राजेश बोबडे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे केवळ प्राथमिक शिक्षण झाले असले तरी त्यांनी ग्रामगीता व पाच हजार प्रकारच्या गद्य व पद्य रचना करून विपुल साहित्यसंपदेची  निर्मिती करून खंजेरी भजनातून देशात क्रांतीची मशाल पेटविली. साक्षरता व शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना महाराज म्हणतात, ‘‘समाज-शिक्षण हे मानवसमाजाला उन्नतीच्या उंच शिखरावर नेणारे प्रथम साधन आहे. अशिक्षित खेडुतांमध्ये मनुष्यत्व निर्माण करून त्यांचा राष्ट्राशी घनिष्ट संबंध जोडणारा व भावी भारतवर्षांची उज्ज्वल निर्मिती करणारा; हाच आजच्या काळचा खरा धर्म आहे. मागासलेल्या जनतेला दृष्टी देऊन स्वाभिमानाने व स्वावलंबनाने जगण्याचा मंत्र जर आपण आता शिकवणार नाही तर परिणाम अत्यंत वाईट होईल; भारताच्या कानाकोपऱ्यांत ही लाट पसरून प्रत्येक अशिक्षित नागरिक शिक्षणाच्या जाणिवेने पूर्णपणे भारला गेला पाहिजे. यासाठी राष्ट्रातील सर्व संस्थांनी एकमताने एका महान यज्ञाप्रमाणे कार्य उचलून धरले पाहिजे.  साक्षरता प्रसार हा समाज शिक्षणाचा पाया आहे.’’

‘‘आपल्या देशातील अनेक लोक अजूनही  निरक्षर आहेत. यामुळे हा देश कलाकौशल्यांच्या व शोधसुधारणांच्या बाबतीत मागे पडला आहे. निर्वाहाचा मुख्य धंदा शेती असून त्यातदेखील दरवर्षी तूटच येत आहे. जातीयतेने, बुवालोकांनी व पोथ्यापुराणांनी या देशाचे नुकसान केले आहे. कलावंत, व्यापाऱ्यांनी आमच्या जीवावर मजा मारावी व आम्ही मात्र टाळ कुटतच बसावे, असा जणू संकेतच आहे. देशाचा हा सारा कलंक धुऊन निघावा व भारताचा प्रत्येक घटक सुसंस्कृत, स्वावलंबी आणि सुखी व्हावा यासाठी समाज शिक्षणासारखा उपाय नाही.’’

‘‘डोळे असून जर वस्तूंचे ज्ञान नसेल तर तो आंधळाच ना? तसेच सर्वाग सुंदर असूनही जर त्याला अक्षरज्ञान नसेल, तर आजच्या जगात तरी त्याला काय महत्त्व आहे? तो प्रत्येक ठिकाणी परावलंबी, पांगळा आणि पराधीनच राहील हे उघड आहे! आज देशातील एक माणूस देखील ‘अंगठाछाप’ असणे सर्वाना लाजिरवाणे आहे. राष्ट्राचा हा कमकुवत घटक म्हणजे राष्ट्राच्या जीवितालाच धोका आहे, हे विसरू नये. देशात जेवढे पुरुषांना तेवढेच महिलांनाही साक्षर होणे जरुरीचे आहे. पुरुष आणि स्त्री ही देशाच्या रथाची दोन चक्रे आहेत. देशाचे हे दोन्ही घटक उन्नत झाले तर आपल्या भाग्याला काहीच उणीव राहणार नाही. विद्येसारखी पवित्र संजीवनी नाही, असे भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवले आहे. आपल्या हीनदीन व मृतवत झालेल्या राष्ट्राला नवजीवन मिळून त्यात नंदनवन फुलावे, असे वाटत असेल तर त्यासाठी राष्ट्रातील प्रत्येक घटकाला ज्ञानवानच केले पाहिजे.’’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘देशात पोथ्या वाचणाऱ्यांची आजही काही उणीव नाही; परंतु पोथी ऐकणारे उभ्या जन्मात कधी वाचक होतील व वाचणारे कधी त्यातील तत्त्वे घेऊन आपले जीवन उजळतील  असे वाटत नाही. ही स्थिती आता आम्ही नष्ट न केली तर परिस्थिती आम्हालाच नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. भारतातील प्रौढांचे विशेषत: अशिक्षित प्रौढ स्त्री-पुरुषांचे मानसशास्त्र लक्षात घेता. त्यांना (प्राथमिक शाळेतील वाक्य पद्धती व शब्द पद्धतीपेक्षा) चांगल्या धार्मिक गीतांच्या व भजनांच्या माध्यमातून साक्षर करणे व समाजशिक्षण देणे हे अधिक आकर्षक व परिणामकारक ठरेल.’’