छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भूगोलाच्या अंगाने पाहिला तर तो शिवनेरी ते रायगड या दोन किल्ल्यांच्या दरम्यान विस्तारतो. या दरम्यानचा त्यांच्या कर्तृत्वाचा प्रवास शोधू लागलो, की अनेक दुर्गम दुर्गच प्रथम समोर येतात. यातीलच १२ गडकोटांच्या भाळी शुक्रवारी ‘युनेस्को’ने जागतिक वारसा स्थळाचा टिळा लावला. शिवनेरी, राजगड, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा, साल्हेर, खांदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, रायगड हे महाराष्ट्रातील तर तामिळनाडूमधील जिंजी या किल्ल्याची यामध्ये निवड झाली आहे. या प्रत्येक किल्ल्याला वैशिष्ट्यपूर्ण असा भूगोल, धगधगता इतिहास आहे. यातील काही किल्ले शिवपूर्वकालातील तर काही खुद्द राजांनी बांधलेले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील संपूर्ण पन्नास वर्षे आणि त्यामधील जाज्वल्य इतिहासाच्या पाऊलखुणा या दुर्गांनी जपून ठेवलेल्या आहेत. हे गड आज केवळ कागदावरचा इतिहास नाहीत तर सतराव्या शतकात मराठ्यांनी निर्माण केलेल्या साम्राज्यामागील सामर्थ्याचे बळ ठरले आहेत, याचाच विचार ‘युनेस्को’ने जागतिक वारसास्थळ ठरवताना केलेला आहे. आता या गडांच्या शोधातून जागतिक पटलावर महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडेल. महाराष्ट्रासारख्या दुर्गांच्या देशाचे जगभर प्रतिनिधित्व करणाऱ्या या दुर्गांचीच ही वारी !
स्वराज्याची पूर्वा – शिवनेरी
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी डोंगरांचा वेढ्यात अडकलेला आहे. प्रत्यक्ष शिवनेरी उंच आणि विस्तीर्ण. जणू एखादे नांगरलेले भलेमोठे जहाज. गडाचा भूगोल जेवढा विस्मयकारी तेवढाच त्याचा इतिहास खोल. दोन हजार वर्षे प्राचीन असा हा सातवाहनकालीन गड. याच गडावर शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीया, शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या एकाच घटनेमुळे शिवनेरीला आज केवळ गडाचेच नाहीतर एका तीर्थाचे महत्त्व आले आहे. पोटातील बौद्ध लेणी, सात दरवाजांची मालिका, निजामशाहीकालीन स्थापत्ये आणि प्रत्यक्ष शिवजन्मस्थान… शिवनेरीवर आलेल्या प्रत्येक पावलाला हा गड असा इतिहास, भूगोलातून गुंतवून टाकत असतो.
पहिली राजधानी – राजगड
स्वराज्य निर्माण झाले, मावळ्यांसोबत गडकोट उभे राहू लागले आणि या स्वराज्याच्या राजधानीचा पहिला मान पुणे जिल्ह्यातील राजगडाला मिळाला. तीन माच्या आणि बालेकिल्ला असे राजगडाचे रूपच मोठे राजबिंडे. राजांचा गड आणि गडांचा राजा – राजगड! महाराजांच्या एकूण पन्नास वर्षांच्या आयुष्यातील तब्बल पंचवीस वर्षांचा सहवास या गडाने अनुभवला.
शिवरायांच्या सहवासाचे सर्वाधिक भाग्य जिजाबाईंच्या खालोखाल राजगडालाच मिळाले. या गडाने छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म पाहिला, तसाच महाराणी सईबाईंचा मृत्यूही सोसला. अफझलखानाच्या वधासाठी महाराज याच गडावरून बाहेर पडले आणि आग्रा येथील औरंगजेबाच्या कैदेतून सुटका झाल्यावर त्यांनी पहिले पाऊलही राजगडावरच टाकले. स्वराज्याचे पहिले पाऊल ते हिंदवी सत्तेचा तो उत्कर्ष, सारे, सारे या गडाने पाहिले !
जावळीचा प्रतापगड
जावळीच्या खोऱ्यातील हा वनदुर्ग प्रत्यक्ष महाराजांच्या आज्ञेने साकारला. भौगोलिकदृष्ट्या या जागेचे महत्त्व त्यांनी ओळखले आणि जावळीच्या निबिड अरण्यात इसवीसन १६५६ ते ५८ या दोन वर्षांत प्रतापगड आकारास आला. महाराजांचे द्रष्टेपण पुढच्याच वर्षी इतिहासाला पाहण्यास मिळाले. स्वराज्यावर चालून आलेला सर्वांत बलाढ्य शत्रू अफझलखानास महाजांनी याच गडाच्या घेऱ्यात अडकवले आणि १० नोव्हेंबर १६५९ रोजी त्याचा वध केला. विजापूरच्या बलाढ्य शक्तीचा हा नि:पात प्रतापगड आणि त्याभोवतीच्या जावळीच्या जोरावरच घडला होता. सामान्य पर्यटक प्रतापगडास भेट देताना या गडाचा इतिहास अनुभवतात तर त्याच वेळी संरक्षण विषयक अभ्यासक महाराजांची युद्धनीती आणि त्यातील प्रतापगडाची भूमिका याचा विचार करत असतात.
बुलंद लोहगड
पुणे जिल्ह्यातील पवन मावळातील हा लोहगड त्याच्या नावाप्रमाणे पोलादी. दुर्ग स्थापत्यातील विशेषपण पाहण्या-अभ्यासासाठी इथे अनेकजण येत असतात. कातळकड्यावर उभी तटबंदी आणि आत प्रवेश करण्यासाठी भक्कम दरवाजांची मालिका. लोहगडाचे हेच दुर्गमत्व ध्यानी घेत महाराजांनी इसवी सन १६६४ मध्ये सुरतेवरून आणलेली लूट या बुलंद लोहगडाच्या सुरक्षेत उतरवली. कुठल्याही गडाची अशी योजकता पाहणेही अभ्यासाचे ठरते.
पर्णाल पर्वत पन्हाळा
शिलाहार भोजांचा हा गड. कोरीव दरवाजे; सज्जाकोठी, अंबरखाने, अंधारबाव अशा अनेक मध्ययुगीन बुलंद इमारतींमुळे पन्हाळ्याची महती इतिहास गातच होता. त्याचे आकर्षण छत्रपती शिवाजी महाराजांनाही होते. यातूनच २८ नोव्हेंबर १६५९ रोजी महाराजांनी पहिल्यांदा हा गड जिंकला. ती वेळ रात्रीची होती. पण महाराजांना गड पाहण्याची उत्सुकता असल्यामुळे मशालींच्या उजेडात त्यांनी पन्हाळा डोळे भरून पाहिला. या वेळी त्यांच्या अंगावर मावळ्यांनी चाफ्याची फुले उधळली. या चाफ्याचे वंशवृक्ष आजही पन्हाळ्यावर बहरत आहेत. महाराजांनी मावळ्यांएवढेच या गडकोटांवरही प्रेम केले. इतिहासातील सिद्दी जोहरचा वेढा, त्यातून महाराजांची सुटका आणि पुढे पावन उर्फ घोडखिंडीत घडलेला तो बाजीप्रभू देशपांडे यांचा रणसंग्राम हे सारे या पन्हाळ्याने त्याच्या हृदयात जपून ठेवलेले आहे.
उत्तुंग साल्हेर
गडकोटांचा इतिहास हा भूगोलावर स्वार असतो. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उत्तुंग जागी वसलेले हे दुर्ग त्यांच्यातील या दुर्गमतेनेच प्रथम थरकाप उडवतात. या दुर्गांच्या देशात नाशिक जिल्ह्यातील साल्हेर हा सह्याद्रीच्या सर्वोच्च जागी वसलेला. तब्बल ५१४० फूट उंची. आकाशात घुसलेली शिखरे आणि कोसळणारे कडे या भूगोलावर इथे हा महाराष्ट्रातील सर्वोच्च दुर्ग वसलेला आहे. सह्याद्री हीच आमुची शक्ती आणि दुर्गमता हीच युक्ती ! साल्हेरसारखे हे दुर्गम दुर्ग हेच सांगत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या बागलाण मोहिमेत १६७० मध्ये या उत्तुंग गडावरही भगवे निशाण फडकावले !
खांदेरीची लढाई
अलिबागसमोरील खोल समुद्रात असलेले खांदेरी उंदेरी हे दुर्ग महाराजांनी बांधले. स्वराज्याचे भविष्यातील शत्रू हे जमिनीवरून नाही तर समुद्रमार्गे असतील याचे भान राजांना अगोदरच आलेले होते. त्यानुसारच त्यांनी ब्रिटिश, पोर्तुगीज, डच या विदेशी शक्तींना रोखण्यासाठी जलदुर्गांची साखळीच उभी केली. यातील महत्त्वाचा जलदुर्ग खांदेरी ! याच्या असण्याचे महत्व जसे महाराजांना जाणवले तसेच त्याच्या नसण्याचा फायदा शत्रूने देखील अचूक ओळखला. या जलदुर्गाचे बांधकाम सुरू झाले. मराठे गड बांधत होते आणि तो पूर्ण होऊ नये म्हणून ब्रिटिश, जंजिऱ्याचा सिद्दी त्यावर हल्ले करत होते. या साऱ्या संघर्षातून हा खांदेरी उभा राहिला आणि ब्रिटिशांच्या कोकणातील वावरावरच चाप बसला. इसवीसन १६७९ सालात घडलेल्या या रणसंग्रामाच्या लहरी खांदेरीच्या तटबुरुजांवरून अद्याप वाहत्या आहेत.
तटरक्षक सुवर्णदुर्ग
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदराच्या रक्षणासाठी उभारलेला हा भक्कम जलदुर्ग. ऐन समुद्रात आपल्या पंधरा बुरूजांनी पाय रोवून बसलेला आहे. हा जलदुर्ग उभारला आणि शिवरायांनी कोकणात सर्वदूर विस्तारलेले त्यांचे राज्य सुरक्षित केले. पुढे या सुवर्णदुर्गच्या साक्षीनेच सरखेल कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या घराण्यानेही इतिहास रचला.
मराठ्यांचे आरमार – विजयदुर्ग !
छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक म्हणतात. या मराठा आरमाराची गोष्ट ऐकायची असेल तर तळकोकणातील विजयदुर्गवर यावे. अफझलखानाच्या पारिपत्यानंतर विस्तारलेल्या स्वराज्यात कोकणचा मोठा मुलूख सामील झालेला होता. या किनारपट्टीवर शिवरायांचे तब्बल ८४ जलदुर्ग स्वराज्याची पताका फडकावू लागले होते. या साऱ्या प्रदेशाला संरक्षण देण्यासाठी केवळ दुर्ग बांधून चालणार नाही तर त्यांना शक्तीशाली करण्यासाठी आरमार उभे करावे लागणार. याच हेतूने मराठ्यांच्या आरमाराची पावले पडू लागली. या साऱ्याचे मुख्यालय होते विजयदुर्ग ! या किल्ल्याच्या साक्षीने महाराजांनी १६६४ मध्ये पहिल्या मराठा आरमाराची स्थापना केली.
जलदुर्ग, गलबते, लढाऊ जहाजे; त्यांच्या बांधणीपासून ते दुरुस्तीपर्यंतची गोदी हे सारे विजयदुर्गच्या साक्षीने घडू लागले. वाघोटन खाडीच्या तोंडाशी हा विजयदुर्ग. दुर्गाची भौगोलिक रचना, दुर्गाच्या पोटात असलेला खाडीचा भाग, किल्ल्याच्या पुढ्यात असलेल्या समुद्रातील उंचसखल दगड, कातळभिंतीचा गूढ प्रदेश आणि या साऱ्यांवर नियंत्रण आणि आक्रमण करणारे हे तिहेरी तटबंदीचे बुलंद दुर्गस्थापत्य. या साऱ्या गोष्टींमुळे विजयदुर्ग त्याच्या नावाप्रमाणे समुद्रावरील लढाईत अखेरपर्यंत अपराजित राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेला हा इतिहास पुढे आंग्रे घराण्याने शिखरावर नेला. या साऱ्यांचा साक्षीदार विजयदुर्ग !
शिवलंका सिंधुदुर्ग
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक असलेले दुर्ग जिंकून भक्कम केले तर काही नव्याने बांधले. मालवणसमोरच्या समुद्रात उभा असलेला देखणा सिंधुदुर्ग अशीच महाराजांनी स्वत: उभी केलेली दुर्गबांधणी. इसवीसन १६६७ मध्ये हा जलदुर्ग महाराजांनी बांधला. किनाऱ्यापासून आत खोल समुद्रात दीड दोन किलोमीटरवर एका बेटावर हा तब्बल ४२ बुरुजांचा जलदुर्ग आकारास आला. या जलदुर्गाचे बांधकाम खुद्द महाराजांच्या देखरेखीखाली उभे राहिले. ते होत असताना, त्याच्या स्थापत्याची पाहणी करताना एकदा त्या ओल्या बांधकामात महाराजांचाच हात आणि पायाचा ठसा उमटला. सिंधुदुर्गाने हे दोन्हीही ठसे एखाद्या राऊळाप्रमाणे जतन करून ठेवले आहेत.
दक्षिणदिग्विजय – जिंजी
देश आणि कोकणाच्या आश्रयाने वसलेले स्वराज्य हळूहळू आजच्या महाराष्ट्राबाहेरही विस्तारले. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिणदिग्विजय मोहिमेत तर मराठ्यांनी थेट तामिळनाडूतील तंजावर, जिंजीपर्यंत स्वराज्याचा विस्तार केला. यातील जिंजीला तर दुसऱ्या राजधानीचाच दर्जा देत भक्कम केले. धोरणे अशी आखली, की त्याचा फायदा पुढे स्वराज्य रक्षणाला झाला. औरंगजेब ज्यावेळी दक्षिणेत स्वराज्यावर चालून आला त्यावेळी रायगडावरून निसटलेल्या छत्रपती राजाराम महाराजांनी बरोबर या जिंजी किल्ल्यावर आश्रय घेत हिंदवी स्वराज्याचा लढा सुरू ठेवला.
महाराष्ट्राचा नंदादीप – रायगड !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक जीवनपटाचा सुवर्णकाळ अनुभवण्याचे नशीब रायगडाला मिळाले. अगोदरच्या रायरीचे राजांनी रायगड असे नवनिर्माण केले. राजांचे स्थापत्यविशारद हिरोजी इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली गडावर तटबुरूजांसह राजप्रासाद, नगारखाना, सदर, राजांचा राहता वाडा, राणीवसा, अष्टप्रधानांचे वाडे, विहिरी, टाकी, तळी, स्तंभ, मंदिरे, नगरपेठ अशी अनेक बांधकामे उभी राहिली. स्वराज्याच्या दुसऱ्या राजधानीने रायगडावर आकार घेतला. शून्यातून निर्माण केलेले हे रयतेचे राज्य पूर्णत्वास पोहोचले. मग याच टप्प्यावर स्वराज्याची द्वाही देण्यासाठी राज्याभिषेकाचा संकल्प सुटला. ६ जून १६७४ रोजी या रायगडानेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळाही डोळे भरून अनुभवला.
अचाट भूगोल, विलक्षण इतिहास आणि अनेक अलौकिक प्रसंगांनी रायगड भारावलेला आहे. महाराजांची पायधूळ अनेक गडकोटांना लागली. परंतु रायगडाचे नशीब याबाबत थोडे थोर राहिले!
चैत्र शुद्ध पौर्णिमा, शके १६०२, शनिवार, ३ एप्रिल १६८० रोजी महाराजांनी अखेरचा श्वास याच रायगडावर घेतला. रयतेचे राज्य उभे करणारा हा शिवभास्कर मावळला. शिवनेरीला सुरु झालेला हा प्रवास रायगडावर थांबला. महाराष्ट्र, मराठी माणसांसाठी या प्रवासाला वारीचे महत्व तर शिवनेरी, रायगडाला, आळंदी – पंढरीचे!
रायगडाचे आणखी एक नाव आहे – नंदादीप. त्या अर्थाने हा दुर्ग आज महाराष्ट्रभूमीचा नंदादीप म्हणून तेवत आहे !
महाराष्ट्राचे दर्शन जर केवळ एखाद्याच सांकेतिक विषयातून घडवायचे असेल तर आमच्याकडील गडकोटांशिवाय दुसरे अचूक दृश्य शोधून सापडणार नाही. या एका स्थळामध्ये आमच्या भूमीचे सारे भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संचित सामावलेले आहे. आमच्या पराक्रमी इतिहासाचा शोध आणि सामर्थ्य या गडकोटांच्या तटबुरूजांमध्ये आहे.
एक राजा ज्याचा जन्म एका गडावर झाला. त्याचे संपूर्ण आयुष्य या गडकोटांशी हितगुज करत गेले. त्या गडपुरुषाने आपला अखेरचा श्वास देखील एका गडावर, त्यांच्या रायगडाच्या कुशीत घेतला. या दुर्गांएवढे सख्य त्यांचे अन्य कशाशीही नसावे. शिवरायांच्या पदरी असलेल्या रामचंद्र अमात्य यांनी लिहिलेल्या ‘आज्ञापत्र’ या अद्वितीय ग्रंथात ते छत्रपती शिवरायांचे या गडकोटांबद्दलचे विचार सांगतात. ते म्हणतात, ‘गडकोट हेंच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचें मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बल, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसतिस्थळे, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण ! …संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग!’
आमच्या याच दुर्गांचे महत्त्व लक्षात घेत त्यांच्या प्रवेशद्वारी आता जागतिक वारसा स्थळाचे तोरणही चढलेले आहे !
- अभिजित बेल्हेकर
(abhijit.belhekar@expressindia.com)