लाधलें सकळ साधनांचे फळ। भेटला गोपाळ अखंडित।। आघवा संसार झाला मोक्ष-मय। होता ज्ञानोदय अंतर्यामी।। श्रीसद्गुरूंची अखंड भेट लाभली आणि जो संसार आधी बंध-मय होता, ज्या जगाचा आधी मनावर पगडा होता, ज्या जगाच्या काळजीनं मन आधी व्याप्त होतं तो पगडा ओसरला. ज्या जगात आधी मी गुंतत होतो त्याच जगातली आसक्तीच लोपल्यानं सारं काही मोक्ष-मयच झालं. का? तर केवळ श्रीसद्गुरूंच्या अखंड भेटीनं अंतर्यामात ज्ञानाचा उदय झाला! एक गोष्ट इथेच स्पष्ट करतो. ती म्हणजे या सदरात जेव्हा जेव्हा श्रीसद्गुरू असा उल्लेख होईल तेव्हा तो साक्षात् जे खरे  सद्गुरू आहेत, त्यांचाच आहे, हे कायमचं ध्यानात ठेवावं. जो स्वत:च जगाच्या मोहात फसला आहे, असा भोंदू बाबाबुवा इथे अभिप्रेत नाही. असो. तर केवळ श्रीसद्गुरूंच्या अखंड भेटीमुळं अंतरंग ज्ञानानं भरून गेलं आणि जगातलं अडकणं संपलं. अभंगातल्या प्रत्येक शब्दांना फार खोल अर्थ आहे बरं. ‘भेटला गोपाळ अखंडित’! इथे ‘अखंडित’चा अर्थ पूर्णपणे, असाही आहे. श्रीसद्गुरूंचं मला पूर्ण दर्शन झालं. पूर्ण दर्शन म्हणजे? तर त्यांचं खरं पूर्ण दर्शन कुणालाच शक्य नाही, पण तरी त्यांच्या स्वरूपाचं व्यापकत्व जाणवलं. त्यांच्या बाह्य़ रूपापुरतं दर्शन हे अपूर्ण दर्शनच आहे. त्या अपूर्ण दर्शनानं मी मानवी बुद्धीच्या आधारे त्यांच्यात गुण-दोष शोधण्याची धडपड करतो आणि स्वत:चाच घात करून घेतो. त्यांच्या खऱ्या व्यापक दर्शनाला अंतरतो. तेव्हा असं झालं नाही. सद्गुरूंचं पूर्ण दर्शन झालं. ‘अखंडित’चा दुसरा अर्थ म्हणजे याच जगात पदोपदी, प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक कणाकणात मला त्यांचंच दर्शन झालं, त्यांचाच संग लाभला, त्यांच्याच बोधाचा प्रत्यय आला, त्यांचं स्मरण क्षणमात्रही खंडित झालं नाही. एका अभंगात स्वामी स्वरूपानंद सांगतात, ‘‘पाहे ज्याची दृष्टि सर्वत्र श्रीहरि। भक्त तो संसारीं भाग्यवंत।। आठवी श्रीहरी नित्य हृदंतरीं। भक्त तो संसारीं भाग्यवंत।।’’ (संजीवनी गाथा, अभंग १७२चा प्रथम व तृतीय चरण). श्रीहरी म्हणजे सद्गुरू. हरी म्हणजे सर्व भवतापाचं हरण करणारा. भवताप दूर करणारा. ज्या भक्ताला याच प्रपंचात राहताना सर्वत्र सद्गुरूच दृष्टीस पडतात, तो खरा भाग्यवंत आहे. ज्याच्या हृदयात नित्य सद्गुरू बोधाचं स्मरण जागृत आहे, तो खरा भाग्यवंत आहे. अहो, ही स्थिती भाग्यवंताची खरीच, पण जीवनात सद्गुरू येणं, या भाग्याचं तरी आपल्याला आकलन होतं का? मीराबाईंचं एक भजन आहे – ‘‘नाही ऐसो जनम बारंबार। का जाणु कछु पुण्य प्रगटै। भा मानुषा अवतार।। नाही ऐसो जनम बारंबार।।’’ सर्वसाधारणत: याचा अर्थ असा घेतला जातो की, की काय पुण्य केलं कोणास ठाऊक पण मला माणसाचा जन्म मिळाला. असा जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही. या भजनाचा खरा अर्थ असा की, मी अनेकवार जन्मलो-मेलो, पण असं कोणतं पुण्यं केलं होतं कुणास ठाऊक की, मला माणसाचा जन्म लाभला असतानाच सद्गुरूही मनुष्य रूपात अवतरले आणि माझ्या जीवनात आले. असा जन्म वारंवार मिळत नाही!!