सुधा आणि नारायण मूर्ती यांची विवाह-कथा एव्हाना बऱ्याच जणांना माहीत असेल.मूळच्या सुधा कुळकर्णी या ‘टेल्को’तल्या पहिल्या महिला इंजिनीअर. एकदा सर्व सहकाऱ्यांसह सुधा यांनाही नारायण मूर्तीनी डिनरला बोलावलं- एकटी मुलगी म्हणून त्या ‘नाही’ म्हणत असताना नारायण यांनी त्यांना समजावलं, त्यातून नारायण यांचे समानतावादी विचार सुधा यांच्यापर्यंत पोहोचले आणि आधी डिनरला, मग लग्नालाही त्या ‘हो’ म्हणाल्या.. ‘इन्फोसिस’ स्थापण्यासाठी नारायण मूर्तीनी नोकरी सोडल्यावर सुधा यांनी नोकरी सांभाळून मुलांना वाढवलं.. वगैरे!

हेही वाचा >>> चाहूल: प्रशासकीय सेवेभोवतीचे वलय भेदणारी पुस्तके..

पण हीच सर्वज्ञात गोष्ट आता कथा-कादंबरीकार म्हणून अमेरिकेत आणि भारतात गाजलेल्या चित्रा बॅनर्जी दिवाकरूनी लिहिताहेत. त्यातही मूर्तीच्या संसारकथेचा सुरुवातीचाच भाग असल्यानं ‘मुलीचं लग्न कुठं झालं? किती खर्च आला?’ वगैरे यात नाही! ‘अ‍ॅन अनकॉमन लव्ह’ या नावानं ते पुस्तक म्हणे २६ डिसेंबरला येतंय (कदाचित त्याआधीच ते दुकानांत दिसेल- कारण प्रती छापून तयार आहेतच). दिवाकरूनी यांची द्रौपदीच्या नजरेतून महाभारत सांगणारी ‘पॅलेस ऑफ इल्यूजन्स’ ही कादंबरी जितकी गाजली, तितकी अन्य १७ पुस्तकं गाजली नाहीत, त्यामुळे १९९६ सालात ‘अ‍ॅरेन्ज्ड मॅरेज’ हा कथासंग्रह त्यांनी लिहिला होता हे आता कुणाला चटकन आठवणारही नाही. पण २७ वर्षांपूर्वीच्या ‘अ‍ॅरेन्ज्ड मॅरेज’पासून आता ‘अनकॉमन लव्ह’पर्यंत दिवाकरूनी यांचा प्रवास झाला, तो कसा असेल, याचं कुतूहलच कदाचित या पुस्तकाकडे नेऊ शकेल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.