scorecardresearch

आरोग्याचे डोही : जगवायला शिकूया

रुग्णालयापर्यंत पोहोचेस्तोवर रक्ताभिसरण सुरू ठेवण्याचे हृदयफुप्फुससंजीवनासारखे उपाय सर्वांना माहीत व्हावेत..

आरोग्याचे डोही : जगवायला शिकूया
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

रुग्णालयापर्यंत पोहोचेस्तोवर रक्ताभिसरण सुरू ठेवण्याचे हृदयफुप्फुससंजीवनासारखे उपाय सर्वांना माहीत व्हावेत..

डॉ. उज्ज्वला दळवी

चौकातल्या वर्दळीत एक आजोबा चालताचालता थबकले, कोसळले आणि बेशुद्ध झाले. आजूबाजूच्या लोकांपैकी काही दुर्लक्ष करून पुढे गेले. एकाने जवळच्या बाटलीतलं पाणी शिंपडून बघितलं. कुणी आजोबांच्या नाकाशी चप्पल धरली. मग त्यांच्या खिशांत पत्ता मिळतो का शोधलं. काहीजणांनी आजोबांचा फोटो घेऊन व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्रूपवर टाकला. शेजारच्या दुकानदारानं पोलिसांना खबर दिली. इतकं सगळं होईपर्यंत बराच मोलाचा वेळ वाया गेला. आजोबा वाचू शकले नाहीत.

भाजी घेऊन येताना बंडूकाकांच्या छातीत धडधडलं, डोळय़ांसमोर अंधारी आली आणि शुद्ध हरपली. रवी आणि राजूने हे पाहिलं. त्या दोघांनीही ‘सीपीआर’चा म्हणजे  हृदयफुप्फुससंजीवनाचा  कोर्स केला होता. त्यांनी ताबडतोब ते उपचार सुरू केले. त्याच वेळी अ‍ॅम्ब्युलन्सलाही बोलावलं. संजीवनामुळे बंडूकाकांचं रक्ताभिसरण हॉस्पिटलात पोहोचेपर्यंत चालू राहिलं. पुढचे इलाज होऊ शकले. बंडूकाका बरे होऊन घरी परतले. 

संजीवन येत असलं तर कुणालाही एखाद्याचा जीव वाचवता येतो. डॉक्टर असायची  गरज नाही. जीव वाचवायची ओढ आणि ताकद पाहिजे. पण संजीवन म्हणजे जादू नव्हे. ‘नायिकेच्या खवीस वडलांच्या हृदयाचं स्पंदन एकाएकी थांबलं आणि ते कोसळले. नायकाने त्यांचं  हृदयफुप्फुससंजीवन केलं. त्यांनी उठून नायक-नायिकेला आशीर्वाद दिले,’-  असे सिनेमातल्यासारखे चमत्कार होत नाहीत.

 हृदयफुप्फुससंजीवन म्हणजे काय?

 कुठल्याही कारणाने हृदयाचं काम थांबलं तर रक्ताभिसरण थांबतं. फुप्फुसांचं काम थांबलं तर रक्तात प्राणवायू कमी पडतो. दोन्ही परिस्थितींत मेंदूकडे, खुद्द हृदयाकडे आणि मूत्रिपडासारख्या इतर महत्त्वाच्या अवयवांकडे प्राणवायू पोचत नाही. प्राणवायूच्या अभावाने पाच मिनिटांहून कमी वेळात मेंदूच्या पेशी मरू लागतात. म्हणून बेशुद्ध पडलेल्या माणसाची नाडी लागत नसली, श्वास चालू नसला तर योग्य तंत्रांनी त्याच्या मेंदूपर्यंत रक्त आणि फुप्फुसांत हवा पोहोचवायचा प्रयत्न करणं म्हणजे हृदयफुप्फुससंजीवन (कार्डिओपल्मोनरी रीस्यूसिटेशन). दोन्ही हातांनी आजाऱ्याच्या छातीच्या मध्यावर योग्य दाब देणं आणि सोडणं अशी क्रिया मिनिटाला शंभर वेळा केली की पुरेसं रक्ताभिसरण होतं. आजाऱ्याच्या तोंडावर तोंड ठेवून, जोराने हवा फुंकून त्याची छाती फुगवली की पुरेसा प्राणवायू फुप्फुसांपर्यंत पोहोचतो.  इतकं केलं की हॉस्पिटलमध्ये पोहोचून नेमके इलाज होईपर्यंत मेंदूच्या आणि इतर अवयवांच्याही पेशी जिवंत ठेवणं जमतं.

 तोंडाला तोंड लावलं की कोविडची, साध्या सर्दीपडशाचीही लागण होऊ शकते. ती टाळायला तोंडावरच्या पट्टीतून घशापर्यंत पोहोचणारी नळी मिळते. तिला जोडायला गाडीच्या हॉर्नसारखा, हवा फुंकणारा फुगाही असतो. ते यंत्र खिशात नाही पण गाडीत सहज जवळ बाळगता येतं. लहान मुलांच्यात बहुतेक वेळा अडथळा श्वसनात असतो. त्यांच्या फुप्फुसांत श्वास फुंकणं अधिक महत्त्वाचं असतं. पोटात किंवा लहान मुलांच्या पाठीवर विशिष्ट पद्धतीने बुक्का मारून घशात, श्वासनलिकेत अडकलेली वस्तू बाहेर काढता येते. ते हाइम्लिश तंत्र लहान मुलांत विशेष महत्त्वाचं असतं.

 आडजागी अचेतन सापडलेल्या माणसाचा मृत्यू बऱ्याच वेळापूर्वी झाल्याची चिन्हं स्पष्टपणे दिसत असली तर त्याला संजीवनाने फायदा होणं शक्य नाही. नाहीतर कुठल्याही अचेतन माणसाला तातडीचे वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत, अगदी दीड-पावणेदोन तासांपर्यंत चालू ठेवलं तर हृदयाकडे, मेंदूकडे, इतर अवयवांकडे  रक्ताभिसरण आणि प्राणवायूचा पुरवठा चालू राहतो, नुकसान आटोक्यात राहतं. अपघातामुळे मेंदूलाच जबर दुखापत झालेली असली तर संजीवनाने त्या माणसाला नवजीवन मिळत नाही. पण अवयवदानासाठी त्याचं यकृत, मूत्रिपडं, हृदय, फुप्फुसं सुस्थितीत राहतात. अर्थात दीड-पावणेदोन तास संजीवन चालू ठेवणं एकटय़ा माणसाला शक्य नाही. तिथे दोघां-तिघांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक असतात. शिवाय संजीवन हा हॉस्पिटलला पर्याय नाही. आजाऱ्याला लवकरात लवकर हॉस्पिटलात नेईपर्यंतची ती तात्पुरती तडजोड असते. गरजेची इंजेक्शनं, हृदयाला द्यायचे विजेचे झटके रस्त्यावर किंवा घरच्या घरी देणं शक्य नसतं. म्हणून संजीवन सुरू करतानाच हॉस्पिटलची रुग्णवाहिका बोलावण्याची तजवीज करायला हवी.

अचेतन माणसाला जागं करण्याचे प्रयत्न द्रोणागिरी आणण्यापासून चालूच आहेत. इ.स. १५००च्या सुमाराला एका ऑस्ट्रियन डॉक्टरने अचेतन माणसाच्या छातीत लोहाराच्या भात्याने श्वास फुंकण्याचा प्रयत्न केला होता.. गरम हवेने फुप्फुसं भाजून निघाली. १७३२मध्ये एका स्कॉटिश डॉक्टरनं कोळसा खाणकामगाराच्या तोंडाला तोंड लावून श्वास फुंकला. तो कामगार वाचला ( विल्यम टोसाच यांच्या त्या शोधाचं चित्र लंडनच्या ‘वेलकम कलेक्शन’नं जपलं आहे) कोंबडीचं हृदय विजेच्या झटक्याने सुरू करणं १७८५मध्ये जमलं. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी छाती उघडून हृदयाला मसाज करणं सुरू झालं. तेही आधी मांजरांत वापरलं. १९०३मध्ये कुत्र्यांच्या हृदयाला बाहेरूनच मसाज देऊन रक्ताभिसरण चालू ठेवणं जमलं. सध्याची संजीवनाची पद्धत चार वेगवेगळय़ा डॉक्टरांनी मिळून १९६०मध्ये अमेरिकेत मेरीलँडच्या कॉन्फरन्समध्ये सादर केली. त्यानंतरही त्यात सतत नवी सुधारणा झाली आहे. हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत. 

  भारतात दर लाखामागे ४२०० लोकांना दरवर्षी संजीवनाची गरज लागते. हृदय बंद पडतं तेव्हा त्यांच्यातले जेमतेम २० टक्के लोक हॉस्पिटलमध्ये असतात. उरलेल्यांपैकी निम्म्याहूनही कमी लोकांना तातडीची मदत मिळते. मदतीशिवाय वाया जाणाऱ्या प्रत्येक मिनिटागणिक मेंदूला अधिक इजा होते आणि जगण्याची शक्यता दर मिनिटाला ७ ते १०टक्क्यांनी घटत जाते. पहिल्या दोन-तीन मिनिटांत संजीवनाची मदत मिळाली तर जगण्याची शक्यता दुपटी-तिपटीनं वाढते. काही प्रगत देशांत तशी मदत मिळाल्यामुळे ४०-६० टक्के लोकांचे प्राण वाचले. दुर्दैवानं भारतात अद्याप तशी मदत मिळत नाही. भारतातल्या दोन टक्के लोकांनाही संजीवनाची माहिती नसते. ज्यांना माहिती असते त्यांनाही ते ज्ञान वापरायचा आत्मविश्वास नसतो. जवळच्या माणसांचे प्राण आपण धोक्यात आणू, अनोळखी माणसांना मदत करायला जाऊन कायद्याच्या कचाटय़ात अडकू, स्त्रियांना संजीवन देताना विनयभंगाचं बालंट येईल अशी भीती त्यांना वाटत असते.

 ती भीती दूर करण्यासाठी भारतीय ‘गुड समॅरिटन(कनवाळू मदतकर्ता) कायदा’ २०१६ मध्ये अस्तित्वात आला. अपघातामुळे किंवा प्रकृतीच्या इतर कारणांमुळे गंभीररीत्या आजारी झालेल्या माणसाला कसलंही नातं, बांधिलकी किंवा कर्तव्य नसूनही, कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, स्वयंस्फूर्तीनं तातडीची मदत करायला पुढे  सरसावणाऱ्या माणसाला कसल्याही कायदेशीर कटकटींचा त्रास होणार नाही अशी त्या कायद्यानं हमी दिली.  

संजीवन जाणणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी ‘आयएमए’ (इंडियन मेडिकल असोशिएशन) या संघटनेनं प्रयत्न सुरू केले. अपघातस्थळी सर्वात आधी पोहोचतात ते रिक्षाचालक, बसचालक, पोलीस. २०१६मध्ये तशा त्वरित पोहोचणाऱ्यांतल्या कमीत कमी दहा लाख लोकांना संजीवनाचं शिक्षण द्यायचं ‘आयएमए’नं ठरवलं. त्यानंतर हृदयाला विजेचे सौम्य झटके देणारी यंत्रं आता विमानतळ, रेल्वे स्टेशनं, मोठी ऑफिसं वगैरे ठिकाणीसुद्धा उपलब्ध झाली.

 काही सुधारणा अद्यापही व्हायला हव्यात. सध्याच्या संजीवन कोर्सेसमध्ये आणीबाणीच्या वेळी द्यायच्या औषधांविषयीचा कठीण भागही असतो. तो वगळून फक्त रक्ताभिसरणाचं, श्वसनाचं आणि हाइम्लिश तंत्र नीट शिकवलं तर ते छान लक्षात राहील. अगदी नऊ वर्षांच्या मुलांपासून सगळय़ांना संजीवनाचं शिक्षण मिळायला हवं. तुटपुंजं आर्थिक बळ आणि शिक्षकांची कमतरता या दोन कारणांमुळे शाळांमधून योग्य रीतीने संजीवन शिकवलं जात नाही. त्या समस्येवरही तोडगा निघाला की भारतातला प्रत्येक माणूस संजीवन शिकेल. प्रत्येक गरजू आजाऱ्याला संजीवन मिळेल. सध्याही ‘आरईपीएस इंडिया’चे, भारतीय आरोग्य मंत्रालयाचे, भारतीय रेड क्रॉस सोसाटीचे फस्र्ट रिस्पॉन्डर (पहिला प्रतिसाददाता) कोर्सेस ठिकठिकाणी शिकवले जातात. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतसुद्धा ते कोर्सेस असतात. त्यांची समाजमाध्यमांतून जाहिरात झाली, तरुणाईनं त्यांचा फायदा घेतला आणि मग संजीवन-शिक्षितांची मित्रमंडळं बनवली तर लाखो लोकांना संजीवनाचा सांघिक आत्मविश्वास येईल. मग तात्याआजोबा रस्त्यावर कोसळले तर कमीत कमी  चार-पाचजण पटकन सरसावून एकदिलाने संजीवन देतील, अ‍ॅम्ब्युलन्स बोलावतील आणि  हॉस्पिटलापर्यंत सोबतही जातील. तात्याआजोबा बरे होऊन घरी जातील. 

 तसं पाहिलं तर संजीवनाची गरज फार तर चार टक्के लोकांनाच लागणार आहे. पण जन्मभरात एकदाच का होईना ते तंत्र वापरून एका माणसाचा जीव वाचवता आला तर त्या घटनेच्या परीसस्पर्शाने आपल्या आयुष्याचं सोनं होईल!

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 00:03 IST

संबंधित बातम्या