एखाद्या माथेफिरूच्या गोळीबारात सार्वजनिक ठिकाणी एकापेक्षा अधिक जीव जाण्याचे प्रकार अमेरिकेत नवीन नाहीत. तरीदेखील शनिवारी रात्री ओहायो आणि टेक्सास या दोन राज्यांमध्ये झालेले गोळीबार अभूतपूर्व म्हणावे लागतील. मेक्सिको सीमेवरील टेक्सास राज्यात एल पासो येथे एका दुकानावर झालेल्या गोळीबारात २० जण मृत्युमुखी पडले, तर ओहायो राज्यातील डेटन शहरात जवळपास १२ तासांनी झालेल्या गोळीबारात नऊ जण जिवास मुकले. गेल्याच आठवडय़ात कॅलिफोर्नियात झालेल्या गोळीबारात तीन जीव गेले, तर अनेक जखमी झाले होते. एल पासोमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतेक हिस्पॅनिक वंशीय आहेत. या घटनेत सहा मेक्सिकन मरण पावल्याचा दावा मेक्सिकोने केला असून, अटक झालेल्या गौरवर्णीय हल्लेखोराविरुद्ध दहशतवादाचा खटला भरण्याची तयारी मेक्सिकोने चालवली आहे. एल पासोतील हल्लेखोराने गोळीबार करण्यापूर्वी समाजमाध्यमांवर दिलेल्या संदेशात ‘हिस्पॅनिक आक्रमकांना हुसकावून लावण्यासाठी’ आपण ही कृती केल्याचे म्हटले आहे. ओहायोतील हल्लेखोराने (हा पोलीस कारवाईत मारला गेला) कृष्णवर्णीयांना लक्ष्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांनी अमेरिकेतील सर्वसामान्य नागरिक हादरून गेले आहेत. अमेरिकेतील हाताबाहेर गेलेल्या बंदूक नियंत्रण कायद्याचा हा मुद्दा आहेच; पण आक्रमक व अनियंत्रित ‘गौरवर्णीय राष्ट्रवादा’ला शीर्षस्थांकडूनच अधिष्ठान मिळाल्याने हे प्रकार वाढीस लागल्याचे दिसून येते. हा श्वेत राष्ट्रवाद फोफावण्यास अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वक्तव्ये कारणीभूत ठरत आहेत. अमेरिकेला पुन्हा वैभवशाली बनवू, तिच्याभोवती भिंत उभारू, कारण मेक्सिकन स्थलांतरितांनी आमच्या नोकऱ्यांवर, शाळांवर अतिक्रमण केले आहे, असे ट्रम्प निवडणूक प्रचारादरम्यान वारंवार सांगत. अलीकडे अमेरिकी प्रतिनिधीगृहातील डेमोक्रॅटिक पक्षाच्या चार अश्वेत महिला प्रतिनिधींविरोधात ‘तुमच्या मूळ देशात चालते व्हा’ असे अशोभनीय उद्गार ट्रम्प यांनीच काढले होते. त्यानंतरच कडव्या रिपब्लिकनांच्या सभांमध्ये ‘चालते व्हा’ हे जणू बोधवाक्यासारखे वापरले जाऊ लागले. आज मेक्सिकनांविरुद्ध अशा प्रकारे पेटवलेले जनमत उद्या भारतीयांविरुद्धही वापरले- पेटवले जाऊ शकते, हे त्या पक्षाला समर्थन देणाऱ्या अनिवासी आणि वांशिक भारतीयांनी ध्यानात ठेवले पाहिजे. बराक ओबामा या उदारमतवादी डेमोक्रॅटिक अध्यक्षाने पुढाकार घेऊनही बंदूक  नियंत्रण विधेयक इंचभरही पुढे सरकू शकले नाही. कारण अध्यक्ष कोणत्याही पक्षाचा असला, तरी अमेरिकी लोकप्रतिनिधीगृहात प्रतिगामी रिपब्लिकनांचे प्राबल्य गेली काही वर्षे टिकून आहे. ओबामांनी त्यांच्या परीने या विषयावर भरपूर जनजागृती करण्याचा प्रयत्न करूनही गोळीबाराच्या घटना घडत राहिल्या.  आता तर थेट एखाद्या वांशिक गटाविरुद्ध जाहीरपणे वल्गना करून गोळीबार होत आहेत. २०१६ मधील अध्यक्षीय निवडणुकीत ओबामांच्या बंदूकविरोधी मोहिमेस लक्ष्य करताना ‘‘ते’ तुमच्या बंदुकाही घेणार’ असा आक्रमकांच्या भयगंडाला खतपाणी घालणारा अपप्रचार ट्रम्प यांनी केला. शाळांतील गोळीबाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिक्षकांना सशस्त्र करा, असा हास्यास्पद उपाय ट्रम्प सुचवतात. बंदुकीवर नियंत्रण दुसऱ्या बंदुकीमुळे नव्हे, तर कायदे आणि धोरणांनीच आणता येऊ शकते हे ट्रम्प यांच्या गावी नसावे. बंदूक नियंत्रणाबाबत त्यांच्या बेजबाबदार भूमिकेला श्वेत राष्ट्रवादाची जोड मिळाल्यामुळे अमेरिकेतील वर्णविद्वेष उघड होतो आहे.