शहजाद पूनावाला
‘काँग्रेस पक्ष कुठल्याही निवडणुकीत हरल्यानंतर त्या पक्षाचा आणि नेतृत्वाचा फुसकेपणा दिसून येतोच, पण त्याहीपेक्षा राहुल गांधींचे आरोप फुसके आहेत’, ‘अनेक चित्रवाणी वृत्तवाहिन्यांनीही या फॅक्ट चेकिंगचे वृत्त प्रसारित केले आणि राहुल गांधी यांच्या ताज्या आरोपाचा पार फज्जा उडाला’, ‘मतदानयंत्रे दोषरहित असतात हे अनेक न्यायालयीन निकालांमधून सिद्ध झाल्यानंतर आता राहुल गांधी यांनी ‘मतदार याद्या’ हा नवा बागुलबोवा शोधून काढलेला दिसतो.’ असे मुद्दे स्पष्टपणे मांडणारा लेख…
राहुल गांधी यांनी ‘अॅटम बॉम्ब’ अशी ओरड करत भारतीय निवडणूक आयोगाच्या विरोधात आणखी एक फुसका आरोप केलेला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्यांमध्ये तथाकथित घोटाळे करण्यात आल्यामुळे मतदारसंख्या फुगली आणि त्याचा तोटा आपल्या पक्षाला झाला, हे राहुल गांधींचे रडगाणे जुनेच असताना आता त्यांनी कर्नाटकातल्या महादेवपुरा या विधानसभा मतदारसंघात १,००,२५० मतदारांची नावे खोटी असल्याचा नवा शोध लावलेला आहे. म्हणे, या मतदारसंघातील मतदारांचे पत्ते खोटे, त्यांची छायाचित्रेही खोटी आणि म्हणून मतदार ओळखपत्रेही खोटीच. हा इतका गंभीर आरोप राहुल गांधींनी केला कसा, तर पत्रकार परिषदेत एक ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’ दाखवून. पण त्यांचा हा बार फारच फुसका आहे. काँग्रेस पक्ष कुठल्याही निवडणुकीत हरल्यानंतर त्या पक्षाचा आणि नेतृत्वाचा फुसकेपणा दिसून येतोच, पण त्याहीपेक्षा राहुल गांधींचे आरोप फुसके आहेत.
राहुल गांधी हे ‘फेक न्यूज’ पसरवत आहेत, असेच म्हटले पाहिजे. पण ही फेक न्यूज पसरवण्यामागे त्यांची पाच टप्प्यांची कार्यपद्धती आजवर दिसून येते. आधी निवडणुकीत सपशेल गटांगळ्या खायच्या, मग काही तरी सबबी शोधून काढायच्या, पण रीतसर तक्रार द्यायचीच नाही, न्यायालयांमध्ये टिकणारे आधारच आरोपांना द्यायचे नाहीत हे चार टप्पे झाल्यावर मग पाचवा टप्पा अर्थातच फेक न्यूज फैलावून गोंधळ माजवून देण्याचा प्रयत्न करणे. हेच आताही सुरू आहे. राहुल गांधी यांचा नवा दावा असा आहे की कर्नाटकात काही मतदारांची नावे मतदार यादीत ज्या मतदार-ओळखपत्र क्रमांकासह नोंदवली गेलेली आहेत, त्याच मतदार-ओळखपत्र क्रमांकावर त्यांचीच नावे लखनऊच्या आणि महाराष्ट्रातल्याही मतदार याद्यांमध्ये नोंदलेली आढळतात म्हणे! ही अशी काही तरी नावे आणि क्रमांक असल्याचे राहुल गांधी सांगतात म्हणून आपला निवडणूक आयोगच घोटाळेखोर आहे असे आपण समजावे, असा राहुल गांधी यांच्या त्या पत्रकार परिषदेचा खटाटोप होता. पण राहुल गांधी यांच्या मुखातून हा आरोप निघाल्या निघाल्या अवघ्या ३० मिनिटांच्या आत आपल्या प्रसारमाध्यमांतील काही जणांनी हा दावा किती खोटा आहे, हे दाखवून दिले. राहुल गांधी यांनी ज्यांची नावे घेतली ते मतदार लखनऊ आणि महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये नाहीतच, हे आपल्या प्रसारमाध्यमांतील काही जणांनी ‘फॅक्ट चेकिंग’चे तंत्र वापरून सिद्ध केलेले आहे. लगोलग अनेक चित्रवाणी वृत्तवाहिन्यांनीही या फॅक्ट चेकिंगचे वृत्त प्रसारित केले आणि राहुल गांधी यांच्या ताज्या-ताज्या आरोपाचा पार फज्जा उडाला… राहुल गांधी यांच्या कोणत्याही सभेचा फज्जा उडतोच, त्याहीपेक्षा जास्त फजिती झाली. जे काही तथाकथित सनसनाटी आरोप राहुल गांधी करू पाहात होते, त्या आरोपांमागच्या कटकारस्थानांचा खेळ खलास झाला. राहुल गांधी यांचा पक्ष निवडणुकीत गोते खाल्ल्यावर कसे अद्वातद्वा आरोप करतो, हेच जगाला दिसले.
याआधी महाराष्ट्रात कधी एक कोटी, कधी ७० लाख तर कधी ४० लाख जादा मतदार आढळल्याचा दावा राहुल गांधी यांनी कोणत्याही वास्तविक आधाराविना केलेला आहे. महाराष्ट्रातील या तथाकथित ‘मत चोरी’बद्दलचे राहुल गांधी यांचे आरोप मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दांत शेरा नोंदवून फेटाळलेले आहेत. तरीही राहुल गांधी स्वत:ला आवर घालत नाहीत. अगदी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाकडूनही, भारतीय लष्कराविरुद्ध आरोप केल्याबद्दल खडे बोल ऐकण्याची वेळ राहुल गांधी यांच्यावर आलेली होती. आजतागायत राहुल गांधी यांचा कोणताही आरोप न्यायालयात सिद्धच झालेला नाही- मग तो राफेलबद्दल असो की सावरकरांच्या माफीबद्दल; पेगॅसस-पाळत प्रकरणाबद्दल असो की ‘हिंडेनबर्ग’ प्रकरणाबद्दल; राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरचा आरोप असो की चीनने आपली भूमी बळकावल्याबद्दलचा… राहुल गांधी यांचा प्रत्येक दावा न्यायालयांमध्ये अग्राह्यच ठरलेला आहे.
काँग्रेस निवडणुका जिंकूच शकत नाही, तेव्हा राहुल गांधी यांचा आरडाओरडा वाढतो. कुठे तरी हिमाचल प्रदेश किंवा तेलंगणासारख्या राज्यांत काँग्रेसला पुरेशा जागा मिळल्या तर निवडणूक आयोगाबद्दल त्यांची काही तक्रार नसते- जणू हा आयोग सद्गुणांचा पुतळाच. पण हरले रे हरले, की आयोग पक्षपाती असल्याची ओरड सुरू. हरियाणात हे असेच सुरू झाले, तेव्हा अनुभवी काँग्रेसनेत्या सेलजा कुमारी यांनी पक्षाचा पराभव पक्षाच्याच चुकांमुळे झाल्याचे मान्य करण्याचा मोठेपणा तरी दाखवला. पण राहुल गांधी मात्र कधी आत्मपरीक्षण करताना दिसले नाहीत. त्यांची आरडाओरड ही खरे तर काँग्रेसने गेल्या काही वर्षांत मतदान-यंत्रांवर दोषारोप करण्याचा सपाटा लावला होता त्याचीच आठवण देणारी आहे. मतदानयंत्रे दोषरहित असतात हे अनेक न्यायालयीन निकालांमधून सिद्ध झाल्यानंतर आता राहुल गांधी यांनी ‘मतदार याद्या’ हा नवा बागुलबोवा शोधून काढलेला दिसतो.
पण आयोगाने मागितल्याप्रमाणे पुरावे देण्यास टाळाटाळ करणे, हा राहुल गांधी यांच्या वर्तनातला विचित्रच म्हणावा असा भाग ठरतो. कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना ‘लोकप्रतिनिधित्व कायदा- १९५१’ प्रमाणे जे काही आरोप आहेत ते शपथपत्रात नमूद करा असे सांगितले, पण राहुल गांधींचा तोरा असा की मी उच्चारलेला शब्द म्हणजे शपथपत्रच! हा केवळ अहंकारच नव्हे, तर कोणतीही जबाबदारी टाळण्याचा जाणूनबुजून केलेला प्रयत्न यामागे दिसतो. जर राहुल गांधी यांच्या आरोपांमध्ये तथ्य असते, तर पत्रकार परिषदेचा घाट घालण्याची काही गरजच नव्हती- थेट न्यायालयाला पुरावेच सादर करता आले असते.
राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर केलेले आरोप केवळ निराधारच नसून ते धोकादायकसुद्धा आहेत. राहुल गांधी हे त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ‘गंभीर परिणामां’ची धमकी देतात, तेव्हा ते ‘आणीबाणी’च्या काळात आपल्या कुटुंबीयांच्या सत्ताकांक्षेसाठी लोकशाही संस्थांना पायदळी तुडवणाऱ्या हुकूमशहांसारखीच भाषा करत असतात. इंदिरा गांधी यांची जी मानसिकता आणीबाणीच्या कालखंडात दिसली होती, तीच राहुल गांधी पुढे नेत आहेत, असे म्हणावे लागते. बहुधा राहुल गांधी यांना घटनेच्या राज्यापेक्षा घराण्याचे राज्यच अधिक महत्त्वाचे वाटत असावे.
अर्थात, राहुल गांधी यांच्या या ताज्या आरोपांतून एक गोष्ट मात्र ‘अनवधानाने’ का होईना, अत्यंत स्पष्ट होते; ती म्हणजे बिहारमध्ये निवडणूक आयोगाने मतदार याद्यांची ‘सर्वंकष फेरतपासणी मोहीम’ (स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन- एसआयआर) हाती घेतली, तशीच मोहीम देशभर राबवण्याची गरज आहे. या ‘एसआयआर’लाच तिकडे बिहारमध्ये काँग्रेसच्या मित्रपक्षातले तेजस्वी यादव विरोध करत आहेत. नाही तरी राहुल गांधीसुद्धा अशा याद्यांमध्ये मतदारांची बनावट नावे असल्याचा किंवा काही मतदारांची नावे एकापेक्षा जास्त वेळा असल्याचा आरोपच तर करतात… म्हणजे एक प्रकारे, तेसुद्धा या याद्यांच्या फेरतपासणीची गरजच व्यक्त करतात, जी निवडणूक आयोगाने आधीच ओळखलेली आहे आणि बिहारमध्ये अनेक नावे वगळलेलीही आहेत. बहुतेक राहुल गांधींना, आपलेच मित्रपक्ष काय म्हणताहेत हे नीटसे समजत नसावे. खुद्द तेजस्वी यादव यांनी अलीकडेच बिहारमध्ये स्वत:ची दोनदोन मतदार- ओळखपत्रे भर पत्रकार परिषदेत दाखवली होती. पण निवडणूक आयोगाने तपशील मागितला तेव्हा हे यादवसुद्धा थंड पडले होते. या सगळ्यांना मतदार याद्यांची इतकी काळजी असेल, तर उलट निवडणूक आयोगाच्या ‘सर्वंकष फेरतपासणी मोहिमे’ला त्यांनी मदत करायला हवी- त्याऐवजी हे लोक आयोगावरच शंका घेतात.
जाता जाता, राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षासाठी गालिबचा एक शेर नमूद करायला हवा.
‘ता उम्र ़गालिब ये भूल करता रहा।
धूल चेहरे पे थी, ़गालिब आईना साफ करता रहा।।’