त्यांचे मित्र सांगतात, ‘आम्ही मनाने खचलेलो असताना त्यांना भेटायचो. त्यांच्या सहवासात आलो, त्यांच्याशी बोललो की नैराश्य दूर व्हायचे आणि आम्हाला प्रेरणा मिळायची!’.. या प्रेरणादात्याचे नाव एम. पी. अनिल कुमार. भारतीय वायुसेनेतील निवृत्त वैमानिक. दोनच दिवसांपूर्वी, वयाच्या पन्नाशीतच त्यांनी जगाचा निरोप घेतला, पण त्यापैकी २६ वर्षे मानेच्या खालच्या संपूर्ण शरीराला पक्षाघात झालेल्या अवस्थेतही ते असंख्य जणांना प्रेरणा देऊन गेले.  
केरळच्या तिरुवनंतपूरमजवळील सैनिकी शाळेत त्यांनी शिक्षण घेतले, तिथे अभ्यासात आणि खेळातही ते अग्रेसर होते. आपल्या क्षमता सिद्ध करीत खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत छात्र म्हणून दाखल झाले. बाहेर पडले ते वायुसेनेच्या तुकडीतील सवरेत्कृष्ट छात्र म्हणून! ते वायुसेनेत लढाऊ विमानाचे वैमानिक बनले. पठाणकोट येथील तळावर असताना रस्ते अपघातात त्यांच्या बहुतांश शरीरातील चैतन्य हरपले. हात-पाय हलवता येत नाही, केवळ मानेच्या वरच्या भागाची हालचाल करता येते. हे घडले तेव्हा त्यांचे वय होते २४ वर्षे!
तरुण वयात, यशस्वी आयुष्याचे स्वप्न दिसत असतानाच हा आघात झाला.. पुढे ‘व्हीलचेअर’वरचे जगणे अन् संपूर्ण परावलंबित्व. खडकी येथील ‘पॅराप्लेजिक रीसर्च सेंटर’ हेच त्यांचे घर बनले. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. अशाच अवस्थेत त्यांनी लिहायचा प्रयत्न सुरू केला. लिहायचे कसे? तोंडात पेन धरून अथक प्रयत्नांनंतर ते लिहू लागले. मित्रांशी पत्राने संपर्क साधू लागले. मग जीवनात परिवर्तन घडले. हळूहळू चित्रसुद्धा काढू लागले. प्रयत्न सुरू केल्यावर त्यांना त्या दृष्टीने इतरही मदत मिळत गेली. त्यांच्या शाळेच्या मित्रांनी त्यांना खास अ‍ॅम्ब्युलन्स भेट दिली. त्यातून ते जवळपास फिरू लागले. लोकांना भेटू लागले. व्याख्याने देऊ लागले. पुढे त्यांनी ‘चेअरबोर्नवॉरियर’ या नावाने स्वतंत्र ब्लॉग सुरू केला. त्यात एनडीएमधील दिवस, क्रिकेट, विविध अनुभव यांवर लिहू लागले.. सर्व लेखन प्रेरणादायी, निराशेचा लवलेशही नाही. त्यामुळेच तर शारीरिकदृष्टय़ा ते असे परावलंबी असतानाही त्यांचे मित्र नैराश्य घालवण्यासाठी त्यांना भेटायला यायचे. अगदी नियमितपणे.
अनिल कुमार यांच्यावरील धडा बालभारतीच्या दहावी इंग्रजीच्या पुस्तकात आहे. त्याच्यामुळे आणि त्यांच्या इतर लेखनामुळे असंख्य मुलांना प्रेरणा मिळाली आहे. ते गेले तरी पुढच्या काळातही पुढची कित्येक वर्षे लक्षात राहतील, त्यांची जिद्द पुढेसुद्धा प्रेरणा देत राहील हे निश्चित!