अव-काळाचे आर्त : प्रज्ञा आणि प्रतिमा

काझुओ इशिगुरोंचा जन्म जपानमधल्या नागासाकी शहरातला. दुसऱ्या महायुद्धातल्या अणुबाँबहल्ल्याच्या ताज्या जखमा अंगावर बाळगणारं हे शहर सोडून, वयाच्या पाचव्या वर्षीच आपल्या पालकांसोबत इंग्लंडला आलेल्या इशिगुरोंची लेखनकारकीर्द अस्सल इंग्रजी वळणाची आहे.

‘क्लारा अ‍ॅण्ड द सन’ लेखक : काझुओ इशिगुरो प्रकाशक : फेबर अ‍ॅण्ड फेबर प्रथमावृत्ती : २०२१ पृष्ठसंख्या : ३०७ ; किंमत : ४२७ रु.

|| नंदन होडावडेकर

कुनस्थानी (डिस्टोपियन) कादंबऱ्यांची ओळख करून देणारं हे सदर; पण ‘क्लारा अ‍ॅण्ड द सन’ ही काझुओ इशिगुरोंची नवी कादंबरी, सुनस्थान (युटोपिया) आणि कुनस्थान (डिस्टोपिया) यांच्या मधली परिस्थिती हेरते आणि तिथंच घडते…

मानवी प्रज्ञा, तिचं स्वरूप, तिच्या नानाविध शक्ती, शक्यता आणि निरनिराळ्या प्रसंगांतली प्रकटनक्षमता यांचा पल्ला फार मोठा आणि विविधरंगी आहे. असामान्य प्रतिभावंतांचे आविष्कार सोडाच, पण क्वचित अगदी सर्वसामान्य माणूसही एखाद्या क्षणी या अव्याख्येय शक्तीची झलक दाखवून जातो आणि मानवजात म्हणून आपल्या क्षमतांचा आवाका आजवर आपल्यालाच पूर्णत: आकळलेला नाही, असं जाणवून जातं.

याच मानवी प्रज्ञेचा एक विलक्षण भाग म्हणजे, आपल्याला मिळालेल्या निसर्गदत्त गोचर (ज्ञानेंद्रियांना उलगडा होणाऱ्या) आणि अ-गोचर (ज्ञानेंद्रियांना उलगडा न होणाऱ्या) क्षमतांची निसर्गापासून स्वतंत्रपणे अशी, पुनर्निर्मिती करण्याचा सातत्याने प्रयत्न करत राहणं – मग ते ‘सीआरआयएसपीआर’सारखं (डीएनएच्या अक्षरांचा विवक्षित क्रम ओळखून नेमका त्याच ठिकाणी बदल घडवण्याचं तंत्रज्ञान) तंत्रज्ञान वापरून जनुकांत हवे ते बदल घडवणं असो वा कृत्रिम प्रज्ञेनं दिलेली कामं (सांगकाम्याच्या कितीतरी पट अधिक कुशलतेने) करणारे आणि विचारक्षम यंत्रमानव निर्माण करणं असो. तरुण वयात, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व निर्माण होत असताना, पूर्वसुरींचं ऋण नाकारून स्वयंभूपणाची ओढ जशी हरएक नव्या पिढीत दिसून येते – तशीच या दोहोंतून, मानवजातीची निसर्गावर अवलंबून न राहता, संपूर्ण स्वतंत्र अस्तित्व आणि स्वयंभू क्षमता अंगी आणण्याची एक व्यवच्छेदक ऊर्मी दिसून येते.

या ऊर्मीचं साहित्यव्यवहारात – त्यातही डिस्टोपियन साहित्यात – प्रतिबिंब पडणं स्वाभाविकच. मेरी शेलीच्या ‘फ्रँकेन्स्टाईन’पासून ते अ‍ॅसिमोव्हच्या ‘आय, रोबोट’पर्यंत अनेक प्रकारे हा विषय आजवर हाताळला गेला आहे. २०१७ सालचं साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालेल्या काझुओ इशिगुरो यांच्या अलीकडच्या दोन कादंबऱ्यांत (‘नेव्हर लेट मी गो’ आणि ‘क्लारा अ‍ॅण्ड द सन’) याच मानवी ईष्र्येच्या दोन प्रकटीकरणांचा, तसंच मानवी नातेसंबंधांवर अशा ईर्षा-प्रकटीकरणानं होणाऱ्या परिणामांचा अतिशय तरलपणे वेध घेतला आहे.

काझुओ इशिगुरोंचा जन्म जपानमधल्या नागासाकी शहरातला. दुसऱ्या महायुद्धातल्या अणुबाँबहल्ल्याच्या ताज्या जखमा अंगावर बाळगणारं हे शहर सोडून, वयाच्या पाचव्या वर्षीच आपल्या पालकांसोबत इंग्लंडला आलेल्या इशिगुरोंची लेखनकारकीर्द अस्सल इंग्रजी वळणाची आहे. ‘द रिमेन्स ऑफ द डे’ ही त्यांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी १९२०च्या दशकातले श्रीमंत उमराव (लॉड्र्स), त्यांच्या इस्टेट्स आणि त्यांतली बटलर, हाऊसकीपर अशी नोकरांची फौज अशा गतवैभवाच्या नॉस्टॅल्जिक आठवणींच्या पार्श्वभूमीवर आकाराला येते. (जपानमधून वयाच्या पाचव्या वर्षी, १९६० साली इंग्लंडमध्ये येऊन ब्रिटिश समाजाशी एकरूप होऊन गेलेले इशिगुरो आणि त्याच सुमारास, अठराव्या वर्षी शिक्षणासाठी त्रिनिदादहून ऑक्सफर्डला आलेले व्ही. एस. नायपॉल यांच्या इंग्लंडमधील पहिल्या दिवसांच्या अनुभवांचं ‘द एनिग्मा ऑफ अरायव्हल’ पुस्तकातलं चित्रण यांच्यातला फरक लक्षणीय आहेच – शिवाय त्या त्या लेखकाच्या शैली आणि स्वभावाचं प्रतिबिंबही त्यात पडलेलं दिसून येतं.)

इशिगुरोंची ‘नेव्हर लेट मी गो’ ही कादंबरी २००५ साली प्रकाशित झाली; त्या वर्षीचं बुकर पारितोषिकही तिला मिळालं. अस्सल ब्रिटिश बोर्डिंग स्कूलच्या वातावरणात ही घडते. कॅथी या कथेतील मुख्य पात्राच्या निवेदनातून कथानक हळुहळू उलगडतं. कॅथी आणि तिचे सहाध्यायी हे अन्य उच्चवर्गीय बोर्डिंग स्कूल्ससारख्या वातावरणात जरी वाढत असले; तरी ओघानं हे उघड होतं की ते ‘क्लोन्स’ आहेत – कृत्रिमरीत्या निर्माण केलेला असा एक नवीन वंश, ज्याचं जगण्याचं प्रयोजन हे केवळ अन्य आजारी व्यक्तींना निरोगी इंद्रियांचा पुरवठा करणारं शरीर इतकाच आहे. कॅथी, तिची मैत्रीण रुथ आणि टॉमी असा नेहमीचा प्रेमत्रिकोण या कादंबरीत आहे; मात्र या नात्यांतील गुंतागुंतीला क्लोन्सच्या (इंद्रियं हस्तांतरित केल्यानंतर) अल्पायुष्याच्या शापाची झालरही आहे.

‘क्लारा अ‍ॅण्ड द सन’ ही इशिगुरोंची अगदी अलीकडे म्हणजे या वर्षाच्या मार्च महिन्यात प्रकाशित झालेली कादंबरी. सारं जग कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गात आपल्या शारीरिक आरोग्याच्या सुरक्षेसोबतच, सक्तीच्या विलगीकरणातून उद्भवलेल्या मानसिक प्रश्नांनाही तोंड देत असताना आलेल्या या कादंबरीत, क्लारा नावाची सौर ऊर्जेवर चालणारी एक यंत्रमानव, एका छोट्या अमेरिकन कुटुंबात ‘कृत्रिम प्रज्ञावान मैत्रीण’ (आर्टिफिशियल फ्रेंड किंवा ए.एफ.) म्हणून दाखल होते. शहरापासून थोडं दूर राहणाऱ्या या कुटुंबात जोझी नावाची १४ वर्षांची, नाजूक प्रकृतीची एक शाळकरी मुलगी आणि तिची उच्चपदस्थ आई अशा दोघीच आहेत.   

कुनस्थानी (डिस्टोपियन) भविष्यात घडणाऱ्या या कादंबरीत, बव्हंशी मुलांची शैक्षणिक क्षमता ही जनुकीय अभियांत्रिकीद्वारे (जेनेटिक इंजिनिअरिंग) कृत्रिमरीत्या वाढवण्यात आलेली आहे. तसं न केलं तर ‘अकुशल कामगार’ म्हणून कुठल्याशा कोपऱ्यात जगणं भाग आहे. जोझीच्या शेजारी राहणारा, तिचा समवयस्क रिक नावाचा मित्र वगळता, तिचे सारे सहाध्यायी जनुकीयदृष्ट्या ‘उन्नत’ आहेत. त्या साऱ्यांचं शिक्षण घरबसल्या टॅब्लेटसमोर बसून होतं आणि अन्य मुलांसोबत प्रत्यक्ष संवाद साधण्याच्या, मिसळण्याच्या अन्य संधी फारशा नसल्यामुळे, बहुतांशी पालकांनी क्लारासारखे ‘एएफ’ आपल्या मुलांसाठी विकत घेतले आहेत. (कोविडकाळात संगणकासमोर बसून शिकणाऱ्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींची भेट होत नसल्याने कंटाळलेल्या मुलांच्या पालकांना हे चित्र बरंच ओळखीचं वाटेल!)

सर्वशक्तिमान किंवा सर्वज्ञानी असं साधारणत: कृत्रिम प्रज्ञावान यंत्रमानवांचं (मग ते सुष्ट असोत वा दुष्ट) चित्रण केलं जातं; तसा सरधोपट साचा या कादंबरीत नाही. क्लारा आणि तिच्यासोबतचे अन्य ‘एएफ’ यांच्या माहितीला मर्यादा आहेतच; शिवाय प्रत्येक ‘एएफ’ला स्वत:चं काहीएक व्यक्तिमत्त्व आहे. सूक्ष्म निरीक्षणशक्ती, सहानुभाव आणि चुकांतून शिकत स्वत:ला सुधारण्याची क्षमता असणाऱ्या क्लाराच्या निवेदनातून कादंबरीचं कथानक उलगडत जातं. जोझी आणि आई काही वाद घालत असतील, किंवा जोझी आणि रिक यांना बोलण्यासाठी खासगीपणा हवा असेल, तर त्यांना तसा अवकाश देण्याची उपजत पोच तिला आहे.

शेजारच्या रिकशिवाय अन्य कुणी मित्रमैत्रिणी नसणाऱ्या, नाजूक प्रकृतीच्या जोझीला क्लाराचा लवकरच लळा लागतो. तिची आई मात्र अधिक सावध असते. कृत्रिम प्रज्ञेची क्लारा ही जोझीच्या हालचालींची आणि बोलण्याच्या लकबींची हुबेहूब नक्कल करू शकते, हे ध्यानी आल्यावर मात्र तिचा नूर पालटतो. तिची पहिली मुलगी ही अशाच जनुकीय उन्नयनाच्या प्रक्रियेमुळे दगावली होती आणि या प्रक्रियेनंतर जोझीचीही प्रकृती फारशी ठीक नसते. हळुहळू जोझीचं रेखाचित्र (पोट्र्रेट) काढण्याचा बहाणा करून जोझीचं त्रिमित शिल्प करता येईल का, आणि यदाकदाचित जोझी जगली नाही तर तिच्या हालचाली आणि बोलणं हुबेहूब नकलणारी क्लारा तिची उणीव भरू काढू शकेल का, याची जोझीच्या आईने केलेली चाचपणी कथानकातल्या मुख्य मुद्द्याला हात घालणारी आहे.

माणसाने तयार केलेले यंत्रमानव प्रथम आपण जी कामं करतो ती करू लागले. त्यापुढची पायरी म्हणजे कृत्रिम प्रज्ञेने त्यांच्यात काहीएक प्रमाणात विचारक्षमता निर्माण झाली. आता, भावनिकदृष्ट्याही त्यांना एखाद्या व्यक्तीची जागा घेणं शक्य आहे का? मानवी प्रज्ञेची भरारी आपली सर्वार्थाने हुबेहूब अशी प्रतिमा निर्माण करण्याइतपत आहे का? की सगळ्या शास्त्रांच्या, कलांच्या, तत्त्वज्ञानांच्या केंद्रस्थानी जी मानवजात आहे – तिच्यात निव्वळ देह, बुद्धी, जाणीव-नेणीव, भावना या साऱ्यांच्या पलीकडेही अव्याख्येय, अनिर्वचनीय असं काही आहे ज्याची पुनर्निर्मिती करता येणं शक्य नाही? (इथे रॉय किणीकरांची ‘हा देह तुझा पण देहातिल तू कोण?’ ही अजरामर ओळ आठवणं अपरिहार्यच!) एका अर्थी, ‘कोऽहम?’ या अनादिकाळापासूच्या प्रश्नाचं हे आधुनिक स्वरूप आहे. कादंबरी हे प्रश्न थेटपणे उपस्थित करत नाही किंवा त्यांची उत्तरं देण्याचा आवही आणत नाही – पण इशिगुरोंच्या संयत, नेमक्या शैलीत हे अवघड प्रश्न आपल्यासमोर उभे ठाकतात.

जोझीला आता आपला कितीही लळा असला तरी ती मोठी झाल्यावर तिला तिचं स्वतंत्र आयुष्य आहे आणि तिच्या वाटा आपल्यापासून आणि रिकपासूनही निराळ्या होणार आहेत – याचा शहाणा स्वीकार क्लाराने केला आहे. कादंबरीच्या शेवटी, निवृत्त झालेल्या अन्य ‘एएफ’सोबत भंगारात स्वेच्छेने येऊन राहिलेल्या क्लाराची आपल्या आजवरच्या आयुष्याकडे पाहण्याची भावना ही ‘जाहल्या काही चुका अन्…’ सारखी कृतार्थतेचीच आहे.

तसं पाहिलं तर क्लाराच्या या साऱ्या भावना आणि जाणिवा सर्वार्थाने मानवी आहेत. एका टोकाला माणूस आणि दुसऱ्या टोकाला यंत्रमानव अशी कप्पेबंद विभागणी न करता, क्लारा आणि अन्य ‘एएफ’ या वर्णपटावर कुठेतरी आहेत. (‘क्लाराला माणूस म्हणून वागवावं का व्हॅक्यूम क्लीनरसारखं एखादं उपयोगी यंत्र म्हणून?’ असा एक स्वाभाविक पेच जोझीच्या घरी आलेल्या एका पाहुणीला पडतो – तो एका अर्थी, बहुतांश विज्ञानकथा-वाचकांच्या आजवरच्या सरधोपटपणाच्या सवयीमुळे (कंडिशनिंग) झालेल्या कोंडीचंच प्रतिनिधित्व करतो).

परिणामी, काझुओ इशिगुरोंच्या या दोन कादंबऱ्यांची सुनस्थानी (युटोपियन) वा कुनस्थानी (डिस्टोपियन) अशी सरळसोट विभागणी करता येत नाही. जनुकीय अभियांत्रिकी, यंत्रमानव आणि क्लोन्स या गोष्टी त्यांच्या फायद्यातोट्यांसकट अंगवळणी पडलेल्या भविष्यकालीन समाजाचं एक व्यापक चित्र त्यांतून उभं राहतं. माणूस आणि यंत्र अशी ढोबळ विभागणी येथे उरलेली नाही. माणसांनी कृत्रिमरीत्या आपली शारीरिक व बौद्धिक क्षमता वाढवली आहे आणि यंत्रं कृत्रिम प्रज्ञेने आणि मानवी जाणिवांनी, भावभावनांनी समृद्ध झाली आहेत.

जगात फार थोड्या गोष्टींची विभागणी कप्पेबंद, परस्परव्याघाती असते – बऱ्याच गोष्टी एका वर्णपटावर कुठेतरी असतात – याचा पडताळा आणून देणारं हे शतक आहे. जगभर थैमान घालणारा कोविडचा विषाणू हा सजीव, निर्जीव की दोहोंच्या मध्ये कुठेतरी? लैंगिक ओळख ही ठाम की तरल? स्वमग्नता (ऑटिझम) हा एकच शिक्का पुरेसा की त्या वर्णपटावर आपण सारेच कुठे ना कुठेतरी मोडतो? भिन्नलिंगी आकर्षण व समलिंगी आकर्षण असे दोन ध्रुव की अल्फ्रेड किन्सी या शास्त्रज्ञाने मांडल्याप्रमाणे प्रवाही शक्यतांची मोजपट्टी?

अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत – जिथं सुनस्थानी आणि कुनस्थानी गोष्टी एकसमयावच्छेदेकरून वावरत असतात – आकाराला येणाऱ्या इशिगुरोंच्या या कादंबऱ्या ठोकळेबाज विभागणी, कुठल्याही अभिनिवेशाशिवाय नाकारतात आणि (मर्ढेकरांची उपमा किंचित उसनी घेऊन सांगायचं तर) शास्त्रकाट्याला प्रसंगी भावनेची कसोटी लावून; एक प्रगल्भ, व्यामिश्र भावी मानवी व यंत्रमानवी भावविश्व आपल्यासमोर उभं करतात.

nandan27@gmail.com  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dystopian utopia dystopia to the senses akp

Next Story
कडेलोटाकडून ‘क्रांती’कडे!
ताज्या बातम्या