विश्वचषक २०२३ स्पर्धेचा साखळी टप्पा भारत वि. नेदरलँड्स सामन्याने रविवारी समाप्त झाला. भारतीय क्रिकेट संघाने दीपावलीच्या पहिल्या दिवशी सामना संपल्यानंतर सहकुटुंब दिवाळी साजरी केली. तशाच प्रकारच्या उत्सवी आणि निवांत वातावरणात भारतीय संघ दुपारी मैदानात उतरला होता आणि पूर्ण ताकद न लावताही नेदरलँड्स संघाविरुद्ध मोठय़ा फरकाने जिंकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार संधी न मिळणाऱ्या आणि अजूनही मोठय़ा प्रमाणावर स्थलांतरित क्रिकेटपटूंवर अवलंबून राहणाऱ्या नेदरलँड्स संघाला तरीही स्वत:च्या कामगिरीने समाधान वाटले असेल. कारण भारताविरुद्ध फारच थोडय़ा संघांनी या स्पर्धेत अडीचशे धावा किंवा त्यापलीकडे मजल मारलेली आहे. अर्थात ४०० धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पूर्ण ताकदीनिशी गोलंदाजी केली नाही हेदेखील त्यामागील एक कारण असावे. या पूर्णतया बिनमहत्त्वाच्या सामन्यात प्रमुख गोलंदाजांना विश्रांती मिळावी या उद्देशाने कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव या मूळच्या फलंदाजांनी गोलंदाजी केली. येत्या बुधवारी होत असलेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यासाठी प्रमुख गोलंदाज ताजेतवाने राहाणे भारतासाठी आवश्यक होते. सलग नऊ सामने जिंकून भारत उपान्त्य फेरीत दाखल झाला आहे. उपान्त्य फेरीत भारताची गाठ विश्वचषक स्पर्धेत नेहमीच धोकादायक मानल्या गेलेल्या न्यूझीलंड संघाशी आहे. गेल्या खेपेस इंग्लंडमध्ये झालेल्या स्पर्धेत याच संघाने भारताचा याच टप्प्यावर धक्कादायक पराभव केला होता. त्या कटू आठवणीची पुनरावृत्ती होऊ नये अशी असंख्य क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. पण त्या भारतीय संघाच्या तुलनेत विद्यमान भारतीय संघ अधिक तयारीत आहे, ही बाब नजरेआड करता येत नाही.
सलग नऊ विजय ही निव्वळ आकडेवारी नाही. यापूर्वी दिग्विजयी ऑस्ट्रेलियन संघाने २००३ आणि २००७ या स्पर्धामध्ये प्रत्येकी सलग ११ विजय मिळवले होते. त्या विक्रमाची बरोबरी करायची, तर भारताला विश्वविजेतेपदच पटकवावे लागेल. पण ऑस्ट्रेलियाच्या त्या विजयमालिकेपेक्षाही भारताने या स्पर्धेत आतापर्यंत मिळवलेले विजय अधिक एकतर्फी आहेत. त्याची कारणे अनेक आहेत. भारताची सिद्धता हे प्रमुख कारण आहे. सहा महिन्यांपूर्वी भारतीय संघाच्या क्षमतेविषयी प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यातील काही रास्त होते. परंतु प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर निवड समिती आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पूर्ण विश्वास ठेवला आणि संघनिवडीचे स्वातंत्र्यही दिले. राहुल-रोहित यांनीही प्रत्येक खेळाडूकडून नेमके काय हवे आहे याचा विचार करून संघबांधणी केली. जसप्रीत बुमरा, श्रेयस अय्यर, हार्दिक पंडय़ा यांना दुखापतींतून बरे होण्यासाठी पुरेसा वेळ दिला. त्यातून जो संघ उभा राहिला, तो फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, नेतृत्व अशा सगळय़ा आघाडय़ांवर सरस ठरत आला आहे. प्रथम गोलंदाजी केल्यास प्रतिस्पर्धी संघाला २०० ते २७० धावांमध्ये रोखून लक्ष्याचा पाठलाग करणे किंवा प्रथम फलंदाजी केल्यास ३००हून धावांच्या राशी रचत प्रतिस्पध्र्याना लवकरात लवकर गुंडाळून भारताने या स्पर्धेतली रंगतच संपुष्टात आणलेली दिसते. हार्दिक पंडय़ासारखा मोक्याचा खेळाडू ऐन स्पर्धेत जायबंदी होऊनही त्याचा फारसा परिणाम भारताच्या कामगिरीवर दिसून आला नाही, कारण सर्वच खेळाडूंकडे सामना जिंकून देण्याची क्षमता आहे.
टी-२० क्रिकेटच्या अतिरेकामुळे ५० षटकांचे अधिक दीर्घ मुदतीचे क्रिकेट खेळण्याची अनेक संघांची सवय सुटलेली दिसून येते. विद्यमान विश्वविजेते इंग्लंड आणि माजी विजेते पाकिस्तान, तसेच श्रीलंका यांच्या बाबतीत हे दिसून आले. पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलियन संघही सुरुवातीला चाचपडत होता. परंतु अफगाणिस्तानसारख्या जिगरबाज संघाने याही परिस्थितीत आपल्या खेळात ईप्सित बदल केलेच. भारतामध्ये आयपीएलच्या निमित्ताने टी-२० क्रिकेटचा अतिरेक होत असल्याचे बोलले जात असले, तरी येथील स्थानिक क्रिकेट अजूनही भक्कम असल्यामुळे एकदिवसीय क्रिकेट खेळणे आपल्यासाठी तितकेसे आव्हानात्मक ठरत नाही.
अर्थात मुंबईत बुधवारी होणाऱ्या उपान्त्य सामन्यात समोर असलेल्या न्यूझीलंड संघाने गेल्या चार बाद फेरीच्या सामन्यांमध्ये भारताला हरवून दाखवले आहे. क्रिकेटजगतात सर्वाधिक श्रीमंत आणि शक्तिमान असलेल्या भारतीय क्रिकेटला २०११ पासून विश्वविजेतेपदाने हुलकावणी दिलेली आहे. मोक्याच्या सामन्यात गळपटणारे किंवा ‘चोकर्स’ असा शिक्का बसू द्यायचा नसेल, तर साखळी टप्प्यातील उत्तम कामगिरीला विश्वविजेतेपदाचा साज चढवणे भारतीय क्रिकेटच्या प्रतिमासंवर्धनासाठी आवश्यक आहे. ‘श्रीमंत’ किंवा ‘शक्तिमान’ या बिरुदांपेक्षा ‘विश्वविजेते’ हे बिरुद केव्हाही चिरकालीन ठरते!