दिल्ली विधानसभेत भाजपला भुईसपाट करणाऱ्या पराभवाचे विश्लेषण करणारा अग्रलेख (११ फेब्रु.) ‘आप’च्या विजयाचे योग्य मूल्यमापन करीत नाही. फक्त भाजपला धूळ चारणे एवढाच मतदारांचा हेतू असता तर काँग्रेस अशी एवढी नामशेष होण्याइतकी नगण्य नव्हती. पण दिल्लीच्या मतदारांनी ‘आप’साठी सकारात्मक मतदान केल्यामुळेच ‘आप’ला असा ‘छप्पर फाडके’ विजय मिळाला हे नि:संशय.
केजरीवाल यांच्यासाठी मात्र पुढील काळ कठीण परीक्षेचा असेल हे त्यांच्यासह सर्वानीच जाणले आहे. स्वस्त वीज, स्वस्त पाणी अशा लोकानुनयी घोषणा करणे सोपे असते. ताळेबंद अवघड असतो. ‘मी बनिया आहे; सरकार तोटय़ात चालवणार नाही’ असे केजरीवाल म्हणाल्याचे प्रसिद्ध झाले असले तरी त्यांच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागेल. प्रशासनातील भ्रष्टाचारापासून मुक्ती हे त्यांच्या प्रमुख आश्वासनांपकी एक, त्यावर त्यांना आता पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल. प्रशासकीय अनुभवामुळे खाबू बाबूंच्या चोरवाटा, पळवाटा त्यांना चांगल्याच ठाऊक असतील. जवळपास अविरोध राजकीय विजयामुळे त्यांना प्रशासकीय सुधारणांकडे पूर्ण लक्ष केंद्रित करताही येईल. त्यामुळेच संपूर्ण देशाचे लक्ष त्यांच्या कारभाराच्या यशाकडे लागलेले असेल. देशभरातील ‘आप’चे समर्थक असोत वा विरोधक, भ्रष्टाचार निर्मूलनासाठी ‘आप’कडे आशेने पाहात आहेत.
बोलल्याप्रमाणे कदाचित वागतीलही असा विश्वास वाटावा असे संपूर्ण देशात आता केजरीवाल हे एकमेव नेते उरले आहेत. (सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मोदींबद्दल असेच वाटले होते. पण-) मोदी अजूनही फक्त बोलण्यातच गुंग आहेत. ही गुंगी उतरणे देशाच्याही फायद्याचे ठरेल.
‘आप’च्या विजयाने अशा तऱ्हेने सर्वच प्रकारे अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी त्यांना शुभेच्छा!
-मनीषा जोशी, कल्याण

साऱ्याच सत्ताधाऱ्यांना इशारा
‘कोठे चुकती युक्ती’ हा अग्रलेख (११ फेब्रु.) वास्तवदर्शी आहे. मोदी सरकारचे ‘नमनाला घडाभर..’ नऊ महिन्यानंतरसुद्धा चालूच आहे. पिचलेल्या देशवासीयांना सुधारणांची अतिरंजित स्वप्ने दाखवून सत्तेवर आल्यानंतर, अजूनही सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ला मुहूर्त मिळत नाही. परंतु तथाकथित सांस्कृतिक आणि फालतू धर्माध गोष्टींसाठी मात्र वेळ मिळतो आहे. म्हणूनच दिल्लीवासीयांनी प्रस्थापित सत्तांध पक्षांचा भुगा केला हे चांगलेच झाले.       
बाजारातील मंदीसदृश वातावरणामुळे, देशांतर्गत उद्योगांना अजूनही त्याच आणि तेवढय़ाच असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यात भर म्हणजे सोकावलेले सरकारी प्रशासन आणि कर विभाग. त्यातल्या त्यात सक्षम रिझव्‍‌र्ह बँक आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरत्या तेलांच्या किमती, हाच काय तो दिलासा. पण त्यात सरकारचे कर्तृत्व शून्य आहे, हे जनतेलाही माहीत आहे आणि सरकारलासुद्धा.
दिल्लीवासीयांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनासुद्धा इशाराच दिला आहे, की आता मानापमानाची नाटके बंद करून, जाहीरनाम्याची पुस्तके पुन्हा वाचून, मुकाटय़ाने कामे करा, नाही तर मध्यावधी निवडणुका झाल्यास लोक विरोधात नाही तर थेट घरीच बसवतील. सर्वच सत्ताधाऱ्यांनी जागे व्हावे आणि ‘आप’ल्या सत्तांध आणि धर्माध पिलावळीला आवरावे, त्यातच त्यांचे आणि जनतेचे हित आहे. नाही तर जनता आहेच!
अंकुश मेस्त्री, बोरिवली (मुंबई)

भाजपप्रेमींनीच ‘लस’ टोचली
‘कोठे चुकती युक्ती..’ हा अग्रलेख वाचला. दिल्लीतील
जय-पराजयाचे विश्लेषण आता अनेक अंगांनी होईल. ‘आप’वर दाखवलेला अभूतपूर्व विश्वास, भाजपचा भ्रमाचा फोडलेला भोपळा, ‘आत्ममग्न’ काँग्रेसचे वेगाने होणारे पतन असे अनेक पदर या निवडणुकीत समोर आले. भाजपचे कार्यालय ओस पडले होते, असेही वाचण्यात आले. दिल्ली हे भाजपचे बलस्थान समजले जाते. अवघ्या काही महिन्यांपूर्वी ज्या मतदारांनी ‘आप’ल्यावर इतके प्रेम केले त्यांनीच हे काय केले अशा विचारांनी भाजपने अकारण दुक्ख करीत बसू नये.
 ‘मायबाप सरकार’ असे आपण जरी वारंवार म्हणत असलो तरी लोकशाहीत मतदारराजा हाच खराखुरा ‘मायबाप’ असतो. ‘आप’ल्यावर प्रेम करणाऱ्या दिल्लीतील या ‘मायबापाने’ आपले योग्य वयात ‘लसीकरण’ केले आहे, असे भाजपने समजावे. दंडावर त्याचा व्रण कायम राहील, कदाचित काही दिवस ताप येऊन त्रासही होईल. पण भावी आयुष्यातील सुदृढ आरोग्याकरिता या लसीकरणाची गरज होतीच असा सकारात्मक विचार करावा. त्यामुळे आता ताप उतरला की नव्या उत्साहात बिहार, बंगाल आणि तामिळनाडूमधील नव्या आयुष्याला सुरुवात करावी. शरीराला योग्य तो बोध लसीकरणातून मिळालाच असेल, जो पुढे योग्य प्रकारे कामी येईल.
 काँग्रेसचे लसीकरणाचे वयही केव्हाचेच निघून गेले आहे. स्वत:च्या ‘आरोग्यविषयक सवयी’ पूर्णपणे बदलणे हे आता फक्त त्यांच्याच हातात आहे!
प्रसाद दीक्षित, ठाणे</strong>

रा. स्व. संघ ‘नथुरामच्या त्या कृत्या’चा समर्थक नाही
‘जनता तेव्हाही खुळी नव्हती’ हा डॉ. विवेक कोरडे यांचा लेख (११ फेब्रु.) वाचला. नथुराम गोडसे याच्या कृत्याचे म्हणजेच महात्मा गांधीजींच्या निर्घृण हत्येचे समर्थन ६७ वष्रे झाल्यानंतर हिंदुत्ववादी करतात, असे त्यात म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक या नात्याने मी या पत्राद्वारे संघाची भूमिका स्पष्ट करू इच्छितो. नथुराम गोडसेच्या कृत्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही समर्थन केलेले नाही आणि करीत नाही. ‘साध्या मंदिर-प्रवेशाच्या प्रश्नावर रा. स्व. संघाने कधी आंदोलन केले नाही. मग बाकी सामाजिक सुधारणांच्या बाबतची बातच सोडा’ असे या लेखात म्हटले आहे.. पण संघाची कार्यपद्धती वेगळी आहे. संघ हे संपूर्ण समाजाचे संघटन आहे. त्यात मंदिर-प्रवेश नाकारणारे सुद्धा आले आणि ज्यांना प्रवेश नाकारला जातो तेसुद्धा आपले. संघाच्या मते समाजात तेढ का उत्पन्न झाली, कारण एकमेकांविषयी आत्मीयता नष्ट झाली. समाजात आत्मीयता निर्माण करण्याचे काम संघ करतो.  
राहुल आपटे

जन-धन जमवणाऱ्यांना  हक्कसुद्धा नाही?
लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जन-धन योजने’ ची हाक दिली आणि सर्व बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या लाडक्या पीएमसाहेबांच्या हाकेला साद घालत रात्रंदिवस एक करून ही योजना सफल करून दाखवली. या योजनेच्या सफलतेचा मोदीजींना अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये ते दिल्ली वगळता प्रत्येक निवडणुकीत भरपूर फायदा झाला.
पण ही योजना राबवताना बँक कर्मचाऱ्यांचे जे हाल झाले त्याच्या बदल्यात त्यांना ‘इन्सेंटिव्ह’ तर सोडाच, पण त्यांचा जो हक्क आहे, म्हणजेच वेतनसुधारणा- तेसुद्धा मिळाले नाही. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी संप केला, पण पीएमसाहेबांनी त्याची साधी दखलही घेऊ नये? हा कुठला न्याय? म्हणून मोदीजींना एकच सांगणे आहे की, एकदा मागे वळून बघा!
– ओंकार चेऊलवार, परभणी.