News Flash

झोपी गेलेला ‘जागता पहारा’!

एखादा गुन्हा घडल्यानंतर शिताफीने गुन्हेगारांना जेरबंद करून पाठ थोपटून घेणाऱ्या सुरक्षा यंत्रणा गुन्हे रोखण्यासाठी मात्र पुरेशा प्रशिक्षित वा सक्षम नाहीत

| August 30, 2013 01:02 am

एखादा गुन्हा घडल्यानंतर शिताफीने गुन्हेगारांना जेरबंद करून पाठ थोपटून घेणाऱ्या सुरक्षा यंत्रणा गुन्हे रोखण्यासाठी मात्र पुरेशा प्रशिक्षित वा सक्षम नाहीत, हे गेल्या दोन दशकांतील अनेक घटनांवरून स्पष्ट झाले आहे. अतिरेकी हल्ल्यासारख्या भीषण गुन्हेगारी कारवाया असोत किंवा जलप्रलयासारख्या नैसर्गिक आपत्ती असोत, असे प्रकार मुळात घडूच नयेत, यासाठी फारशी सतर्कता सुरक्षा यंत्रणांकडे असल्याचे जाणवतच नाही. असे काही घडून गेले, की मग मात्र या यंत्रणा जोमाने कामाला लागतात, असेच नेहमी दिसते. नंतर टीकेचे भडिमार झाल्यानंतर पुन्हा जाग आल्याचा आव आणला जातो आणि सुरक्षा व्यवस्था कडक केल्याचेही भासविले जाते. बॉम्बस्फोट झाल्यानंतर रेल्वे स्थानकांसारख्या गर्दीच्या ठिकाणी धातुशोधक चौकटी बसविल्या जातात, पोलिसांची चौकी उभी राहते आणि वर्दीधाऱ्यांची गर्दीही दिसू लागते. या चौकटी पार करताना होणाऱ्या आवाजामुळे सुरक्षा यंत्रणा जाग्या झाल्या आणि त्यांनी कुणी गुन्हेगार पकडला असे एखादे उदाहरण मात्र कुणालाच आठवणार नाही. आयत्या वेळी चालू स्थितीत असतीलच याची हमी नसलेली जुनाट हत्यारे घेतलेले पोलीस निवांत गप्पांमध्ये रमलेले दिसतात. वर्दीधारी रक्षकांची गर्दी आणि तकलादू धातुशोधक चौकटी हीच आपली कडेकोट सुरक्षेची कल्पना असेल, तर ती कशी फोल आहे, याचे उदाहरण मुंबई महापालिकेतील ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेमुळे जिवंत झाले आहे. मुंबईतील हजारो नागरिकांची या वास्तूमध्ये येजा सुरू असते. इमारतीच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर आणि प्रत्येक मजल्यावर वर्दीधारी रक्षक उभे असतात आणि धातुशोधक चौकटी, स्कॅनरसारखी अत्याधुनिक यंत्रणाही सज्ज असते. या पोकळ सुरक्षेचे पितळ पोलिसांनीच उघडे पाडले आहे. पालिका मुख्यालयाच्या चारही प्रवेशद्वारांमधून आत घुसलेल्या साध्या वेशातील त्या पोलीस कर्मचाऱ्यांकडे रिव्हॉल्व्हर होती, शस्त्रे होती आणि बॉम्बदेखील होते. पण प्रवेशद्वारावर त्यांना कुणीच हटकले नाही किंवा त्यांच्याकडील या स्फोटक सामग्रीची दखलही घेतली नाही. जेथे जेथे सुरक्षा रक्षक तैनात असतात, त्या सर्व भागांत फिरूनही कुणीच न हटकल्याने अखेर कंटाळून या कर्मचाऱ्यांनी पालिका आयुक्तांचे दालन गाठले आणि आपल्याकडील स्फोटके त्यांच्यासमोर ठेवली. तेव्हा आयुक्तांची अवस्था काय झाली असेल, याची कल्पना करणे मोठे मनोरंजक ठरू शकते. हे साध्या वेशातील पोलीस आहेत, हे समजल्यावर कदाचित आयुक्त काहीसे सावरले असतील, पण पालिकेच्या सुरक्षेचे धिंडवडे निघाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरदेखील, त्यांचा पांढराफटक पडलेला चेहरा पूर्वपदावर आला असेल का, याचीही कल्पना करणे रंजकच ठरेल. मुंबई व परिसरात दहशतवादी आणि गुन्हेगारी संकटांचे सावट गडदपणे वावरत आहे हे वारंवार स्पष्ट होत असतानाच महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेचे असे धिंडवडे निघाले आहेत, ही बाब चिंताजनक आहे. केवळ वर्दीधारी रक्षकांची गर्दी आणि निकामी हत्यारे, केवळ आवाज करणाऱ्या धातुशोधक चौकटींचे देखावे एवढे आता पुरेसे नाही. गुन्हेगारी विश्व नवनव्या तंत्रांचा अवलंब करीत असताना, झोपी गेलेले असे पहारे समाजाचे संरक्षण करण्यात कुचकामी ठरतील आणि अप्रिय घटना घडल्यानंतर मात्र आपत्ती निवारणाची धावपळ करून कौतुक करून घेतील. जागे असल्याचे सोंग पुरेसे नाही, तर खरोखरीच जागे राहण्याची वेळ आली आहे, हे या यंत्रणांना कधी समजणार?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2013 1:02 am

Web Title: mumbai municipal corporation weak security system
टॅग : Bmc
Next Stories
1 नट की सम्राट?
2 पोपटाची फडफड पिंजऱ्यापुरतीच?
3 ‘राजयोग’ की ‘काम’योग?
Just Now!
X