काही थोडे वेदाध्ययन झाल्यावर मी तेरा-चौदा वर्षांचा असताना कांगडी येथील आर्यसमाजाच्या गुरुकुलात पुढील संस्कृत विद्योच्या अध्ययनाला जावे, असे मला वाटू लागले. माझ्या वडिलांनी मला गुरुकुलात पाठविण्याची तयारी दाखविली. मी ज्या खेडेगावात राहत होतो, तेथे वन विभागाचे एक अधिकारी राहिले होते. योगाभ्यासाकडे त्यांचा कल होता. ते माझे गुरू केवलानंद सरस्वती यांचे मित्र होते. त्यांनी माझ्या वडिलांना सुचविले की, आधी काही वर्षे महाराष्ट्रातच वाई येथे असलेल्या प्राज्ञपाठशाळेत मी शिक्षण घ्यावे व अधिक शिक्षणार्थ प्रौढ वयात कांगडी येथे जावे, ही सूचना माझ्या वडिलांना व मला पसंत पडली.
मी रेल्वेने पुणे मार्गे पुणे-बेंगळूरु रेल्वे मार्गावरील वाठार स्टेशनपर्यंत पहाटे येऊन पोहोचलो व तेथून २० मैल बैलगाडीने वाईस आलो. कृष्णा नदीवर ११-१२च्या सुमारास प्रथम स्नान केले. लांब रेल्वे प्रवासाचा शीण या शीतोदकाच्या स्नानाने बराचसा गेला. कृष्णा स्नानानंतर संध्यावंदनादी धार्मिक कर्मकांड उरकून मी गुरुदर्शन घेतले.
गुरुमूर्ती प्रसन्न, तेजस्वी, उंच, गौरकाय व आरोग्यसंपन्न अशी दिसली. गुरूंचे गांभीर्य कळण्याइतके ते वय नव्हते. गुरूंचा वेश अगदी साधा म्हणजे दोन स्वच्छ धूत वस्त्रे, एक खांद्यावर आणि दुसरे कंबरेला अशी होती. कृष्णेच्या काठावर गंगापुरीच्या घाटावर असलेल्या तीन खणी लहानशा घरकुलात गुरू बसले होते. दर्भासन, हरिणाजिन व त्यावर एक ऊर्णावस्त्र अशा आसनावर गुरूंची मूर्ती विराजमान झाली होती. त्या खोलीत साध्या लाकडी घडवंचीवर वेदवेदांगे व षड्दर्शन यांच्या पोथ्या व बांधलेली पुस्तके नीट रचून ठेवलेली होती.
गुरूंच्या आसनासमोर लहानशी बैठी लाकडी तिवई होती. त्यावर लेखन सामग्री व अध्ययन-अध्यापनाची पाच-दहा पुस्तके व पोथ्या एकावर एक ठेवलेल्या होत्या. त्या तीन खणी खोलीत बारीकसे अंथरूण-पांघरूण, दांडीवर धोतर-उपरणे, दोन पाट, दोन-तीन आसने, एक लहानशी तांब्याची घागर, एक गडवा, दोन फुलपात्रे, एक पातेले व एक ताट-वाटी एवढीच सामग्री होती. पन्नास वर्षे गुरू त्या खोलीत राहिले होते; परंतु या त्यांच्या उपकरणांमध्ये वाढ वा घट केव्हाही झाली नाही. फक्त वस्त्रांचा रंग तेवढा बदलला, शुभ्र होती ती भगवी झाली.
आचार्यांचे हे असे दर्शन झाल्यावर मी त्यांच्या संमतीने दुसऱ्या दिवशी त्यांच्या राहत्या घरकुलाजवळच्या विद्यार्थी वसतिगृहात येऊन राहिलो. माझे संस्कृत अध्ययन सुरू झाले. अगदी प्राथमिकपासून तयारी करावी लागली. प्राथमिक किंवा प्रवेश शिक्षणाच्या माझ्या वर्गात दहा-बारा सहाध्यायी होते. गुरूंचे अध्यापनकार्य प्रति दिन आठ तास चाले. त्यात प्राथमिक शिक्षणापासून उच्च पांडित्याच्या शिक्षणापर्यंतचे ते पाठ घेत असत. मी एका वर्षात रूपावली समासचक्रापासून महाकाव्यातील महत्त्वाचे सर्ग संपविण्यापर्यंत मजल मारली.
अर्थात या वेगामध्ये माझ्याबरोबर इतर एक किंवा दोघे जण टिकले, बाकीचे मागे पडले. गुरूंच्या जवळ प्रस्थानत्रयी, सिद्धांतकौमुदी व तर्कशास्त्र यांचेही अध्ययन करणारे प्रौढ विद्यार्थी या वेळी होते. कै. दिनकरशास्त्री कानडे, विनोबा भावे व त्यांचे सहाध्यायी शांकरवेदांताची प्रस्थानत्रयी शिकत होते. महादेवशास्त्री दिवेकर पाणिनी सूत्रावरील काशिकावृत्ती पढवीत होते. आम्ही सर्व लहान व प्रौढ विद्यार्थी शेजारी-शेजारी मठात राहत होतो.
श्री केवलानंद सरस्वती यांची विद्यार्थ्यांवर निरंतर देखरेख असायची. विद्यार्थ्यांची विद्या व त्यांचे चारित्र्य या दोन्ही गोष्टींचे तुल्य महत्त्व जाणून विद्योइतकेच चारित्र्याचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे म्हणून विद्यार्थ्यांच्या उठल्यापासून निजेपर्यंतच्या सर्व वर्तनावर त्यांचे लक्ष असे. स्वत:च्या आचरणाने स्वावलंबनाचे धडे देत. आजारी पडलेल्या विद्यार्थ्याची ते माता-पित्याप्रमाणे सर्वप्रकारची शुश्रूषा ममतेने करीत. आजाऱ्याच्या मल-मूत्र विसर्जनापासून अंथरूण घालणे, कपडे धुणे, दीर्घ आजारात दिवसपाळी व रात्रपाळी करून सेवा करणे, वेळच्या वेळी औषध देणे, खाण्या-पिण्याची काळजी घेणे, इत्यादी गोष्टी ते स्वत: करीत व इतरांनी स्वेच्छेने कराव्यात असे प्रयत्न करीत. झाडणे, सारवणे, कपडे धुणे, भांडी घासणे, स्वयंपाक करणे, शौचकूप साफ करणे, इत्यादी सर्व कामे ते स्वत: करीत आणि करवून घेत.