इंदिरा व संजय गांधी यांच्यावरील निष्ठेमुळे मुख्यमंत्रिपद मिळवणारे     बॅ. अ. र. अंतुले तडफदार होते आणि प्रश्न समजून घेण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी होती. समस्या ही की धडाडी आणि धरबंध यातील संतुलन कोठे संपते याचे त्यांना भान राहत नसे. वागण्यातील तडफेस नियंत्रित करण्यासाठी जो संयतपणा लागतो, तो त्यांच्या ठायी कधी नव्हता..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्राचे पहिले मुसलमान मुख्यमंत्री ही अब्दुल रहेमान अंतुले यांची खरी आणि पूर्ण ओळख ठरणार नाही. किंबहुना तशी ती करणे हे त्यांच्यावर अन्यायकारक आहे. त्यांच्या मुख्यमंत्रिपदातील पहिलेपण धर्मापेक्षा अन्य एका वास्तवाने महत्त्वाचे ठरते. ते म्हणजे कोकणातून आलेला, साखर कारखानदार वा सहकारसम्राट यांचा पाठिंबा नसलेला पहिला मुख्यमंत्री असे म्हटल्यास अंतुले यांचे मोठेपण लक्षात यावे. अंतुले यांच्यामागे ना सहकारी बँक ना कोणती संस्था. तरीही त्यांना या राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळाले. हे जसे त्यांचे मोठेपण तसेच अशक्तपणदेखील ठरते. याचे कारण या राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी कोण लायक ठरते, किंवा खरे तर कोण नालायक ठरते, याचे काही अलिखित नियम तग धरून आहेत. त्यानुसार मराठा जातीतील नेत्यांस प्राधान्य मिळते. मराठा आणि तो परत त्यात पश्चिम महाराष्ट्रातील असेल तर ते सोन्याहून पिवळे. हे नसेल तर गेलाबाजार त्याच्यामागे काही सहकारी साखर कारखाने तरी हवेत. अंतुले हे या सर्वच नियमांना अपवाद होते. ते मराठा नव्हते, पश्चिम महाराष्ट्राशी त्यांचा थेट संबंध नव्हता आणि मागे एखादी सहकारी संस्था असण्याचीदेखील सुतराम शक्यता नव्हती. तरीही ते १९८० साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मागे अनेक गोष्टी नसलेल्या अंतुले यांच्याकडे काँग्रेसमधील सत्ताकारणासाठी जीवनावश्यक असे दोन घटक होते. एक गांधी घराण्यावर निष्ठा आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्रातील असूनही प्रसंगी मराठा आणि सहकार दबाव गटांशी दोन हात करण्याची तयारी.
हे दोन्ही घटक अंतुले यांच्या मुख्यमंत्रिपदी निवडीत निर्णायक ठरले. याचे कारण तत्कालीन राजकीय परिस्थिती. १९७८ साली शरद पवार यांनी पुरोगामी लोकशाही दलाचा प्रयोग करून काँग्रेसला चांगलेच संकटात आणले होते. वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडल्यानंतर डावे, उजवे, समाजवादी अशा सर्वच आवळ्याभोपळ्यांना घेऊन पवार यांनी राज्य सरकारची मोट बांधली होती. त्याआधी आणीबाणीनंतरच्या निवडणुकांनी इंदिरा गांधी यांना धूळ चारली होती. एके काळचे काँग्रेसचे मोरारजी देसाई ते जनसंघाचे अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, साथी जॉर्ज फर्नाडिस यांचे असेच सरकार केंद्रात सत्तेवर आले होते. परिणामी इंदिरा गांधी यांना आपण कसे संपवले असे म्हणत एकमेकांना टाळय़ा देत या ढुढ्ढाचार्याचे राजकारण सुरू होते. त्यापासूनच प्रेरणा घेत शरद पवार यांनी महाराष्ट्रात पुलोदचा घाट घातला. तो चांगलाच रंगेल अशी चिन्हे असताना घात झाला. तो म्हणजे इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या. जी बाई संपली असे मानून ज्यांचे राजकारण सुरू होते त्या सर्वानाच इंदिरा गांधी यांच्या धडाडीच्या पुनरागमनाने धक्का बसला. बाईंनी पहिले काय केले तर महाराष्ट्रात शरद पवार यांचे पुलोद सरकार विसर्जित केले. परिणामी पवार जसे राजकीयदृष्टय़ा निर्वासित झाले तसेच महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेतृत्वही. या टप्प्यावर इंदिराबाईंचे अब्दुल रहेमान अंतुले यांच्याकडे लक्ष गेले. मुख्यमंत्रिपदी निवड होण्याआधी अंतुले चांगले दशकभर विधानसभेत होते, वेगवेगळय़ा खात्यांचे मंत्रीही होते. या काळात त्यांचा एक गुण काँग्रेसश्रेष्ठींच्या नजरेत भरला असावा. तो म्हणजे बेधडकपणा. हा काळ संजय गांधी यांच्या दिव्य लीलांचा. आणीबाणीच्या आधी या संजयलीलांनी आणि त्याच्या गणंगांनी राजकारण ग्रासलेले होते. काँग्रेसच्या दरबारी राजकारणात संजय म्हणेल ती पूर्व दिशा मानण्याचा प्रघात होता. त्यामुळे जेव्हा आई इंदिरेने शरद पवार सरकार बुडवले तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी संजय गांधी यांच्याकडून अंतुले यांचेच नाव पुढे ढकलले गेले. गांधी मायलेकांना अंतुले यांच्याविषयी ममत्व असण्याची प्रमुख कारणे तीन. एक म्हणजे या मायलेकांच्या पडत्या काळातही अंतुले यांनी त्यांची साथ सोडली नाही, दुसरे म्हणजे यशवंतराव चव्हाण ते शरद पवार व्हाया वसंतदादा पाटील या राज्याच्या मराठा राजकारणास आव्हान देऊ शकेल अशी अंतुले यांची मनोभूमी आणि तिसरे म्हणजे अर्थातच त्यांचा धर्म. तेव्हा या सर्व कसोटय़ांवर उत्तम गुणांनी उतरणाऱ्या अंतुले यांची निवड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी होणे हे साहजिक होते.
मुख्यमंत्रिपदी आसनस्थ होताच अंतुले यांच्यातील मूळ बेधडक स्वभावास वैधतेची जोड मिळाली. अंतुले तडफदार होते आणि प्रश्न समजून घेण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी होती. राज्याच्या सेवेत राहून गेलेले अनेक ज्येष्ठ सनदी अधिकारी अद्यापही अंतुले यांच्याविषयी आदराने बोलतात ते यामुळेच. एकदा का निर्णय घेतला की अंतुले ठामपणे अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आणि कोणत्याही प्रसंगाने डगमगून जात नसत. याचा सर्वात मोठा दाखला म्हणजे रिझव्‍‌र्ह बँकेच्या विरोधात जात त्यांनी जाहीर केलेली कर्जमाफी. आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची कर्जे माफ व्हावीत असा निर्णय त्यांनी घेतला. तोपर्यंत राज्य सरकारनेच कर्जे माफ करण्याची प्रथा नव्हती. परिणामी त्यांच्या निर्णयाचे अनेक पडसाद उमटणार होते. तसे ते उमटले आणि त्याची दखल घेत थेट रिझव्‍‌र्ह बँकेनेच राज्य सरकारला तंबी दिली. प्रश्न अवघा ५० कोटी रुपयांचा होता आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार होता. तोपर्यंत असे कधीही झालेले नसल्यामुळे नानी पालखीवाला यांच्यासह अनेकांनी त्या विरोधात काहूर उठवले. परंतु अंतुले जराही डगमगले नाहीत आणि रिझव्‍‌र्ह बँकेला महासरकार होऊ देणार नाही, असे सांगत त्यांनी ती योजना जशीच्या तशी राबवली. जे झाले ते आर्थिकदृष्टय़ा योग्य की अयोग्य असा प्रश्न यावर उपस्थित होऊ शकतो. तसा तो झाला तरी त्यामुळे अंतुले यांची प्रशासनातील धडाडी मात्र दिसून येते. त्यांच्या आयुष्यातील दुर्दैवी योगायोग म्हणजे संजय गांधी यांचे निधन. संजय गांधी यांच्यामुळे अंतुले यांना मुख्यमंत्रिपद मिळाले. परंतु ते मिळाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत संजय गांधी यांचे निधन झाले. तेव्हा आपल्या या राजकीय पाठीराख्याच्या स्मरणार्थ अंतुले यांनी संजय गांधी निराधार योजना सुरू केली. राज्यातील निराधारांना दरमहा ६० रुपये इतके तरी निवृत्तिवेतन मिळावे, अशी ती योजना. आजही ही योजना देशभर वेगवेगळय़ा राज्यांतून राबवली जाते. फरक इतकाच की, आज हे निवृत्तिवेतन ५०० रुपयांच्या घरात गेले आहे.
परंतु अंतुले यांच्या स्वभावातील समस्या ही की धडाडी आणि धरबंध यातील संतुलन कोठे संपते याचे त्यांना भान राहत नसे. इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान हे प्रकरण घडले ते यामुळेच. ज्या वेळी सिमेंटसारख्या घटकासाठी बिल्डरांना सरकारवर अवलंबून राहावे लागत असे त्या वेळी अंतुले राज्य सरकारच्या वतीने बिल्डरांना धडाधड असे परवाने देत असत. अट अशी की त्या बदल्यात या बिल्डरांना अंतुलेचलित न्यासांना देणगी द्यावी लागत असे. वास्तवात ही देणगी अंतुले हे धनादेशाद्वारेच घेत असत. परंतु तरीही अंतुले यांचे राजकीय विरोधक असलेल्या वसंतदादा पाटील आदींनी अंतुले रोखीने देणग्या घेत असा प्रचार पद्धतशीरपणे केला आणि तो इंदिरा गांधी यांच्यापर्यंत जाईल अशी व्यवस्था केली. माध्यमांतूनही हे प्रकरण चिघळले आणि बघता बघता अंतुले यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे वादळ उभे राहिले. अंतुले यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद मिळू नये यासाठी त्या वेळी वसंतदादा पाटील यांनी जंग जंग पछाडले होते. त्यांच्या विरोधास डावलून मुख्यमंत्रिपदी अंतुले यांची वर्णी लागल्याने दादा आणि मराठा नेतेमंडळींशी संबंधित अनेक जण अंतुले यांना खिंडीत पकडण्यासाठी टपूनच होते. त्यांना अंतुले यांनी स्वहस्ते संधी दिली आणि अखेर स्वत: संकटात सापडले. वास्तविक काँग्रेसचे तत्कालीन नेते अंतुले यांच्या तुलनेत काही संतसज्जन होते असे नाही. तरीही त्यांच्या तुलनेत अंतुले भ्रष्ट ठरले.
याचे कारण बेधडकपणा कोठे संपतो आणि बेधुंद बेमुर्वतपणा कोठे सुरू होतो, याकडे त्यांनी कधीही लक्ष दिले नाही. कपाळावर मध्ये मध्ये येणारी केसांची बट, बोलता बोलताच ती मागे करण्याची बेफिकिरीची लकब, वागण्यात एक प्रकारचा जोश आणि ऊर्जा असे अंतुले आपल्या वागण्यातूनच एक सकारात्मक संदेश देत. बघू, पाहू, करू अशा शब्दांना त्यांच्याकडे स्थान नव्हते. परंतु वागण्यातील तडफेस नियंत्रित ठेवण्यासाठी जो प्रकारचा संयतपणा लागतो, तो त्यांच्या ठायी कधी नव्हता. त्यामुळेच पायउतार व्हावे लागल्यानंतर त्यांची कारकीर्द भरकटत गेली आणि एका चांगल्या प्रशासकाचा दुर्लक्षित शेवट झाला.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barrister ar antulay first muslim cm of maharashtra
First published on: 03-12-2014 at 01:15 IST