scorecardresearch

अन्यथा : आणि ते आनंदी राहिले!

आटपाट नगरातली ही कथा. हे आटपाट नगर आजही आहे. पूर्वी होतं तसं. राज्यकर्ते, प्रजा, लुटणारे, लुटून घेणारे, प्रामाणिकपणे कर भरणारे, प्रामाणिकपणे कर टाळणारे सगळं तसंच.

गिरीश कुबेर

तुम्हा-आम्हाला आटपाटनगरी माहीत असते.. तिथले अनेक बाबा- गुरूही ऐकून माहीत असतात; पण त्यांच्या सगळय़ाच ‘लीला’ कुठे माहीत असतात..?

आटपाट नगरातली ही कथा. हे आटपाट नगर आजही आहे. पूर्वी होतं तसं. राज्यकर्ते, प्रजा, लुटणारे, लुटून घेणारे, प्रामाणिकपणे कर भरणारे, प्रामाणिकपणे कर टाळणारे सगळं तसंच. शाळा- महाविद्यालयं तशीच. त्यातून कोणत्या भाषेत विद्यार्थ्यांना शिकवायला हवं यावर वाद घालणारेही तसेच. खरं तर वाद घालणाऱ्यांची मुलं ज्यांच्यासाठी वाद घातला जातोय त्यांच्या शाळेत शिकतच नाहीत. पण तरीही ते वाद घालतात. मग आटपाट नगरातली मुलं शिक्षण झालं की आटपाट नगर सोडून जातात. गेली की परत येतच नाहीत. तिकडेच लग्न. मग त्यांच्या बायका गर्भार राहिल्या की आटपाट नगरातनं ते आपल्या आईवडिलांना तिकडे बोलवून घेतात. कारण त्या परदेशांत आयांसाठी खूप खर्च. त्यापेक्षा आटपाट नगरातली आई फुकटात! बाबांचा घरकामात हातभार आणि आईची बाळंत सुनेला किंवा मुलीला मदत. मुलं मोठी झाली की या आईवडिलांना मग परत आटपाट नगरात पाठवतात. मग आटपाट नगरात राहून हे आपल्या नातू/नातीला स्काईपवर बघतात. आजी स्काईपवरच तीट लावते आणि अशीच दृष्टही काढते. पुढच्या बाळंतपणापर्यंत मग हे दोघे आटपाट नगरात.

या आटपाट नगरात गुरू आणि बाबांचा फारच सुळसुळाट. तो फार पूर्वीही होता. पण आता त्यांची संख्या फारच वाढली. त्यात योगींचीही भर. योगी म्हणजे खरं तर सर्व भौतिकवादापासून दूर गेलेला माणूस. पण आटपाट नगरातले योगी वेगळेच. ते राजकारणात, समाजकारणातच नाही तर सत्ताकारणातही असत. या आटपाट नगरात एक बाबाही होता. तो योगी होता आणि त्यात बाबाही. किंवा आधी बाबा होता मग त्याचा योगी झाला, असंही असेल. तो पोटाचे स्नायू गरागरा फिरवून दाखवायचा. जणू पिठाची गिरणीच. बोलता बोलता खाली डोकं, वर पाय करायचा. एका पायावर उभा राहून तर दाखवायचाच. पण एका हातावर काय; एका बोटावरही उभं राहून दाखवायचा. भले भले त्याचे चाहते. त्याच्यामुळे सगळय़ांनाच आपल्या पोटाच्या स्नायूंची जाणीव झाली. तो इतका लोकप्रिय की समग्र आटपाट नगर रोज सकाळ-संध्याकाळ आपले पोटाचे स्नायू हलवण्यात मग्न.  या छंदाचा आटपाट नगराला खूपच फायदा झाला. हे पोटाचे स्नायू हलवण्याच्या नादात त्यातल्या अनेकांना आपल्या पोटात काहीच नाही, याची जाणीवच व्हायची नाही.

या बाबाला अर्थशास्त्रही कळतं. म्हणजे सरकारनं आपलं उत्पन्न कसं वाढवावं, काळा पैसा कसा बाहेर काढावा वगैरे. आटपाट नगरातले धनाढय़ शेजारच्या नगरात पैसा लपवतात म्हणे. त्या नगरात अंधार. पैसा आणि तो ठेवणारे/काढणारे सर्वच काळोखात. म्हणून त्याला काळा पैसा म्हणतात. हा काळा पैसा आपल्या देशात आणायचा, त्यासाठी भलेथोरले पेटारे पाठवायचे, तिकडनं तो काळा पैसा या पेटाऱ्यांत भरायचा, आटपाट नगरात हे पेटारे आणायचे आणि त्यातले पैसे आटपाट नगरातल्या नागरिकांत वाटून टाकायचे, अशी बाबांची कल्पना. म्हणजे सगळेच श्रीमंत. या चमकदार कल्पनेचं स्वागत सगळय़ांनीच केलं. तेवढय़ात निवडणुका आल्या. या निवडणुकांतल्या आव्हानवीरांनाही ही कल्पना आवडली. त्यांनी तसंच करू असं सांगितलं. त्यामुळे या आव्हानवीरांना सत्ता मिळाली. आता सगळय़ांना वाटलं आपल्याला पैसे मिळणार. पण कसंच काय नि फाटक्यात पाय! आटपाट नगरातला पैसा शेजारच्या देशात नव्हताच मुळी. तो आटपाट नगरातच होता. तिथल्या जमिनीत, बाजारपेठा, सोनंनाणं यात तो दडून होता. आता हे कसं विकणार? त्यामुळे बाबांची कल्पना काही यशस्वी झाली नाही. बाबा गप्प बसले.

पण म्हणून काही ते शांत बसले असं नाही. अर्थशास्त्रीनंतर त्यांना आता उद्योगपती व्हायचं होतं. त्यासाठी मग ते बरंच काय काय बनवून विकू लागले. साबण, केस धुवायचा शाम्पू, वेगवेगळे काढे वगैरे असं बरंच काही. आटपाट नगराला जुन्या वनौषधींचं भारी प्रेम. या अशा वनौषधींचे काहीच सहपरिणाम (साइड इफेक्ट्स) होत नाहीत, असं हे आटपाट नगरवासी मानत. पण ज्यांचा सहपरिणाम नसतो, त्यांचा मुळात काही परिणामच  नसतो, हे काही त्यांना माहीत नव्हतं. त्यांच्या या अज्ञानाचा फायदा या बाबांसारखे अनेक घेत. आणि आटपाटवासीही त्यांची औषधं मोठय़ा प्रमाणावर आनंदाने प्राशन करत. ‘‘एकवेळ परिणाम नसेल, पण सहपरिणाम तर नाही ना’’, असा त्यांचा युक्तिवाद. मग या बाबांनी दंतमंजनं आणली, लांबसडक केसांची आश्वासनं देणारी तेलं आणली, बलवर्धकं आणली. असं बरंच काय काय बाबांच्या कारखान्यात तयार व्हायला लागलं. बरं हे सगळे दावे तपासून घ्यायची पद्धतच नव्हती आटपाट नगरात. म्हणजे बाबांचं तेल लावल्यानं केस नक्की किती वाढले, बलवर्धन किती झालं वगैरे काही मोजलंच जायचं नाही. काहीच मोजायचं नाही, हीच तर आटपाट नगराची खासियत. आणि दुसरं म्हणजे बाबांच्या या औषधाचं कौतुक करायला आटपाट नगराचे मंत्रीसंत्रीही असत. मग काय बाबांना राजमान्यताच मिळाली की. पूर्वीच्या काळी असायची तशी. म्हणजे बाबा आटपाट नगरचे राजवैद्यच जणू.

बाबांचं उद्योगविश्व झपाटय़ानं वाढू लागलं. इतकं की ते बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही टक्कर देतील की काय अशी शक्यता निर्माण झाली. आटपाट नगरवासीयांना खूप आनंद झाला. असा आत्मनिर्भर उद्योजक होणे नाही.. असं त्यांना वाटू लागलं. हा आनंद इतका मोठा होता की बाबांच्या कारखान्यात तयार झालेल्या कथित औषधांचा दर्जा, त्याची गुणवत्ता, फायदे-तोटे वगैरे कसलेही प्रश्न, किंतु त्यांच्या मनात आले नाहीत. बाबांची पुण्याई आणि आटपाट नगरपित्यांचा पाठिंबा असल्यावर यश किती दूर राहणार? तर बाबा यशाच्या पायऱ्या असे झरझर चढू लागले. पैसाच पैसा. बक्कळ नफा मिळू लागला त्यांना. त्यामुळे त्यातून अनेक अन्य कंपन्यांत त्यांना ‘रुची’ निर्माण झाली. 

तर झालं असं की बाजारात एक कंपनी दिवाळखोरीत निघाली. आटपाट नगरचं सरकार असं मधे काय काय करायचं. त्यामुळे सरकारच्या प्रामाणिकपणावर शिक्कामोर्तब व्हायचं. ही कंपनी आटपाट नगरातल्या सरकारी बँकांची कर्ज फेडू शकत नव्हती. नियमाप्रमाणे मग निघाली ती दिवाळखोरीत. आटपाट नगर सरकारनं अर्ज मागवले ही कंपनी खरेदी करू इच्छिणाऱ्यांकडून. तिची विक्री होण्याआधी या कंपनीला कर्ज देणाऱ्या बँकांना वाटलं आपण थोडा त्याग करायला हवा. त्यांनी मग या कंपनीच्या डोक्यावरची साधारण ५० टक्के कर्ज माफ केली. म्हणजे कंपनीकडून सरकारी बँकांना समजा १०० रुपये येणं होतं तर या बँकांनी उदार अंत:करणानं सांगितलं, तुमची परिस्थिती अगदीच वाईट आहे..  तेव्हा आमच्या देण्यातल्या १०० रुपयांतले फक्त ५० रुपयेच परत करा. बाकीचे ५० आम्ही माफ करून टाकतो. बँकांच्या या औदार्यामुळे या कंपनीच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा हलका झाला. मग लिलाव पुकारला गेला या कंपनीचा. चांगली भरल्या घरची कंपनी. बुडतीये म्हटल्यावर बाबांप्रमाणे अनेकांना तिच्यात ‘रुची’ निर्माण झाली. अनेकांचे अर्ज आले.

कोणत्याही लिलावाचा नियम काय? तर जास्तीत जास्त बोली लावेल त्याच्या गळय़ात माळ घालायची. तर बाबांप्रमाणे आणखी एका उद्योगपतीचाही या कंपनीवर जीव जडला. आणि बाबांपेक्षा या उद्योगपतीची ताकद फार म्हणजे फार मोठी. हात ‘अगदी वरवर’पर्यंत पोहोचलेले. त्यामुळे त्यानं लिलावात अशी काही बोली लावली की बाकीच्यांचे डोळेच दिपले. ही बुडती कंपनी या उद्योगपतीकडेच जाणार हे अगदी नक्की झालं. म्हणजे बाबांना हात चोळत बसावं लागणार.

पण अखेर चमत्कार झाला. कसं काय कोण जाणे पण या उद्योगपतीनं या लिलावातनं माघार घेतली. आपली बोली मागे घेतली त्यानं. खरं तर हा उद्योगपती तसा काही अडाणी नव्हता, पण तरी त्यानं माघार घेतली खरी. बाबांची कृपा म्हणतात ती हीच. या उद्योगपतीनं माघार घेतल्यामुळे ती बुडीत खात्यात गेलेली कंपनी बाबांना मिळाली.

आणखी एक चमत्कार झाला!

ही कंपनी घेण्यासाठी बाबांना भरपूर कर्ज मिळाली. कोणी दिली ती? तर ज्या बँकांची कर्ज बुडाली म्हणून ती कंपनी दिवाळखोरीत निघाली, ज्या बँकांनी या कर्जातल्या ५० टक्के रकमेवर पाणी सोडलं त्याच बँकांनी तीच कंपनी घेण्यासाठी त्याच बाबांना रग्गड कर्ज दिली. आटपाट नगरात कोणालाही काहीही वाटलं नाही. आटपाट नगरातील प्रजा तशीच आनंदात डुंबत राहिली.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

मराठीतील सर्व अन्यथा ( Anyatha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anyatha happy rulers people robbers honestly tax fillers students teach argument wearer ysh