आपली सत्ता टिकणे म्हणजेच लोकशाहीचे रक्षण असे मानणाऱ्या राज्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन यशस्वी होते, हे तुर्कस्तानात परवाच दिसले..
युरोपीय संघाचे सदस्यत्व मिळावे यासाठी तुर्कस्तानाचे प्रयत्न सुरू होते. परंतु एदरेगान यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याने आणि फाशीच्या शिक्षेचे पुनरुज्जीवन करण्याच्या घोषणेने त्यावर पाणी ओतले..
‘‘तुम्ही परमेश्वराचे अवतार आहात’’, ‘‘परमेश्वराने देशाच्या भल्यासाठी तुमच्या रूपात मानवातार घेतला आहे’’, ‘‘तुम्ही आदेश द्या, आम्ही देशासाठी मरावयास तयार आहोत’’ अशा स्वरूपाची वक्तव्ये, त्यामुळे चेकाळून उठणारा राष्ट्रवादाने भारलेला प्रचंड जनसमुदाय, जिकडेतिकडे पक्षाचे झेंडेच झेंडे, डोक्याला पक्षाच्या रंगाच्या पट्टय़ा बांधलेले उन्मादी तरुण आणि जवळपास प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्या लाडक्या नेत्याच्या चेहऱ्याचा मुखवटा. देशभरात आणि त्याद्वारे जगभरात या सभेचे थेट प्रक्षेपण केले गेल्याने या दृश्यांची परिणामकारकता अधिकच वाढलेली. ज्याच्यासाठी हे सर्व सुरू होते त्या नेत्याने कर्कश उन्मादात फाशीच्या शिक्षेचे पुनरुज्जीवन करण्याची दिलेली हाक या चित्राला पूर्णतेकडे नेत होती. या वर्णनाने अनेकांच्या मनात निश्चितच अनेक आठवणी आणि संदर्भ जागे झाले असतील. परंतु हे सर्व घडत होते मानवी संस्कृतीच्या इतिहासात प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर एक पाऊल पुढेच असणाऱ्या इस्तंबूल या नितांतसुंदर शहरात. तुर्कस्तानातील हे सर्वात मोठे आणि देखणे शहर युरोप आणि आशिया खंडांच्या सीमारेषेवर असून तेथील सध्याच्या घडामोडी या जिवाला घोर लावणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांचा अर्थ लावणे आवश्यक ठरते.
तुर्कीत हे सर्व घडले विद्यमान अध्यक्ष रेसेप तय्यीप एदरेगान यांना जनतेचा किती पाठिंबा आहे हे जगाला दाखवण्याच्या गरजेचा भाग म्हणून. ती गरज खुद्द एदरेगान यांना वाटली कारण १५ जुलै रोजी त्यांच्या विरोधात झालेला बंडाचा प्रयत्न. लष्कराच्या एका गटाने एदरेगान यांच्या विरोधात उठावाचा प्रयत्न त्या रात्री केला. लष्कराच्या वाहनांनी इस्तंबूलमधील बोस्फोरस परिसरातील महत्त्वाच्या पुलाची कोंडी केली. सरकारी मालकीच्या दूरचित्रवाणी वाहिन्यांचा ताबा घेतला आणि सुटीसाठी परदेशी असलेल्या एदरेगान यांना पदच्युत करण्याचा प्रयत्न केला. या बंडखोर जवानांपैकी काही फारच धाडसी निघाले. त्यांनी मायदेशी परतणाऱ्या एदरेगान यांच्या विमानांचा पाठलाग केला. परंतु अर्थातच त्यात त्यांना यश आले नाही. देशातील ही निर्नायकी काही काळ सुरू होती. दरम्यान एदरेगान यांच्या विरोधात खरोखरच बंड यशस्वी झाल्याची वार्ताही येत होती. परंतु ती अफवा असल्याचे लवकरच स्पष्ट झाले. ते केले एदरेगान यांनीच. एरवी तंत्रज्ञानाच्या विरोधात असलेल्या, समाजमाध्यमांच्या नावे बोटे मोडणाऱ्या एदरेगान यांनी या समाजमाध्यमांचाच आधार घेतला आणि आपण अजूनही अध्यक्षपदी आहोत याची जनतेस जाणीव करून दिली. जनतेस आपल्या मागे उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी समाजमाध्यमांतून केले. त्यानंतर चक्रे फिरली आणि एदरेगान यांच्याशी एकनिष्ठ असलेले जवान आदी आक्रमक झाले. तुलनेत आकाराने कमी असलेल्या बंडखोरांशी त्यांनी दोन हात करून त्यांना निष्प्रभ केले. दरम्यानच्या चकमकीत २८० वा अधिक तुर्कस्तानी नागरिकांनी जीव गमावला. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात हे बंड मोडले गेले आणि सत्ता एदरेगान यांच्याच हाती कायम राहिली. दरम्यान जे काही झाले त्यामुळे तुर्कस्तान आणि जगही हादरले. कारण अमेरिकाकेंद्रित नाटो समूहाचा महत्त्वाचा घटक असलेल्या तुर्कस्तानात लष्करशाही येणे किंवा लष्करी उठावातून सत्तांतर होणे हे या सर्व परिसराला अनिश्चिततेच्या गर्तेत लोटणारे ठरले असते. सीरिया या देशातून स्थलांतरित होणाऱ्या निर्वासितांचा सगळ्यात मोठा भार तुर्कस्तानला सहन करावा लागत आहे. त्याविरोधात आधीच देशात नाराजी असून त्यात राजकीय अस्थिरता तयार झाली असती तर या सगळ्याचेच परिणाम अधिक गंभीर झाले असते. तेव्हा एदरेगान यांच्या विरोधातील बंड फसले याबद्दल सर्व संबंधितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यात एदरेगान यांच्या विरोधकांचाही समावेश होता. याचे कारण एदरेगान पदच्युत झाले असते तर काय झाले असते, कोणाच्या हाती देशाची सूत्रे आली असती वगैरे काही कळावयास मार्ग नाही. परिणामी या उठावाने अनेकांच्या मनात गेल्या काही दशकांपूर्वीच्या तुर्कस्तानच्या आठवणी जाग्या झाल्या. ऐंशीच्या दशकात अशा उठावांनी तुर्कस्तानास अनिश्चिततेच्या गर्तेत लोटले होते. आता कोठे गेले दशकभर हा देश राजकीय स्थिरता अनुभवून विकसित देशांच्या गटांत स्वत:चा समावेश करू पाहत होता. त्यातूनच युरोपीय संघाचे सदस्यत्व मिळावे यासाठी तुर्कस्तानाचे प्रयत्न सुरू होते. परंतु एदरेगान यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याने त्यावर पाणी ओतले. या मेळाव्याच्या आयोजनात खुद्द एदरेगान यांनी रस घेतला होता. आपण अजूनही जनतेत किती लोकप्रिय आहोत, समाजातील विविध स्तरांतून आपणास पाठिंबा कसा आहे आणि सत्ता आपल्या हाती राहिल्याखेरीज या देशास तरणोपाय कसा नाही हे एदरेगान यांना दाखवून द्यावयाचे होते. त्यात ते निश्चितच यशस्वी झाले.
या सभेस पन्नास लाखांचा जनसमुदाय जमला होता, असे सांगितले जाते. इस्तंबूल शहरातील सर्वात मोठे पटांगण आणि संबंधित उपनगर त्यासाठी ताब्यात घेण्यात आले होते. एदरेगान यांचे राजकीय विरोधकदेखील या सभेत हजर राहून भाषणे करतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. ‘लोकशाही आणि हुतात्मा मेळावा’ असे या सभेचे वर्णन केले गेले. तुर्कस्तानातील लोकशाही टिकविण्यासाठी एदरेगान सत्तेवर टिकून राहणे आवश्यक असून वेळ पडल्यास प्रत्येकाने आता हुतात्मा होण्याची तयारी ठेवावी, असेच प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे या मेळाव्यात सुचवले गेले. एदरेगान यांच्यासाठी हा मेळावा ही राजकीय गरज होती. याचे कारण इतके दिवस ज्या अमेरिकी आणि युरोपीय जगाने त्यांना आधार दिला ते आता एदरेगान यांचे कडवे टीकाकार बनले असून त्यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्हे निर्माण करू लागले आहेत. आपल्या विरोधातील उठाव अमेरिकास्थित बंडखोर धार्मिक नेते फेतुल्ला गुलेन यांनी घडवून आणल्याचा एदरेगान यांचा आरोप आहे आणि त्यामुळे अमेरिकेने त्यांना आपल्या हवाली करावे अशी त्यांची मागणी आहे. ती अर्थातच अमेरिकेस अमान्य आहे. गुलेन यांनीही यात आपला काहीही हात नसल्याचे स्पष्ट केले आहे. हे गुलेन एके काळचे एदरेगान यांचे सहकारी. पुढे दोघांत अधिकारकक्षांवरून वितुष्ट आले. गुलेन आपल्या कारभारात फारच हस्तक्षेप करतात हे कारण देत एदरेगान यांनी त्यांना दूर केले. तेव्हापासून ते अमेरिकेत वास्तव्यास असून त्यांचा स्वत:चा असा एक धर्मपंथ तयार झाला आहे. तुर्कस्तान आणि जगभरात हजारो अनुयायी या पंथात सहभागी आहेत. तेव्हा या सगळ्यांविरोधात एदरेगान यांनी मोठीच आघाडी उघडली असून लष्कर आदींतील अनेकांवर केवळ संशयाने कारवाई सुरू केली आहे. अर्थातच यामुळे मानवी अधिकारांचे पूर्ण उल्लंघन होत असून पाश्चात्त्य जगाने त्यामुळे एदरेगान यांच्या राजकारणासंदर्भात काळजीचा सूर लावला. एदरेगान त्यामुळे नाराज आहेत. जे काही झाले त्या संदर्भात आत्मपरीक्षण करण्याऐवजी आपल्या विरोधकांना संपवण्याची ही संधी आहे अशा भावनेतून एदरेगान हे बंडोत्तर परिस्थिती हाताळत असून अनेकांची त्यांनी धरपकड सुरू केली आहे. प्रश्न तेवढाच नाही.
यापुढे जाऊन या सर्व बंडखोरांना फासावरच लटकवायला हवे असे एदरेगान यांना वाटते. परंतु युरोपीय समुदायाचा घटक होऊ पाहणाऱ्या तुर्कस्तानने देशातून फाशीचे उच्चाटन केले असल्याने त्या देशात फाशीची शिक्षा दिली जात नाही. परंतु आता ही प्रथा पुन्हा सुरू केली जावी, अशी एदरेगान यांची इच्छा आहे. तुर्कस्तानच्या पार्लमेंटने तसा ठराव केल्यास आपला त्यास पाठिंबाच राहील, असे एदरेगान यांनी या सभेत टाळ्यांच्या गडगडाटात आणि राष्ट्रवादी उन्मादात जाहीर केले. फाशीचे पुनरुज्जीवन झाले तर तुर्कस्तानला अर्थातच युरोपीय संघाचे सदस्यत्व मिळणार नाही. एदरेगान यांची त्यास तयारी आहे. आपला देश आणि त्याचे सार्वभौमत्व हे कोणत्याही संघटनेच्या सदस्यत्त्वापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांचे म्हणणे. अशा तऱ्हेने आपले सार्वभौमत्व म्हणजेच देशाचे सार्वभौमत्व असे जनतेच्या मनावर बिंबवण्यात एदरेगान यांना यश आले असून ही लोकशाही बुरख्याखालील हुकूमशाही म्हणूनच काळजी वाढवणारी ठरते.