१९. तीन तिघाडा

डॉ. नरेंद्र रेखाकृती काढत असताना भराभर माहितीही देत होते. त्यातली बरीचशी माहिती मनावर ठसायला वेळ लागत होता.

डॉ. नरेंद्र रेखाकृती काढत असताना भराभर माहितीही देत होते. त्यातली बरीचशी माहिती मनावर ठसायला वेळ लागत होता. पण मोठय़ा मेंदूकडे आणि लहान मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या या गळ्यातून आणि मग वर नाकाच्या बाजूनं घाटासारख्या वाटेनं भ्रूमध्याकडे आणि तिथून पुढे वर जाताना पाहून मूलाधारापासून ते आज्ञाचक्रापर्यंतचा ‘पैल तो गे काऊ’ अभंगाचा प्रवासही डोळ्यासमोर उभा राहात होता.
ज्ञानेंद्र – आता मला वाटतं आपण परत तिसऱ्या चक्रापाशी जाऊ. योगेंद्र तू सांगत होतास त्याप्रमाणे जागृत झालेली कुंडलिनी शक्ती नाभीत असलेल्या तिसऱ्या मणिपूर चक्रात पोहोचते तेव्हा अतृप्त वासनेचं हे जन्ममूळ शांत करण्यासाठी ‘दहीभाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी। जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी।।’ असं माउली सांगत आहेत.. हृदू तुला भक्तीमार्गातून काहीतरी गवसलं, असंही तू म्हणालास..
हृदयेंद्र – हो.. आणि कर्मू जे म्हणाला ना ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ तेही वेगळ्या अर्थानं मनाला भिडलं.. (उसळून काही बोलू पाहणाऱ्या कर्मेद्रला अडवत) आणि मला वाटतं की ते बोललंही पाहिजे.. योगा कुंडलिनी शक्ती जसजशी एक-एक चक्र वर जाते तेव्हा ती ती चक्रं शुद्ध करत जाते, बरोबर ना?
योगेंद्र – हो..
हृदयेंद्र – माझ्या मते चक्र शुद्ध होणं म्हणजे त्या स्थानी असलेली जी शक्ती जगाकडे, बाह्य़ाकडे, स्थूलाकडे, भौतिकाकडे जात असते ती परमतत्त्वाकडे, आतमध्ये, सूक्ष्माकडे प्रवाहित होणं! ती शक्ती ज्या मूळ कारणासाठी मला लाभली आहे त्याकडेच ती वळणं! आता पहिली तीन चक्रं आणि शरीरातलं त्यांचं स्थान पाहिलं तर लक्षात येईल की मलत्याग, लैंगिक वासना आणि पचन या तीन क्रिया तिथे आहेत. तुम्ही आध्यात्मिक अंगानं याचा विचार करा.. माणूस भक्तीमार्गाकडे वळतो तेव्हा काय होतं?
कर्मेद्र – तो टोटल कामातून जातो..
हृदयेंद्र – (हसत) कधी तरी गंभीर हो रे.. माणूस भक्तीमार्गाकडे खऱ्या अर्थानं वळतो तोवर तो भौतिकाच्या स्पर्धेत दिवसरात्र धावतच असतो. जन्मापासून हवं ते मिळालंच पाहिजे, हा हट्ट त्याला स्वस्थ बसू देत नसतो.. पहिलं मूलाधार चक्र शुद्ध होतं ना तेव्हा अशाश्वत गोष्टींच्या आवडीचा त्याग त्याला करावासा वाटतो. पूर्वी दर महिन्याला नवे कपडे घ्यायची ओढ होती, आता वाटतं आहेत तेवढे वर्षभरासाठी खूप झाले, अजून नको! प्रत्येक गोष्टीत पूर्वी जी आवड होती तिच्यात कपात होते.. मग दुसरं लिंगमुळात असलेलं स्वाधिष्ठान चक्र शुद्ध होतं तेव्हा काय होतं? माणसाचं सगळं जगणं वासनाकेंद्रितच असतं. वासना म्हणजे कामवासनाच नव्हे, तर सर्व तऱ्हेच्या कामना.. या वासनांचा जगण्यावरचा पगडा जाणवू लागतो. आधी भौतिकातल्या स्थूल गोष्टींच्या संग्रहातली आवड ओसरू लागली, आता सूक्ष्मातल्या वासनांची आवड ओसरू लागते.. त्यांचा प्रभाव झुगारावासा वाटतो! जीवनाचं अधिष्ठान तोवर वासनामयता होतं, आता निर्वासन होण्याचं ध्येय जागं होतं..
कर्मेद्र – वासनेशिवाय माणूस राहूच शकत नाही..
हृदयेंद्र – बरोबर आहे, वासना फार सूक्ष्म असते.. तुम्ही तिचा त्याग करत आहात काय, मग ‘मी त्यागी’ हे रूप धारण करून ती त्यागाच्या अहंकाराच्या भोगात तग धरू पाहते! पण वासनेचं खरं स्वरूप आणि तिच्या पूर्तीतला फोलपणा लक्षात आला तरच तिचा प्रभाव झुगारावासा वाटेल. वासनेच्या तृप्तीला अतृप्तीचा अर्धविराम असतोच.. अमुक मिळालं आणि मी पूर्ण सुखी झालो, असं कधीच होत नाही. हवं ते मिळालं तरी त्यापुढल्या दहा गोष्टी खुणावू लागतात.. जेव्हा हे वास्तव लक्षात येईल तेव्हाच माझ्या कृतीला, प्रयत्नांना हवं-नकोपणाचा स्पर्श उरणार नाही.. हे साधलं तरच दुसरं चक्र शुद्ध झालं! तिसरं नाभीस्थानी असलेलं चक्र शुद्ध होतं म्हणजे काय? आपलं जन्म-मृत्यूचं चक्रं अतृप्त वासनांवर अवलंबून आहे. जे मिळवायचं राहून गेलं त्याच्या ओढीनं मी पुन्हा जन्म घेतो. वासनेचं खरं स्वरूप उकलतं तेव्हा अपूर्णता उरतच नाही. जे आहे त्यातच पूर्ण तृप्ती अनुभवता येते. तेव्हाच हे चक्र शुद्ध होतं! पण या तिन्ही चक्रांपर्यंत वासनेचा झंझावात असल्यानं या तिघांचा ‘तीन तिघाडा’ झाला तर जीवनाचं जे खरं उद्दिष्ट त्यात बिघाड होतोच!
चैतन्य प्रेम

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: All sorts of desires