अतुल सुलाखे

कमालीची स्वतंत्र वृत्ती हा विनोबांच्या विचारांचा विशेष होता. निर्भयता, स्वतंत्रता आणि त्याला उचित जोड म्हणून अहिंसा अशी सांगड त्यांच्या व्यक्तित्वात दिसते.

देशाला स्वातंत्र्य मिळाले त्याच्या पाच महिने अगोदर त्यांनी स्वातंत्र्याचा अर्थ सांगणारा छोटेखानी पण मूलगामी लेख लिहिला होता. त्या लेखात ते म्हणतात, ‘‘.. दुसऱ्याची सत्ता आपल्यावर चालू नये एवढय़ापुरती स्वतंत्रतेची प्रीति हा मोठासा गुण च नाहीं; पशूंतहि तो आढळणारा आहे. आपलीहि सत्ता दुसऱ्यावर चालू नये असें ज्याला वाटत असेल, तो स्वतंत्रतेचा खरा उपासक आहे. आणि त्याचा तो एक मोठा गुण म्हणतां येईल.

पण हा गुण अजून मानवांत रुजलेला नाहीं. किंबहुना याच्या उलट गुण रुजलेला आहे असें म्हणावें लागतें. दुसऱ्याची सत्ता माझ्यावर चालूं नये आणि शक्य तर माझी सत्ता दुसऱ्यावर घालावी, अशी च अजून मानवाची वृत्ति आहे. मानव-हृदयाला ती पटणारी आहे असा अर्थ नाही. कारण आपली सत्ता कोणावरहि न चालवणाऱ्या थोर पुरुषांविषयीं माणसाला आदर वाटतो. पण तो ‘थोर’ पुरुष म्हणविला जातो, ‘सामान्य’ पुरुष म्हणविला जात नाही. सामान्य पुरुषच तो, असें व्हायला हवे आहे. ती स्थिति आज नाहीं.

माझ्यावर कोणाची सत्ता असूं नये, आणि शक्य तर माझी दुसऱ्यावर असावी, ही आजची स्वतंत्रतेची वृत्ति आहे. त्या वृत्तीचा पूर्वार्ध सिद्ध करण्याचा कोणाचा कार्यक्रम चालू असतो, तेव्हां त्याविषयीं लोकांना साहजिक च सहानुभूति वाटते. सदर वृत्तीच्या उत्तरार्धाचा कार्यक्रम सुरू होतो तेव्हां ती सहानुभूति निघून जाते.

स्वतंत्रतेचा शुद्ध अर्थ खरोखर आपणास किती प्रिय आहे हे दरेकानें आंतून तपासून घेतलें पाहिजे..’’

स्वातंत्र्याचा हा अर्थ तपासून पाहण्याची समाजाची आजही हिंमत नाही. उलट उत्तरोत्तर आपल्याला अडचणीच्या वाटणाऱ्या समूहांना दाबून टाकण्याची आपली वृत्ती आहे. हे दबलेले समूहदेखील संधी मिळताच त्याच मार्गाचा अवलंब करतात. गीतेच्या परिभाषेत बोलायचे तर ही आसुरी संपत्तीची लक्षणे आहेत.

गीतेचा सोळावा अध्याय हा आसुरी संपत्तीचा वेध घेणारा आहे. गीता प्रवचनांमध्ये विनोबांनी या आसुरी संपत्तीची अत्यंत नेमकी मांडणी केली आहे. कुटुंब, जात, धर्म, देश आणि विविध देशांमधील असूया यांच्या मुळाशी असणारी दमन करण्याची वृत्ती ही स्वतंत्रतेला तिलांजली देणारी आहे. विनोबांची ही शोधक वृत्ती, आपण ज्या मूल्यांना आदरणीय मानतो ती आपल्याला किती खोलवर समजली आहेत याची झडती घेते.

हे चिंतन, विनोबा केवळ तात्त्विक पातळीवर ठेवत नाहीत. रोजच्या जगण्यात ही मूल्ये कशी आणायची याबद्दलही ते मार्गदर्शन करतात, फक्त आपल्याला त्यांचा उपदेश झेपत नाही. परंतु स्वातंत्र्य आणि रोजचे जगणे यांचा मेळ त्यांनी कसा घातला ते पाहिले तर किमान विचारचक्र तरी सुरू होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

jayjagat24 @gmail.com