scorecardresearch

अग्रलेख : फूटउत्सुकांची फौज!

राज ठाकरे यांनी ‘हिंदूंनो एक व्हा’ अशी हाकाटी घालत पुन्हा एकदा आपले हिंदूत्ववादी वळण सूचित केले.

निवडणुका एका शहराच्या. महानगरपालिकेच्या. आणि त्यात मुद्दे कोणते? तर धर्म आणि भाषा! राजकारणाच्या या अतिसुलभीकरणपायी, समोरच्या प्रश्नांचा विचारच नाही..

रामचंद्र चितळकर ऊर्फ संगीतकार सी रामचंद्र यांनी वर्णिलेला हा प्रसंग. एका सद्गृहस्थाने त्यांच्याकडे ‘ही प्रति-लता आहे’ असे सांगत एका तरुण गायिकेची शिफारस केली. त्यावर सी रामचंद्र म्हणाले : समोर खरी लता असताना प्रति-लताची गरजच काय? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या बहुप्रतीक्षित गुढीपाडवा सभेतील भाषणाच्या पार्श्वभूमीवर हा प्रसंग समयोचित ठरावा. या सभेत राज ठाकरे यांनी ‘हिंदूंनो एक व्हा’ अशी हाकाटी घालत पुन्हा एकदा आपले हिंदूत्ववादी वळण सूचित केले. वास्तविक हिंदूत्वाचे कार्य सिद्धीस नेण्यास तूर्त नरेंद्र मोदी आणि त्यांचा भाजप हे एकहाती सक्षम आहेत. त्या उद्दिष्टांसाठी त्यांना ना ठाकरे बंधूंची गरज आहे ना ‘जानवेधारी’ राहुल गांधी वा तत्समांची. तरीही स्वत:च्या हिंदूत्वनिष्ठेची द्वाही फिरवत नवनवे नेते आणि त्यांचे निष्प्रभ पक्ष भाजपच्या यात्रेत सहभागी होताना दिसतात. त्यामागे हिंदूत्वाच्या आणि म्हणून भाजपच्या गरजेपेक्षा या नवहिंदू पक्ष आणि नेत्यांची अपरिहार्यता अधिक आहे हे अमान्य होणे अशक्य. अर्थात इतर राजकीय पक्षांना हा हिंदूत्वाचा हिजाब परिधान करावयास लावणे हे निर्विवाद भाजपचे यश. यातून राजकीय कथानकाचे सूत्र आपल्या हाती राखण्याचे भाजपचे कसब ठसठशीतपणे उठून दिसते. गुढीपाडव्याच्या हिंदू पवित्रदिनी राज ठाकरे धर्माची कास धरण्याचा आपला इरादा स्पष्ट करीत असताना त्याच दिवशी सकाळी त्यांचे चुलतबंधू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठी नववर्षदिनी भाषिक जाणिवांस स्पर्श करत होते. महाराष्ट्राच्या राजकारणातील हे बदलते वारे दखल घ्यावी असे.

म्हणजे शिवसेनेची स्थापना झाली मराठी माणसाच्या उद्धारासाठी. त्यात अनेक अमराठी वळणे घेतल्याने मराठीचा मुद्दा त्या पक्षाच्या हातून निसटू लागला. दरम्यान नव्वदच्या दशकात लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेने हिंदूत्वाचे पुनरुत्थान केले. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे उधळते घोडे अलगदपणे त्या रथास जोडून टाकले. मराठीच्या पलीकडे जात अमराठीजनांना आणि मतांना आपले म्हणता यावे यासाठी ही हिंदूत्ववादी भूमिका शिवसेनेस सोयीस्कर होती. एव्हाना स्वत:चा ‘मनसे’ संसार थाटणाऱ्या राज ठाकरे यांनी शिवसेनेकडून दुर्लक्षित झालेल्या मराठीचा हात हाती घेतला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या प्रति-शिवसेनेचा झंझावात निर्माण केला.  दरम्यान हिंदूत्वाच्या आणाभाकांवर भाजपशी आपला दोन-तीन दशकांचा संसार, पुरेसा मान मिळत नाही असे सांगत शिवसेनेने उधळून लावला आणि एकाऐवजी दोन नवे जोडीदार पत्करले. त्याआधी शिवसेना हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर भाजपसमवेत होती म्हणून मनसेने हिंदूत्वविरोधी भूमिका घेतली आणि हिंदूत्ववाद्यांवर आपले आसूड ओढले. पण कडकलक्ष्मीप्रमाणे त्यांचा फक्त आवाज आला. जखमा दूरच पण संबंधितांस खरचटलेही नाही. विजय हिंदूत्ववादी म्हणवणाऱ्यांचा झाला. हिंदूत्वास विरोध करणारे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यांच्या मागून मनसे पुन्हा अडगळीत गेले. पण २०१९ च्या निवडणुकांनंतर स्वत:च्या कपाळावरील हिंदूत्वाची टिकली कायम ठेवत शिवसेनेने इतके दिवस हिंदूत्वविरोधी ठरवल्या गेलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी निकाह लावल्याने सगळय़ांचीच पंचाईत झाली. विशेषत: मनसेची. तोपर्यंत मनसे पुन्हा एकदा हिंदूत्वाकडे वळला होता. पण सी रामचंद्र म्हणून गेले त्याप्रमाणे समोर ‘खरे’ हिंदूत्ववादी असताना प्रति-हिंदूत्ववादी मनसेकडे मतदारांनी दुर्लक्ष केले. तरीही आता पुन्हा या पक्षास हिंदूत्वाचा आधार घ्यावा लागत आहे.

कारण समोर ठाकलेल्या महानगरपालिका निवडणुका. त्या जसजशा जवळ येतील तसतशी शिवसेना अधिकाधिक मराठीवादी होईल आणि मनसे हिंदूत्ववादी. शिवसेनेस दरम्यानच्या काळात मनसेमागे गेलेल्या आणि नंतर त्या पक्षास वाऱ्यावर सोडणाऱ्या मराठी मतदारांची गरज आहे आणि धरसोडीच्या राजकारणामुळे मराठीजनांनी पाठ फिरवल्यानंतर अमराठीजनांनी तरी आपले म्हणावे म्हणून मनसेस हिंदूत्ववादाची निकड आहे. या मुद्दय़ावर खरे तर भाजप अधिकृतपणे मनसेचा हात हाती मागू शकतो. पण तसे तो करणार नाही. याचे कारण म्हणजे मराठीपणाचा झेंडा फडकावत मनसेने काही वर्षांपूर्वी स्थलांतरितांवर, त्यातही विशेषत: हिंदी भाषकांवर मुंबईत केलेले हल्ले. त्यामुळे हिंदी भाषक राज्यांत मनसेविषयी अढी आहे. अशा पक्षाशी अधिकृत सोबत करणे त्यामुळे भाजपस परवडणारे नाही. मुंबईतील या हिंदी भाषकांना जवळ करण्यासाठी कृपाशंकरादी गणंगांस भाजपने पवित्र करून घेतलेले आहेच. आता पडद्यामागे राहून ‘आपल्या’साठी काम करणाऱ्यांस भाजप अधिक जवळ करेल. राज्यभरात नाही तरी मुंबईत ही भूमिका मनसे पार पाडू शकतो. यात मनसेच्या हाती काय लागेल, काय नाही याची फिकीर भाजपने करण्याचे कारण नाही. तो त्या पक्षाचा प्रश्न. तथापि मुंबई महापालिका निवडणुकांआधी भाजपस हिंदूत्वाचा मुद्दा अधिकाधिक तापवण्याची गरज आहे कारण त्या पक्षाकडे मुंबईसाठी म्हणून मराठी नेतृत्वाचा चेहरा नाही. आणि प्रचारात मोदी-शहा आदींना उतरवावयाचे असेल — आणि मुंबईचे ‘महत्त्व’ लक्षात घेता ते उतरतीलच — तर राजकारण हिंदूत्वाभोवती फिरते ठेवण्याखेरीज पर्याय नाही.

त्यात राज ठाकरे सर्वार्थाने ‘कामी येऊ’ शकतात. त्यामुळे यापुढे अर्थात शिवसेना अधिकाधिक तीव्रपणे मराठीचा मुद्दा तापवू पाहणार आणि भाजप आणि त्याच्याआडून मनसे अधिकाधिक कर्कश्श हिंदूत्ववादी होत राहणार. म्हणजे निवडणुका एका शहराच्या. महानगरपालिकेच्या. आणि त्यात मुद्दे कोणते? तर धर्म आणि भाषा. त्याचमुळे केंद्रात गेली आठ वर्षे आणि त्यापैकी पाच वर्षे राज्यातील सत्ता असताना नबाब मलिकादी मान्यवरांचे दाऊद संबंध भाजपस जाणवलेही नाहीत आणि मुंबई महापौर निवास हे शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकांसाठी आंदण देण्याचा निर्णय भाजपचा आहे हे राज ठाकरे यांस लक्षात आले नाही. म्हणून उत्तर भारतीयांस ‘भय्या’ ठरवून मारझोड केल्यानंतर उत्तर प्रदेशात उत्तम विकास होत असल्याची जाणीव राज ठाकरे यांना होते आणि त्यांचा दृष्टिकोन संतुलित असल्याचे प्रमाणपत्र भाजप-नेते देतात. हे सर्व अगदीच शालेय म्हणता येईल असे राजकारण! पण त्यातून काही महत्त्वाचे प्रश्न उभे राहतात.

उदाहरणार्थ भाजपेतर पक्षांना, जसे की काँग्रेस, राष्ट्रवादी इत्यादी, मते देणारे सर्वच अहिंदू असतात काय? तसेच इतके दिवस शिवसेनेच्या आणि काही काळ मनसेच्याही मागे उभे राहणारे फक्त आणि फक्त मराठीच होते काय? नागरिकांची आणि मतदारांची इतकी सरधोपट विभागणी करता येत असेल तर ते राजकारणाचे अतिसुलभीकरण म्हणायला हवे. ते झालेलेच आहे. पण त्यामुळे देशासमोरचे, राज्यासमोरचे आणि शहरांसमोरचे प्रश्न काय याचा काही विचारच नाही. प्रश्न कोणतेही असोत. उत्तर एकच. धर्म, भाषा, जात इत्यादी. कोणताही राजकीय पक्ष नागरिकांच्या हितासाठी स्वत:सह कोणी काय केले याचा हिशेब मागत नाही आणि म्हणून देतही नाही. विकासाची भाषा करणारेही तो करता न आल्याने शेवटी धर्माच्याच आश्रयास जातात. त्याची अनेक उदाहरणे आसपास दिसतील. या मुद्दय़ांवर फूट पाडता येते कारण अशा फूटउत्सुकांना मतदारांची साथ आहे म्हणून. ग्राहक, शेतकरी ऊर्फ बळीराजा आणि मतदार यांस राजा असे संबोधून त्यांना कसे गुंडाळून ठेवता येते हे अनुक्रमे कंपन्या-दुकानदार, शासन आणि राजकीय पक्ष आपल्याकडे सतत दाखवून देतात. त्याचा नवा अध्याय आता महाराष्ट्रात सुरू होईल. फूटउत्सुकांची इतकी व्याकुळ फौज असताना दुसरे काय होणार?

मराठीतील सर्व अग्रलेख ( Agralekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray play hindu card in gudi padwa rally raj thackeray gudi padwa speech zws