News Flash

२३. माउली

कर्मेद्रच्या बोलण्यावर, विशेषत: ‘कावळ्याचा जीव’ या शब्दप्रयोगावर सर्वचजण मोकळेपणानं हसले. याच शब्दाचा धागा पकडत हृदयेंद्र म्हणाला..

| February 3, 2015 01:01 am

कर्मेद्रच्या बोलण्यावर, विशेषत: ‘कावळ्याचा जीव’ या शब्दप्रयोगावर सर्वचजण मोकळेपणानं हसले. याच शब्दाचा धागा पकडत हृदयेंद्र म्हणाला..
हृदयेंद्र – खरंच साधनपथावरील या अंत:करणरूपी कावळ्याचा जीव लहानच असतो. वासनेशी निगडित तीन चक्रांतून वर जाणारा हा साधक आताशी कुठे उंबरठय़ावर आला असतो.. गंमत पहा हं, लहान मूल घराचा उंबरठा ओलांडून स्वत:च्या पायांनी जसजसं बाहेरच्या जगात जाऊ लागतं आणि त्याचं वय वाढू लागतं तेव्हा त्याची समज वाढत जाते, असं लोकही समजतात. इथे उलटं आहे. बाहेरच्या जगातली भटकंती थांबवून तिथली समज उंबरठय़ाबाहेरच ठेवून उंबरठा ओलांडून घरात येऊन पुन्हा मूल बनायचं आहे! जसजशी खरी प्रामाणिक साधना होऊ लागते ना, तसतसा हा साधक अर्भकवतच तर बनतो! मूल जसं आईवरच अवलंबून असतं ना, तिच्याशिवाय त्याला दुसरा आधार नसतो ना, तसं मूल झाल्यावरच सद्गुरूमाउलीचं दिव्य प्रेम मिळतं! जाणते लेकरू माय लागे दूरी धरू.. म्हणून महाराज मला अजाणच ठेवा, तुमच्या कडेवरच ठेवा.. खरंच अशी ज्याची वृत्ती होते ना, त्याचंच हृदय त्यांच्या प्रेमानं भरून जातं.. (हृदयेंद्र भान हरपून म्हणाला..) हे अंत:करणरूपी कावळ्या.. जन्मभर तू कचराच चिवडलास.. आता तुला तृप्तीची गोडी हवी आहे ना? मग खऱ्याखुऱ्या आत्मतृप्त सद्गुरूंकडेच गेलं पाहिजे.. अरे ती माउली आहे. माय जशी लेकराला छातीशी धरते, त्याला दूध पाजते, तशी ही सद्गुरूमाय बोधामृत पाजेल. म्हणून माउली म्हणतात, ‘दुधे भरूनी वाटी लावीन तुझे वोठीं’!
ज्ञानेंद्र – ओहो!
हृदयेंद्र – मला आठवलं, मी गोंदवल्यास जात असे. श्रीमहाराजांच्या समाधीवर गोपाळकृष्णाचं मंदिर आहे. कृष्णाच्या अत्यंत देखण्या मूर्त्यां अनेक ठिकाणी पाहिलेल्या. ही मूर्ती मात्र का कोण जाणे देखणी भासत नव्हती.. या गोपाळकृष्णाचं नाक थोडं जाडसर, चेहरा चौकोनी.. तेव्हा मी भाऊंकडेही जात असे..
योगेंद्र – पेणजवळच्या खेडय़ात राहायचे तेच ना?
हृदयेंद्र – हो.. साक्षात्कारी संतच ते.. त्यांना भेटायला गेलो होतो, त्यांना द्यायला म्हणून महाराजांचं प्रवचने हे पुस्तक पण घेतलं होतं. माझ्या मनात मात्र गोंदवल्याचा समाधीवरचा कृष्ण असा का, हा बालीश प्रश्न होता.. त्यांनी पुस्तक उघडलं तर गोपाळकृष्णाचं छायाचित्र असलेलं पान आलं. एकदम म्हणाले, ‘‘अरे हे तर महाराजांचे सद्गुरू तुकामाई!’’ मला फार आश्चर्य वाटलं, तर त्याच पुस्तकातलं तुकामाईंचं छायाचित्र त्यांनी समोर धरलं. म्हणाले, ‘‘पहा तुकामाईंचा आणि कृष्णाचा चेहरा किती मिळताजुळता आहे! महाराजांना तुकामाईंचं प्रथम दर्शन झालं ना, ते कृष्णरूपातच असावं..’’ मग म्हणाले, ‘‘पहा तुकामाईंनी स्तनाशी कुत्र्याचं पिल्लू धरलं आहे!’’ मला आणखीनच आश्चर्य वाटलं. पुरुषाला स्तन कुठला? तर माझ्या मनातला भाव जाणून ताडकन म्हणाले, ‘‘अरे त्यांच्या नावातच माय आहे ना? आपण कुत्री आहोत, पण त्यांनी कुत्र्याला नव्हे, पिल्लाला छातीशी धरलंय! कुत्रा असतो ना, तो स्वत:चा इलाखा स्वत:च ठरवतो. त्या इलाख्यात कुणी बाहेरचा आला की लागला भुंकायला.. तसं ‘माझं माझं’ करत आपण भुंकतोच आहोत.. पिल्लू अजाण असतं.. तसं पिल्लू बनून.. मूल बनून गेलात तर माउलीचं रूप दिसेल.’’
ज्ञानेंद्र – वा.. फार विलक्षण..
हृदयेंद्र – मग ज्ञानेश्वरी वाचताना तर आणखी ठसलं हे सारं.. बाराव्या अध्यायाच्या सुरुवातीला तर कमालच आहे.. सद्गुरूंना नव्हे, नुसत्या त्यांच्या कृपादृष्टीला माउलीची उपमा दिली आहे ज्ञानेश्वरमहाराजांनी! हे माते मूलाधाराच्या मांडीवर तू आम्हाला खेळवतेस आणि हृदयाकाशाच्या पाळण्यात झोके देतेस.. मग म्हणतात, ‘सतरावियेचे स्तन्य देसी। अनाहताचा हल्लरू गासी। समाधिबोधे निजविसी। बुझाउनि।।’ सोळावी कला पूर्णत्वाची म्हणतात ना? तू तर पुढच्याही कलेचं अमृतपान करवतेस आणि अनाहताची अंगाई गात समाधीसुखात निजवतेस.. म्हणून तुझी सावली कधीच सोडणार नाही! सद्गुरूंच्या कृपाछायेतच पूर्ण आराम आहे. या कृपाछायेतून तसूभरही दूर जाऊ नका, हे आमच्या चित्तावर बिंबवण्यासाठीच गोंदवलेकर महाराजही कृष्णरूपी तुकामाईंच्या छायेत समाधीस्थ आहेत!
चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2015 1:01 am

Web Title: mauli 2
टॅग : God
Next Stories
1 २२. हृद्-गत!
2 २१. हृदयातुर
3 २०. दहीभाताची गोडी
Just Now!
X