शशिकांत सावंत

विश्वनाथन आनंद हा बुद्धिबळातला जगज्जेता. मनोबलामुळेच खेळ जिंकता येतो, हे स्वत:च्या काही चुकांमधूनही त्याला शिकायला मिळालं. या चुकांची कबुली देतानाच यशाचं नेमकं विश्लेषण करणारं त्याचं आत्मचरित्र महत्त्वाचं आहे..

विश्वनाथन आनंदने ज्युनिअर जागतिक स्पर्धा जिंकली तेव्हा भारताकडे एकही ग्रॅण्ड मास्टर नव्हता. मॅन्युअल आराँसारखा आंतरराष्ट्रीय ‘मास्टर’ तेवढा होता. आज आपल्या देशामध्ये साठहून अधिक ग्रॅण्ड मास्टर्स आहेत. याचं मोठं श्रेय विश्वनाथन आनंदला जातं. याचं कारण त्यानं भारतामधील खेळाचा चेहरा-मोहरा पालटला. अलीकडेच (११ डिसेंबर) त्याने वयाची पन्नाशी पूर्ण केली. आजही तो अनेक जागतिक टुर्नामेंटमधून खेळतो. अमेरिकेच्या बॉबी फिशरने बुद्धिबळातला रशियनांचा एकछत्री अंमल संपवला. गॅरी कास्पारॉव, कारपॉव, क्रॉमनिक यासारखे अनेक रशियन खेळाडू नंतरही कार्यरत होते. पण विश्वनाथन आनंदने विलक्षण झुंज देऊन पाच वेळा जगज्जेतेपद मिळवलं. त्याचं हे आत्मपर पुस्तक फक्त त्याची विजयगाथा सांगत नाही तर विजयाच्या रहस्यांचा वेध घेतं, म्हणून महत्त्वाचं आहे!

गॅरी कास्पारोव्हपासून ते फिशपर्यंत अनेक खेळाडू त्यांच्या लहरीपणा आणि तापटपणासाठी प्रसिद्ध आहेत. विश्वनाथन आनंद कधीही हरल्यामुळे चिडचिडा झालाय किंवा त्याने एखादे विचित्र विधान केलंय असं कधी होत नाही. तो विलक्षण शांत असतो. लहानपणापासून तो बुद्धिबळ खेळतो आहे. ज्या काळात तो बुद्धिबळ खेळू लागला त्या काळात आजच्या इतकी संगणकीय इंजिन्स उपलब्ध नव्हती पण जे उपलब्ध होतं त्याचा त्याने कसून वापर केला. अर्थातच रशिया किंवा अमेरिकेसारखे प्रशिक्षक भारतात नव्हते. त्यामुळे मॅग्नस कार्लसनप्रमाणेच बराच खेळ त्याने स्वत: आत्मसात केला. त्याला जर्मन आणि स्पॅनिश भाषा येतात. स्पेनमधल्या मद्रिदजवळ त्याचं घर आहे. अनेकदा हरल्यानंतर तो स्वत:वरच टीका करतो. या टीकेत खुलेपणा जरूर असतो, पण त्रागा अजिबात नसतो!

अलीकडेच त्यानं म्हटलं होतं की माझा मोठा शत्रू कोण असेल तर मीच आहे. भारतात जेव्हा पहिल्यांदा जागतिक विजेतेपदासाठी मॅच झाली तेव्हा तो हरला. मॅग्नस कार्लसनशी चेन्नईत झालेल्या सामन्यातही तो पराभूत झाला. पण त्याने पुन्हा उसळी घेत या जगज्जेत्याला चॅलेंजर म्हणून स्वत:ची निवड करून घेतली. हे मनोबलाचं एक विलक्षण यश आहे. विश्वनाथन आनंदमुळेच आज दीडशेहून अधिक देशात भारतीय बुद्धिबळ क्षेत्राबद्दल आदर आहे. ‘चेसबेस’सारखं संकेतस्थळ नेहमी वापरणाऱ्यांना हे लक्षात येईल. अलीकडे या चेसबेसचा प्रमुख भारतात बुद्धिबळाची स्थिती पाहण्यासाठी घेऊन गेला आणि देशभर फिरला. एक गरीब मुलीला त्याने स्कॉलरशिपही दिली. एखाद्या खेळाच्या वाढीसाठी अनेक संघटक आवश्यक असतात हे खरं, पण आनंदसारखा ‘प्रेरणास्रोत’ या संघटकांनाही प्रेरणा देतो.

ही प्रेरणा कशाची? मनोबलाचीच, असं ‘माइंड मास्टर’ हे पुस्तक सांगतं. आनंदच्या कारकीर्द- प्रवासाची किंवा त्याच्या खेळातील महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती एव्हाना बऱ्याच जणांना असेल.  ‘चेसबेस’वरच प्रियदर्शन बंजन यांनी अनेक भागांमध्ये ‘विशी आनंद’ हे चरित्र लिहिलं होतं. ते त्याच्या आयुष्यापेक्षा त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करणारं होतं. ‘चेसबेस’वरच ते असल्यामुळे, बुद्धिबळाचे त्याने खेळलेले डाव नोटेशनच्या रूपात दिले  होते. पण खुद्द आनंदनंच सुसान नायनन या सहलेखिकेबरोबर लिहिलेलं हे पुस्तक नक्की वेगळं आहे.

या आत्मचरित्रात अर्थातच बुद्धिबळावर भरपूर चर्चा आहे पण डाव दिलेले नाहीत.  अर्थात ते इंटरनेटवर बघता येतात. आनंदचा प्रवास विस्मयजनक आहे. बुद्धिबळ हा मदानी खेळांपेक्षा थोडासा कमी प्रतीचा खेळ आहे असं अनेकांना वाटतं. ते साहजिकही आहे, पण एकेकाळी बुद्धिबळाचे डाव जवळपास सहा-सात तास चालत आणि आजही कधीकधी चालतात. पूर्वी ते एन्डझोन होऊन दुसऱ्या दिवशी चालू राहात आता तितकं होत नाही, पण गेल्या काही वर्षांत या खेळाचं संथ स्वरूप बदलण्यात येऊन ब्लिट्झ , रॅपिड, अर्मागेडन अशा निर्णायक खेळापर्यंतची वाटचाल झाली. या साऱ्या टप्प्यांमध्ये आनंद अर्थातच सहभागी होता.

प्राथमिक धडे

विश्वनाथन आनंदचा प्रवास सुरू झाला तो मद्रासहून. मॅन्युअल आराँ यांनी स्थापन केलेल्या बुद्धिबळ क्लबमध्ये तो खेळायला लागला आणि तो अनेकांना हरवू लागला. त्याच्या आधी अर्थातच घरी आई आणि बहिणी बुद्धिबळ यांच्याशी तो खेळत असे. सुदैवाने मॅन्युअल आराँ यांच्यासारखा इंटरनॅशनल मास्टर मद्रासमध्ये असल्यामुळे त्यांनी त्याला योग्य मार्गदर्शन दिलं आणि हळूहळू राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा त्याचा विकास झाला. तो कसा झाला हे विश्वनाथन आनंद विलक्षण सुंदर शब्दात सांगतो. चांगल्या पुस्तकाची गडबड ही असते की त्याविषयी वृत्तपत्रात लिहिताना त्यातली किती वाक्यं उद्धृत करावी आणि किती नको, असं होऊन जातं. हे पुस्तकही त्याच दर्जाचं आहे. याचं मोठं श्रेय आनंदच्या सहलेखिका सुसान यांनाही दिलं पाहिजे.

बुद्धिबळ न येणाऱ्या मंडळींना हे पुस्तक किती रुचू शकेल किंवा किती आस्वाद घेता येईल,  असा प्रश्न साहजिकच उद्भवू शकतो. त्याचं उत्तर असं की, बुद्धिबळ न येणारी मंडळी हे पुस्तक कोणतीही अडचण न येता वाचू शकतील, त्याचा आनंदही घेऊ शकतील.. पण क्लब पातळीवर बुद्धिबळ खेळणाऱ्यांना हे पुस्तक अधिकच भावेल. त्याची गंमत अर्थात बुद्धिबळाच्या रचनेत आहे. मिड ऑन किंवा मिड ऑफमधला फरक न समजणारा माणूसही क्रिकेटचा आस्वाद घेऊ शकतो; कारण तो मदानी खेळ आहे. बुद्धिबळाचं तसं नाही. ‘ओपनिंग्ज’ म्हणजे काय? सुरुवात, मध्य आणि ‘एन्डगेम’ यांच्यामधलं कौशल्य नेमकं कशात असतं? स्ट्रॅटेजी (व्यूहात्मक खेळी) आणि क्लृप्ती या गोष्टी बुद्धिबळात महत्त्वाच्या कशा ठरतात? हे माहीत असणाऱ्यांना हे पुस्तक खूप काही देईल. अर्थात एक खेळाडू म्हणून जगताना येणारे ताणतणाव, प्रवास, गृहस्थाश्रम या साऱ्याबद्दलही आनंद भरभरून लिहितो.

उदाहरणार्थ, आई वडिलांनी शोधलेल्या वधूशी म्हणजे अरुणाशी लग्न केल्यावर तिने कसा आपला ताबा घेतला आणि आयुष्याला,  प्रवासाला शिस्त लावली हे त्याने फार सुंदर रेखाटलं आहे. आनंदची एका उपांत्य फेरीत  कारपॉवशी गाठ पडणार होती म्हणूनच जगज्जेतेपदाच्या तयारीसाठी त्याने कारपॉवच्या खेळाची इत्थंभूत माहिती असलेला ट्रेनर निवडायचे ठरवले. या ट्रेनरने कास्पारॉवला ‘सेकंड’ म्हणून काम केलं होतं. उच्चस्तरीय बुद्धिबळपटू ज्या टीमबरोबर, मदतनीसांसह काम करतात त्यांना ‘सेकंड’ असं म्हणतात. आनंद लिहितो की, या ट्रेनरने आल्याआल्याच माझा वॉकमन ताब्यात घेतला.. कारण शिखरावर जाण्यासाठी जी जी गोष्ट आवश्यक आहे ती करताना कोणतीही कमतरता ठेवू नये असं त्याचं मत होतं. या अशा गोष्टी वाचकाला नेमकं एखाद्या गोष्टीतलं मर्म सांगतात.

कबुली देण्याचा पोक्तपणा

आनंद हा तसा शांत माणूस आहे.  एरवी तापटपणा, चिडचिड याचा मोठा इतिहास बुद्धिबळात पाहायला मिळतो. बॉबी फिशर तरुण असताना त्यावेळचे ज्येष्ठ बुद्धिबळपटू जोस कॅपाब्लान्का यांनी म्हटलं होतं की, ‘बॉबी उत्कृष्ट खेळाडू आहे पण पंचविसाव्या वर्षी त्याच जगण्यातलं बौद्धिक वय पंधरा आहे’! त्याउलट आनंद. आनंदच्या जगण्या, वागण्यात एक पोक्तपणा नेहमीच दिसून येतो. कधीही त्याने पराभवानंतर तिखट कॉमेंट केलेल्या नाहीत.

अर्थात म्हणून तो परिपूर्ण धीरगंभीर पुरुष आहे, असा त्याचाही दावा नाही. तो सांगतो की ‘प्रत्येक खेळाडू अवघड अवस्थेत आल्यावर काही तरी खुणा दाखवतो. क्रॉमनिक अचानक भराभरा खेळायला लागतो. काही जणांचा श्वास थांबतो.. कास्पारॉवकडे बघून त्याची स्थिती चांगली आहे की वाईट आहे हे चेहऱ्यावरून कळतच नाही त्याचं कारण तो उत्तम अभिनेता आहे..’ आणि स्वत:बद्दल तो सांगतो – ‘पूर्वी जर माझी स्थिती अवघड झाली की मी नख चावायला लागायचो’. अर्थात ही सवय आनंदने सोडली पण माणसांच्या सवयी, लकबी स्वाभाविक असतात हे त्यातून दिसतं.

एकदा एका ग्रँडमास्टरने आनंदला कॅटलन बचावामधील एक युक्ती दाखवली होती. वजिराच्या हल्ल्यानंतरही तो घोडय़ाची खेळी करत होता. अशी ती गोष्ट होती. नंतर एकदा, सिसिलियन बचावात अशीच स्थिती आली आणि आनंदनं ही युक्ती तिथे वापरली. ती कशी हे पुस्तकात दिलेलं आहे. थोडक्यात एखादी गोष्ट तुम्हाला समजते तेव्हा ती दुसऱ्या संदर्भातही वापरता येते.

इतरांकडून प्रेरणा

आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना यश-अपयशाचे अनेक प्रसंग आनंदच्या आयुष्यात आले. तो लिहितो की जगतजेता झाल्यानंतर सहाच महिन्यात तो हरू लागला. रात्र रात्र त्याला जागरणं व्हायची, झोप यायची नाही आणि अत्यंत जड शरीराने, मनाने जागत तो बुद्धिबळाच्या वेळेची वाट बघत राहायचा. या परिस्थितीत त्याने सहा-सात डाव गमावले पण मग हळूहळू स्वत:वरचं नियंत्रण परत मिळवलं. इतरांकडून त्याने कशी प्रेरणा घेतली हे सांगताना तो म्हणतो की कारपॉव आणि कास्पारॉवच्या सामन्यामध्ये बारा-अकरा असा स्कोअर असताना कास्पारॉव रात्रभर पत्ते खेळत बसला आणि आरामात खेळासाठी निघाला. त्यांनी स्वत:ला इतकंच सांगितलं होतं की, काही नाही नेहमीचा साधा खेळ खेळायचा, अधिकाधिक सोंगटय़ा पटावर राखायच्या. यातून आनंद बरंच काही शिकला.

आनंदनं या पुस्तकात विश्वचषक लढय़ातील बोरिस गेल्फंड आणि मॅग्नस कार्लसन यांच्याविरुद्धच्या लढाईचं जे वर्णन केलं आहे ते पराभूत मन:स्थितीबाबतचं अचूक निरीक्षण ठरेल. तो म्हणतो, मी कोणाशीही मॅच ड्रॉ करू शकत होतो. पण नवे अनेक खेळाडू नव्या युक्त्या घेऊन येत होते, उलट मी आणि माझी टीम पाच वर्षांत तीन विश्वचषक सामने खेळत होतो. तीच माणसं, तेच घरापासून दूर राहणं, जंकफूड खाणं,  कॉफीचे कप! पण कार्लसनबरोबरच्या पराभवानंतर मूकपणे निराश आनंद जेव्हा हॉटेल रूममधल्या आपल्या छोटय़ा तीन वर्षांच्या मुलाशेजारी पहुडतो तेव्हा पत्नी अरुणा त्याला सांगते, तू कुठलंही जेतेपद कमाव किंवा गमाव हे असं आपल्या तिघांचं एकत्र असणं कायम राहणार आहे.

नर्मविनोद हेही आनंदच्या स्वभावाचं वैशिष्टय़ आहे. लग्नानंतर पत्नी अरुणाने सगळं काम-  बुकिंगपासून ते बॅग भरण्यापर्यंत – हाती घेतल्यावर आनंद जरा अस्वस्थ झाला होता. पण तो पुढे म्हणतो की नंतर त्याला इमोशनल ‘बॅगेज’ राहिलं नाही. एके ठिकाणी तो म्हणतो की मॅग्नस कार्लसनशी झालेल्या माझ्या पराभवात वयाचा वाटा होताच, पण त्याहीपेक्षा मोठा वाटा होता तो कार्लसनच्या व्यूहरचनेचा. मला कायम तो अवघड स्थितीत आणून ठेवत असे. यातील सर्वात उत्कंठावर्धक भाग आहे तो जागतिक जगज्जेतेपदाच्या सामन्यातील क्रॉमनिकशी झालेल्या खेळांचं वर्णन. क्रॉमनिक आणि आनंद यातून एक जगज्जेता होणार होता. दोघेही पंचवीसहून अधिक वर्ष एकमेकांचा खेळ जाणून आहेत. अशा परिस्थितीत क्रॉमनिकची ज्यात मास्टरी होती ती वजीर प्याद्याची सुरुवात आणि आनंदची जी राजा प्याद्याची सुरुवात हे दोघे करणार हे नक्की होतं. दोघांनाही एकमेकांचा खेळ नीट माहीत असल्यामुळे असे सामने बरोबरीत सुटण्याची शक्यता होती. म्हणून आनंदने जाणीवपूर्वक सामन्याआधी तीनेक महिने डी फोर म्हणजे वजीर प्याद्याच्या ओपिनगचा सराव केला, विविध शक्यता चाचपल्या आणि त्यातून कोणती क्रॉमनिकला लागू पडेल हे शोधलं. हे सारं त्याने फार सोपेपणानं सांगितलं आहे. आणि दोन डाव बरोबरीत सुटल्यावर तिसऱ्या डावात तो जिंकला आणि पुढे आणखी दोन डाव जिंकल्यावर त्यांनी वर्णन केलं आहे ते अशा स्थितीत येणाऱ्या बेसावधपणाचं! अशाच बेसावधपणामुळे आपण याआधीही हरलो होतो, हे सांगत त्याने विजयाकडची वाटचाल स्पष्ट केली आहे.

संगणक-युगातही वाटा..

आनंदने बुद्धिबळातील दोन्ही टप्पे पाहिले आहेत. जड जड पुस्तकं घेऊन सामन्याला जाऊन ओपिनगची तयारी करायची इथपासून ते संगणक आणि बुद्धिबळाची विविध इंजिन्स झाल्यावर पडलेला फरक या दोन्ही टप्प्यांचं वर्णन पुस्तकात आहे. पण त्यातही चेसबेसचे प्रमुख निर्माते आणि प्रोग्रामर फ्रेडरिक यांच्याशी त्याने त्यांच्या सहकार्याने हळूहळू बुद्धिबळात तंत्रज्ञानाचा वापर कसा केला आणि स्वत: त्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात कशी मदत केली याचाही तपशील पुस्तकात आलेला आहे.

बिल गेट्सपासून आमीर खानपर्यंत बुद्धिबळाच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. या खेळावर विपुल साहित्यही उपलब्ध आहे. पण बुद्धिबळ खरंच जीवनात काही देऊ शकतो का?  उत्तम बुद्धिबळपटू हा जीवनात यशस्वी होतो का? अनेकांची उदाहरणे पाहिल्यास याचं उत्तर नकारार्थीच येईल. पण याचं उत्तर होकारार्थीही असू शकते, हे एक प्रकारे आनंदचं  हे आत्मचरित्र सांगतं.

‘माइंड मास्टर : विनिंग लेसन्स फ्रॉम अ चॅम्पियन्स लाइफ’

लेखक :  विश्वनाथन आनंद (आणि सुसान नायनन)

प्रकाशक : हॅचेट इंडिया

पृष्ठे: २७२, किंमत :  ४९९  रुपये