जॉर्जिया या कॉकेशन पर्वतराजींमधील सामरिक महत्त्वाच्या देशात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाची चर्चा भलतीकडे सरकू लागली आहे. या निवडणुकीचे विश्लेषण करण्याआधी जॉर्जियाचा अलीकडचा इतिहास जाणून घेणे आवश्यक ठरते. एरवी हा तसा शांतताप्रिय आणि स्वाभिमानी देश. परंतु जन्मापासूनच रशियासारख्या आडदांड शेजाऱ्याशी अस्तित्वाची लढाई लढावी लागत असल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिमेकडे आणि युरोपवादाकडे झुकू लागला होता. १९९१मध्ये सोव्हिएत रशियाकडून फारकत घेतलेल्या ज्या देशांविषयी व्लादिमीर पुतिनप्रणीत रशियाच्या मनात आकस नेहमीच राहिला, त्यांमध्ये प्रमुख होते युक्रेन आणि जॉर्जिया. जॉर्जियाच्या नागरिकांनी अनेक शतके पर्शियन, ऑटोमन साम्राज्यांच्या तडाख्यातून आपली संस्कृती, भाषा जपण्याचा प्रयत्न केला. आता गेली तीन दशके मध्ययुगीन साम्राज्यांची जागा रशियाने घेतलेली आहे. नवीन सहस्राकाच्या सुरुवातीस रशियात व्लादिमीर पुतिन अध्यक्ष बनल्यानंतर आणि नंतर लगेचच तिकडे जॉर्जियात मिखाइल साकाश्विली हे अध्यक्ष बनल्यानंतर दोन देशांतील सुप्त शत्रुत्व उघड वैरभावात परिवर्तित होऊ लागले. साकाश्विली यांना जॉर्जियाला वैचारिक, आर्थिक, राजकीयदृष्ट्या नाटो आणि युरोपीय समुदायाकडे म्हणजेच रशियापासून दूर न्यायचे होते. पुतिन यांना ते मंजूर नव्हते. युक्रेनवर दोन वर्षांपूर्वी आणि दहा वर्षांपूर्वी झालेल्या रशियन आक्रमणांविषयी आज साहजिक बरेच लिहिले-बोलले जाते. पण २००८ मध्ये रशियाने साऊथ ओसेटिया आणि अबखाझिया या जॉर्जियाच्या दोन प्रांतांवर आक्रमण केले. जॉर्जियाने प्रतिकार केला, पण हे दोन्ही प्रांत आज रशिया आणि रशिया-समर्थित बंडखोरांच्या ताब्यात आहेत. ते स्वतंत्र देश असल्याचे रशियाच्या पार्लमेंटने म्हटले आहे. या दोन देशांच्या रक्षणासाठी तेथे रशियाचे सैन्य तैनात आहे. २१व्या शतकात युरोपीय भूमीवरील ते पहिले युद्ध ठरते. त्या कारवाईचे प्रारूप बरेचसे युक्रेनवरील आक्रमणासारखेच आहे. प्रथम अशा देशात रशियनबहुल प्रांतांमध्ये बंडखोरांना मदत करायची, अस्थैर्य निर्माण करायचे, नि अस्थैर्याचे रूपांतर थेट लष्करी कारवाईत करायचे. त्यास प्रादेशिक, सांस्कृतिक अस्मितेची जोड द्यायची. युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अनेक विश्लेषकांनी रशियाचा पुढील ‘युक्रेन’ म्हणजे जॉर्जिया असेल असे म्हटले होते, त्याची ही पार्श्वभूमी.

हेही वाचा : व्यक्तिवेध: डॉ. वीणा देव

जॉर्जियात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष बिद्झिना इवानिश्विली यांच्या जॉर्जियन ड्रीम (जीडी) पक्षाला बहुमत मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाले, मतमोजणीत फेरफार करण्यात आले असा आरोप युनायटेड नॅशनल मूव्हमेंट (यूएएम) या विरोधी पक्षांच्या आघाडीने केला. या आघाडीला जनमत चाचण्या, तसेच मतदानोत्तर चाचण्यांमधून बहुमत मिळेल, असे दिसून आले होते. प्रत्यक्षात रविवारी मतमोजणी झाली, त्या वेळी जीडीला ५४ टक्के मते मिळाल्याचे आणि यूएएमला ३८ टक्के मते मिळाल्याचे तेथील निवडणूक यंत्रणेने जाहीर केले. या मतदान प्रक्रियेविषयी संयुक्त राष्ट्रे, युरोपीय समुदाय या संघटनांच्या निरीक्षकांनी अनेक शंका उपस्थित केल्या होत्या.

हेही वाचा : संविधानभान: निवडणुकीची पद्धत आणि प्रतिनिधित्वाचा प्रश्न

सत्तारूढ जीडी पक्षाने जॉर्जियाच्या नाटो आणि युरोपीय समुदायातील संभाव्य प्रवेशास विरोध केला आहे. २०२२ पासून म्हणजे युक्रेनवर रशियाने आक्रमण केल्यापासून हा विरोध तीव्र झाला. युरोप हवे की जॉर्जिया, असा जीडीच्या प्रचाराचा रोख होता. अध्यक्ष इवानिश्विली २०१२मध्ये सत्तेवर आले. त्यांनी साकाश्विली यांचा पराभव केला, ज्यांनी प्रथम जॉर्जियाला मुक्त आणि समृद्ध युरोपच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला होता. इवानिश्विली हे बडे उद्याोगपती होते आणि त्यांनी सगळी माया १९९०च्या दशकात रशियात जमवली होती. सुरुवातीस आडमार्गाने आणि नंतर थेटच त्यांनी पुतिन यांच्या रशियाची तळी उचलण्याचे धोरण आरंभले. युक्रेन युद्धाच्या वेळी तटस्थ राहण्याचे त्यांनी ठरवले. वास्तविक २००८मध्ये जॉर्जियावर हल्ला झाला, त्या वेळी युक्रेनने जॉर्जियाची बाजू घेत रशियाला विरोध केला होता. रशिया किंवा इतर दमनशाही देशांप्रमाणे विरोधकांची गळचेपी, एलजीबीटीक्यू समुदायाची जाहीर निर्भर्त्सना, खोटी कथानके आणि अपप्रचार अशी सारी लक्षणे इवानिश्विली राजवट अनेक वर्षे दाखवू लागली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जॉर्जियातील स्वातंत्र्यप्रेमी आणि अभिमानी जनतेला हे मंजूर नाही. त्यांना साऊथ ओसेटिया आणि अबखाझियाचा हिशेब हवा आहे. त्यासाठी सत्ता हवी आहे. त्यांचे सत्तेत येणे ज्यांना नकोसे वाटते, त्या रशियात इवानिश्विली यांच्या निवडीबद्दल जल्लोष सुरू झाला आहे!