News Flash

विज्ञान

अंकगणित, बीजगणित , रेखागणित, त्रिकोणमिती ही शास्त्रेही भारतीय विद्वानांना अवगत होती. खगोल शास्त्रातही प्राचीन भारतीयांनी शोध लावलेले आहेत.

| March 23, 2015 12:09 pm

अंकगणित, बीजगणित , रेखागणित, त्रिकोणमिती  ही शास्त्रेही भारतीय विद्वानांना अवगत होती.  खगोल शास्त्रातही प्राचीन भारतीयांनी शोध लावलेले आहेत. आर्यभट्ट, भास्कराचार्य ही त्यातील काही नावे. पण आमच्या  मनोवृत्तीला विज्ञानाचे महत्त्व कधी कळलेच नाही. आमचे सगळे लक्ष धर्मशास्त्र आणि मोक्ष यांच्याकडे होते. त्यामुळे विज्ञान दुर्लक्षित करून भौतिक प्रगतीत आम्ही जगाच्या मागे राहिलो.

प्राचीन भारतात प्रवेश करून स्थिर जीवन जगू लागलेले मानव-समूह हे जगात सर्वात जास्त कल्पक लोक असावेत हे माझे मत, अगोदरच्या एका प्रकरणात मी नोंदवलेले आहे. आता या प्रकरणात प्राचीन भारतीयांनी विज्ञानाच्या दिशेने कोणकोणते पराक्रम केले ते आपण थोडक्यात पाहणार आहोत.
कोणीतरी अज्ञात भारतीयाने १ ते ९ व ० (शून्य) ही अंकनचिन्हे किती हजार वर्षांपूर्वी शोधून काढली ते माहीत नाही. त्याचप्रमाणे मोठे आकडे लिहिण्यासाठी याच दहा आकडय़ांची त्यांच्या स्थानावरून मूल्य ठरविण्याची (दश, शत, सहस्र वगैरे) पद्धत व लहान आकडय़ांसाठी (दशांशचिन्ह) व दशांश पद्धत, या सर्व पद्धती भारतीयांनीच शोधलेल्या आहेत. दशांशचिन्हाचा उल्लेख इ.स.च्या दुसऱ्या शतकापासूनच्या संस्कृत ग्रंथात आहे. पुढे अरबांनी इ.स. ७१२ मध्ये सिंध प्रांत पादाक्रांत केला तेव्हा अरबी व्यापाऱ्यांनी ही सोपी व सुंदर अंकनपद्धत भारतातून अरेबियात व तिथून नंतर युरोपात नेली. अशा प्रकारे ही आपली अंकनपद्धत जगभर गेली व जगातील इतर बोजड अंकनपद्धती (रोमन वगैरे) नामशेष होऊन भारतीयांची अंकनपद्धत जगाची बनली. जगाला काही काळ जरी ही पद्धत ‘अरबी पद्धत’ वाटली होती तरी त्या काळीसुद्धा अरेबियन व ग्रीसमध्ये हे अंकगणित शास्त्र ‘हिंदी शास्त्र’ किंवा ‘हिंदी विज्ञान’ या नावाने ओळखले जात होते. याबाबत विशेष हे की आजपर्यंत मानवजातीने केलेल्या सर्व वैज्ञानिक, तांत्रिक व इतर प्रगतीचासुद्धा ही पद्धत हाच पाया व ‘भक्कम मूलभूत साधन’ आहे. भारताने संशोधित करून ही पद्धत जर दिली नसती तर जगाची आजची वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती होणे किती कठीण (अथवा असंभव) झाले असते याचा विचारही कठीण आहे.
केवळ अंकगणितच (Arithmetic) नव्हे तर बीजगणित (Algebra), रेखागणित (Geometry) व त्रिकोणमिती (Trigonometry) ही शास्त्रेही भारतीय विद्वानांना अवगत होती. एवढेच नव्हे, तर खगोल शास्त्र (Astronomy) या शास्त्रातही प्राचीन भारतीयांनी शोध लावलेले आहेत. आर्यभट्टाने इ.स.च्या चौथ्या शतकात पृथ्वी सपाट नसून वाटोळी आहे व ती पश्चिमेकडून पूर्वेकडे स्वत:भोवती फिरते, म्हणून दिवसरात्र होतात हे सांगितले. भास्कराचार्य (इ.स. ११४४ ते १२३३) या शास्त्रज्ञाने तर असे सांगितले की, गोल पृथ्वीला अक्षभ्रमण व कक्षाभ्रमण अशा दोन गती आहेत; तिचा व्यास सुमारे ७९०५ मैल असून तिच्याभोवती १२ योजने, म्हणजे ६० मैलांपर्यंत वायूचे आवरण आहे; तिच्या अंगी ‘गुरुत्वाकर्षण’ आहे व ती सर्व बाजूंनी आकर्षिली जात असल्यामुळे अधांतरी आहे. तसेच चंद्र परप्रकाशित आहे आणि कुणी ‘राहू व केतू’ अस्तित्वात नाहीत. युरोपातील कोपर्निकस, गॅलिलियो, ब्रूनो व न्यूटन या महान शास्त्रज्ञांच्या किती शतके अगोदर भास्कराचार्यानी हे सर्व सांगितले आहे ते लक्षात घ्या. पण आमच्या भारतीय मनोवृत्तीला विज्ञानाचे महत्त्व कधी कळलेच नाही. आमचे सगळे लक्ष धर्मशास्त्र आणि मोक्ष यांच्याकडे होते. त्यामुळे विज्ञान दुर्लक्षित करून भौतिक प्रगतीत आम्ही जगाच्या मागे राहिलो.
आज फिजिक्स म्हणजे पदार्थविज्ञान या दुसऱ्या महत्त्वाच्या शास्त्राविषयी पाहू या. विसाव्या शतकातील आधुनिक पदार्थ विज्ञानाचे आधारस्तंभ म्हणजे १)सापेक्षता सिद्धांत व २) पुंज सिद्धांत (क्वांटम थिअरी) हे होत. फ्रिजॉफ काप्रा या शास्त्रज्ञ-लेखकाच्या मते, या दोन सिद्धांतामुळे आज विश्वाकडे पाहण्याची जी ‘नवी दृष्टी’ विज्ञानशास्त्रात प्रस्थापित झाली आहे ती व प्राचीन पौर्वात्य (भारतीय व चिनी) विचारवंतांची दृष्टी यात खूपच आश्चर्यकारक साम्य आहे. इ.स.पू. ५व्या शतकात ग्रीसमध्ये होऊन गेलेला डेमोक्रिटस, ज्याने विश्व अणूंचे बनलेले आहे असे सांगितले व ज्याच्या पदार्थविज्ञानविषयक विचारांचा प्रभाव जागतिक विज्ञानावर गेली अडीच हजार वर्षे टिकून राहिला असे मानले जाते. त्याच्या एकदोन शतके आधीच भारतात काय घडले ते पाहा. गौतम बुद्धाहून वयाने थोडा मोठा असलेल्या पकुध कात्यायनाने सांगितले की, ‘विश्वात काहीही नवे उत्पन्न होत नाही व काहीही नष्ट होत नाही’. तसेच ‘वैशेषिक दर्शना’चा प्रणेता कणाद मुनी याने सांगितले की, ‘विश्वाची निर्मिती अणूंपासून होते, ईश्वरापासून नव्हे’. डॉ. बॉशम यांच्या मते हे दर्शन हा परमोच्च प्रतीचा अणुवाद आहे. लक्षात घ्या की, या दिशेने हे ‘जगातील पहिले’ विचारवंत आहेत.
प्राचीन भारतीयांचे स्वत:चे वैद्यकशास्त्र होते. त्याचे नाव ‘आयुर्वेद’, जे सबंध आयुष्याचे, शरीराचे व मनाचे आरोग्यशास्त्र आहे; ती केवळ रोगावरील औषध योजना किंवा शल्यक्रिया नव्हे. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद असून मूलत: तो असुरांच्या (अनार्याच्या) संजीवनी विद्येतून आला असावा असे वाटते. फार प्राचीन काळी ‘अश्विनीकुमार हे सामान्य लोकांचे व देवांचेही (आर्याचे) खास वैद्य होते व त्यांनी अनेकांना आरोग्यपूर्ण, निरामय जीवन मिळवून दिले होते. त्यांच्यानंतर चरक, सुश्रुत आणि वाग्भट हे आयुर्वेदाचे तीन महान प्रणेते-संशोधक होऊन गेले, ज्यांचे ग्रंथ आज उपलब्ध आहेत. पण आयुर्वेदावरचे दुसरे अनेक ग्रंथ आज नष्ट झालेले आहेत. त्याहून दुर्दैवाची गोष्ट ही की पुढील काळात आयुर्वेदात काहीही संशोधन झालेले नाही व आधुनिक काळातही काही संशोधन होताना दिसत नाही. शिवाय मधल्या काळात केव्हातरी ‘मंत्र-सामर्थ्यांने’ आयुर्वेदात घुसखोरी केलेली आहे व ती अर्थातच विश्वासार्ह नाही.
भारतात रसायनशास्त्रसुद्धा होते. परंतु त्याचा उगम व विकास बहुश: आयुर्वेदाला साहाय्यक क्रिया म्हणून झालेला आहे. म्हणजे त्यात मानवकल्याणाचे उद्दिष्ट आहे. हलक्या धातूपासून मौल्यवान धातू, उदाहरणार्थ लोखंडापासून सोनेचांदी मिळविणे असले उद्दिष्ट त्यात नाही.
प्राचीन भारतीयांना शिलाशिल्प व धातुविज्ञान शास्त्र आणि त्यांतील तंत्रेसुद्धा अवगत होती असे म्हणता येते. त्याची साक्ष अशी की, उत्तर हिंदुस्तानात ठिकठिकाणी सम्राट अशोकाचे आदेश कोरलेले तीसहून अधिक स्तंभ मिळालेले आहेत, जे प्रत्येकी ४० फूट उंच, सुमारे ५० टन वजनाचे व एकेका अखंड शिलेचे आहेत. या मौर्यकालीन स्तंभांचे पॉलिश, त्यांची चमक, दृढता आणि त्यांचे तांत्रिक नैपुण्य आश्चर्यकारक आहे. तसेच भारतातील अनेक लेण्यांतील व मंदिरातील शिल्पकला या अप्रतिम आहेत. दिल्लीजवळ मेहराली येथे असलेला २३ फूट उंचीचा लोहस्तंभ जो बहुधा चंद्रगुप्त २ (इ.स. ३७५ ते ४१५) या राजाचे स्मारक असावा. आजवर पंधराशेवर मुसळधार पाऊस सहन करून तो अजूनही गंजलेला नाही. असा शुद्ध लोहस्तंभ ते लोक त्या काळी बनवू शकत होते.
पतंजली मुनीने इ.स.पू. दुसऱ्या शतकात ‘योगशास्त्र’ सूत्रबद्ध केले. म्हणजे त्यापूर्वी काही शतके हे शास्त्र भारतीयांना ज्ञात असणार. गेल्या दोन हजार वर्षांतील शास्त्रज्ञांनीसुद्धा दुर्लक्षित केलेल्या या योगविद्येने मागील काही दशकांपूर्वी अचानक जगातील वैज्ञानिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आज युरोप-अमेरिकेतील कित्येक देशांतील प्रयोगशाळांमध्ये मानसशास्त्रज्ञ व मनोरोग चिकित्सक अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने या विषयावर फलदायी संशोधन करीत आहेत. पाश्चात्त्यांनी पूर्वी निष्कर्षित केलेल्या काही आधुनिक शरीरशास्त्र व मानसशास्त्रविषयक सिद्धांतात या योगविद्येने क्रांती घडवून आणलेली आहे. योगशास्त्र ही भारताची जगाला बहुमौल्यवान देणगी आहे.
प्राचीन भारतीयांच्या विज्ञान क्षेत्रांतील पराक्रमांची आणखीही काही लहानमोठी उदाहरणे देता येतील. पण तसा प्रयत्न न करता मी एकदम शेवटाकडेच वळतो. आमचे पूर्वज मोठे कल्पक बुद्धिमान व तर्कप्रज्ञावान होते. याबाबत वरील उदाहरणे लक्षात घेता कुणाला शंका राहू नये, असे नक्कीच म्हणता येईल. त्यामुळे खरेतर आमच्या पूर्वजांनी सुखी मानवी जीवनासाठी त्यांची ती प्रखर तर्कप्रज्ञा (reason) वापरून निसर्ग व विश्वातील भौतिक शक्तींचा शोध घ्यायला हवा होता. त्याऐवजी त्यांनी त्यांच्या अंत:प्रज्ञेवर (intuition) अवाजवी भरवसा ठेवून ते फक्त अध्यात्माचाच शोध घेत राहिले. त्यातच सुखसमाधान मानत राहिले. त्यामुळे झाले असे की, युरोपातील काही घडामोडींमुळे पाश्चिमात्य जगात चक्क विज्ञानयुग अवतरले तरी आमचे पंडित मात्र ब्रह्मानंदी टाळी लावून किंवा द्वैतअद्वैताचा घोळ घालीत आणि अवतारांच्या चमत्कारांची सुरस वर्णने करीत मोक्षाचा पाठपुरावा करीत बसले आणि आम्ही सामान्य लोक मात्र आमच्या पूर्वजांकडे विमाने होती, अ‍ॅटम बॉम्ब (ब्रह्मास्त्रे) होती किंवा प्लॅस्टिक सर्जरी करून प्राण्याचे शीर ते माणसाच्या धडाला जोडू शकत होते, अशी निराधार स्वप्नरंजने करीत बसून राहिलो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2015 12:09 pm

Web Title: science 2
टॅग : Astronomy,Science 2
Next Stories
1 प्रस्थान त्रयी
2 स्मृतिपुराणे
3 धर्मसूत्रे
Just Now!
X