Actually, it’s not clear what we are meant to be afraid of, nativists or Muslims. I leave that unresolved.
‘जास्त भीती कोणाकडून? मुस्लीम की आपलेच देशीवादी? हा प्रश्न मी फक्त विचारतो आहे. त्याचं उत्तर मी देणार नाही. ते ठरवण्याचं काम वाचकाचं आहे’ – असं ‘पॅरिस रिव्ह्यू’ या नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत मिशेल ओल्बेक या बहुचर्चित आणि वाचकप्रिय फ्रेंच लेखकानं म्हटल्याची बातमी दिवंगत फ्रेंच लेखक आल्बेर काम्यूच्या स्मृतिदिनीच (४ जानेवारी) इंटरनेटवर वाचायला मिळावी, कुतूहलानं  पॅरिस रिव्ह्यूच्या वेबसाइटवर जावं तर तिथं ते इंग्रजी वाक्य वाचायला मिळावं, त्यातून ओल्बेकच्या नव्याकोऱ्या ‘सउमिशन’ (शरणागती- इंग्रजीत ‘सबमिशन’) नावाच्या कादंबरीबद्दल उत्कंठाच वाटावी.. या साऱ्याला तीन दिवस होतात न होतात तोच पॅरिसमधल्या ‘शार्ली एब्दो’ या व्यंग्य-नियतकालिकाच्या कार्यालयावर तो sam04जीवघेणा हल्ला झाला. हल्लेखोर मुस्लीम असल्यानं मुस्लीम, फ्रान्समधले मुस्लीम, वगैरे चर्चा अधिक महत्त्वाची ठरली. तब्बल ११ पत्रकार वा व्यंगचित्रकार ठार मारले गेल्याची हळहळ जगाला. पण ‘शार्ली एब्दो’चा पुढला अंक निघालाच! त्याच्या मुखपृष्ठावर मिशेल ओल्बेकचं व्यंगचित्र आहे.
ते फ्रेंचमध्ये असल्यामुळे अनेकांना कळणार नाही. पण समजा त्याचं (मोडकंतोडकं का होईना,) भाषांतर   इथल्याइथे मराठीत दिसलं, तरीदेखील त्याचा संदर्भ लागणार नाही.  अगदी वर ‘(ख्रिस्ताजन्मावेळच्या तीन शहाण्यांसारखे) शहाणे ओल्बेक यांचे भविष्य’ अशी ओळ आहे आणि ओल्बेच्या च्या व्यंगचित्राच्या तोंडून निघणारी दोन वाक्यं. यापैकी ‘२०१५ मध्ये दात पडले’ इथवर एकवेळ ठीक.. पण ‘२०२२ मध्ये मी रमजान (पाळला)’ हे काय?
तेही कळेल, पण त्यापेक्षा ओल्बेकला इतकं महत्त्व कसं काय हे कळलं पाहिजे आणि त्यासाठी ही कादंबरी काय आहे, हे जाणून घेतलं पाहिजे. त्याकामी या कादंबरीबद्दलच्या बातम्या उपयोगी ठरतीलही, पण बातम्यांच्या पलीकडेही कादंबरीचा आशय आहे. तोही आपण पाहू.
बातम्या हे सांगतात की, २०२२ सालातील फ्रान्स ‘युनायटेड मुस्लीम पार्टी’ नामक (काल्पनिक) पक्षाच्या हाती गेला असून देशाचे इस्लामीकरण सुरू झाले आहे, असे चित्र ही कादंबरी रंगवते! पण कादंबरीतील मुख्य पात्र फ्रान्सिस (फ्रान्स्वां) हा एकांडा प्राध्यापक, फ्रेंच साहित्य शिकवतानाच, जे के ह्युस्मान्स (१८४८-१९०७) याच्या कादंबऱ्यांवर संशोधन करत असतो असा कथाभाग व ह्युस्मान्सबद्दलच्या कितीतरी नोंदी जणू ‘ओघानेच’ येतात, विस्मृतीत गेलेल्या एका फ्रेंच ‘डीकेडन्स’वादी लेखकाने अखेर रोमन कॅथलिक पंथच शिरोधार्य का मानला असावा असा प्रश्नही येतो, हे कोणत्याही बातमीने अद्याप सांगितलेले नाही.  ह्युस्मान्सच्या निमित्ताने, बहुसंख्य लोकांचा धर्म हा धर्ममत-दृष्टय़ा अल्पसंख्याकांना सुखाची आशा कशी लावतो, आणि बहुसंख्यशरण झाल्यास सुखही कसे मिळते, हा मुद्दा येतो. कथेत प्रा. फ्रान्सिसची नोकरी इस्लामीकरणानंतर जाते, पण त्याने धर्मातर केल्यावर त्याला त्याच पदावर लठ्ठ पगार मिळतो, एकांडा न राहता तो तीन लग्ने करतो- त्यापैकी एक वयस्करशी पत्नी रांधायला, दुसरी उशाला नि तिसरी १५ वर्षांची शेजेला. हे सारे ‘सुखी-समाधानी’ आयुष्य त्याला एका निर्णयामुळे मिळते!
एवढय़ा वर्णनावरून, लेखक ओल्बेक हे कोणत्या बाजूचे, कोणत्या मताचे आहेत, असा हिशेब करता येणार नाही. ओल्बेक यांनी कुराण दोनदा वाचले, तो ग्रंथ प्रमाण मानणाऱ्या धर्मालाच २००० मध्ये त्यांनी ‘स्टुपिडेस्ट रिलीजन’ म्हटले होते, ते फ्रान्सच्या बिगरमुस्लीम ‘नेटिव्हिस्टां’वरही नाखूषच दिसतात.. मग त्यांचे मत काय? गोंधळलेले असा शिक्का मारावा काय त्यांच्यावर?
नाही. ते गोंधळलेले नाहीत. एका बौद्धिक परंपरेचा नवा आविष्कार घडवणारे बुद्धिवंत, हे ओल्बेक यांचे उचित वर्णन ठरेल. ही परंपरा ‘डीकेडन्स’ची! डीकेडन्स म्हणजे अवनती, हे ठीक. पण अवनती ही संकल्पनाच किती ‘बहुसंख्य’-सापेक्ष आहे, अशी भूमिका बोद्लिए, ऑस्कर वाइल्ड, ‘अगेन्स्ट द ग्रेन’ या पहिल्या कादंबरीत ह्युस्मान्स आदींनी घेतली होती. व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे सुख नाकारण्याचेही स्वातंत्र्य. ते एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीच्या बऱ्याच फ्रेंच व काही इंग्रज कलाकारांनी पुरेपूर भोगले. ही जुनी गोष्ट. पण आजही यातून जी बौद्धिक परंपरा दिसते ती कसली?
पाश्चात्त्य आधुनिक संस्कृतीला आव्हान, ही ती परंपरा. जुने आव्हान सुख नाकारणारे (म्हणून बौद्धिक) होते, पण पुढल्या काळात बौद्धिक समाधान व रूढार्थाने सुख, दोन्ही मिळण्याची जी सोय युरोपीय लोकशाह्यांनी देऊ केली होती, ती आता उरेलच असे नव्हे.. कारण यापुढे कोणाला अधिक भ्यावे, हेच तुम्हाला ठरवायचे आहे, असा इशारा ओल्बेक देतो. युरोपीय संस्कृतीने जे अनिर्णित प्रश्न दडपले, ज्याकडे दुर्लक्ष केले, त्याचा आरसा तो ‘२०२२ साली फ्रान्स मुस्लिम पक्षाच्या अमलाखाली’ या कथानकातून दाखवतो. निवड ही अशी वाइटा-वाइटातूनच करावी लागेल, हे किती काळ नाकारणार तुम्ही? हा प्रश्न त्याची कादंबरी विचारते!
-विबुधप्रिया दास