आपण देहाला सर्वस्व मानत असतो, देहावरच विसंबून जगत असतो, आपल्या शारीरिक क्षमता जणू कधीच नष्ट होणार नाहीत, या भावनेनं वावरत असतो. वयपरत्वे देह थकू लागला की ते आपल्याला स्वीकारता येत नाही, सहन होत नाही. नव्वदी पार केलेले भाऊसाहेब, ‘देहाचा कंटाळा आला म्हणून नव्हे तर माझा काही उपयोग नाही म्हणून विचारतो की मला अजून का ठेवलं आहे,’ असं विचारतात त्यातली खोली आज आपल्याला उमगणार नाही. त्याचबरोबर, ‘‘जगातील कोणत्याही गोष्टीचा लोभ नसताना व त्याचा उपभोग घेता येत नसतानाही कसे समाधान टिकवता येते हे दाखविण्याकरिता तुम्हाला ठेवले आहे!’’ या श्रीमहाराजांच्या उत्तरातील खोलीही जाणवणार नाही. आपल्या देहाला वयपरत्वे काही कमीजास्त होऊ लागले की भाऊसाहेबांची जीवनदृष्टी आणि तपश्चर्या आपल्याला जाणवू शकेल. श्रीमहाराजांचे एक श्रेष्ठ शिष्य पुण्यात असत. शेवटच्या दोन-तीन वर्षांत त्यांचे गुडघ्याचे सांधे धरले जाऊन त्यांना उभेही राहता येत नसे. पावलांनी खुरडत खुरडत जावे लागे. श्रीमहाराज पुण्यात आले म्हणजे रोज त्यांना भेटत. एकदा ते चालता येत नसल्याबद्दल काहीतरी म्हणाले असावेत. श्रीमहाराज त्यांना म्हणाले, ‘‘आजवर किती वर्षे चालून झाले? शेवटपर्यंत चालत राहिलेच पाहिजे का? किंबहुना, या वयात चालता न येणे हेच जास्त स्वाभाविक नाही का? मूल जन्माला आले म्हणजे ठरावीक वेळी ठरावीक गोष्टी- उपडे पडणे, रांगू लागणे, बसू लागून हळूहळू चालू लागणे, बोलू लागणे इत्यादी व्हाव्यात अशी अपेक्षा असते. त्या तशा झाल्या नाहीत तर काहीतरी निसर्गाविरुद्ध झाले असे वाटून काळजी वाटते. त्याचप्रमाणे वय झाले म्हणजे शरीराची शक्ती कमी होत जाऊन त्याचे व्यवहार कमी कमी होत जाणे हे स्वाभाविक नाही का? किंबहुना, ते व्यवहार पूर्ववत् होत राहिले तरच आपल्या मनात हे असे कसे, का होते, असा विचार आला पाहिजे. कारण तसे होणे हे निसर्गनियमाला सोडून आहे. परंतु त्याचे उलट या वयातही हे सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणेच चालू राहाणे हे आपण गृहीत धरतो. याचे कारण आपला आनंद थोडा थोडा बाहेरच्या गोष्टींवर वाटला गेला आहे. त्यामुळे आज आपण खऱ्या आनंदाला पारखे झालो आहोत. देहाची कशीही अवस्था असली तरी आपल्याला आनंदात राहता आले पाहिजे व तसे राहता येते आणि हीच गोष्ट मी भाऊसाहेबांनाही सांगितली होती. आपला आनंद इतक्या गोष्टींवर का अवलंबून राहावा? तो आपल्या स्वाधीन असला पाहिजे. तो आनंद परमात्म्याजवळ आहे आणि तो मिळविण्याकरिता त्याचे अखंड अनुसंधान पाहिजे व त्याकरिता नामस्मरणाची गरज आहे.’’ (संदर्भ- डॉ. वा. रा. अंतरकर यांचा लेख ‘श्रीमहाराजांचे तर्कशास्त्र/ चैतन्यस्मरण विशेषांक १९९८). आता वय झालं तरी शक्ती टिकून असण्यात काय गैर आहे, असं काहींना वाटेल. काहींना यात नकारात्मक सूर वाटेल. पण हा बोध नकारात्मक  वा निराशाजनक नाहीच. त्यासाठी श्रीमहाराजांच्या बोधाचा खरा रोख आणि त्यामागचा हेतू जाणून घेऊ.