‘आपले आपण; आतल्या आत’ हा अग्रलेख वाचला (१३ ऑक्टोबर). नव्वदच्या दशकात मुक्त व्यापार व जागतिकीकरण यांचे फायदे कसे सर्वांनाच होतात याचा डंका पिटत त्याची जगभर लाट आणली होती. ते वारे आपणही शिडात भरून घेतले कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. तत्कालीन सोव्हिएट युनियनही ‘ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोईका’ या मुक्तपणाच्या वावटळीत तेव्हा अस्ताव्यस्त झाला. ती लाट जिने आणली होती तीच महासत्ता आता दुसऱ्या टोकाची- म्हणजे सारी दारे खिडक्या बंद करून घेण्याची- भूमिका मांडत आहे व आपणही आत्मनिर्भरतेचा नारा दिला आहे!
अर्थव्यवस्थेला ‘लॉक-डाऊन’सारखे घरात बंदिस्त करून ठेवणे आता कोणालाही शक्य नाही. आयात निर्यात आणि त्यावरचे वाढते अवलंबित्व टाळता येण्यासारखे नसले तरी आयात कसली करावी लागते आणि निर्यात कसली करणे जमते हे कळीचे प्रश्न आहेत. अस्थिर जगातील बदलत्या आंतरराष्ट्रीय संबंधांत युद्धसदृश परिस्थिती उद्भवलीच तर आपली नाकेबंदी होऊ शकते का हाच मुद्दा महत्त्वाचा ठरतो. चीनमधून भलेही दैनंदिन वापराच्या साध्यासुध्या स्वस्त वस्तू जगभर निर्यात होत असतील, परंतु ‘रेअर अर्थ’सारखी खनिजे हा हुकमी एक्कासुद्धा तो देश बाळगून आहे. आपली निर्यात प्रामुख्याने चामडे, कापूस, कपडे, दागिने, मनुष्यबळ व त्यावर आधारित सेवा अशा स्वरूपाची आहे. त्याच वेळी आपली आयात मात्र खनिज तेल वा युरेनियमसारखे इंधन, संगणकातील चिप्स, आधुनिक शस्त्रास्त्रे अशी आहे. हुकमी एक्का म्हणावे असे आपल्या हाती फारसे काही नाही. आत्मनिर्भरता महत्त्वाची असली तरी त्याहीपेक्षा ही परिस्थिती कशी बदलेल हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे असे वाटते.
● प्रसाद दीक्षित, ठाणे
देशांतर्गत व जागतिक स्पर्धात्मकता हवीच
‘आपले आपण; आतल्या आत!’ हे संपादकीय वाचले. उद्याोगांना चालना देण्यासाठी, जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी लहानसहान कायद्यांचा फौजदारी बडगा उचलण्याआधी, नागरिक वाहतूक नियम मोडण्यास का प्रवृत्त होतात, हे समजून घ्यावे लागेल. पायाभूत सुविधांच्या हक्कांसाठी भ्रष्ट लाल फितीचा कारभार, मनुष्यबळाचा अभाव, अरेरावी या अडचणी लक्षात घ्याव्या लागतील. पुढचा आयात निर्यात व्यापार मुद्दाही महत्त्वाचा. त्यात आशियाई शेजारी राष्ट्रांशी आपल्या उत्पादनांची तुलना जागतिक पातळीवर कशी होते याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. देशातील विविध राज्यांच्या उत्पादकतावाढीचा तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे. दुर्दैवाने पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ यांच्या अंतर्गत बंडाळ्या आणि भारताशी आंधळे धार्मिक युद्ध यामुळे आपणच आपल्या जागतिक स्तरावरील व्यापार-उदिमात कमी पडत जाऊ यांची फिकीर या देशांना दिसत नाही. या नजीकच्या परिसरातील व नजीकच्या भविष्यातील बेभरवशी वातावरणामुळे आपले आपण भले करण्यासाठी आपल्याच पाण्यात हातपाय मारत राहण्यापेक्षा जागतिक व्यापार स्पर्धेच्या सागरात टिकून राहण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याची वेळ आली आहे, हे स्वीकारावे लागेल. त्यासाठी प्रसंगी कठोर निर्णय घेऊन थेट चीन, रशिया, अमेरिका यांसारख्या बलाढ्यांशी व्यापार सहचर्याचे प्रयत्न करावे लागतील.
● श्रीपाद कुलकर्णी, पुणे
निवडणुकीपुरती बोंबाबोंब नंतर सामसूम
‘भाजपला मुस्लीम का लागतात?’ हा महेश सरलष्कर यांचा लेख वाचला. बिहार विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी मतदार याद्यांची सखोल तपासणी करून घेतली गेली. परंतु यातून किती घुसखोरी शोधून काढली, हे स्पष्ट झाले नाही आणि होणारही नाही- हा मुद्दा योग्यच. भाजपला कोणत्याही निवडणुकीपूर्वी सर्वात आधी मुस्लीम व्होट बँकेचा मुद्दा तापाविण्यात रस असतोच. मुस्लिमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याने देशाला धोका आहे हा त्यांचा धोशा सुरूच असतो. परंतु हा धोका कमी करण्यासाठी आपण नक्की काय करणार किंवा घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी कोणती कठोर आणि दमदार पावले उचलणार, याची उत्तरे भाजपकडे नाहीत आणि त्याचे नियोजनही नाही. फक्त निवडणुकीपुरती बोंबाबोंब करायची आणि नंतर सर्व सामसूम अशी त्यांची पद्धत आहे. मुळात बिहारी जनतेला चांगले आणि सुरक्षित जीवन हवे आहे, नोकऱ्या हव्या आहेत. त्यांच्या मुलांना नोकरीसाठी परप्रांतात जावे लागू नये, ही त्यांची अपेक्षा आहे. पण हे सर्व सोडून केवळ निवडणूक जिंकण्याकरिता हा बागुलबुवा उभा केला जातो. बिहारचे मतदार सुज्ञ आहेतच. ते हा बनाव हाणून पाडतील.
● मिलिंद कोर्लेकर, ठाणे
खऱ्या गरजूंच्या मदतीवर बंधने
‘पूरग्रस्त भागातील तालुक्यांची संख्या वाढवण्यासाठी दबाव का येतो?’ हे संतोष प्रधान यांचे विश्लेषण (१३ ऑक्टोबर) वाचले. महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांपैकी ७६ तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांत अतिवृष्टी झाली असे सरकारने सादर केलेल्या अहवालात दिसते. यामध्ये लोकप्रतिनिधींनी दबाव आणून आपले तालुके घुसडले, मात्र यामुळे ज्यांचे खरोखरच व अतोनात नुकसान झाले आहे त्यांच्या मदतीवर बंधने येत आहेत. त्यांच्या मदतीमध्ये आपोआप कपात होत आहे. ज्या भागांत अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांची जनावरे, उभी पिके, शेतातील माती वाहून गेली त्या भागातील लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. सरकारच्या व आपल्या सहकाऱ्यांच्या विविध कृतींकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवून अशा चुकीच्या गोष्टी होऊ नयेत व मूळ बाधितांना पुरेपूर मदत मिळावी यासाठी त्यांनी लक्ष ठेवावे व योग्य ठिकाणी हस्तक्षेप करावा.
● तानाजी सातव, सासवड (पुणे)
हुंडा हे क्रूर, ऐतखाऊ मानसिकतेचे प्रतीक
‘मुंबईतही हुंड्यासाठी महिलांचा छळ’ ही बातमी वाचली. शिक्षणाने माणूस सुसंस्कृत, संवेदनशील, सामाजिक मूल्य जपणारा होतो हा समज चुकीचा आहे. हुंडा प्रतिबंधक कायदे प्रत्यक्षात कडक अंमलबजावणी न होता केवळ कागदोपत्रीच कसे राहतात हे पुणे येथील हुंडाबळीतून सिद्ध झाले आहे. मुलाकडची सखोल चौकशी न करता मुलीचे आई-वडील सोयरीक जुळवतात आणि जास्त काही अपेक्षा नसल्याचे भासवणारी सासरची मंडळी लग्नानंतर खरे दात दाखवू लागतात. मुलीचे कुटुंब ही तिच्या सासरच्यांना पैसा पुरविणारी हक्काची वित्तीय संस्थाच वाटते. आपल्या मनगटात जोर नाही तर मुलाने बोहल्यावर उभे राहूच नये! हुंडा हे क्रूर, ऐतखाऊ मानसिकतेचे प्रतीक आहे.
● हेमंतकुमार मेस्त्री, मनोर (पालघर)
आज्ञा पाळणारे शेकडो मानसिक गुलाम
‘लॉ म्हणजे आज्ञा की नियम?’ हा ‘तत्त्वविवेक’ सदरातील लिखित लेख (१३ ऑक्टोबर) वाचला. भारतीय मानसिकतेतील आज्ञाधारकपणासुद्धा कसा घातक आहे, हा विचार मनात आला. कारण आज्ञाधारकपणा म्हणजे आज्ञा धारण करणारा म्हणजेच कुठल्याही प्रकारे प्रश्न न विचारता, शंका उपस्थित न करता निमूटपणे सांगेल तो आदेश पाळणारा. थोडक्यात मेंढरू वृत्तीचा. आज्ञाधारक मुले ही सरळ वळणाची असतात, असा आणखी एक समज आपल्या समाजात घट्ट रुतून बसला आहे. पण वळण कधी सरळ असते का, हा प्रश्न मला कायम पडतो. मूठभरांना वर्चस्व गाजवता यावे म्हणून असे आज्ञाधारक सांगकामे गुलाम बनवणे हाच आपल्या संस्कृतीचा पाया आहे आणि म्हणून आपल्या संस्कृतीला पु. ल. देशपांडे गमतीने म्हणत की, ही ‘गप्प बसा’ संस्कृती आहे. या आज्ञाधारकपणामुळे आपण आपल्या पुढच्या पिढीची एक प्रकारे निष्ठुरपणे आदेश पाळणारी हृदयशून्य यंत्र मानवी संस्कृती तयार करत असतो.
याच आज्ञाधारकपणामुळे भारत मागास राहिला आहे. कारण भारतीय मानसिकतेत मुलांनी प्रश्न विचारणे, शंका उपस्थित करणे, संशय घेणे, चिकित्सा करणे, ही सगळी उद्धटपणाची लक्षणे मानली गेली आहेत. भारतीय धर्मग्रंथातूनच ‘संशयात्मा विनश्यति’ असे वचन सांगितले गेल्यामुळे संशय घेणाऱ्याचा नाश होतो असा समज पसरला आणि त्यातून ही ‘गप्प बसा संस्कृती’ जन्माला आली. यामुळे भारतात कुठल्याही प्रकारचा नवीन वैज्ञानिक शोध लागला नाही आणि भारतीय सतत पूर्वजांचे गोडवे गाण्यात मग्न राहिले. नवीन कल्पनांचा उदय झाला नाही. पुरातन गोष्टीला कवटाळून बसणे हेच उच्च संस्कार आहेत असे मूल्य रुजले. परिणामी भारतात मोठ्या प्रमाणात तरुणांच्या बेलगाम झुंडी निर्माण झाल्या आहेत. मूठभरांच्या वर्चस्वासाठी आज्ञा पाळणारे शेकडो मानसिक गुलाम तयार झाले आहेत. लोकशाहीतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यापेक्षा मनुस्मृतीतील विषमतेलाच डोक्यावर घेऊन नाचणारे संस्कारी(!) तयार झाले आहेत.
● जगदीश काबरे, सांगली