तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारतीय समाजमन नेहमीच गोंधळलेले राहिले. धोरणकर्ते एकीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा सल्ला देत होते आणि त्याच वेळी तंत्रज्ञानाचे गुलाम होण्याची भीतीही दाखवत होते. ही द्विधा अवस्था बराच काळ कायम राहिली आणि त्याचे पडसाद आजही उमटताना दिसतात. असे का झाले? बुद्धिमत्ता आणि संसाधने मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुरेशी प्रगती का करू शकला नाही? आपण नेमके कुठे कमी पडलो? अरुण मोहन सुकुमार यांचे ‘मिडनाइट्स मशीन्स’ हे पुस्तक या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा तटस्थ आणि प्रामाणिक प्रयत्न करते. स्वातंत्र्योत्तर काळात ज्या विविध क्षेत्रांत प्रगती सुरू झाली, त्यापैकी तंत्रज्ञान हे एक महत्त्वाचे क्षेत्र! मात्र त्याचा इतिहास स्वतंत्रपणे मांडला गेला नाही. स्वतंत्र भारतातील राज्यकर्त्यांचा तंत्रज्ञानविषयक दृष्टिकोन कसा होता, याचा लेखाजोखा ‘मिडनाइट्स मशीन्स’मध्ये मांडण्यात आला आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर धार्मिक संकल्पना, देशांतर्गत धोरणे, आंतरराष्ट्रीय राजकारण, राज्यकर्त्यांची मानसिकता इत्यादी घटकांचा परिणाम अपरिहार्यपणे होत राहिला. इतिहास, राजकारण आणि विज्ञानाच्या क्षेत्रातील घडामोडींचे परस्परावलंबित्व या पुस्तकातील विवेचनातून स्पष्ट होते. अतिशय रूक्ष वाटावेत असे हे विषय एखाद्या कादंबरीप्रमाणे रंजक पद्धतीने मांडण्यात आले आहेत. भारतीय नेहमीच तंत्रज्ञानातील प्रगतीकडे संशयाने पाहत आल्याचे वास्तव सुकुमार अधोरेखित करतात. प्रशासकीय कारभारात संगणकाचा शिरकाव झाला तेव्हा त्याविषयी विविध पातळय़ांवर उमटलेल्या प्रतिक्रिया, हे त्याचेच द्योतक होते. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील घडामोडींविषयीची अनेक ऐतिहासिक कागदपत्रे आणि वृत्तपत्रीय बातमीदारीचे संदर्भ पडताळून, त्यांचे विश्लेषण पुस्तकात करण्यात आले आहे. वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांना आपापली वेळ-काळाची, जागेची बंधने असतात. त्यापलीकडे जाऊन केलेल्या, सातत्यपूर्ण आणि सखोल अभ्यासातून तंत्रज्ञानाविषयीची भारतीयांची मानसिकता आणि त्यातून घडत गेलेला इतिहास ‘मिडनाइट्स मशीन्स’ मांडते. तंत्रज्ञानाला शत्रू मानणाऱ्या देशाची मानसिकता एकविसाव्या शतकात प्रवेश करेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर कशी बदलत गेली, याची गोष्ट हे पुस्तक सांगते.