प्रथम नमन तुज एकदंता…

बुद्धीचा शास्ता या नात्याने विद्याधर गणेशाचे असाधारणत्व महाराज कौतुकमिश्रित परमादराने गातात ते त्यांच्या ‘नाटा’च्या दोन अभंगांत

लाडुमोदकांचा भोक्ता यांपेक्षाही शब्दज्ञानाचा अधिष्ठाता या स्वरूपात भागवतधर्मी संतमंडळाने गणेशाराधन मांडलेले आहे. तुकोबांनी मांडलेले गणेशस्तवन या संदर्भात कमालीचे आगळेवेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. गणोबा विक्राळ। लाडुमोदकांचा काळ अशा शब्दांत तुकोबाराय वर्णन करतात गजाननाचे प्राकृतिक रूपगुण. तर, बुद्धीचा शास्ता या नात्याने विद्याधर गणेशाचे असाधारणत्व महाराज कौतुकमिश्रित परमादराने गातात ते त्यांच्या ‘नाटा’च्या दोन अभंगांत. ‘नाट’ या शीर्षकाखाली गाथेमध्ये आढळणारे महाराजांचे एकंदर ५६ अभंग हा तुकोबारायांच्या समग्र काव्यसृष्टीचा आणि विचारविभाचा एक अनोखा विशेष होय. ‘नाटा’च्या अभंगांच्या या गुच्छाचे रूप-स्वरूप प्रबंधात्मक असणे तुकोबारायांना अभिप्रेत असावे, असे वाटते. त्याला कारणही तसेच आहे. ग्रंथारंभी अथवा प्रबंधरचनेस प्रवृत्त होते वेळी विद्यापती गणनायकास स्मरणपूर्वक दंडवत घालण्याचा ग्रंथकारांचा परिपाठ पूर्वापारचा आहे. ‘नाट’ या शीर्षकाखाली संग्रहित असलेल्या तुकोबारायांच्या ५६ अभंगांपैकी पहिले दोन अभंग गणनाथाचे गुणवर्णन करणारे असे आहेत. गणेशाकडे बघण्याची तुकोबारायांची अतिशय आगळी व असाधारण अशी दृष्टी त्या दोन अभंगांपैकी पहिल्या अभंगाच्या पहिल्याच चरणात स्पष्ट होते. प्रथम नमन तुज एकदंता। रंगीं रसाळ वोडवीं कथा। मति सौरस करीं प्रबळता। जेणें फिटे आतां अंधकार अशा शब्दरूपी सुमनांद्वारे महाराज एकदंताचे नमन आरंभतात. या चरणातील प्रत्येकच शब्द कमालीचा आशयपूर्ण आहे. ‘वोडव’ अथवा ‘वोडवणे’ म्हणजे ‘प्राप्त’ होणे, ‘योग्यता’ येणे. ‘सौरस’ या शब्दाला अर्थाच्या विविध छटा आहेत. ‘गोडी’, ‘प्रसाद’, ‘सामर्थ्य’, ‘योग्यता’, ‘सुरसता’ हे अर्थांतराचे त्यांतील काही पदर-उपपदर. ‘विद्यादाता’ म्हणूनच गणेशाचा महिमा आपल्या परंपरेमध्ये अनादी काळापासून गाजत-गर्जत आलेला आहे. परंतु, इथे तुकोबाराय मात्र गणनायकाला वंदन करतात ते बुद्धीला पैलू पाडून सामर्थ्य प्रदान करणारी आदिदेवता या स्वरूपात. हे मोठे वैशिष्ट्यपूर्ण होय. त्याला कारणही तसेच आहे. बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती -। आठवितां चित्ती काय नव्हे अशी आहे तुकोबांची अविचल निष्ठा. विठ्ठलकृपेने प्राप्त झालेल्या बुद्धीच्या माध्यमातून कथा-कथनासाठी मी प्रवृत्त झालेलो आहे; तेव्हा, माझी देवदत्त बुद्धी प्रबळ बनव आणि तिच्या माध्यमातून साकारणाऱ्या माझ्या कथेला गोडी, प्रासादिकता, सामर्थ्य लाभून तिच्याद्वारे अज्ञानरूपी अंधकाराचे निवारण होईल अशी कृपा माझ्यावर कर, हा आहे तुकोबांच्या गणेशवंदनाचा आशय. बुद्धी केवळ शुद्ध असून भागणारे नाही तर ती प्रबळही बनावी, हे महाराजांचे मागणे मोठे लक्षणीय आहे. ध्येयाच्या मार्गावर वाटचाल करत असताना नाना प्रकारची आमिषे, मोह विद्याथ्र्याला अगर उपासकाला भुलवत राहतात. त्या आकर्षणांना सहजासहजी बळी पडण्याइतकी, हे गजानना, माझी बुद्धी लेचीपेची राहू देऊ नकोस, साध्याच्या मार्गावर स्थिर राहण्यासारखी ती चांगली प्रबळ बनव, अशी प्रार्थना आहे तुकोबारायांची. काय हो स्थिर राहेल बुद्धी। कांहीं अरिष्ट न येल मधीं। धरिली जाईल ते शुद्धी। शेवट कधी तो मज न कळे या महाराजांच्या उद्गारांत तीच भावना प्रतिबिंबित झालेली आहे. प्रतिष्ठापना करतेवेळी बाप्पांकडे आज नेमके काय मागायचे ते ठरवायचे आहे आता आपण. – अभय टिळक

agtilak@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ganesh utsav different tukobaraya look ganesh vision akp

ताज्या बातम्या