29 September 2020

News Flash

संजीव चतुर्वेदी/अंशू गुप्ता

पंतप्रधान कार्यालयाकडून आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात लढताना कुठलेही सहकार्य मिळाले नाही, आपण जे टिकून राहिलो ते न्यायव्यवस्थेच्या जोरावर..

| July 30, 2015 12:53 pm

पंतप्रधान कार्यालयाकडून आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात लढताना कुठलेही सहकार्य मिळाले नाही, आपण जे टिकून राहिलो ते न्यायव्यवस्थेच्या जोरावर.. हे उद्गार आहेत यंदाचे मॅगसेसे पुरस्काराचे मानकरी संजीव चतुर्वेदी यांचे. ते मूळचे हरयाणाचे. त्यांचा जन्म २१ डिसेंबर १९७४ रोजी झाला. १९९५ मध्ये त्यांनी विद्युत अभियंत्याची पदवी घेतली. त्यानंतर ते २००२ मध्ये भारतीय वन सेवेच्या परीक्षेत दुसरे आले होते. कुरुक्षेत्र येथे त्यांना पहिली नेमणूक मिळाली. सरस्वती वन्यजीव अभयारण्यात त्यांनी बेकायदा वृक्षतोड करणाऱ्या लोकांवर खटला भरला तेव्हा मुख्य सचिव (वन) यांनी त्यांना धमकावले व त्यांची बदली फतेहाबादला केली. नंतर २००७ मध्ये त्यांनी आदेशाचे पालन केले नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली; पण ती राष्ट्रपतींनी अयोग्य ठरवली होती. आमदार प्रल्हाद सिंह यांनी त्यांच्या व्यक्तिगत बागेत करदात्यांच्या पैशातून दुर्मीळ झाडे लावली, तो घोटाळा त्यांनी उघड केला. या बदल्यात चतुर्वेदी यांच्यावर अनेक बोगस खटले भरले. हरयाणात चतुर्वेदी यांची बारा वेळा बदली झाली. त्यांच्या सासू-सासऱ्यांना त्यांच्यावर हुंडय़ासाठी छळ केल्याचा खटला भरायला लावण्यात आला. ‘ते तुम्हाला टाळण्यासाठी बदल्या घेत आहेत’ असे त्यांच्या पत्नीला पटवण्यात आले व त्यांचा घटस्फोट घडवून आणला गेला.
२००९ मध्ये ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे पुत्र दीपेंदर हुडा यांच्या झाज्जर जिल्हय़ातला भ्रष्टाचार बाहेर काढला. नंतर त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात मुख्य दक्षता अधिकारी म्हणून नेमण्यात आले, पण तेथेही त्यांनी राजकारणी व वरिष्ठ अधिकारी आरोग्य सुविधांचा कसा गैरवापर करून घेतात याची प्रकरणे बाहेर काढून बदली ओढवून घेतली. अजूनही ते त्याच संस्थेत आहेत, पण त्यांना काम देण्यात आलेले नाही. त्यांना दिल्ली सरकारचे मुख्य दक्षता अधिकारी करावे, ही मुख्यमंत्री केजरीवाल यांची विनंती सरकारने फेटाळली आहे.
दातृत्वाच्या मार्गाने गरीब व श्रीमंत यांच्यात सेवेचा पूल बांधणारी गुंज ही संस्था १९९९ मध्ये स्थापन करणारे अंशू गुप्ता यांनाही मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी त्सुनामीच्या काळात जुन्या कपडय़ांचे वाटप लोकांना केले. उत्तराखंड व काश्मीरमधील पुरातही त्यांनी मदतसामग्रीचे वाटप केले होते. त्यांची संस्था २१ राज्यांत काम करते आहे. दर महिन्याला ते असे ७० हजार किलो व वर्षांला हजार टन साहित्य लोकांना वाटत आहेत. त्यांनी २००९ मध्ये दानोत्सव सुरू केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 12:53 pm

Web Title: sanjiv chaturvedi and anshu gupta profile
Next Stories
1 डॉ. सुनीती सॉलोमन
2 संतसिलन कादिरमगार
3 नलिनी सेनगुप्ता
Just Now!
X