साठीत शिरणाऱ्या महाराष्ट्राला बुद्धिप्रामाण्याच्या वारशाची आठवण करून द्यावी, इतपत त्याचे विस्मरण झालेले दिसते..
बुद्धिवादाचा, त्यावर आधारित समाजसुधारणा आणि राजकीय चळवळींचा मार्ग महाराष्ट्राने लांबरुंद केला. काही ना काही निमित्ताने, नाटकीपणाने भावनेस हात घालून जनसामान्यांची मने रिझविण्याचा क्षुद्र विचार आणि प्रयत्न या मराठी मातीतील प्रज्ञावानांकडून कधीही झाला नाही. याचे कारण चारपाचशे वर्षे मृतप्राय पडलेल्या महाराष्ट्र भूमीत प्राण फुंकणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वात असावे..
व्यक्तीप्रमाणे व्यक्तींना सामावून घेणाऱ्या प्रदेशांची म्हणून काही गुणवैशिष्टय़े असतात. ती शारीरिक ठेवण आदींशी जशी संबंधित असू शकतात तशीच ती स्वभाव वैशिष्टय़ेदेखील स्पष्ट करणारी असतात. मानववंशशास्त्र हा या सगळ्याचा अभ्यासाचा विषय. सामान्यजन त्या अभ्यासाशी अनभिज्ञ असतील/ नसतील. पण तरीही या अशा गुणवैशिष्टय़ांचे वर्णन करणारा प्रचलित शब्द या अभ्यासाचा सारदर्शक आहे. तो म्हणजे मातीचा गुण. तेव्हा महाराष्ट्राच्या मातीचा असा विशेष गुण काय?
गोविंदाग्रजांनी ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ म्हणून त्याचे यथार्थ वर्णन करून ठेवलेले आहे. त्याच्याच पुढे वास्तविक ते ‘नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा’ असे महाराष्ट्रास म्हणू पाहतात. पण या दुसऱ्या ओळीपेक्षा आपला पहिलीशीच अधिक परिचय. त्याच कवितेत ते महाराष्ट्रास ‘बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा’ असे म्हणत असले तरी त्याआधीचे ‘अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा’ हे वर्णन आपल्या अधिक जिव्हाळ्याचे. तेव्हा गोविंदाग्रजांनी वर्णिलेला महाराष्ट्र योग्यच. पण ते वर्णन महाराष्ट्राच्या बाह्य़रूपाशी अधिक निगडित. या पंक्तींतून महाराष्ट्रमनातील अंतरंगाचा अंदाज येऊ शकत नाही. तेव्हा महाराष्ट्राचे अंतरंग आहे तरी कसे?
भारताच्या सामाजिक इतिहासात बंगालचे सुपुत्र राजा राममोहन रॉय यांनी हाती घेतलेली सती प्रथेविरोधातील चळवळ ही सर्वाना ठाऊक असते. एकोणिसाव्या शतकाची पहाट होत असताना पहिल्या दशकांत रॉय यांनी समाजसुधारणेच्या दिशेने पहिले पाऊल उचलले. १८२० ते १८३० हा तो साधारण कालखंड. रॉय यांच्या काही ऐतिहासिक पावलांनंतर अवघ्या सात वर्षांत महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर यांच्यामुळे तर्कवादाचा उदय झाला. हे जांभेकर ‘दर्पणकार’ म्हणून अधिक ओळखले जातात. लहान मुद्दे अधिक लक्षात ठेवण्याच्या आपल्या मानसिकतेस साजेसेच हे. तथापि जांभेकर यांची कामगिरी ही एका संपादकपदात मावणारी नाही. भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, तत्त्वज्ञान, अर्थकारण अशा अनेक विषयांत त्यांना गती होती आणि त्यांच्या महत्त्वाच्या विद्यार्थ्यांत भाऊ दाजी लाड ते दादाभाई नौरोजी अशा अनेकांचा समावेश होता. यावरून त्यांच्या बौद्धिक उंचीचा आवाका लक्षात यावा. रॉय यांच्यानंतर बंगाल प्रांतातील समाजसुधारणा चळवळ ही धार्मिक अंगाने गेली तर महाराष्ट्राने मात्र तिला करकरीत बुद्धिप्रामाण्यवादापासून ढळू दिले नाही. हा बुद्धिवादाचा मार्ग पुढे चांगलाच लांबरुंद झाला. तर्खडकर, भांडारकर, न्या. तेलंग, न्या. रानडे, आगरकर अशी एकापेक्षा एक तगडी स्वयंप्रकाशित व्यक्तिमत्त्वे येथे उदयाला येत गेली. जांभेकर आणि तद्नंतरचे विद्वान राज्यात तर्कवाद रुजवत असताना त्याच काळात महात्मा फुले यांच्यासारख्या क्रियावंताने शेतकऱ्यांचे आसूड ओढावेत हा योगायोग मोठा विलक्षणच म्हणायचा. पुढे याच महाराष्ट्रात जागतिक कीर्तीचे केरूनाना छत्रे यांच्यासारखे गणिती, वैज्ञानिक शंकर आबाजी भिसे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सांख्यिकी पांडुरंग वासुदेव सुखात्मे, स्फोटकेतज्ज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन, प्रकांडपंडित आणि मूलगामी अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आजही ज्यांनी घालून दिलेल्या समीकरणांनुसार केंद्र आणि राज्ये यांत महसुलाची विभागणी होते ते डॉ. धनंजयराव गाडगीळ, देशास चित्रपटकलेची देणगी देणारे दादासाहेब फाळके असे अनेक महानुभाव निपजले. नावे तरी किती घ्यावीत त्यांची.
बुद्धिवैभव हे या आणि अशा अनेकांचे वैशिष्टय़. काही ना काही निमित्ताने, नाटकीपणाने भावनेस हात घालून जनसामान्यांची मने रिझविण्याचा क्षुद्र विचार आणि प्रयत्न या मराठी मातीतील प्रज्ञावानांकडून कधीही झाला नाही. याचे कारण चारपाचशे वर्षे मृतप्राय पडलेल्या महाराष्ट्र भूमीत प्राण फुंकणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वात असावे. आसपास आणि सर्वत्रच आसमंतात माना आणि मने टाकलेल्यांची मायंदाळ प्रजा असताना भोसल्यांकडील या मुलास ताठ उभे राहावे असे वाटले हाच खरे तर मानववंशशास्त्रीय चमत्कार ठरतो. शिवाजी महाराजांच्या सर्व कर्तृत्वाचा पाया बुद्धिवाद हा होता. भावनेच्या आहारी वेडात दौडत जाऊन आपले अस्तित्व लयाला घालवण्याचा आततायीपणा त्यांच्या काळात घडलाही असेल. पण शिवाजी महाराजांनी भावनाशरण कृती केल्याचे उदाहरण चुकूनही आढळणार नाही. पुढे थोरल्या बाजीराव पेशव्याने ही कर्तृत्वाची पताका थेट अटकेपार नेली. परंतु काळाने लादलेला कर्मदरिद्रीपणा असा की त्या काळात थेट दिल्लीलाही कवेत घेणारा हा शूरवीर अलीकडे अनेकांना माहीत असतो तो मस्तानीपुरताच. या बाजीरावाने उभारलेल्या शनिवारवाडय़ावर युनियन जॅक फडकेपर्यंत या देशावर साहेबाचे राज्य निर्माण होऊ शकले नाही. शनिवारवाडय़ावर ब्रिटिशांचा झेंडा झळकला तेव्हा कोठे संपूर्ण देश पारतंत्र्यात गेला असे मानले गेले. चार घरांच्या पलीकडे गावसुद्धा न पाहिलेल्या आणि मिसरूडही न फुटलेल्या वयात ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’ अशी बौद्धिक मिजास मिरवणाऱ्या ज्ञानेश्वरांना जन्मास घालणाऱ्या मातीचेच हे वैशिष्टय़ असावे. त्याचमुळे ब्रिटिश काळात सुरुवातीला देशाची राजधानी कोलकाता होती तरी देशाच्या राजकारणाचे केंद्र पुणे हेच होते. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीची मुहूर्तमेढ या महाराष्ट्रानेच रोवली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यापासून ते गांधीकाळास आकार देणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले यांचे कार्यकर्तृत्व फुलले ते याच पुण्यात. गांधींना महात्मापदाची दिशा देणारा हा पुणेकरच होता आणि त्यांचे जीवन संपवून टाकणारा नथुराम गोडसे हाही पुणेकरच होता हा योगायोग दुर्दैवी खरा. पण तो नाकारता येण्यासारखा नाही.
महाराष्ट्राची ही वैभवी वाटचाल स्वातंत्र्योत्तर काळातही सुरू राहिली. महाराष्ट्रास महा राष्ट्रपण देणाऱ्या सहकारी चळवळीचा पाया याच राज्यात घातला गेला. वैकुंठभाई मेहता आणि थोरले डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हे याच राज्यातील. इतकेच नव्हे तर रिझव्र्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर चिंतामणराव देशमुख हे याच मातीतले. त्यांच्या नोंदणीकृत लग्नात साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करायला थेट पंडित जवाहरलाल नेहरू आले होते, हे अनेकांना आजही ठाऊक नसावे. त्याचप्रमाणे आकाशवाणीवर रात्री शास्त्रीय संगीताची बैठक सुरू करण्याचे आणि आकाशवाणीसाठी स्वतंत्र वाद्यवृंद तयार करण्याचे श्रेयदेखील मराठी माणसाचे, याचाही अनेकांना विसर पडला असावा. बाळकृष्ण विश्वनाथ केसकर हे त्यांचे नाव. पं. नेहरूंच्या मंत्रिमंडळात माहिती खात्याचे मंत्री असलेले हे केसकर पुण्याचे. परंतु पुण्यात जन्मूनही उत्तर प्रदेशातील सुलतानपूर वा अमेठी जिल्ह्य़ातील मुसाफिरखाना अशा मतदारसंघांतून निवडून येण्याचे अचाट राजकीय साहसही त्यांच्या नावावर आहे. या राज्याच्या गौरवांकित इतिहासाचे असे अनेक दाखले देता येतील.
ही अशी महाराष्ट्रगाथा आज गाण्याचे काही एक विशेष प्रयोजन. ते म्हणजे आता हे राज्य साठीत शिरेल. १ मे १९६० या दिवशी यशवंतराव चव्हाण यांनी राज्यस्थापनेचा मंगलकलश आणला त्यास आज ५९ वर्षे झाली. एखाद्या प्रांतांच्या वयाची साठी म्हणजे एक स्वल्पविरामदेखील नाही. साठीत बुद्धी नाठी होण्याचा शाप व्यक्तीस असतो. प्रांतास नाही. तथापि ही बुद्धी नाठी न होतादेखील या इतिहासाचे विस्मरण आजच्या महाराष्ट्रास नि:संशय झाले आहे. किंबहुना या बुद्धीच्या अस्तित्वाबाबतच प्रश्न पडावेत अशीच ही सांप्रत स्थिती. ज्या प्रांताने संपूर्ण देशास विचारांनी दिपवले त्या राज्याच्या विचारक्षमतेवर जमलेली काजळी आणि काजळमाया या वर्धापन दिनानिमित्ताने तरी दूर व्हावी इतकाच काय तो उद्देश.