दहशतवादय़ांना आता राष्ट्र या संकल्पनेला आणि न्यायसंस्थेसारख्या आधारस्तंभांनाच लक्ष्य करायचे आहे, हे पाकिस्तानातील क्वेट्टा येथील हल्ल्यातून दिसले..

नागरी समाज म्हणजे धर्मराष्ट्रवाद्यांसाठी सलता काटा असतो. आधुनिक लोकशाही जिवंत ठेवण्यात त्याचा मोठा वाटा असतो. कधी कायद्याच्या, तर कधी दहशतीच्या मार्गाने नागरी समाजाचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू असतात. हेच पाकिस्तानात होत आहे..

प्राचीन धर्म हा आधुनिक लोकशाही राष्ट्राचा आधार बनू शकत नाही हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झाले आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्याने ते पुन्हा अधोरेखित केले. एक राष्ट्र, एक धर्म आणि एक ध्वज मिरविणाऱ्या या देशात दहशतवादी हल्ले ही नावीन्याची गोष्ट राहिलेली नाही. पाकिस्तानी राज्यकर्त्यांचे तर ते रोजचे रडणे झालेले असून, जेव्हा जेव्हा पाकिस्तानवर दहशतवादाला आश्रय दिल्याचा आरोप होतो, तेव्हा तेव्हा तेथील राज्यकर्ते आम्हीही कसे दहशतवादाची शिकार आहोत असा बिचारेपणाचा आव आणत असतात. मुळात पाकिस्तानला ही विषारी फळे चाखावयास लागत आहेत, त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्या देशाचा दहशतवादाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. चांगला दहशतवाद आणि वाईट दहशतवाद असा काहीही प्रकार नसतो. मात्र पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्कर यांनी तसा फरक केलेला आहे. क्वेट्टामधील ताजा दहशतवादी हल्ला हा त्या धोरणाचाच परिणाम असून, त्यामुळे आज पाकिस्तानची एकात्मताच धोक्यात आल्याचे दिसत आहे. मात्र याबाबतही पाकिस्तानातील शासनकर्ता वर्ग सौदी अरेबियाच्या वाळूत तोंड खुपसून बसला आहे. भारताशी शत्रुत्व हे त्या शहामृगीवृत्तीचेच द्योतक आहे. सोमवारी क्वेट्टातील रुग्णालयात आत्मघाती हल्ला होत असताना इस्लामाबादेत ‘जागतिक दहशतवाद आणि पाकिस्तान’ या विषयावरील एक परिसंवाद सुरू होता. त्यात जमात-उद्-दवा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख हाफिझ सईद, जमात-ए-इस्लामीचा नेता लियाकत बलूच यांसारखे नेते सहभागी असणे हा मोठाच विनोद. त्याहून मोठा विनोद केला तो हाफिझ सईदने. गेल्याच आठवडय़ात पाकिस्तानात येऊन गेलेले भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा क्वेट्टातील हल्ल्यात हात असल्याचे तो म्हणाला. हे विधान आपल्या दृष्टीने हास्यास्पदच नव्हे, तर मूर्खपणाचे असले, तरी सईद याने ते मोठय़ा गांभीर्याने केलेले आहे. समाजासमोर सातत्याने एखादा शत्रू उभा ठेवल्याशिवाय दहशतवाद या व्यवसायाला भवितव्य नाही हे तो पक्के जाणून आहे. सईद हा तर बोलूनचालून दहशतवादीच. त्यामुळे त्याने अशी गरळ ओकण्यात नवल काही नाही. आश्चर्याची बाब ही, की तेथील शासनकर्ता वर्गही असेच भ्रम पसरविताना दिसतो. सतत अशा बाह्यशत्रूंचे भय समाजाला दाखविण्यातून अंतर्गत शत्रूंकडे मात्र आपले दुर्लक्ष होत असते, हे त्यांना कळत नाही असे नाही. परंतु आता तेही या अंतर्गत शत्रूंपुढे हतबल झाल्याचे दिसते आहे. अमेरिकेच्या अप्पलपोटय़ा आणि तेवढय़ाच धरसोडीच्या धोरणांतून निर्माण झालेल्या तालिबान, अल् कायदा आणि आता आयसिस या संघटनांनी पाकिस्तानच्या धार्मिक आणि राजकीय जीवनाचा ताबा घेतलेला आहे. आता या संघटनांचे लक्ष्य राष्ट्र ही संकल्पना आहे. ते कसे हे समजून घेणे आवश्यक आहे.

आपल्याकडील भारत-पाक मैत्रीची कबुतरे उडविण्याचा छंद असलेल्या विचारवंतांना पाकिस्तानातील नागरी समाजाचे मोठे कौतुक असते. त्यात गैर काही नाही. कोणत्याही राष्ट्रात सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी असा नागरी समाज आवश्यकच आहे. किंबहुना लोकशाहीची ती एक मोठी गरज आहे. मात्र या विचारवंतांना आपल्याच ‘विचारतळ्यांत’ डुंबणे अधिक आवडत असल्याने पाकिस्तानातील नागरी समाजाचे प्रमाण किती आहे, त्याचा प्रभाव किती आहे याबद्दल ते ठार आंधळे तरी आहेत किंवा त्यांनी आंधळ्याचे सोंग घेतलेले आहे. याचे कारण गेल्या कित्येक वर्षांपासून तेथील धर्मराष्ट्रवाद्यांनी या नागरी समाजाचे पद्धतशीर खच्चीकरण केले असून, त्यात तेथील आयएसआयच्या गुप्तचरांचाही हात आहे. कराचीतील ‘द सेकंड फ्लोअर’ हा कॅफे तेथील सामाजिक कार्यकर्त्यांचा, लेखक, कलावंतांचा अड्डा. साबीन महमूद ही मानवाधिकार कार्यकर्ती निर्भीडपणे तो चालवत असे. गेल्या वर्षी जूनमध्ये दहशतवाद्यांनी तिची गोळ्या घालून हत्या केली. त्याला वर्ष पूर्ण होत नाही तोच अमजद साबरी या सुविख्यात सुफी गायकाची हत्या करण्यात आली. या घटना अपवादात्मक नाहीत. त्यांमागे तेथील मानवाधिकार कार्यकर्ते, लेखक, कलावंत, पत्रकार असा जो वर्ग आहे त्याचा आवाज दाबण्याचे सूत्र आहे. धर्मराष्ट्रवाद्यांसाठी हा नागरी समाज म्हणजे सलता काटा असतो. आधुनिक लोकशाही जिवंत ठेवण्यात त्याचा मोठा वाटा असतो. म्हणून तो दूर करणे धर्मराष्ट्रवाद्यांसाठी आवश्यक असते. जेथे जेथे धार्मिक कट्टरतावादी शक्ती सत्तेवर कब्जा मिळवू पाहात आहेत तेथे तेथे कधी कायद्याच्या, तर कधी दहशतीच्या मार्गाने नागरी समाजाचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू असतात. पाकिस्तानात सध्या हेच घडत आहे. याशिवाय दहशतवाद्यांचे लक्ष असते ते आधुनिक राष्ट्राच्या आधारस्तंभांवर प्रहार करण्याचे. क्वेट्टात एका रुग्णालयामध्ये आत्मघातकी हल्ला करण्यात आला. हे कृत्य सैतानासही लाजविणारे असे आहे. मात्र त्या हल्ल्याचे खरे लक्ष्य रुग्णालय नव्हते, तर न्यायसंस्था होती हे नीट लक्षात घेतले पाहिजे.

क्वेट्टातील हल्ल्यात सुमारे ६५ जण मृत्युमुखी पडले असून, सव्वाशे जखमी झाले आहेत. त्यातील बहुतांश वकील किंवा पत्रकार आहेत. हे सर्व जण बिलाल कासी यांच्या हत्येची बातमी ऐकून तेथे जमले होते. कासी हे बलुचिस्तान बार असोसिएशनचे अध्यक्ष. आधी दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली आणि नंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जमा झालेल्या त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांवर आत्मघाती बॉम्बहल्ला केला. हे दहशतवादी कोण या तपशिलात आता फारसा अर्थ नाही. हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत दोन संघटनांनी घेतली आहे. त्यात नेहमीप्रमाणेच आयसिसचा समावेश आहे. दुसरी संघटना जमात-उल-अहरार ही आहे. या संघटनेचा प्रमुख ओमार खोरसानी हा माजी पत्रकार असून, पाकिस्तानी पत्रकारांना धमक्या देण्यात तो आघाडीवर असतो. क्वेट्टातील हल्ल्यातून त्याने न्यायमंडळ आणि माध्यम अशा लोकशाहीच्या दोन स्तंभांवर नेम साधला आहे. या स्तंभांवर दोन प्रकारे हल्ला केला जातो. एक तर त्याची विश्वासार्हता संपविण्याचे प्रयत्न केले जातात. ते आतून जसे केले जातात, तसेच बाहेरूनही. समाजमाध्यमांच्या काळात ते खूपच सोपे झाले आहे. त्याहून भयानक प्रकार म्हणजे त्या क्षेत्रातील व्यक्तींना संपविणे. पाकिस्तानात ते मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे.

अखेर कोणताही दहशतवादी हल्ला हा राज्ययंत्रणेवरचा हल्ला असतो. राज्य जनतेची सुरक्षा करू शकत नाही, हे दाखवून देत दहशतवाद्यांना राज्ययंत्रणा ताब्यात घ्यायची असते. त्यासाठी हल्ले होतात ते लोकांवर, तसेच राज्याच्या प्रतीकांवर. पण तरीही लोकांचा राज्यावर विश्वास असतो. तो घालवायचा असेल, तर त्यासाठी राज्याचे आधारस्तंभ खिळखिळे करणे आवश्यक असते. क्वेट्टातील हल्ला हा त्यासाठीच होता. राज्याच्या पायावर मारलेली ती कुऱ्हाड होती. पाकिस्तानातील उरल्यासुरल्या नागरी समाजासमोर आज आव्हान आहे ते याचा मुकाबला करण्याचे. ते कठीण आहे. एक वेळ शस्त्रांचा मुकाबला करता येईल. त्यासाठी राज्याची दंडशक्ती पुरेशी असते. परंतु या शस्त्रांमागे उभ्या असलेल्या कट्टरतावादी विचारसरणीचा सामना कसा करायचा हा खरा प्रश्न असतो. याचे कारण समाजमनालाच तिने विळखा घातलेला असतो. अशा वेळी आवश्यकता असते ती कट्टरतावादापुढे ठामपणे उभे राहू शकणाऱ्या विचारवंतांची, बुद्धिजीवींची, कलाकारांची, लेखकांची, स्वयंसेवी संस्थांची, सामाजिक कार्यकर्त्यांची, माध्यमांची. परंतु ज्या समाजाला, ज्या राष्ट्राला या दहशतवादी, धार्मिक कट्टरतावादी शक्तींपासून वाचवायचे असते, त्याच समाजाने एव्हाना या सर्वाना मोडीत काढत आपल्याच पायावर कुऱ्हाड मारलेली असते. पाकिस्तानपुढील नेमका गुंता आहे तो हाच. तो सुटत नाही तोवर किंवा दहशतवादी संघटनांच्या हाती ते राष्ट्र जात नाही तोवर, हा हिंसाचार असाच अव्याहत सुरू राहील, यात शंका नाही.