राजेश बोबडे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘बुवाबाजीतील अपप्रवृत्तींना जाणत्या बुवांनी तरी नेहमी फटकारले पाहिजे व समाजाला मोकळेपणाने वाव देऊन त्याच्या हिताकरिता पुढे आले पाहिजे. बुवांनी आपापल्या उद्योगधंद्यात, धर्म खंबीर करण्यात, शील प्राप्त करण्यात नि कर्तव्यतत्परतेत योगदान दिले पाहिजे. या बाबतीत कित्येक बुवांचे असे म्हणणे असते की ‘आम्ही आपला उद्धार करावा की उगीच लोक- लोक घेऊन बसावे?’ मी म्हणेन- जोपर्यंत तुम्हाला बुवापणाविषयी भरवसा नसेल, तुमचे व्रत साध्य झाले नसेल, इंद्रिये ताब्यात आली नसतील, तुम्ही मरणाविषयी निर्भय झाले नसाल, तोपर्यंत बुवापणाचा आव आणून उगीच लोकांची व स्वत:ची तरी फसवणूक का करावी?
संसार करून, कामधंदा करून उद्धार होत नाही असे कोण म्हणतो? माझा अनुभव असा आहे की, अनेकांनी आपले घरदार न सोडता, कामधंदे न सोडता आपल्या समाजाचा कलंक दूर केला आहे. मग हे विशेष भूषण कशाला? आपण म्हणाल की ‘अहो! घरादारात ही गोष्ट नाही घडून येत, म्हणून आम्ही हा आश्रम धरला आहे.’ ठीक आहे तो अभ्यास. पण बुवा म्हणविणारे लोक असा अभ्यास करण्यात किती गर्क असतात? धंदा म्हणून देवभक्ती करणे याच्या एवढा पतनाचा मार्ग कोणता? भक्ती ही जीवांच्या उद्धाराकरिताच असते. त्यापासून आपली सावकारीही वाढावी असा भाव देवभक्तीला जरा तरी शोभतो का? कितीतरी पैसा आहे या बुवांच्या संस्थानात! असेल तो, पण त्याचा उपयोग धड बुवासही नाही व सत्कृत्यांसही नाही. फक्त काय ते त्यांच्या जवळचे मजा मारणारेच त्याचे मालक! हा प्रकार समाजाला किती घातक आहे, याचा विचार आमच्या बुवालोकांनी नको का करावयास?’’
महाराज सचेत करताना म्हणतात, ‘‘माझ्या प्रिय हरिभक्तपरायण संत बुवांनो! तुमच्यात आज सामर्थ्य असेल नसेल तर त्याचा उपयोग आपल्या धर्माकरिता, जगाच्या दु:खद परिस्थितीचा उद्धार करण्याकरिता, लोकांच्या मनोभावना उज्ज्वल करण्याकरिता व मनुष्यपणाच्या दृष्टीने मनुष्यसमाज खंबीर करण्याकरिताच केला पाहिजे. आम्ही कितीही संस्थाने काढली तरी तेवढय़ानेच भागत नाही. लोकांत सामुदायिकत्व निर्माण करण्यासाठी पाऊल पुढे टाकले पाहिजे. लोकातील संप्रदाय व पंथभेद दूर करून त्यांना खऱ्या राजमार्गाचा व खऱ्या समाजसेवेचा मंत्र दिला पाहिजे. तो त्या पंथांतील बुवा म्हणून आम्हाला प्रिय नाही, असा ‘सवतीमत्सर’ बुवांत तरी असणे बरोबर नाही.’’
महाराज म्हणतात, ‘‘माझे स्पष्ट मत असे आहे की, अजूनही बुवा (सर्वच धर्मातील) अनेक घटमठाधिपती आणि निस्पृह धर्मप्रचारक आपल्या मनावर घेतील तर जगाचे कल्याण होण्यास अजिबात वेळच लागणार नाही. आज जो बुवांच्या नावावर, पंथावर व वेशावर अनेक लोकांनी दोष लावला आहे, तो सर्वानी आपले मार्ग उज्ज्वल करून आपल्या सत्कर्तव्याने साफ नाहीसा करावा. एवढीच माझी त्या बुवा म्हणविणाऱ्या, दृश्य व अदृश्य सज्जनांना नम्र प्रार्थना आहे.rajesh772@gmail.com