राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, पूर्वी लोकांची धार्मिक संस्काराकडे स्वाभाविक प्रवृत्ती असे. हे खरे आहे; पण याला कारणेही आहेत. पूर्वी फार विवंचना नव्हती. मनुष्य आपले सरळमार्गी जीवन सुखाने रेटून भक्तीकडे आकर्षित होत होता. मनोरंजनाच्या नावाखाली भलभलत्या गोष्टींना प्रतिष्ठा नव्हती; त्यामुळे सरळ माणूस भजन-पुराणादी साधनातच रमून जात होता. काकडआरती होई, दिंडय़ा निघत, एक्के-सप्ताह चालत, कीर्तन-भजने होत. त्यात आबालवृद्ध भाग घेत आणि त्यांच्या मनावर तो संस्कार बिंबून जाई. वडील मंडळींनी हाती टाळ किंवा काकडा घेतला, तुळशीला प्रदक्षिणा घातली, तर लहान मुले त्यांचे अनुकरण करत. पण आजकाल ‘‘देवधर्म सांदी पडले सकळ। विषयी गोंधळ गाजतसे’’ असा प्रकार झाल्याने सुसंस्कारांचे कारखानेच जणू बंद पडले आहेत. ज्यांचे अनुकरण इतर करतात ते समाजाचे धुरीण, गावाचे वा देशाचे नेते, शासनाचे अधिकारी किंवा धार्मिक-राष्ट्रीय पुढारी यांची ओढ कुणीकडे आहे, हाही महत्त्वाचा प्रश्न ठरतो.

आज आपण पाहतो की, सुशिक्षित व सुधारलेले लोक बहुधा विज्ञानाच्या चमत्कारांनी दिपून गेले आहेत आणि त्यांचा देवाधर्मावरचा विश्वास आतून डळमळला आहे. साधुसंतांनी ती बाजू सावरावी तर ते आपल्यातच मस्त आहेत आणि त्यापैकी बरेचसे परिस्थितीने बावचळले आहेत. सामान्य जनतेला दररोजच्या जीवनात खऱ्यापेक्षा खोटय़ांनाच प्रतिष्ठा, न्याय, सुख, अधिकार आणि जीवनाची साधने अधिक मिळत असल्याचे दिसून येते. त्यामुळे तिच्याही विश्वासाला तडे गेले आहेत. जीवनमूल्यांची प्रतिष्ठा वाढविणे आणि समाजाच्या हृदयात सात्त्विक श्रद्धा बळकट करणे हे राज्याच्या हिताचे असते; पण तिकडे शासनकर्त्यांचे लक्ष दिसत नाही. आपले राज्य निधर्मी आहे. याचा अर्थ बहुधा त्यांनी असा केलेला दिसतो की ‘धर्म म्हणजे थोतांड, अवडंबर!’ वास्तविक आपली राज्यघटना एवढेच म्हणते की शासनाने कोणत्याही धर्माचा पक्ष घेऊ नये, कोणत्याही धर्मात हस्तक्षेप करू नये. परंतु याचा विपरीत अर्थ करून चांगल्या धार्मिक गोष्टींचीही गळचेपी केली जात आहे. देशकाल परिस्थितीप्रमाणे धर्मातील कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावे, याचा तारतम्य विचार शासनाने करावा. परंतु मानवी धर्ममूल्यांची अवहेलना होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण ‘यथा राजा तथा प्रजा’ हे सूत्र सत्य आहे. परंतु भलत्याच संस्कारांचे लोण सरसकट या पिढीत नि शासनात पसरले आहे. हे सारे पाहिले म्हणजे, या देशाचे तारू पुढे कुणीकडे जाणार याची तीव्र चिंता वाटू लागते! ज्यांना हे कळते, ज्यांना सात्त्विकतेची नि जीवनमूल्यांची चाड आहे, त्यांनी व्यक्तिश: व आपल्या समविचारी लोकांची संघटना करूनदेखील हरप्रकारे चांगल्या गोष्टींना चालना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समाजाचे सोडा, पण निदान आपल्या मुलाबाळांचे तरी शाश्वत कल्याण व्हावे म्हणून सुसंस्कार देत राहिले पाहिजे. जीवनास आवश्यक साधनसामुग्री प्रामाणिकपणे मिळवीत राहूनच हे सारे नेटाने केले पाहिजे; त्याशिवाय तरणोपाय नाही!

Who Ask Question to Sharad Pawar?
“अजित पवारांच्या लग्नाला ३९ वर्षे होऊनही सून बाहेरची?”, शरद पवारांना कुणी विचारला प्रश्न?
bharat gogawale, sunil Tatkare
रायगडमध्ये तटकरे – गोगावले यांच्यात दिलजमाई
avimukteshwaranand saraswati
VIDEO : “गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देऊ”, नववर्षानिमित्त शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी व्यक्त केला संकल्प!
Baba Jumdev
विश्लेषण : विदर्भात एका ‘बाबां’बद्दल दुसऱ्या ‘बाबां’चे वादग्रस्त वक्तव्य… अनुयायांत संताप आणि भाजपला ताप!

राजेश बोबडे