गिरीश कुबेर इतकी वर्ष ‘व्हायब्रंट गुजरात’चे गुंतवणूक मेळे भरतायत. लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचं सांगितलं जातंय. आणि तरीही इतक्या संख्येनं गुर्जर बांधव बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न करतायत? आपल्याकडच्या एका नेत्याशी मागे एकदा गप्पा मारताना चर्चेचा विषय होता भय्ये. हे उत्तर प्रदेशी, बिहारी ‘बेकार आणि बेरोजगार’ तरुण मुंबईत कसे येतात आणि आपल्या तरुणांच्या तोंडचा घास कसा हिरावून घेतात.. आपल्या पोरांच्या रोजगारावर कशी गदा येते वगैरे नेहमीचे मुद्दे. त्यांचा सूर असा होता की मराठी तरुण जणू काही वाटच पाहात बसलेत मिळेल ते काम करण्यासाठी. त्यांना म्हटलं कोकणात हल्ली आंबे/ नारळ पाडायला बिहारी/ नेपाळी पोरं असतात. तर ते त्यांनी न ऐकल्यासारखं केलं. मग या अशा भावनोद्दीपित मुद्दय़ांवर त्यांचा सात्त्विक संताप शांत होऊ दिला. पत्रकारितेतल्या अनुभवावरनं एव्हाना मराठी माणसाला आपल्यावर अन्याय कसा होतोय ही भावना चुंबाळायला फार आवडतं हे लक्षात आलं होतं. आपलंही काही चुकत असेल हा मुद्दाच नाही. सतत कोणी तरी आपल्याविरोधात कटकारस्थानं कसं करतंय आणि आपल्यावर अन्याय कसा होतोय हाच सूर. एकदा तो लावला की दुसरं काही ऐकायला आणि डोक्यातही येत नाही. मस्त आनंदी राहता येतं या अन्यायग्रस्ततेचा बुक्का लावून.. हेही वाचा >>> अन्वयार्थ : राज्यपाल आणि विधेयक कालमर्यादा मग थोडय़ा वेळानं त्यांना म्हटलं आपल्याकडनं जी मुलं जातात नोकऱ्या करायला अमेरिकेत, युरोपात.. ती तिथल्या स्थानिकांच्या नजरेतनं भय्येच असतात. ते चपापले. त्यांच्या घरातलेही काही होते परदेशात. आयटी सेक्टरमध्ये. हल्लीचा हा नवा मार्ग. ‘एमएस’ नावाचा अभ्यासक्रम करायला कोणत्या तरी अमेरिकी विद्यापीठात गच्च पैसे मोजून प्रवेश घ्यायचा.. आईबाप/ नातेवाईकांना वाटतं पोरगं अमेरिकेत गेलंय शिकायला.. आणि मग तिकडे मिळेल त्या नोकरीला लोंबकळत ग्रीनकार्डची वाट पाहायची. त्या नेत्याच्या घरातही असंच घडलं होतं. पण आपला भाचा, पुतण्या वगैरे भय्ये? छे..छे..! हे कसं शक्य आहे? त्यांनी त्या वेळची बचावाची योग्य चाल केली. ‘‘आपल्या पोरांना भय्या कसं म्हणता? बिहार/ यूपीतून येणारी अशिक्षित मुलं कुठे आणि आपली चांगली सुशिक्षित ‘ग्रीनर पाश्चर’साठी (हा त्यांचा शब्द) तिकडे जाणारी मुलं कुठे? यांची तुलना कशी काय होऊ शकते..?’’ हा सात्त्विक संतापाचा दुसरा टप्पा. हळूहळू तो दूर झाला. बाजारभावापेक्षा स्वस्तात काम करणारे म्हणजे भय्ये वगैरे सांगितल्यावर थोडय़ा वेळानं त्यांनी ही चर्चा सोडून दिली. तरी ‘आपल्या’ पोरांचीही गणना ‘भय्या’त करणं त्यांना जड जात होतं. ठीकच होतं ते. अर्थजाणिवेचा झोत डोळय़ावर पडला की अंधारी येतेच. झाला बराच काळ या चर्चेला. पण आजची आकडेवारी समोर ठेवली तर त्यांना आता काय वाटेल, हा प्रश्न पडतो. तो पडण्याचं कारण हे निश्चितच नाही की २०१२ पासून आपल्या देशातनं परदेशाला घर मानणाऱ्यांची संख्या वाढलीये. करोनानंतरच्या काळात तर अनेक लक्षाधीश, अब्जाधीश पोर्तुगाल, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इतकंच काय पण दुबईचं नागरिकत्व पैसे देऊन विकत घेतायत हेही हा प्रश्न पडायचं कारण नाही. तुम्ही काय खाता, काय पिता, विवाहित आहात की अविवाहित की लिव्ह इनमध्ये आहात?, ‘आमच्यासारखे’ की समलिंगी वगैरे प्रश्न ज्या प्रदेशात विचारले जात नाहीत त्या ठिकाणी जाऊन राहणं आजच्या पिढीला योग्य वाटत असेल तर ते योग्यच म्हणायचं. हे सर्व तसे शिक्षित आणि आर्थिक सुस्थितीतले. ते कायदेशीररीत्या स्थलांतर करतात. प्रश्न यांचा नाहीच. तो आहे सर्व नियम धाब्यावर बसवून विकसित देशांत, त्यातही अमेरिका आणि कॅनडा या देशांत, प्रवेश करू पाहणाऱ्यांचा. बीबीसी, सीएनएन जे कोणी पाहात असतील त्यांच्या हे लक्षात येईल. मेक्सिकोच्या सीमेवरून, नदीतून वाट काढत हजारो नागरिक कसे अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतात ते! एकाच वेळी लाज आणि वाईट अशा दोन्ही भावना जाग्या होतात ती दृश्ये पाहून. वाईट यासाठी की त्यांना त्यांची मातृभूमी नकोशी वाटते आणि लाज वाटते ज्या तऱ्हेने त्यांना अमेरिकी सुरक्षा यंत्रणा हाडत-हुडुत करतात ते पाहून! पण या लाज भावनेला आता एक संख्या मिळालीये ही आणखी लाजिरवाणी बाब.. हेही वाचा >>> बुकरायण : उद्ध्वस्त करणारा राष्ट्रवाद! ती संख्या ९६,९१७ ही. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून आताच्या, म्हणजे २०२३ च्या सप्टेंबपर्यंत अमेरिका आणि कॅनडाची सीमारेषा बेकायदेशीर मार्गानी ओलांडून त्या देशांत प्रवेश करू पाहणाऱ्या आणि त्या प्रयत्नांत सुरक्षारक्षकांनी पकडलेल्या भारतीयांची ही संख्या! म्हणजे जवळपास लाखभर भारतीय बेकायदेशीरपणे अमेरिकेत/ कॅनडात घुसण्याचा प्रयत्न करत असताना पकडले गेले. तेही (फक्त) एका वर्षांत! ही पकडले गेलेल्यांची संख्या. जे असे पकडले गेले नाहीत आणि ज्यांना यशस्वीपणे त्या देशांत घुसखोरी करता आली ते वेगळेच. आणि ही संख्या आहे तीदेखील फक्त अमेरिका आणि कॅनडा या देशांपुरतीच. युरोपात घुसलेल्या, घुसताना पकडले गेलेल्यांची गणती यात नाहीच. अमेरिकेच्या सरकारी यंत्रणेनं हा तपशील जाहीर केलाय आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वगैरेंनी तो प्रसिद्ध केलाय. लाखभर भारतीयांना मिळेल त्या मार्गानं मायभूमी सोडून मिळेल तिथून परदेशात घुसखोरी करावी असं वाटतं, हीच बाब नाही का पुरेशी लाजिरवाणी? इतक्या मोठय़ा संख्येनं भारतीय असा अमेरिकेत घुसायचा प्रयत्न करतायत हे वाचल्यावर छोटय़ा रबरी बोटीतून अत्यंत धोकादायक पद्धतीनं समुद्र ओलांडून युरोपच्या किनाऱ्यावर थडकू पाहणाऱ्या असहाय आफ्रिकींची आठवण नाही येत? खरं तर त्यांच्यापेक्षा आपली परिस्थिती कित्येक पटींनी उत्तम. ते बिचारे दरिद्री. अन्नाला मोताद झालेले. स्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य अशा मुद्दय़ांची मातबरी उपाशीपोटी नसते. त्यामुळे ते जगायला मिळावं म्हणून देश सोडतात. पण आपल्या भारतीयांचं काय? जगातला सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा देश सोडून जावं असं त्या देशातल्यांनाच वाटावं? काही महिन्यांपूर्वी तर मेक्सिको- अमेरिकेतली ट्रम्प भिंत ओलांडण्याच्या प्रयत्नात एक भारतीय आपल्या मुलीसह पडला आणि गेला. तो पडला मेक्सिकोच्या बाजूला आणि बायको पडली अमेरिकेत! तो गेला आणि बायको-मुलगी वाचली. दोघीही आता अमेरिकेच्या स्थलांतरित नियंत्रण केंद्रात बेकायदा निर्वासित म्हणून आहेत. हेही वाचा >>> बुकमार्क : डिजिटल धोक्यांची यथार्थ जाणीव हे जोडपं होतं गांधीनगरचं. म्हणजे गुजरातच्या राजधानीतलं. खरं तर ते जिथे राहात होते तिथून जवळच अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधल्या स्वातंत्र्यदेवीच्या पुतळय़ाला मान खाली घालायला लावेल इतका भव्य पुतळा आपण उभारलाय. या भव्य कर्तबगारीचा भव्य अभिमान बाळगायचं सोडून हे जोडपं अमेरिकेत घर करू पाहात होतं. पण याहीपेक्षा आश्चर्याची, धक्का बसेल अशी, अचंबित करणारी आणखी एक बाब आहे.. ती म्हणजे बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसखोरी करताना पकडल्या गेलेल्या लाखभरांतले बहुसंख्य हे गुजरात आणि पंजाब राज्यातले आहेत. यातल्या पंजाबींना एक वेळ आपण माफ करू. पण गुर्जर बांधवांचं काय करायचं? इतकी वर्ष त्या राज्यात ‘व्हायब्रंट गुजरात’चे गुंतवणूक मेळे भरतायत. लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचं आपल्याला सांगितलं जातंय. ते सांगणारे नेहमी खरंच बोलतात. म्हणजे गुंतवणूक झालेलीच असणार. आणि तरीही इतक्या संख्येनं गुर्जर बांधव बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न करतायत? यातही धक्क्यावरचा धक्का म्हणजे असं करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत पाच पटीनं वाढ झालीये. तीन वर्षांपूर्वी २०२० साली अमेरिकेच्या सीमेवर पकडले गेलेल्यांची संख्या होती १९,८८३ इतकी. आता ती लाखाच्या घरात आहे. अमेरिकेनं खरं आपल्याकडनं शिकायला हवं आणि आपल्या एनआरसीसारखा कायदा करायला हवा. कारण असं की इतक्या प्रचंड संख्येनं पकडले गेले तरी यातले फारच कमी परत भारतात येतात. असं का? कारण मानवतेच्या मुद्दय़ावर अमेरिका या बेकायदेशीर घुसखोर भारतीयांना आपल्या देशात ठेवून घेते. ना आपल्या धर्माचे, ना वर्णाचे आणि ना वंशाचे! तरीही अमेरिका त्यांना माघारी पाठवत नाही. वेडेच म्हणायचे! पण अधिक वेडे कोण? उच्च संस्कृती, गतिमान अर्थव्यवस्था, जगात सर्वाधिक फॉलोअर्स असलेलं आणि भारताची मान वगैरे उंचावणारं नेतृत्व असताना त्यांच्याच राज्यातले देशत्याग करावासा वाटणारे हे इतके सारे की मानवतेचा विचार करणारी भोगवादी, चंगळवादी इत्यादी अमेरिका? girish.kuber@expressindia.com @girishkuber