राजेश बोबडे

विश्वकल्याणाची पुढची जबाबदारी साधुसंतांवर सोडून ११ ऑक्टोबर १९६८ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरू संत आडकोजी महाराजांच्या तसबिरीकडे कटाक्ष टाकून लौकिक जगाचा निरोप घेतला. महाराजांनी अवतारकार्याच्या अंतिम संकल्पनेतून गुरुकुंजात ‘विश्वमानव मंदिर’ निर्माण केले. येथे जगातील सर्व धर्मपंथांच्या वैश्विक अभ्यासाकरिता आगळेवेगळे केंद्र, जागतिक ग्रंथालय निर्माण करून देशविदेशातील मानवतेच्या हजारो अभ्यासकांना, विश्वमानव मंदिराकडे येताना, तेथील सर्वधर्मीय ग्रंथसंपदेचे विश्वचितंन करताना, तुकडोजी महाराजांना पाहायचे होते. सेवा मंडळाचे तत्त्वज्ञान विश्वात पोहचविण्यासाठी त्यांना येथे अभ्यासक घडवायचे होते.

हेही वाचा >>> चिंतनधारा : मृत्यूचे दु:ख अज्ञानमूलक

महाराज म्हणत, शिष्यपंरपरा ही आंधळया अनुकरणप्रियतेने रूढीच पाळत राहते. त्यामुळे साधने हीच बंधने बनू लागतात व विनाश पदरी येतो. आज व्यक्तीचीच नव्हे तर पंथांची व धर्माची हीच दशा झाली आहे. हे सर्व टाळण्यासाठी गुरुकुंजातील या विश्वमानव मंदिरातून हजारो तत्त्वचिंतक, अभ्यासक त्यांना निर्माण करायचे होते.  म्हणूनच त्यांचे दिव्यदर्शन घ्यायचे झाल्यास ते त्यांच्या विराट साहित्य संपदेतून घेता येईल. महाराज म्हणतात, ‘‘येणाऱ्या काळात श्रीगुरुदेव सेवा मंडळ विश्वाच्या उंच अधिष्ठानावर विराजमान होईल, सेवा मंडळाच्या तत्त्वज्ञान व ध्येयात परिवर्तन आणू पाहाणारे विद्यावान वेळावेळी प्रगट होतील’’. ‘गुरुदेव सेवा मंडल की शिक्षा और दीक्षा एक दिन सारा जगत् पायेगा’ हे दृढनिश्चियी विधान त्यांना गुरुकुंजातील विश्वमानव मंदिरातून साकारावयाचे होते. महाराज म्हणतात, ‘‘आजपर्यंत वेगवगेळया विधानांच्या रूपाने मी माझ्या हृदयातील भावना आपणांसमोर प्रगट केल्या, त्यावर आपण विचार करून जनसेवेचे हे कार्य हाती घेतले तर संतांची उज्ज्वल पंरपरा कायम ठेवल्याचे भाग्य आपणास निश्चित लाभेल. मी एवढे कार्य करून जात आहे, परंतु पूर्वीचे दिवस भारतात येणार नाहीतच हे सांगता येत नाही’’- हे द्रष्टव्य काव्यात अधोरेखित करून, आवाहन करताना ते म्हणतात:

प्रार्थितो संत साधूंना, शक्ति द्या-बुद्धि द्या लोकां।

जाहला देश दुर्बल हा, लाज राखा न घ्या शंका।।

अजवरि संतसाधूंनी, जगविला देश बोधूनी।

पुन्हा ती वेळ दिसताहे, समजुनी साथ द्या रंका ।

बिघडले ब्रीद जनतेचे, चरित्रे नासली सारी।

मंत्र द्या राष्ट्रधर्माचा, शुरत्वे टाळण्या धोका।

बहु दिवसांचि ही रुजली, विषमता पंथ जातियता।

करा नवनिर्मिती जमुनी, वाजवा भारती डंका।

म्हणे तुकडया अभय वर द्या, दिनांची  हाक ही ऐका।।

.. ही हाक ऐकली जाणे, हीच ‘लोकसत्ता’च्या सहकार्याने वर्षभर सुरू राहिलेल्या या सदराची फलश्रुती ठरेल!

(समाप्त)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rajesh772@gmail.com