26 February 2021

News Flash

८५. मुख्य धंदा आणि जोडधंदा

देहानं प्रयत्न करताना मन भगवंताकडे ठेवलं तरी हरकत नाही, देहानं नोकरीधंदा करावा, भौतिक सावरण्याचा प्रयत्न करावा पण मन मात्र भगवंताकडे ठेवावं, असं श्रीतुकाराम महाराज ‘एक

| May 1, 2013 02:46 am

देहानं प्रयत्न करताना मन भगवंताकडे ठेवलं तरी हरकत नाही, देहानं नोकरीधंदा करावा, भौतिक सावरण्याचा प्रयत्न करावा पण मन मात्र भगवंताकडे ठेवावं, असं श्रीतुकाराम महाराज ‘एक मन तुझ्या अवघ्या भांडवला। वांटितां तें तुला येईल कैसें।। १।। म्हणउनि दृढ धरीं पांडुरंग। देहा लावीं संग प्रारब्धाचा।। २।।’ या ओव्यांतून सांगतात. श्रीगोंदवलेकर महाराज यांचेही एक वाक्य आहे, ‘‘शरीराने धंदा कुठेही करावा. मन कुठे ठेवायचे हा महत्त्वाचा प्रश्न आहे’’(बोधवचने, क्र. २१६). समजा एके ठिकाणी खड्डा खणायचा आहे आणि तेथे गुप्तधनही आहे. खड्डा खणत असताना त्या क्रियेत मनाच्या गुंतण्याची काय गरज? मन त्या क्षणी भगवंताकडे लागले आहे, मनात त्याचे स्मरण सुरू आहे आणि एकीकडे देहप्रयत्नांनी खड्डा खणलाही जात आहे. खड्डा खणण्याचे काम थांबलेले नाही. तर मग एक वेळ अशी येईलच की गुप्तधनाचा हंडाही हाती लागेल. म्हणजेच देहाच्या आधारे भौतिकात प्रयत्न करीत असताना त्यात मनाच्या गुंतण्याची काही गरज नाही. त्या प्रयत्नांतूनदेखील भौतिक सांभाळले जाईलच पण त्याचवेळी मनाने मात्र भगवंताचे स्मरण सांभाळले पाहिजे. मनाचे भांडवल त्याच उद्योगात गुंतवले पाहिजे. श्रीतुकाराम महाराज सांगतात, ‘‘आणिक संकल्पा नको गोऊं मन। तरीच कारण साध्य होय।। ३।। तुका म्हणे ऐसें जाणावें उचित। तरी सहजस्थित येईल कळों।। ४।।’’ भौतिकातील प्रगतीसाठी देहाला प्रयत्नांमध्ये जुंपून टाका पण मन मात्र केवळ भगवंताच्या संकल्पात गोवून टाका. भगवंताच्या स्मरणाच्या एकमात्र संकल्पात मन जर गोवलं गेलं तरच ज्या कारणासाठी म्हणजे आत्मकल्याणासाठी ते मन केंद्रित झालं आहे ते कारण, ते आत्मकल्याण सहजसाध्य होईल. जर हे साधलं तर सहजस्थिती लख्खपणे उमगेल. त्या सहजस्थितीत मन सदोदित राहून परमात्मप्राप्ती करू शकेल. याचसाठी श्रीमहाराज सांगतात की भगवंत मिळवणे, हे आपलं मुख्य काम आहे. तेव्हा भगवंताच्या प्राप्तीसाठीचे प्रयत्न हा आपला मुख्य उद्योग हवा आणि प्रपंच हा जोडधंदा! श्रीमहाराजांनीच ही रूपकं वापरली आहेत. एखादा उद्योगपती मुख्य धंद्याबरोबरच जोडधंदाही करतो. पण हा जोडधंदा त्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा नसतो.  मुख्य धंद्यातील लाभ-हानीबाबत तो अत्यंत जागरूक असतो पण जोडधंद्यातील फायद्याने तो फार शेफारून जात नाही की त्यातील तोटय़ाने तो उन्मळून पडत नाही. उलट जर जोडधंदा अधिक वेळ खाऊ लागला आणि फारच तोटय़ात असला तर तो जोडधंद्यातलं आपलं लक्ष काढून घेतो. प्रसंगी जोडधंदाही मोडीत काढतो. ‘पैसा मिळविणे हे हलक्या माणसाचे काम आहे, आपले खरे काम भगवंत मिळविणे आहे,’ असं श्रीमहाराज जेव्हा सांगतात तेव्हा त्यांना प्रपंच आणि परमार्थाची आमची आजची जी मांडणी आहे, तिला धक्का द्यायचा आहे. आज आम्ही प्रपंचाला मुख्य धंदा मानतो आहोत आणि परमार्थ हा जोडधंदा झाला आहे. हे चित्र बदलावे आणि परमार्थ हा मुख्य उद्योग व्हावा, यासाठी आपलं खरं काम काय आहे, याबद्दल महाराज जागं करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2013 2:46 am

Web Title: main business and sub business
Next Stories
1 ८४. भांडवल
2 ८३. अग्रक्रम
3 ८२. रोख
Just Now!
X