‘‘हे बघ संजय, आपला अडीच वर्षांचा कार्यकाळ वेगळा होता. तेव्हा तुझा हट्ट चालवून घेतला असता, आता शक्य दिसत नाही. एक व्यक्ती एक पद असे मी आधीच घोषित केले असताना तू दोन्हीसाठी आग्रह का धरून बसलाय? काय युक्तिवाद करू मी त्या देवाभाऊसमोर?’’ हे ऐकताच एकनाथरावांसमोर बसलेल्या शिरसाटांचे डोळे चमकले. आता हीच संधी आपले म्हणणे जोरकसपणे मांडण्याची असे मनाशी ठरवून ते बोलू लागले.

‘‘साहेब, पदांबाबतची तुमची भूमिका मान्य पण मी मात्र तसे समजत नाही. माझ्याकडे तुम्ही सामाजिक न्याय खाते सोपवले. सिडकोकडेसुद्धा मी सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातूनच बघतो. परवडणारी घरे उपलब्ध करून देणे, त्या घरांचे उपनगर तयार करणे हा सामाजिक न्यायाचाच एक भाग आहे. खोटे वाटत असेल तर केंद्र सरकारने नुकत्याच प्रसारित केलेल्या जाहिराती बघा. त्यात सामान्यांना घरे बांधून देणे हाच सामाजिक न्याय असल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले. जे स्वप्न मोदीजींनी केंद्रात बघितले तेच मी राज्यात बघतो. त्यामुळे मंत्रीपद व सिडकोचे काम एकच अशी माझी ठाम धारणा आहे. सिडकोने गोरगरिबांच्या कल्याणाचा विचार करावा असे मला वाटते. (शिंदे आश्चर्याने त्यांच्याकडे बघतात). केवळ मुंबई वा नवी मुंबईचा विचार न करता आमच्या मागास मराठवाड्यात सिडकोने काम करावे यासाठी मी प्रयत्नशील आहे.

हेही वाचा >>> तर्कतीर्थ विचार : धर्मनिर्णय पद्धती व समाजहित

गेली अडीच वर्षे मी मंत्रीपदापासून दूर राहिलो. त्यामुळे कामाचा मोठा अनुशेष निर्माण झाला. तो भरून काढायचा तर ‘डबल इंजिन’ चालवण्याची संधी मला मिळालीच पाहिजे. सिडकोने केवळ शहरी मध्यमवर्गाकडे न बघता ग्रामीण भागातील शोषित, पीडितांकडेही बघावे, त्यांनाही निवारा द्यावा याच उदात्त हेतूने मी कामाला लागलोय. अनेक मंत्री त्यांच्या खात्याच्या अधीनस्थ असलेल्या मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तशीच व्यवस्था तुम्ही माझ्यासाठी करून द्या. सिडको नगरविकास खात्यात येते. तिथून ते काढून सामाजिक न्याय खात्याला जोडून द्या. (शिंदे चमकतात). तसेही तुमच्याकडे भरपूर महत्त्वाची खाती आहेत. गृहनिर्माणसुद्धा नव्याने आले आहे. सिडको माझ्याकडे वळते केले तर तुमच्याही कामाचा भार थोडा हलका होईल. सिडकोचे अध्यक्षपद लाभाचे अशी ओरड काही लोक करत असले तरी त्यात तथ्य नाही. मी त्या पदासाठीचे साधे मानधनसुद्धा घेत नाही. गरजूंना गृहनिर्माणसाठी भूखंड देणे, ते करताना कायद्याचे पालन करणे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामान्यांना सोयीसुविधांच्या माध्यमातून ‘न्याय’ कसा मिळेल हे बघण्याचेच काम आजवर मी केले व पुढेही करेन. तुमच्यासोबत आलो तेव्हापासून माझ्या हिताचा विचार कधीच केला नाही. ती जबाबदारी तुमच्यावर सोडून निर्धास्त झालो. आता मला मोकळेपणाने समाजाची फक्त सेवा करायची आहे. सिडकोला संपूर्ण राज्यभरात लोकप्रिय करायचे आहे. एकाच वेळी दोन दोन ‘जबाबदाऱ्या’ सांभाळण्याची आमच्या मराठवाड्याची रीतच आहे. त्यामुळे माझ्यावर कसलाही ताण येणार नाही याची हमी मी देतो. तुम्ही फक्त या दोन्ही जबाबदाऱ्या एकाच पद्धतीच्या एवढे त्यांना पटवून द्या’’ हे ऐकून एकनाथरावांचा चेहरा खुलला. आताच जातो देवाभाऊंकडे असे म्हणत ते निघाले. दोन तासांनंतर त्यांनी फोन केला.‘‘संजय, तुला एक जबाबदारी सोडावी लागेल. तो राजीनामा देणार की हकालपट्टी करू असा दमच त्यांनी दिलाय.’’ हे ऐकून ‘ती’ अडीच वर्षे किती चांगली होती असे म्हणत शिरसाट राजीनामा लिहायला बसले.