मा. गृहमंत्री आर. आर. पाटीलसाहेब. आपल्या पोलीस खात्याकडचे चारित्र्य प्रमाणपत्र नोकरीसाठी हवे होते. त्यासाठी पुणे पोलीस मुख्यालय व दोन पोलीस ठाण्यांना दोन आठवडे चकरा मारल्या.
ते जेव्हा बोलावतील तेव्हा ठाण्यात जात होतो. कधी साहेब नाहीत, कधी साहेब आहेत पण कामात आहेत, कधी बंदोबस्तावर, आज व्हीआयपींचा दौरा आहे, आज सुट्टी आहे अशी अनेक उत्तरे या कालावधीत मिळत होती. दिवसातून तीन वेळा बोलावण्यात येत होते. पण काम काही होत नव्हते. विनंती, आर्जव असे सगळे काही करून झाले. विनवणीच्या भाषेचा पोलिसांना राग येत असावा. त्यामुळे त्यांचे कडू बोल ऐकून घ्यावे लागले.
बरोबर असलेल्या वडिलांनाही त्यांनी विनाकारण दरडावले, त्यांचा अपमान केला. तेव्हा मात्र वाईट वाटले. पण नोकरीसाठी हे सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता. आपण दोन आठवडे चकरा मारायला लावतोय, याचे त्यांना काहीच वाटत नव्हते. चारित्र्य प्रमाणपत्राअभावी नोकरी जाणार असे वाटू लागले. अखेर एक हजार रुपये मोजून हे प्रमाणपत्र मिळाले. काही कारण नसताना पसे मोजावे लागले याचे वाईट वाटले.
माझ्यासारख्या अनेकांना ते द्यावे लागले. पुणे महापालिकेत नुकतीच सुमारे दीडशे परिचारिकांची भरती झाली. त्यांनाही असेच रडकुंडीला आणून त्यांच्याकडून पसे घेऊन अखेर प्रमाणपत्रे देण्यात आली. पोलीस मुख्यालयातील हा भ्रष्टाचाराचा प्रकार अनेक  युवक-युवतींना नवा होता. त्यामुळे त्यांच्यावर ‘पांढरे’ होण्याची वेळ येत होती.
आबा, चारित्र्य प्रमाणपत्रासाठीही लाच द्यावी लागते याची शरम वाटली. आपल्या देशातील ही व्यवस्था कधी सुधारणार? किमान या प्रकरणाची चौकशी तरी करावी.
-एन. एस. चौरे, मंगळवार पेठ, पुणे

यंत्रणा एवढय़ा सक्षम नक्कीच आहेत!
क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक झाल्याची बातमी मंगळवार, १४ जानेवारीस ‘लोकसत्ता’त वाचली. अशा प्रकारे ज्याची फसवणूक झाली आहे, तो ग्राहक अगदी हतबल होऊन जातो. याची तीन प्रमुख कारणे म्हणजे (१) स्थानिक पोलीस ‘एफआयआर’ दाखल करून घ्यायला उदासीन असतात. (२) संबंधित बँकसुद्धा खातेदारावर या गोष्टीचे खापर फोडते व खातेदारानेच ही माहिती पुरवली असेल असे म्हणून मोकळी होते. (३) प्रकरण  बँकिंग लोकपालाकडे (ऑम्बड्स्मन) गेले तरी या परिस्थितीत बदल होत नाही.
सदरहू प्रकरणात जे व्यवहार झाले ते हैदराबाद येथून झाले. आपल्या देशातील पोलीस संगणकाचा आयपी अ‍ॅड्रेस व त्याद्वारे हे ठिकाण शोधून काढण्याइतके नक्कीच सक्षम आहेत. त्यामुळे ही जबाबदारी ग्राहकावर न टाकता बँकेवर टाकावी व सकृद्दर्शनी ग्राहकाची तक्रार योग्य असेल तर त्याला अपहृत रकमेचा परतावा द्यावा. तसेच बँकांनी आपापल्या डेटा सेन्टरमधले किंवा क्रेडिट कार्ड देण्याचे काम ज्या कंपनीवर सोपवले आहे तिचे कर्मचारी सामील नाहीत ना हे पाहणेही आवश्यक वाटते.
अभय दातार, ऑपेरा हाऊस (मुंबई)

चैतन्यरूपी ‘मी’चे भान म्हणजेच ‘ध्यान’
प्रा. श्रीनिवास हेमाडे यांचे ‘तत्त्वभान’ सदरातील लेख सहजसुंदर आहेत. या एकूण विश्वाच्या मुळाशी काय आहे? तर सूक्ष्मातिसूक्ष्म असा केवळ बिंदू आहे. तो साऱ्या विश्वाचा गर्भ-कण आहे. त्याचे अस्तित्व अतक्र्य आहे. तो चेतन बिंदू आहे. तो जेव्हा साकार होत जातो, विश्वातील साऱ्या गोष्टींचे प्रकटीकरण होत जाते. विलक्षण आणि अतक्र्य आविष्करण क्षमतेचा गर्भ हीच ती चेतना.
मनुष्येतर वस्तुविश्वाला जरी जड, अचेतन म्हटले तरी ते फार मर्यादित अर्थाने खरे आहे.कारण जड-विश्वाच्या पसाऱ्यातही अगणित परिवर्तने होत असतात, होत राहतील. हे लक्षात घेतले तर जडामध्येही चेतना आहेच. तर मग जडविश्वापेक्षा मनुष्य कसा वेगळा? तर त्याची चेतना- जाणीव (स्व-बोध, आत्मबोध इ.) स्वरुपात प्रकटते. म्हणजेच ‘भान’ येते.
 प्रा. हेमाडे हे ‘ज्ञानशास्त्रीय चेतना’ अशी संज्ञा वापरतात. ती योग्यही आहे. परंतु, स्थल- कालादिचे भान व जाणीव होणे, हे तर आहेच; पण सत्ताशास्त्रीय विचार असे मानतो की ज्ञानाच्या पलीकडे जे केवळ ‘मी’चे भान म्हणजे आत्मभान असते ते मनुष्य म्हणून पूर्णत्वाचे द्योतक असते. असे केवल चैतन्यरूपी ‘मी’चे भान म्हणजेच ‘ध्यान’.  इथं ध्यान हे पद योग दर्शनातील ध्यान याच्या अर्थाहून वेगळे असते. कारण हे ध्यान सर्व प्रकृति आणि मानस- घटनांपासून भिन्न कोटीतले असते. असे तत्त्व-भान अधिक सरस ठरू शकावे.
प्रा. विजय कारेकर, पुणे</strong>

फसलेले प्रयोग नकोच..
अर्थवांती हे संपादकीय (१४ जाने.) वाचले. योग्य उपाय अधिकाधिक जनता करांच्या परिप्रेक्ष्यात आणण्यातच दडला आहे. करबद्ध लोकांच्या तुलनेत करचोरांची संख्या आपल्या देशात मोठी आहे. कुठलाच कर न भरण्यात धन्यता मानणाऱ्या लाखो व्यावसायिकांना राज्यात विहित व्यवसाय कर भरण्यास जसे कायद्याने बद्ध झालेत, असाच एक वाजवी किमान उत्पन्न कर नोंदणीकृत किरकोळ व्यापारी, प्रतिष्ठाने, वैद्यकीय, तांत्रिक व इतर सेवा क्षेत्रांतील व्यक्तींसाठी निश्चित व्हावा. ज्यायोगे करपात्र उत्पन्न मिळवून आणि कर भरण्याची ऐपत असूनही कर जाळ्यामध्ये न आलेली लोकसंख्या देशाच्या तिजोरीत भर घालण्याचे कर्तव्य पार पाडेल. हा असा ‘आर्थिक राष्ट्रधर्म’ जागवण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी करावा, इतरत्र फसलेल्या प्रयोगाच्या वाटेला जाऊन देशाची वाट लावू नये.
 -गजानन उखलकर

बीभत्स, अश्लाघ्य लिखाणाकडे लक्ष द्या..
फेसबुकच्या माध्यमातून काय चाललेय याकडे कुणाचे लक्ष आहे काय? खबरदार भटांच्या चाटय़ांनो, पोल खोल पोपट, सच्चे ईश्वर की पेहचान, संभाजी ब्रिगेड झंझावात, भटुकडय़ांचा कर्दनकाळ, भटांचा कर्दनकाळ संभाजी ब्रिगेड या आणि अशा अनेक पेजेसमार्फत हिंदू धर्म, ब्राह्मण आणि मराठा ज्ञातीबांधवांवर अत्यंत बीभत्स, अश्लाघ्य लिखाण, कॉमेंट्स होत आहेत.
सत्यनारायण, गणपती, राम, हनुमान, सीता या देवदेवतांवर, रामायण, महाभारत या महान ग्रंथांवर इतके हीन भाषेतून लिखाण होते की वाचतानाही शरम वाटावी, किळस यावी. हे सारे नक्की कोण आणि कशासाठी करीत आहे? शिवकालीन घटनांवर भाष्य करताना कधीही न वाचलेले, न ऐकलेले नवीन पण भयंकर शोध वाचायला मिळत आहेत. इतिहासात जितके कर्तबगार ब्राह्मण होऊन गेले आहेत त्यांना निवडून अश्लाघ्य टीका केली जात आहे. लो. टिळक, डॉ. राधाकृष्णन, संत रामदास, संत ज्ञानेश्वर, म. गांधी अशा अनेकांना अश्लील शिव्या दिल्या जात आहेत. मराठा समाजाला अश्लील शिव्या संबोधने दिलेली पुस्तकेही एस.टी. स्थानकावर विकली जात आहेत. शिवराय, संभाजीराजे, जिजामाता यांच्या नावाने संघटना काढून या महात्म्यांची ज्या दैवतांवर अपार श्रद्धा होती त्यांच्यावरच अश्लाघ्य लिखाण होत आहे. अश्लील कॉमेंट्स करून जय भीम,  जय जिजाऊ अशी घोषणाही दिली जाते. देशातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचे हे कारस्थान तर नाही ना? सतत दंगलींनी बेजार असलेल्या या देशात दंगलींचे नवे समीकरण तयार करण्याचा डाव तर नाही ना? गृहखात्याने याची त्वरित आणि गांभीर्याने दखल घेऊन कडक कारवाई करावी. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर चौकशी समित्या स्थापण्यापेक्षा दुर्घटना घडून पुढे आग धुमसत राहण्याची वाट पाहू नये.     
दिलीपराव पालकर, पनवेल</strong>

ठाण्यातील नेते राडेबाजीतच मश्गूल
ठाण्यात तोडफोडीची बातमी (१४ जाने.) वाचली. राज्यातील राजकारणाचा दर्जा किती खालावत चालला आहे हे ठाण्यातील गेल्या काही महिन्यांतील राजकीय बातम्या वाचल्या की जाणवते. वास्तविक पाहता ठाण्यासारख्या झपाटय़ाने वाढणाऱ्या शहरात नागरीकरणाच्या अनेक समस्या भेडसावत आहेत.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वाहतूक कोंडी, घनकचऱ्याची समस्या, झोपडपट्टय़ा, अपुरा पाणीपुरवठा, अनधिकृत बांधकामे यासारख्या अनेक प्रश्नांनी उग्र रूप धारण केलेले आहे, परंतु ठाण्यातील नेते मात्र राडेबाजीत आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात मश्गूल आहेत.
ठाण्यासाठी एकात्मिक विकासाच्या योजना राबवल्या गेल्या पाहिजेत, याचे भान पालिकेतील वा राज्यात सत्तेवर असलेल्या राजकीय पक्षांना राहिलेले नाही.
– केतन भोसले, ठाणे</strong>