करोना विषाणूच्या नव्या रूपाचे प्रत्यक्षात दर्शन झाले ते सप्टेंबरात. त्याबद्दल आरोग्य वैज्ञानिकांनी इशारा देऊनही ब्रिटनच्या जॉन्सन सरकारने त्या वेळी त्याकडे दुर्लक्ष केले..

आता या विषाणू अवतारास इतके गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे काही तज्ज्ञांना वाटत असताना मात्र पंतप्रधान जॉन्सन कडेकोट टाळेबंदीसारख्या उपायांचा अतिरेक करतात..

सर्वोच्च स्थानी खुज्या व्यक्ती विराजमान झाल्यास महासत्ताही कशा दयनीय होतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिका आणि इंग्लंड यांची आजची स्थिती. हे दोनही देश विषाणूग्रस्त आहेत. यातील इंग्लंडास एका विषाणूने झोपवले आहे, तर अमेरिका दोन विषाणूंच्या माऱ्यात पार आडवी झाली आहे. या दोहोंतील एक नैसर्गिक आहे, तर दुसरा मानवनिर्मित. या दोन देशांत नाकीनऊ आणणारा एक विषाणू समान आहे. तो म्हणजे करोना घडवणारा कोविड-१९. अमेरिकेस या करोनाच्या जोडीने मानवनिर्मित संगणकीय विषाणूने हादरवले असून या संगणकीय विषाणू-हल्ल्यामागे चीन की रशिया यांतील कोणाचा हात आहे हेदेखील त्या देशास अद्याप लक्षात आलेले नाही. यावरून संगणकीय आरोग्याबाबतही अमेरिका नावाची महासत्ता किती केविलवाणी झाली आहे हे लक्षात येईल. या दोन्हींस या देशांचे उडाणटप्पू नेतृत्व.. अनुक्रमे डोनाल्ड ट्रम्प आणि बोरिस जॉन्सन.. हे कारणीभूत आहेत, ही बाब दुर्लक्ष करणे अवघड. अमेरिकी संगणक व्यवस्थेवर हल्ला होईल याचा पुरेसा इशारा असताना, तसेच अमेरिकी नागरिकांसमोर करोनाधोका वाढणार याची पूर्वकल्पना असतानाही ट्रम्प महाशय गोल्फ खेळण्यात वा आपला निवडणूक पराभव कसा रद्दबातल करता येईल याचे मनसुबे आखण्यात मग्न होते. अमेरिकेतील या संगणक हल्ल्याविषयी नंतर सविस्तरपणे. तूर्त ब्रिटनच्या दुर्दैवाचे दशावतार घडवून आणणाऱ्या करोनाविषयी. या करोनाने जगासमोर दोन पद्धतींचे नेते समोर आणले.

संकटाची पुरेशी तीव्रता वाढायच्या आतच काही तरी करून दाखवण्याच्या उत्साहात टाळेबंदी लागू करणारे आणि दुसरे म्हणजे संकट गळ्याशी आले तरी त्याची अजिबात दखल न घेणारे. ट्रम्प आणि जॉन्सन हे या दुसऱ्या गटात मोडतात. करोना-नियंत्रणासाठी टाळेबंदीची गरज नाही, सामुदायिक प्रतिकारशक्ती हा त्यावरचा उतारा, असे म्हणत नंतर टाळेबंदी जारी करणारे, ती केल्यानंतर उठवायची कधी याबाबत घोळ घालणारे, नंतर पुन्हा टाळेबंदीची गरज नाही असे सांगून पुन्हा ती लावणारे आणि नाताळाचा सण उत्साहात साजरा करा असे म्हणून नाताळाच्या तोंडावर पुन्हा कडकडीत टाळेबंदी लावणारे जॉन्सन हे वजनदार ब्रिटिश पंतप्रधानांच्या परंपरेतील सर्वात हलके पंतप्रधान असावेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी संपूर्ण ब्रिटनभर कडेकोट टाळेबंदीची घोषणा केली. या वेळचे कारण काय तर कोविड विषाणूचे नवे रूप! त्याविषयी ऊहापोह करण्याआधी जॉन्सन यांच्या धोरण झोकांडय़ांचा उल्लेख करावा लागेल. नाताळ सणासाठी सर्व काही सुरळीत केले जाईल, असे सांगता सांगता त्यांनी अचानक ही नवी टाळेबंदी जाहीर केली. यामुळे नागरिकांच्या हिरमोडीपेक्षाही अधिक त्यांची किती गैरसोय झाली असेल याची कल्पना आपणास अनुभवता येईल. आता पंतप्रधानच धोका आहे असे म्हणतो आहे हे दिसल्यावर युरोपातील अनेक देशांनी ब्रिटनशी हवाई संबंध तोडले. ब्रिटनचा हा नवा विषाणू आपल्या प्रांतात नको यासाठीच्या खबरदारीचा उपाय म्हणून अनेकांनी ब्रिटनला तूर्त चार हात दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. ब्रिटन आणि युरोपातील अन्य देश सध्या अत्यंत कडू चेहऱ्याने ब्रेग्झिटचा गुंता सोडवण्याच्या प्रयत्नात आहेत. जॉन्सन यांच्यामुळे तो अधिकच गुंतागुंतीचा होताना दिसतो. त्यामुळे युरोपीय देश जॉन्सन यांच्यावर आणि त्यामुळे ब्रिटनवर खप्पा आहेत. ज्या पद्धतीने आणि गतीने या देशांनी ब्रिटनशी हंगामी हवाई काडीमोड घेतला ते पाहता, यामागे युरोपच्या गळ्यात अडकलेले ब्रेग्झिटचे हाडुक निश्चितच आहे.

पाठोपाठ, सोमवारी आपणही या देशाची विमानसेवा काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. या वेळी आपण लवकर जागे झालो, हे यातून दिसले. यंदाच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यांत संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, अमेरिका आणि इंग्लंड या चार देशांवर विमानसेवा बंदी घालण्यास आपण कचरलो. त्यामुळे आपल्याकडे करोना अपेक्षेपेक्षा लवकर आला. हे सत्य लक्षात घेता, या वेळी आपण आधीच ब्रिटनशी हवाईनाते स्थगित ठेवले हे बरे झाले. यातील दुर्दैवी आणि वेदनादायी योगायोग म्हणजे, २०२०च्या फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेत करोना सुसाट वेगात असताना त्या देशाचे प्रमुख ट्रम्प भारतात- म्हणजे अर्थातच अहमदाबाद येथे- पायधूळ झाडते झाले. आणि यंदा करोनाप्रसार असाच वेगात असताना ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन नवी दिल्लीत आपल्या देशात येत आहेत. असो. तोपर्यंत तरी करोनाची ही दुसरी वा तिसरी लाट आटोक्यात आली असेल अशी आशा करता येईल.

आता करोनाच्या या नव्या रूपाविषयी. ज्याच्या नावे आणीबाणीचा इशारा देत ब्रिटनमध्ये टाळेबंदी जाहीर केली गेली, त्या करोना विषाणूच्या नव्या रूपाचे दर्शन झाले ते प्रत्यक्षात सप्टेंबरात. त्याच वेळी ब्रिटिश आरोग्य वैज्ञानिकांनी या नव्या विषाणू अवताराचा इशारा दिला होता. जॉन्सन सरकारने त्या वेळी त्याकडे दुर्लक्ष केले. याबाबत दुसरा मुद्दा असा की, ज्वरनिर्माण करणाऱ्या या विषाणूंचे नवे संकरावतार नेहमीच होत असतात. म्हणजे करोनाबाबत नवीनच काही घडले असे नाही. घडले आहे ते असे की, या विषाणूच्या अंगावर जे भाल्यांसारखे तंतू वा काटे आहेत त्यांच्या स्वरूपात बदल झाले आहेत. प्रथिनाधारित अशा या काटय़ांतील बदलांमुळे मानवी प्रतिकारशक्ती लवकर भेदता येऊ लागली. या विषाणूच्या पृष्ठभागावरील हा बदल नैसर्गिक आहे की कोणा बाधिताच्या शरीरात या विषाणूचा विद्यमान कोणा अन्य विषाणूशी संकर होऊन हे घडले आहे, याबाबत शास्त्रज्ञांचे अनुमान निश्चित नाही. या सर्व शास्त्रज्ञांत करोना विषाणूच्या पृष्ठभागावरील बदलांबाबत मात्र एकमत आहे. तेव्हा या बदलामुळे करोनाबाधितांवरील उपचारांत काही बदल करावा लागेल किंवा काय, याबाबतही शास्त्रज्ञ गोंधळलेले आणि म्हणून चिंतित आहेत. कारण सर्व उपचारसंसार नव्याने मांडायचा असेल तर भलतेच अवघड आव्हान. तसेच करोनाच्या या नव्या अवतारामुळे लशीच्या रूपातही बदल करावा किंवा काय, हा एक प्रश्न.

या बदलामुळे करोनाप्रसाराचा वेग कमालीचा वाढल्याचे शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे आणि त्या पुष्टय़र्थ आकडेवारीही आहे. ती असे दर्शवते की, एरवी विषाणूचा प्रसार समजा १:१ अशा समीकरणाने होत असेल, तर या नव्या विषाणूचा रोगप्रसाराचा वेग १:१.४ असा आहे. याचा अर्थ हा विषाणू एका वेळी अधिकांना आजारी पाडतो. त्याच्या या क्षमतेमुळेच ब्रिटनमधील वैद्यकविश्व हडबडून गेले. मात्र त्याच वेळी या विषाणूची संहारकता पहिल्यापेक्षा कमी आहे, असे वैद्यकांचा एक गट मानतो. कारण विषाणूचा प्रसार आडवा अधिक असेल तर त्याच्या दंश क्षमतेची ‘उंची’ कमी असते असे मानले जाते. त्याचमुळे या नव्या विषाणूचा प्रसारवेग अधिक आहे, सबब तो तितका जीवघेणा नाही. म्हणून इतकी काळजी करण्याचे तसेच त्यासाठी इतक्या कडेकोट टाळेबंदीचे कारण नाही, असे हे तज्ज्ञ मानतात.

पण पंतप्रधान जॉन्सन यावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. कारण जेव्हा दखल घ्यायला हवी होती तेव्हा जॉन्सन यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि या विषाणू अवतारास इतके गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे तज्ज्ञांना वाटत असताना मात्र जॉन्सन उपायांचा अतिरेक करतात. अशा तऱ्हेने पंतप्रधानांच्या मनमानीची शिक्षा ब्रिटिश नागरिकांनाही भोगावी लागून त्यांचा नाताळ अंधारात जाणार हे निश्चित. आधीच करोनाकाळ आणि त्यात हे असे नेते म्हणजे जखमेवर मीठ. एक नाताळ हुकल्याचे दु:ख नाही, पण हे नाठाळ नेते सोकावतात, अशीच भावना ब्रिटिशांच्याही मनात असणार. पण त्यास तूर्त तरी इलाज नाही.