‘शिक्षण व्यवस्थेतील सर्जनशील फेरबदल’ हा लेख (रविवार विशेष- १० ऑगस्ट) वाचला. आजघडीला आपण इतर देशांच्या ‘गुणांक’ आदी पद्धतींचे अनुकरण करून आपल्या राष्ट्रीय, नव्या शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा अट्टहास करत आहोत. कोणत्याही क्षेत्रात बदल करायचा असेल तर त्याची सुरुवात मुळापासून करावी लागते. ही बाब आपण हल्ली विसरत चाललो आहोत. इतर देशांशी स्पर्धा करायची असेल तर त्या तुलनेत दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे केंद्र आणि राज्य सरकारचे कर्तव्य आहे.

राज्याचा विचार केला तर अंगणवाड्यांची काय अवस्था आहे हे दिसेल, काही जिल्हा परिषदेच्या शाळा शेवटची घटका मोजत असताना दिसतील. भेगा पडलेल्या भिंती, पावसाळ्यात गळणारे छत, अशा अनेक प्रकारच्या भौतिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शिक्षकसंख्या अपुरी आहेच; शिवाय अध्यापनाखेरीज इतर कामाचा बोजा, ऑनलाइन कामे आणि त्यात जाणारा वेळ यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. या सर्व प्रक्रियेतून शिक्षकांना अध्यापनासाठी एका महिन्यात किती वेळ मिळत असेल? या बाबींचा सरकारने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

उच्च शिक्षणाचे तर राज्यात धिंडवडेच निघत चालले आहेत. मुक्त विद्यापीठातून मिळणाऱ्या पदव्या, वर्षभर कॉलेजात न जाता घरी बसून मिळणाऱ्या पदव्या, कॉपी करून पदव्या मिळवणे अशा पद्धतीने आपली शिक्षण पद्धती पुढे सरकत असेल तर कसे घडतील कौशल्यपूर्ण विद्यार्थी? राज्यातील बेरोजगारीला आपली शिक्षण पद्धतीच जबाबदार म्हणावी लागेल. आपण राज्याला केवळ कागदावर साक्षर दाखवून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहोत का, असा प्रश्न पडतो.-मनीषा अमोल आढळकरनांदगाव (जि. नाशिक)

सरकारी शाळेतील विद्यार्थी मागे का?

शिक्षण व्यवस्थेतील सर्जनशील फेरबदल’ हा प्रिया जाधव यांनी लिहिलेला लेख (१० ऑगस्ट) वाचला. माझ्यासारख्या अनेक शिक्षकांना शिक्षणात सृजनात्मकता आणण्याची, लागू करण्याची मनापासून इच्छा असते, पण तसे होताना दिसत नाही. शिक्षकांना शिकवत असताना इतर कामाचा सर्वात जास्त बोजा असतो. शाळेत शिक्षकच नाही तर विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा सांभाळण्यावर लक्ष द्यावे लागते तसेच शिक्षकांना मध्येच ‘बीएलओची ड्युटी’, सरकारला दाखवण्यासाठी असाक्षर पालक शोधणे अथवा अन्य ऑनलाइन कामे दिली जातात. तरीसुद्धा शिक्षक अनेक पद्धतीने नवीन सर्जनतेचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. पण शेवटी मनात प्रश्न असतो की खासगी शाळेतील विद्यार्थी हुशार व सरकारी शाळेतील विद्यार्थी मागे का? त्यामागे एकच उत्तर मिळते ते म्हणजे शिक्षकांना शिकवू द्या. तो वेळ शिक्षकांकडे नसल्याने पुस्तकातील ज्ञान म्हणजेच संपूर्ण ज्ञान असे समजून बाहेरच्या सर्जनशीलतेचा अभ्यास करणे सोडून दिले जाते.- अमोल भोमलेमालाड (मुंबई)

माहिती नक्कीच खरी असावी; पण…

पाकिस्तानची सहा विमाने जमीनदोस्त -‘ऑपरेशन सिंदूर’मधील शौर्याचे हवाई दल प्रमुखांकडून कौतुक’ ही बातमी (लोकसत्ता – १० ऑगस्ट) वाचली. पहलगाम हत्याकांड २२ एप्रिल रोजी घडले, त्याला भारताने ७ मेच्या रात्री जोरदार प्रत्युत्तर दिले. हवाई दल प्रमुखांनी पाकिस्तानची सहा विमाने पाडल्याची माहिती आता दिली आहे ती नक्कीच खरी असावी. मात्र या घटनेबाबत माहिती मिळवण्यास आणि देण्यास इतका उशीर का व्हावा असा प्रश्न पडतो. किमान आता तरी यावर पडदा पडावा. उरतो तो एकच प्रश्न. पाकवर आपली सेनादले वरचढ ठरत असताना अनपेक्षितपणे युद्धबंदीची घोषणा झाली- ती अमेरिकेने केली आणि कालांतराने दोन्ही देशांनी मान्य केली. युद्ध कोणी थांबवले यावरून अजूनही स्पष्टता नाही.-अनंत बोरसेशहापूर (जि. ठाणे)

जिंकून देणाऱ्यां’ची तात्काळ तक्रार नाही?

जे वयाची साठ वर्षांहून अधिक काळ राजकारणात आहेत, जे मुत्सद्दीपणात आणि राजकीय षड्यंत्रांतही वाकबगार आहेत अशा शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीआधी त्यांना दोन अज्ञात माणसे येऊन भेटली, जी ठरावीक रक्कम घेऊन पवारांना सत्तेसाठी आवश्यक तितक्या जागी आमदार निवडून देणार होती, पण तसे अवैध प्रकार पटत नसल्याने तो प्रस्ताव नाकारला, असा तपशील आता दिला आहे. लगोलग संजय राऊतांनी त्यावर कडी करत विधानसभा व लोकसभा निवडणुकीआधी दोन व्यक्ती त्याच प्रकारचा सौदा घेऊन उद्धव ठाकरेंना भेटल्याचे सांगितले. प्रश्न असा पडतो की हे नेते जनतेला मूर्ख समजतात काय? तुम्हाला तशी माणसे भेटली होती तर ती बाब गंभीर समजून तुम्ही त्या माणसांना पोलिसांच्या स्वाधीन का नाही केले? इतक्या महिन्यात निवडणूक आयोगाच्या निदर्शनास ही गोष्ट का नाही आणली?-मनमोहन रो. रोगेठाणे

क्रूर, स्वार्थी मानवाच्या दांभिकतेची लक्षणे…

भूतदयेचे भूत..’ हे संपादकीय (९ ऑगस्ट) वाचताना हेही आठवले की, मानवाने ‘उत्क्रांती’च्या ओघात प्राण्यांच्या जगण्याच्या, म्हणजे अन्नपाण्याच्या स्राोतावरच कब्जा केला. अनेक प्राणी स्वत: खाण्यासाठी, तर अनेक प्राण्यांपासून संरक्षणासाठी या प्राण्यांना मारले आणि अनेक प्राणी आज नामशेष झाले आहेत. त्यांच्या नामशेष होण्यामागे अनेक कारणे आहेत, त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे मानव प्राणी. साधारण १९७० पासून, म्हणजे पर्यवाराणासंबंधी जागरूकता निर्माण झाल्यानंतरही पृथ्वीवरील ‘जंगली’ प्राण्यांची संख्या निम्मी झाली आहे. आज पृथ्वीवरील बहुसंख्य प्राणी पाळीव आहेत. म्हणजे मानवाच्या अधिपत्याखाली ‘जिवंत’ आहेत. ‘वेदना, अपत्यप्रेम, वात्सल्य, लैंगिक भावना वगैरे मानवी वैशिष्ट्ये आहेत. प्राण्यांमध्ये तसले काही नसतेच फारसे- भले विज्ञान काहीही सांगो’ अशा विचित्र धारणेतून मानव वागत आल्याचे दिसते. त्यामुळेच आज अन्न साखळीत मानव सगळ्यात वरती असावा.

तर हत्तीणप्रेम, कबुतर-दया वगैरे लक्षणे मानवी दांभिकतेचीच ठरतात. संपूर्ण मानव प्रजातीच इतिहासपूर्व काळापासून क्रूर, स्वार्थी व ढोंगी आहे. अशा परिस्थितीत एखाद्या मानवी समूहविशेषाला, एखाद्या प्रथेला किंवा तथाकथित धार्मिक मान्यतेला दोष किती द्यायचा?-विश्राम मेहताकोल्हापूर

सार्वजनिक आरोग्याशी देणेघेणे नाही?

कबुतरांचा सार्वजनिक ठिकाणचा वावर लोकांच्या जिवावर बेतत आहे. त्यांच्या विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे फुप्फुसाचे व श्वसनाचे विकार होतात, हे वैद्याकशास्त्राने सिद्ध केलेले आहे. व त्याप्रमाणे उच्च न्यायालयाने आदेश देऊन सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाऊ घालायला बंदी केलेली आहे. परंतु पक्षीप्रेमी हे ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. आम्ही कबुतरांना उघड्यावरच खायला देणार – सार्वजनिक आरोग्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही, अशीच त्यांची भूमिका दिसते.-रत्नाकर चांदेकरपुणे

निवडक कडकपणा आणि निवडक नरमाई

कबुतरखाने बंद करण्याच्या न्यायालयाच्या निर्देशानंतरही दादर येथील बंदिस्त केलेली जागा उधळून लावणे, त्याच ठिकाणी गाड्यांच्या टपावर ट्रेमध्ये दाणे ठेवून कबुतरांना खाद्या पुरवणे, गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात धान्य घालणे आणि त्याची चित्रफीत बनवणे असे प्रकार ‘शांततेचा पुरस्कार करणाऱ्या’ जैन समाजाकडून होत असल्याचे दिसते.

या पार्श्वभूमीवर सरकारकडून मात्र तुलनेने नरमाईची भूमिका घेतली जात असल्याचे जाणवते. याउलट, महिनाभरापूर्वी मराठी भाषक जनतेने आंदोलन केल्यावर ते मोडून काढण्यासाठी सरकारने तात्काळ आणि कठोर कारवाई केली होती, तसेच कायदा व सुव्यवस्था पाळण्याचे आवाहनही करण्यात आले होते. त्याच भूमिकेची कडक अंमलबजावणी इथे का दिसत नाही? कायद्याचे पालन सर्वांनीच करायचे असते. पण सरकारनेच अंमलबजावणीत निवडक कडकपणा आणि निवडक नरमाई दाखवायला सुरुवात केली, तर त्याला दुटप्पी भूमिका म्हणायची नाही तर काय? जैन समाजाबाबतची ही नरमाई केवळ एकगठ्ठा मते दूर जाऊ नयेत म्हणूनच आहे का, की यामागे आणखी काही कारणे दडली आहेत, हे स्पष्ट व्हायला हवे.-दीपक काशिराम गुंडयेवरळी (मुंबई)