धर्माचा अतिरेक केला तर केवळ विनाशच होणार नाही तर आपण पुन्हा पारतंत्र्यात जाण्याची शक्यता आहे, ही भीती बाबासाहेब व्यक्त करतात..

संविधानसभेच्या पूर्ण कामकाजाच्या दरम्यान अनेक भाषणे झाली. मूलगामी बदल सुचवणारे युक्तिवाद झाले. यातील दोन भाषणे प्रमुख आहेत: जवाहरलाल नेहरू यांचे १३ डिसेंबर १९४६ रोजीचे भाषण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे २५ नोव्हेंबर १९४९ रोजीचे भाषण. संविधानाची उद्देशिका सादर करताना नेहरूंनी भारताची दिशा काय असावी, हे स्पष्ट केले तर आंबेडकरांनी या दिशेने जातानाचे धोके शेवटच्या भाषणात सांगितले. बाबासाहेबांचे हे भाषण स्वतंत्र भारताच्या वाटचालीत सावधानतेचा इशारा देणारे आहे. आज या इशाऱ्याचे महत्त्व अधिकच आहे. बाबासाहेबांच्या भाषणात चार प्रमुख मुद्दे होते:

(१) अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तींची सांविधानिक नैतिकता निर्णायक आहे- संविधान कितीही चांगले असले तरी ते राबवले कसे जाते, हे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. केवळ तरतुदी योग्य असून उपयोगाचे नसते, त्यांची अंमलबजावणी करणारे हात सदसद्विवेकबुद्धीचा उपयोग करतात का, हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळेच नैतिकतेने वागणे बाबासाहेबांना अपेक्षित आहे. नैतिकता ही सापेक्ष बाब आहे म्हणूनच बाबासाहेब संवैधानिक नैतिकतेचा आग्रह धरतात. बाबासाहेबांना सांविधानिक मूल्यांना अनुसरूनच राज्यकर्त्यांचे नैतिक वर्तन अभिप्रेत आहे.

(२) जात किंवा धर्माला राष्ट्राहून अधिक महत्त्व देणे घातक ठरेल- इतिहासाचे अनेक दाखले देत बाबासाहेब सांगतात की जात किंवा धार्मिक समूहाला अधिक महत्त्व दिले तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल. देशाचे नुकसान होईल. मानवतेसाठी ते अहितकारक ठरेल. ‘अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ या पुस्तकात बाबासाहेब म्हणतात की जात राष्ट्रद्रोही आहे. धर्माचे विशिष्ट प्रमाणात महत्त्व आहे; पण राष्ट्रापेक्षा अधिक महत्त्व धर्माला दिले गेले तर विनाश अटळ आहे. धर्माचा अतिरेक केला तर केवळ विनाशच होणार नाही तर आपण पुन्हा पारतंत्र्यात जाण्याची शक्यता आहे. बाबासाहेब ही भीती व्यक्त करतात. यातून बाबासाहेबांचे द्रष्टेपण सहज लक्षात येते.

(३) विभूतीपूजा हा हुकूमशाहीकडे नेणारा रस्ता आहे- आयरिश देशभक्त डॅनियल ओकोनेल यांचा दाखला देत बाबासाहेब म्हणतात, आपल्या प्रतिष्ठेचा बळी देऊन कोणा व्यक्तीला सर्वस्व वाहून देण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे देशाने स्वातंत्र्य गहाण ठेवून आपला विवेक एका व्यक्तीच्या चरणी अर्पण करता कामा नये. धर्मामध्ये भक्ती हा आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग आहे मात्र राजकारणात भक्ती हा लोकशाहीच्या अध:पतनाचा रस्ता आहे. या रस्त्याचे अंतिम ठिकाण आहे हुकूमशाही. महाभारतामध्ये जसे ‘यदा यदा हि धर्मस्य’ म्हणताना धर्माला ग्लानी येईल तेव्हा अवतारी पुरुष येऊन धर्म वाचवेल, असे सांगितले जाते. अगदी तसेच आपल्याला एखादा अवतारी पुरुष देशाचे भवितव्य बदलेल, असे वाटत असेल तर ते घातक आहे. देशाचे भवितव्य एका व्यक्तीच्या हातात नाही तर प्रत्येकाच्या हाती आहे.

(४) सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे खडतर आव्हान भारतासमोर आहे- बाबासाहेबांनी म्हटले, ‘‘उद्यापासून एका विरोधाभासी जगामध्ये आपण प्रवेश करतो आहोत, जिथे राजकीय लोकशाही असेल; मात्र सामाजिक आणि आर्थिक लोकशाही नसेल.’’ ‘एक व्यक्ती-एक मत’ आणि ‘एक मत-एक मूल्य’ हे राजकीय लोकशाहीचे तत्त्व आहे; मात्र सर्वाना समान प्रतिष्ठा नाही. आर्थिक विषमता मोठय़ा प्रमाणावर आहे. तेव्हा लोकशाही सर्व अंगांनी रुजवण्याचे आव्हान देशासमोर आहे.

प्रवासाची सुरुवात करताना काय खबरदारी घ्यावी, हे सांगितले जाते. तसेच देशाच्या प्रवासात कोणती खबरदारी घ्यायची, हे बाबासाहेबांनी सांगितले. संविधान स्वीकारण्याच्या पूर्वसंध्येला बाबासाहेबांनी दिलेला सावधानतेचा इशारा समजून घेऊन प्रत्येकाने कृती केली तर होऊ घातलेला अनर्थ टळू शकतो आणि संविधानाच्या प्रकाशाने प्रत्येकाचे अंगण उजळू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– डॉ. श्रीरंजन आवटे