योगेन्द्र यादव

अपेक्षा त्याच आहेत, पण दूर राहून टीका करण्यापेक्षा उपक्रमातला सहभाग महत्त्वाचा आहे..

‘काँग्रेसने मरण पत्करावे’ असे तुम्हीच म्हणाला होतात ना? मग तुम्ही आता इथे या ‘भारत जोडो यात्रे’त कसे? या स्वरूपाचे प्रश्न गेल्या तीन आठवडय़ांत मला वारंवार विचारले गेले. टीकाकार उत्तराची वाट न पाहाताच खूश असतील, पण हा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांचाही आविर्भाव असा दिसतो की एवढय़ा बिनतोड प्रश्नावर उत्तर टाळलेच जाणार! हा प्रश्न काही निरुत्तर करणारा नाही, तो कठीणही नाही आणि यात माझे मत बदलले, मी ‘घूमजाव’ केले, असेही काहीही झालेले नाही.

पण बहुतेक ‘विश्लेषकां’ना मी तेव्हा (२०१९) काय म्हणालो होतो, तेव्हा काय लिहिले होते आणि आता काय म्हणतो आहे याकडे लक्षच द्यायचे नसते. त्यांना फक्त ‘काँग्रेसने मरण पत्करावे’ (काँग्रेस मस्ट डाय) हे माझे तीन शब्दच आठवतात आणि हल्ली ‘भारत जोडो यात्रे’च्या फोटोंमध्ये मी राहुल गांधी यांच्यासह दिसतो आहे याकडेच त्यांचे लक्ष असते. त्यामुळेच इथे स्वत:बद्दल खुलासेवार लिहितो आहे.

‘तेव्हा’ आणि ‘आता’ मध्ये मी बदललो की नाही, हे ठरवण्यासाठी आधी ‘तेव्हा’ मी काय म्हणालो हे पाहू. ‘काँग्रेसने मरण पत्करावे’ हे तीन शब्द, १९ मे २०१९ या दिवशी मी जे ४१ शब्दांचे एक ट्वीट केले, त्याच्या सुरुवातीला होते. ते संपूर्ण ट्वीट ‘‘काँग्रेसने मरण पत्करावे. भारताची संकल्पना वाचवण्यासाठी भाजपला निवडणुकीत रोखण्याचे काम काँग्रेसकडून होऊ शकत नसेल, तर भारतीय इतिहासातील या पक्षाचे कार्यही संपले आहे असेच म्हणावे लागेल. उलटपक्षी आज, पर्यायांच्या उभारणीतला सर्वात मोठा अडथळा म्हणून त्या पक्षाकडे (काँग्रेसकडे) बोट दाखवावे लागेल.’’

यानंतर दोनच दिवसांनी, २२ मे २०१९ रोजी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’मध्ये १,१२३ शब्दांचा लेख लिहून मी, काँग्रेसबद्दल ‘मरण’ वगैरे शब्दकळा का वापरली, याबद्दल म्हटले होते- ‘‘काँग्रेसला असूनही नसल्यासारखे मानून काही पर्यायी राजकारण पुढे जाणार नाही.. या अनुषंगाने काँग्रेसने मरण पत्करण्याची भाषा मी केली.’’ अविचारीपणे, ‘सवय’ म्हणून काँग्रेसला विरोध करणाऱ्यांपैकी मी नव्हे, हे मी त्या लेखातही स्पष्ट केले होते आणि ‘‘‘बिगर-काँग्रेसवाद’ हा एका विशिष्ट काळापुरती व्यूहनीती म्हणून ठीक असला तरी त्याचे रूपांतर राजकीय विचारधारेत करता येत नाही’’ असेही नमूद केलेले होते. काँग्रेसच्या नेतृत्वावर व्यक्तिगत टीका करणे मी तेव्हाही टाळलेलेच होते, उलट, ‘‘राहुल गांधी हे मी आजवर पाहिलेल्या अनेक राजकीय नेत्यांपेक्षा प्रामाणिक आणि बहुतेकांना वाटते त्यापेक्षा किती तरी बुद्धिमान आहेत’’ – असेही मी त्या लेखात म्हटले होते.

त्या लेखाद्वारे मी मांडलेल्या मतांचे सार पुढील वाक्यांमधून दिसून येते : ‘‘लोकशाही आणि बहुविधता या आपल्या सांविधानिक मूल्यांपुढील धोका नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या उदयामुळे स्पष्ट होतो आहे.. ..प्रजासत्ताकावर अशा वेळी होऊ शकणारे वार थोपवण्यासाठी पुढे होण्याची पहिली जबाबदारी प्रमुख, राष्ट्रव्यापी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसवरच येते.. ही इतिहासदत्त जबाबदारी काँग्रेसने ओळखल्याचे गेल्या पाच वर्षांत (तेव्हा २०१४-१९) दिसते आहे का? किंवा नजीकच्या भविष्यात ही जबाबदारी पार पाडण्यासाठी (काँग्रेसवर) भरवसा ठेवता येईल का? माझे उत्तर स्पष्टपणे ‘नाही’ असे आहे. काँग्रेस पक्ष आज कर्तव्यच्युत झालेलाच दिसतो आहे आणि हे कर्तव्य पार पाडू इच्छिणाऱ्यांसाठी तो (काँग्रेस पक्ष) अडथळा ठरतो आहे.’’

थोडक्यात, काँग्रेसवरची माझी टीका ही एका पायाभूत अपेक्षेमुळे आलेली होती. भाजपला रोखून भारताची संकल्पना वाचवण्याचे काम काँग्रेसने केले पाहिजे, ही ती पायाभूत अपेक्षा होती. तीच पायाभूत अपेक्षा आजही मी करतो आहे, म्हणून तर ‘भारत जोडो यात्रे’ला पाठिंबा देतो आहे. कार्यकर्ते आणि अभ्यासक अशा आम्ही २०० जणांनी स्वाक्षऱ्यांनिशी ज्या लेखी निवेदनाद्वारे भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला, त्यातदेखील सांविधानिक मूल्यांपुढे असलेला धोका आणि शांततामय-लोकशाही मार्गाने प्रतिरोध उभारण्याची गरज हे मुद्दे आहेत. या निवेदनात आम्ही स्पष्टपणे असे म्हणतो की, ‘‘या ‘भारत जोडो यात्रे’ला पाठिंबा देणे ही आमची एक वेळची कृती आहे. ती करताना आम्ही कुणा एका पक्षाशी अथवा नेत्याशी बांधून घेत नसून, उलट पक्षीय भेदांच्या पलीकडे जाऊन आपल्या घटनात्मक प्रजासत्ताकाचे रक्षण करण्यासाठी सार्थ आणि प्रभावी पुढाकाराची पाठराखण करीत आहोत.’’

तरीही काहीतरी बदलले, ते काय?

तेव्हाही मी काँग्रेसकडे अपेक्षेने पाहात होतो, आताही पाहतो आहे, कारण राष्ट्रव्यापी ठरणारा काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधी पक्ष आजही आहे. त्या वेळी काँग्रेसबद्दलचा माझा सूर हा काँग्रेसच्या अपयशातून काहीएक रोगनिदान करण्याचा आणि हा रोग कुठवर पसरेल याचा अंदाज घेण्याचा होता. त्यामुळे, जर काँग्रेसने इतिहासदत्त जबाबदारी ओळखली नाही तर हा पक्ष म्हणजे इतरांच्या मार्गातील अडथळा ठरेल असा निर्वाळा मी दिला. मग तेव्हापासून कोण बदलले? काँग्रेस, की मी?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीची संधी भाजपला विरोध करणाऱ्या सर्वानीच घालवली हे खरे, पण काँग्रेस हा मोठा विरोधी पक्ष म्हणून त्याच्यावर त्या पराभवाचीही जबाबदारी अधिक. हे माझे मत आजदेखील कायम आहे. मते कायम असल्यास पश्चात्ताप वगैरेचा प्रश्नच येत नाही. त्यामुळेच, भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सहभाग आणि त्या आंदोलनाचे रूपांतर राजकीय पक्षात करण्याचा निर्णय, याबद्दलही मी कधी पस्तावत नाही (पस्तावा होतो तो, हा पक्ष काही जणांच्या दावणीला बांधला गेला, याचा).

मग काय काँग्रेस पक्ष बदलला का? याचे प्रामाणिक उत्तर, ‘मला माहीत नाही’ असेच आहे. पण बदल झाला का , असल्यास कसा, नसल्यास का नाही, हे शोधण्याचा प्रयत्न अन्य अनेकांप्रमाणेच मीदेखील करतो आहे. हे उत्तर मला फक्त काँग्रेसच्या नेत्यांकडून किंवा इथे या यात्रेत सहभागी झालेल्यांकडून नाही मिळणार, ते लोकांकडूनही मिळायला हवे.

धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, आर्थिक विषमता यांबद्दल राहुल गांधी स्पष्टपणे बोलत असल्याचे मी पाहिले आहेच पण काँग्रेसने अन्य पक्ष, संघटना, चळवळी यांनाही यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले ही गोष्ट, भाजपशी वैचारिक व राजकीय संघर्ष करण्याचा  काँग्रेसचा इरादा स्पष्ट करणारी आहे. पण तरीही प्रश्न उरतोच, तो हा की, काँग्रेस हे करू शकेल का? – हा सध्या यक्षप्रश्नच आहे. त्याचे ठाम उत्तर देता येत नाही.

गेल्या तीन वर्षांत भारत मात्र बदलला आहे, एवढे नक्की.

मे २०१९ मध्ये होती, त्याहीपेक्षा लोकशाही मूल्यांची घसरण आज झालेली आहे. आपली राज्यघटना तसेच स्वातंत्र्यलढय़ाचा आणि त्याहीआधीच्या सभ्यतेचा वारसा यांनी दिलेली मूल्ये दिवसेंदिवस तुडवली जाऊ लागली आहेत. इतिहासाच्या अशा टप्प्यावर, आग विझवू पाहणाऱ्या प्रत्येकाला प्रसंगी मतभेदाचे मुद्दे विसरून साथ द्यायची असते. केन्सनंतर अर्थशास्त्रावर प्रभाव पाडणारे ‘नोबेल’ मानकरी अर्थतत्त्वज्ञ पॉल सॅम्युअलसन यांच्या शब्दांत सांगायचे तर ‘‘परिस्थितीच बदलली, तर तिच्याविषयीचे माझे आकलनही मी बदलतो.. तुम्ही काय करता?’’

तीन वर्षांपूर्वी मी लिहिलेल्या लेखाच्या अखेरीस, ‘‘काँग्रेसच्या आत अथवा बाहेर असणारी ऊर्जा नव्या पर्यायात विलीन व्हावी’’ अशी इच्छा मी व्यक्त केली होती. न बदलता आणि काहीच न करता पराभूत होत राहणारा काँग्रेस पक्ष ही अशा पर्यायाच्या मार्गातील धोंड ठरेल, असे माझे म्हणणे होते. परंतु सुहास पळशीकरांसारख्या विद्वानाचा यावर प्रतिवाद असा की, ‘‘पुरोगामी वा परिवर्तनवादी आकांक्षा कितीही शुद्ध असल्या तरी नजीकच्या भविष्यकाळातील निवडणूक – शर्यतीचा तसेच जनमताला आकार देण्याचा खेळ हा ज्यांना ‘ना अति डावीकडले ना अति उजवीकडले’ म्हणता येईल अशा मध्यममार्गी शक्यतांच्या परिघातच खेळला जाणार आहे. आज तरी भाजपनेच हा अवकाश प्रामुख्याने काबीज केला असून आम्हीच मध्यममार्गी आहोत असा त्यांचा दावा आहे. यापेक्षा निराळय़ा पद्धतीने मध्यममार्गी असल्याचा दावा करण्याच्या शक्यता काँग्रेसमध्ये आहेत.’’ (पळशीकर : लोकसत्ता- २३ मे २०१९) . गेल्या काही महिन्यांत, पर्यायी आघाडीत काँग्रेसचा समावेश हवाच असल्याचे अन्य अनेक पक्षांच्या नेत्यांनी दिलेले संकेत, हाही बदललेल्या परिस्थितीचा पुरावा आहे.

लेखक ‘जय किसान आंदोलन’ आणि ‘स्वराज इंडिया’चे संस्थापक आहेत.