कर्करोग आनुवंशिक असतो असे विधान त्यांनी केले तेव्हा इतर वैज्ञानिकांनी त्यांना वेडय़ात काढले, पण त्या वेळी कर्करोग आनुवंशिक असू शकतो, त्याचा जनुकांशी संबंध असू शकतो असा चौकटीबाहेरचा विचार कुणी केला नव्हता. १९६०च्या सुमारास हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्राध्यापक डॉ. फ्रेडरिक पाय ली यांनी तो केला आणि अभ्यासान्ती सिद्धही केला. त्यामुळे कर्करोग व जनुकशास्त्र यांच्यातील संबंध जोडणारा वैज्ञानिक म्हणून त्यांचे नाव झाले. अमेरिकेतील पाच टक्केकर्करोग आनुवंशिक असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अलीकडेच अमेरिकेत ब्रूकलिन येथे त्यांचे निधन झाले.
बोस्टन येथील डॅना फॅरबर कॅन्सर इन्स्टिटय़ूटमधून ते ३० वर्षांच्या सेवेनंतर २००८ मध्ये निवृत्त झाले. १९६० मध्ये त्यांनी जोसेफ एफ .फ्रॉमेनी यांच्यासह राष्ट्रीय कर्करोग संस्थेत संशोधन केले. त्यात त्यांना असे आढळून आले की, त्यांनी संशोधनासाठी निवडलेल्या कुटुंबांपैकी चार कुटुंबांत कर्करोग पिढय़ान्पिढय़ा चालत आलेला होता. तो कुठल्या अवयवाला झाला एवढाच फरक . एकच जनुक त्या कुटुंबात कर्करोगास कारण ठरत आहे. ‘अ‍ॅनल्स ऑफ इंटरनल मेडिसिन’ या नियतकालिकात १९६९ मध्ये हे संशोधन ‘फॅमिलियल सिंड्रोम?’ नावाने प्रसिद्ध झाले. ली यांनी मुद्दाम त्यांना प्रश्नचिन्हाचा आग्रह धरला, कारण अचूकता हा वैज्ञानिकाचा स्थायीभाव त्यांच्याकडे होता. आनुवंशिक कर्करोग असलेली आणखी कुटुंबे संशोधनात दिसून आली. नंतर मात्र या स्थितीला ‘ली-फ्रॉमेनी लक्षणसमूह (सिंड्रोम)’ असे नाव दिले गेले. कर्करोग आनुवंशिक आहे हे त्यांना कळले होते, पण त्याला कारण ठरणारा जनुक सापडत नव्हता. १९९० मध्ये धोकादायक जनुके ओळखण्याचे तंत्रज्ञान विकसित होताच कर्करोगाला कारण ठरणारा टीपी ५३ हा जनुक ली व फ्रॉमेनी यांनी ओळखला. आता स्तनाच्या कर्करोगास कारण ठरणारा ‘ब्रॅका’ हा जनुक शोधण्यात आला आहे.
ली यांचा जन्म ७ मे १९४० रोजी चीनमधील ग्वांग्झूयेथे झाला. वयाच्या सातव्या वर्षी ते कुटुंबीयांसमवेत अमेरिकेत आले. न्यूयॉर्क विद्यापीठातून पदवीधर झाले. रॉचेस्टर स्कूल ऑफ मेडिसिन या संस्थेतून ते वैद्यकशास्त्रात पदवीधर झाले. ‘हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’ या संस्थेतून ते पीएच.डी., नंतर त्याच संस्थेत ते प्राध्यापक झाले. ‘कॅन्सर एपिडिमिऑलॉजी बायोमार्कर्स अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन’ या नियतकालिकाचे ते संपादक, तर ‘कॅन्सर रिसर्च’ अभ्यासपत्रिकेचे सहायक संपादक होते. ली यांना ‘एएसीआर-रिचर्ड अ‍ॅण्ड हिंडा रोसेंथाल’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.