गॉर्डन थॉमस हा मोसाद या गुप्तहेर संघटनेचा विशेष अभ्यासक. १५ र्वष अथक अभ्यास करून लिहिलेलं त्याचं ‘गिडॉन्स स्पाइज : द सीक्रेट हिस्टरी ऑफ मोसाद’  हे पुस्तक अतिभन्नाट आहे. मोसादनं कुठे काय काय उपद्व्याप केलेत त्याचा चविष्ट आणि रसाळ तपशील या पुस्तकात एकत्रितपणे मिळतो. हे पुस्तक इतकं भारी आहे की एक ओळ आणि एक मिनिटही त्याचा कंटाळा येत नाही की ते खाली ठेववत नाही.

पॅरिसच्या आलिशान रिट्झ हॉटेलात मॉरिस अनेकदा गेलाय. फ्रान्सच्या राजधानीत येणारे देशोदेशींचे अनेक मान्यवर, राष्ट्रप्रमुख आणि असेच कोणी कोणी बडे या हॉटेलात येत असतात. नंतर तर हे हॉटेल मोहम्मद फाहद यांनी विकत घेतलं. त्यानंतर त्याचं बातमीमूल्य इतकं वाढलं की, काय विचारायलाच नको. पश्चिम आशियातले अनेक तेलसम्राट याच हॉटेलात येऊन राहायचे. राहतातही. म्हणून तर या हॉटेलचं माहात्म्य लक्षात घेऊन मॉरिस या हॉटेलशी, तिथल्या कर्मचाऱ्यांशी दोस्ताना वाढवत होते. त्याच कामावर त्यांना अधिकृतपणे पाठवण्यात आलं होतं.
कोणी?
तर मोसादनं. थंड डोक्यानं वाटेल ती कामगिरी वाटेल त्या मार्गानं तडीस नेण्यासाठी विख्यात असलेल्या इस्रायलच्या मोसाद या संघटनेचे मॉरिस हे अधिकारी. आता या हॉटेलची कामगिरी मोसादसाठी का महत्त्वाची? तर या हॉटेलात अरब जगातले अनेक नेते उतरत. त्यामुळे इथे आले की त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं, ते राहात असलेल्या खोल्यांत गुप्तपणे संभाषण नोंदवणारी यंत्रं बसवणं, छुपे कॅमेरे बसवणं वगैरे अनेक उद्योग मोसादला करावे लागायचे. त्यामुळे या हॉटेलातला कर्मचारी वर्ग फितूर करणं ही मॉरिस यांची जबाबदारी. तेव्हा त्यांचं तिथं येणं-जाणं वरचेवर व्हायचंच.
यातूनच त्यांना आपल्या उद्योगांत मदत करेल असा एक तगडा गडी मिळाला. त्याचं नाव हेन्री पॉल.
हा रिट्झच्या सुरक्षा यंत्रणेचा उपप्रमुख. त्यामुळे हॉटेलात त्याला सर्वत्र संचार मुक्त असतो. मग ते खोल्या असोत वा पाहुण्यांच्या फोनचा तपशील. हेन्रीला काहीही मिळवण्याचे अधिकार असतात. त्यामुळेच तो मोसादला हवा असतो. तो पटावा यासाठी बरेच प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे मॉरिस यांची माणसं त्याच्यावर कित्येक महिने नजर ठेवून होती. त्याला न्याहाळत होती. त्याची प्रत्येक चाल.. तो कुठे मद्य पितो, राहतो कुठे, अविवाहितच दिसतोय.. वगैरे बारीकसारीक तपशिलासह नोंदली जात होती. त्यात मोसादला एक गोष्ट आढळली. ती म्हणजे हेन्री वर्तमानपत्रांच्या, टीव्ही वाहिन्यांच्या छायाचित्रकारांना हॉटेलातली गुप्त माहिती पुरवायचा. म्हणजे कोण खास पाहुणा कधी येणार आहे ते तो त्यांना सांगायचा आणि या पापाराझींकडून चोरून पैसे मिळवायचा. आणि दुसरं एक होतं. ते म्हणजे, हॉटेलात कोणी अतिमहनीय व्यक्ती निवासाला असेल तर पॅरिसमध्ये त्यांच्या मोटारीचं सारथ्य हेन्रीकडे असायचं. त्यामुळे तर तो अधिकच महत्त्वाचा. कारण गाडीत ही माणसं काय बोलतायत, तेही त्याच्या कानावर पडत असणार. ती माहितीही तो विकत होता का?
तेव्हा मग हा तपशील मोसादच्या मनोव्यापारतज्ज्ञाकडे गेला. या माहितीचं विश्लेषण करून त्या आधारे हेन्रीचं व्यक्तिमत्त्व कसं असेल याचा अंदाज आला. त्याला फोडायचं तर काय करावं लागेल हे त्यावरून समजलं. या तज्ज्ञाचा अहवाल आला आणि मॉरिसची खात्री होते. हेन्रीविषयीचा आपला आडाखा अचूक आहे. हा फुटू शकतो. त्यानंतर मॉरिसनं हेन्रीभोवतीचं आपलं जाळं हळूहळू आवळलं. रोजच्या त्याच्या मद्याची व्यवस्था करणं, त्याला पैसे पुरवणं, आणखी काही लागेल ते पुरवणं वगैरे सर्व सरबराई मोसादतर्फे अगदी व्यवस्थितपणे केली गेली आणि अखेर हेन्री अलगदपणे मोसादच्या जाळ्यात अडकला. लवकरच त्याच्याकडनं माहिती मिळाली.
ब्रिटनची भावी महाराणी डायना तिच्या तत्कालीन प्रियकराबरोबर, दोदी अल फाहद, याच्याबरोबर पॅरिसला येणार होती आणि या जोडीचं वास्तव्य रिट्झमध्ये असणार होतं. ते ऐकल्यावर मोसादचे कान टवकारले. एव्हाना हेन्री मोसादच्या हाती पूर्णपणे आलेला असतो. तेव्हा लेडी डायना आणि दोदी यांचं सगळं संभाषण.. अगदी प्रेमालापासह.. मोसादच्या हाती पडणार असतं. हे दोघे जिथे जिथे जातील तिथली बित्तंबातमी मिळणार असते. ती मिळतेही. पण ही माहिती प्रत्यक्ष फोडल्यानंतर आपण हे करतोय याचं इतकं दडपण हेन्रीवर येतं की तो दारूच्या आहारी जातो. रक्तदाबाच्या गोळ्या घ्यायला लागतो आणि त्या दबावाखाली तो अखेर मोडून पडतो. शेवटी मागे लागलेल्या छायाचित्रकारांच्या गराडय़ातून सुटण्याच्या नादात इतक्या वेगात डायना आणि दोदी यांची मोटार त्याच्याकडून अशी चालवली जाते की त्याचं मोटारीवरचं नियंत्रण सुटतं आणि अखेर गाडी रस्त्याच्या कडेला भिंतीवर आपटते. डायना, दोदी आणि हेन्री तिघेही त्या अपघातात मरतात. पण प्रश्न असा की ही घटना खरंच इतकी सरळ, सोपी होती?
परवाच बातमी आली. ब्रिटनच्या युवराज्ञी लेडी डायना यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी केली जाणार असल्याची. त्या बातमीत म्हटलं होतं की स्कॉटलंड यार्डसमोर या हत्येसंदर्भात काही माहिती नव्यानं आलेली आहे आणि तिच्या आधारे ते लेडी डायना यांच्या हत्येसंदर्भात काही गोष्टी पुन्हा तपासून पाहणार आहेत. ती वाचली आणि त्याच वेळी काही वर्षांपूर्वी.. २००७ साली वाचलेल्या अप्रतिम पुस्तकाची आठवण झाली. ताज्या बातमीनंतर लगेच ते फडताळातनं काढलं आणि पुन्हा नव्यानं चाळलं.
गिडॉन्स स्पाइज हे त्याचं नाव. लेखक गॉर्डन थॉमस हा इस्रायलच्या मोसाद या गुप्तहेर संघटनेचा विशेष अभ्यासक. जवळपास १५ र्वष अथक अभ्यास करून लिहिलेलं त्याचं हे पुस्तक अतिभन्नाट आहे. ते न वाचता राहताच येणार नाही, इतकं मोठं काम या पुस्तकानं केलंय. ‘गिडॉन्स स्पाइज : द सीक्रेट हिस्टरी ऑफ मोसाद’ असं या पुस्तकाचं पूर्ण नाव. १९५१ साली स्थापन झाल्यापासून मोसादनं कुठे काय काय उपद्व्याप केलेत त्याचा चविष्ट आणि रसाळ तपशील या पुस्तकात एकत्रितपणे मिळतो. म्हणजे जवळपास ६१५ पानांचं हे पुस्तक इतकं भारी आहे की एक ओळ आणि एक मिनिटही त्याचा कंटाळा येत नाही की ते खाली ठेववत नाही. त्यातले काही काही तपशील तर अचंबित करणारेच आहेत. त्यातलाच एक म्हणजे अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या मोनिका ल्युइन्स्की प्रकरणाची साद्यंत कथा अमेरिकी चौकशी यंत्रणांच्या हाती लागण्याआधी मोसादकडे होती. म्हणजे मोसाद या प्रकरणात किती खोलवर गेली होती? तर मोनिका आणि क्लिंटन यांच्या प्रेमकूजनाचं तब्बल ३० तास भरतील इतकं रेकॉर्डिग मोसादकडे होतं. म्हणजे या दोघांचे फोन चोरून ऐकायची व्यवस्था मोसादनं केली होती. व्हाइट हाऊसमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनादेखील मोसादनं फितवलं होतं आणि त्यातल्या मेगा या सांकेतिक नावाच्या हेरानं ही गुप्त कामगिरी केली होती.
कशासाठी?
तर पश्चिम आशियाच्या शांतता प्रक्रियेत क्लिंटन यांच्यावर दबाव आणण्यासाठी इस्रायलला ही माहिती हवी होती. म्हणजे ब्लॅकमेलिंगच ते.  हे जेव्हा उघड झालं तेव्हा अर्थातच अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांनी अशी काही हेरगिरी केल्याचं नाकारलं. पण ते तसं ठीकच. कारण कोणताच देश.. आणि त्यात इस्रायल तर नाहीच नाही.. आपण असं काही केल्याचं मान्य करणार नाही. अशा अनेक हेरगिरी प्रकरणांचा खमंग तपशील या पुस्तकात आहे. ज्यांना मोसादबद्दल कुतूहल आहे, त्यांना तर आवडेलच. पण ज्यांना आंतरराष्ट्रीय घटनांत रस आहे, त्यांनाही तो उपयुक्त वाटेल.
जवळपास १५ र्वष खपून गॉर्डन यानं हे पुस्तक लिहिलंय. पत्रकार आहे तो. त्यामुळे बातमीचा वास काढत गेलं की बरंच काही हाती लागतं हे त्याला माहिती आहे. तेच त्यानं केलं आणि त्याचं झकास असं पुस्तक केलं.
पुढच्याच शनिवारी, म्हणजे ३१ ऑगस्टला, डायना गेली त्याला बरोबर १६ र्वष होतील. ३१ ऑगस्ट ११९७ हा तिचा आणि दोदीचा.. अर्थात हेन्रीचाही.. अपघातवार. आता १६ वर्षांनंतर तिच्या मृत्यूची नव्यानं चौकशी करण्याची गरज ब्रिटिश गुप्तहेरांना वाटली याचाच अर्थ गॉर्डनच्या लिखाणात तथ्य आहे.
डायनाच्या मृत्यूची चौकशी नव्यानं होणार असल्याच्या बातम्या आल्या म्हणून हे सांगण्याचं महत्त्व. वास्तव हे बऱ्याचदा कथा आणि दंतकथांच्या बेचक्यात असतं. गॉर्डनसारखे लेखक ते चिमटीत धरून बाहेर काढतात. कसं? ते वाचायलाच हवं.
                                   

*गिडॉन्स स्पाइज : द सीक्रेट हिस्टरी ऑफ द मोसाद
गॉर्डन थॉमस
*प्रकाशक  : थॉमस डन बुक्स, न्यूयॉर्क
*पृष्ठे : ६१६  ’किंमत : १४.१५ डॉलर.