आर्थिक महामंदी काळात अमेरिकेतील बऱ्यापैकी सधन कुटुंबात जन्मलेल्या रॉबर्ट गॉटलीब यांचे सारे कुटुंबच वाचनवेडे असल्याचा साक्षात्कार त्यांना जाणिवेच्या काही वर्षांत झाला. म्हणजे जेवणाची पंगत बसलेली घरातील सगळीच हाती पुस्तक घेऊन अन्नाच्या आणि कागदाच्या पानांचा फडशा एकाच वेळी उडवताना पाहत त्यांचीही वाचनभूक वाढू लागली. इतकी की हायस्कूलमध्ये असतानाच सलग चौदा तासांच्या बैठकीत त्यांनी ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’ सहज संपवले. पदवी मिळण्याच्या जवळपास वयाचे असताना मार्सेल प्रूस्तच्या साहित्याच्या सात खंडांचा ‘रोज एक’ यानुसार सात दिवसांत फडशा पाडला. ‘अ‍ॅव्हिड रीडर’ (प्रथमावृत्ती २०१६) या त्यांच्या वाचन- आत्मचरित्रात गेल्या सात- आठ दशकांचा त्यांचा वाचनपसारा नोंदला गेला आहे. कळत्या वयापासून संवेदना हरवू पाहण्याच्या अखेरच्या काळापर्यंत त्यांचे वाचन आणि लेखन सुरू होते. अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत त्यांचे निबंध न्यू यॉर्क टाइम्सपासून सर्व महत्त्वाच्या मासिकांत उमटत होते.

गॉटलीब यांच्या तारुण्याचा काळ रेडिओ-मासिकांच्या भरभराटीचा, हॉलीवूडमधील पॉप्युलर कल्चरचा जगाला निर्यात होण्याचा आणि महायुद्धोत्तर काळातील जखम-ओरखडय़ांचा साहित्यात जोरकसपणे अंतर्भाव होण्याचा. वाचनाच्या आणि आकलनाच्या तगडय़ा भांडवलावर १९५५ साली ऐन पंचविशीत जिथे जायला हवे, तिथेच त्यांना नोकरी मिळाली. ‘सायमन अ‍ॅण्ड शूस्टर’ या प्रकाशन संस्थेत संपादकपदी रुजू झाल्यानंतर साठोत्तरी नवसाहित्याला घडवू पाहणाऱ्या कित्येक लेखकांना हुडकून काढून त्यांच्यातल्या सर्वोत्तम कौशल्याची जगाला ओळख करून देण्यात गॉटलीब यांची भूमिका महत्त्वाची. रे ब्रॅडबरी, जॉन चीवर, डोरिस लेसिंग, सलमान रश्दी, जॉन गार्डनर, जॉन ल् कार, टोनी मॉरिसन, बिल क्लिंटन, नोरा एफ्रॉन, रॉबर्ट कारो, बॉब डीलन, जॉन लेनन ही साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील भीमकाय नावे एकेकाळी कुणीही नसताना त्यांच्या लेखनाला झळाळी आणून देण्याचे काम या संपादकाने केले. दोनच वर्षांपूर्वी ग्रेटा गाबरे या मदनिकेवरील त्यांचे चरित्र गाजले होते. त्यापूर्वीच्या ‘नीअर-डेथ एक्स्पीरिअन्स’ या लेखसंग्रहात लेखकांची आणि समाजथोरांची कैक व्यक्तिचित्रे आहेत. ज्यात त्या काळी अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून कल्पनेतही नसलेल्या वर्षांतील डोनाल्ड ट्रम्प यांचेही शब्दचित्र वाचायला मिळते. आयुष्यभर वाचनातच रमलेल्या या समाजचिंतकाने १९८७ ते १९९२ या कालावधीत न्यू यॉर्कर या साप्ताहिकाची धुरा वाहिली आणि त्याला मोठय़ा प्रमाणात साहित्यिक रूपडे दिले. या काळातच जपानी लेखक हारुकी मुराकामीच्या ‘टीव्ही पीपल’, ‘एलिफण्ट व्हॅनिशेश’, ‘स्लीप’ या गाजलेल्या कथा न्यू यॉर्करमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. जोसेफ हेलर यांच्या ‘कॅच-२२’ या कादंबरीचे शीर्षकही गॉटलीब यांनी जन्माला घातले. अशा कित्येक कादंबऱ्यांना गाजण्याइतपत ‘टोक काढणाऱ्या’ संपादकाचे १४ जून रोजी निधन झाले. तेव्हा वाचक-लेखक आणि संपादक म्हणून त्यांच्याइतक्या कर्तृत्वाचा शोध त्यांच्या नावापाशीच संपल्याची हळहळ सर्वाधिक व्यक्त झाली.