तीर्थयात्रा ही तशी सोपी साधना नव्हेच. प्रवासाची साधने मुदलातच नव्हती त्या युगात तर तीर्थाटन ही महाकठीण बाब गणली जात असे. परंतु आजघडीला प्रवास प्रचंड सहजसुलभ बनलेला असला तरीही तीर्थाटन ही सहज उठून करण्याजोगी साधना काही म्हणता येत नाही. मुख्य म्हणजे तीर्थाटनासाठी गात्रे हवीत अनुकूल. त्यामुळे अंगात बळ आहे तोवरच तीर्थादिकांना भेटी द्याव्यात असा रोकडा सल्ला देतात तुकोबा ‘जंव हें सकळ सिद्ध आहे। हात चालावया पाये। तंव तूं आपुलें स्वहित पाहें। तीर्थयात्रे जायें चुकों नको’ इतक्या नि:संदिग्ध शब्दांत. मात्र केवळ शरीराची साथही नसेती पुरेशी. शरीरबळाला पुरेशा द्रव्यबळाची साथ असेल तरच तीर्थाटन बनते शक्य. एकतर प्रवासासाठी चार पैसे हवेत गाठीला. दुसरे म्हणजे तीर्थाच्या ठिकाणी वास केल्यानंतर तिथे करावयाच्या कर्मकांडांसाठीही कडोसरीचा बटवा हवा भरलेला. तरीही समाजपुरुषाच्या मनात तीर्थयात्रेचे आकर्षण सदासर्वकाळ नांदत आलेले दिसते. हातून कळत-नकळत घडलेल्या पातकांचा निरास व्हावा आणि स्वर्ग वा मोक्षप्राप्ती घडावी, ही तीर्थयात्रेमागील प्रधान अशी प्रबळ प्रेरणा थेट अनादि काळापासूनची. परत तीर्थाच्या ठिकाणी निव्वळ पोहोचून भागत नाही, तिथे यथासांग पार पाडावे लागतात तीर्थविधी. मुंडण, उपवास, स्नान-दान हे तीर्थांतील मुख्य विधी. मस्तकाच्या ठिकाणी वसणारी सर्व पापे मुंडणामुळे नष्ट होतात, ही परंपरागत धारणा. दंडण-मुंडण-पंचाग्निसाधन-योगयाग-मौन-एकांतवास यांसारखी तीर्थांच्या ठिकाणी आवर्जून स्वीकारायची व्रतवैकल्ये सर्वसाधारण संसारिकांना पचतील, पेलवतील याची पुन्हा शाश्वती नाही. पुराणांतरी उदंड महिमा गाजणारा हा सारा साधनसंभार अनावश्यक आणि अप्रस्तुत ठरविणे, हे पंढरीक्षेत्राचे आगळेपण. ‘न लगे दंडण मुंडनीं आटी। योगा यागाची कसवटी। मोकळी राहाटी। कुंथाकुंथीं नाहीं येथें’ अशा मोठ्या मार्मिक शैलीत नाथराय विवरून सांगतात पंढरीचे लोकोत्तर पृथकपण. पुन्हा इतकी सारी व्रताचरणे तीर्थस्थळी राहून करावयाची म्हणजे वेळही हवा. कारण प्रत्येक व्रताचे विधिनिषेध पाळणे हे तर साधकाला बंधनकारकच शास्त्राने. सर्वसामान्य प्रापंचिकांच्या लेखी या साऱ्या बाबी तशा अवघडच. क्षेत्राधिपती असणाऱ्या विठ्ठलदेवाचे नाम ओठी धरून पंढरीत एक पाऊल जरी उचलले तरी अवघ्या तीर्थभ्रमंतीचे सार पदरात पडते, अशी ग्वाही ‘वाराणसी चालिजे मासा। गोदावरी एक दिवसा। पंढरी पाऊल परियसा। ऐसा ठसा नामाचा’ इतक्या निरपवाद शैलीत पुरवत नामदेवराय अधोरेखित करतात पंढरीचे लोकतीर्थत्व. मुळात पापक्षालन करणे हा तीर्थाटनामागील प्राचीन व प्रधान हेतू. पापाचरणाला कारणीभूत असते ती प्रत्येक जीवमात्राच्या ठायी कमी-अधिक प्रमाणात वसणारी पापबुद्धी. तीर्थामध्ये बुडी मारल्याने तेथवर हातून घडलेल्या पापांचा निरास होईल अथवा व्हावा, हेही एक वेळ मान्य. परंतु तीर्थस्नानाद्वारे केवळ शरीरच काय ते धुतले जाऊन पापबुद्धी चिवटपणे तशीच शाबूत राहिली तर उपयोग काय? पंढरीसारख्या आगळ्या लोकतीर्थाचे असाधारणत्व एकवटलेले आहे ते नेमके इथेच. ‘ऐसें तीर्थ कोणीं दाखवा निर्मळ। जेथें नासे मळ दुष्टबुद्धिं’ अशा विलक्षण मननीय शब्दांत नामदेवराय विदित करतात पंढरीचे अनुपम्य सामर्थ्य. मलीन आणि नासक्या बुद्धीपायीच नासून जातो अवघा लोकव्यवहार. बुद्धी निर्मळ राखण्यासाठीच धाव घ्यायची पंढरीकडे नित्याने. त्यालाच म्हणतात वारी ! – अभय टिळक

agtilak@gmail.com