‘पक्षाच्या कार्यालयात कुणी येऊन लिफाफा टाकून निघून गेले. तो उघडला तर त्यात दहा कोटींचे निवडणूक रोखे होते’ हे नितीशकुमारांच्या जदयूने दिलेले स्पष्टीकरण प्रसिद्ध होताच दिल्लीतील राजकीय सल्लागारांचे कान टवकारले. प्रमुख पक्षांना आर्थिक सल्ला देणाऱ्यांनी लगेच एकमेकांना फोनाफोनी करून कनॉट प्लेसला भेटायचे ठरवले. ‘रोख्यांच्या या सर्वोच्च संकटातून पक्षांना साळसूदपणे बाहेर काढायचे असेल, तर चर्चा हवीच, असे म्हणत तातडीने सारे जमले. मतदारांना रोख्यांमागची गडबड कळायच्या आत त्यांच्यावर याच पद्धतीच्या स्पष्टीकरणाचा मारा करायचा असे सर्वानुमते ठरल्यावर मग एकेकाची प्रतिभा प्रसवू लागली.
पहिला म्हणाला, ‘पक्षाध्यक्षांच्या नातवाचा वाढदिवस होता. त्याला राजकीय व उद्योग क्षेत्रातील गणमान्य हजर होते. भेटवस्तूंत एका पुडक्यात शंभर कोटींचे रोखे निघाले. कागद समजून नातू ते फाडायला निघाला होता पण साहाय्यकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला. त्या पुडक्यावर कुणाचेही नाव नव्हते.’ हे ऐकताच साऱ्या सल्लागारांनी टाळय़ा वाजवल्या. दुसरा म्हणाला, ‘पक्षविस्तारासाठी सतत हवाई दौरे करणाऱ्या पक्षाध्यक्षाने हेलिकॉप्टर एका उद्योग समूहाच्या हेलिपॅडवर उतरवले व जाहीर सभेसाठी रवाना झाले. परत आले तेव्हा त्यांच्या सीटवर एक पाकीट दिसले. कुणाचे तरी निवेदन असेल म्हणून त्यांनी ते साहाय्यकाकडे दिले. ते फोडले तेव्हा त्यात एकेक कोटीचे ५० रोखे होते. तेव्हा सारे काही कायदेशीर असल्याने पक्षाध्यक्षांनी मनातल्या मनात त्या उद्योगाचे आभार मानले’ हे ऐकताच ‘वा मस्त’ असे सर्वच जण म्हणाले.
‘इतरांपेक्षा काही तरी वेगळे करू’ असे म्हणत अध्यक्षांनी १० कोटी सदस्यांकडून १०० ते हजारापर्यंतची देणगी गोळा केली आहे. जमा झालेला निधी त्यांनी काही उद्योगांना दिला न त्यातून रोखे खरेदी करून ते पक्षाला द्या अशी विनंती केली. या सहृदयतेने भारावलेल्या उद्योगांनी तात्काळ रोखे दिले. त्यातल्या काहींनी तेवढीच पदरची रक्कम टाकून जास्तीचे रोखे देण्याचा प्रयत्न केला पण अध्यक्षांनी अगदी विनयाने त्याला नकार दिला.’ हे ऐकताच सारे आनंदले. मग चौथा म्हणाला, ‘आमचे पक्षप्रमुख एका उद्योग परिषदेत भाषण करायला गेले. ते इतके उत्कृष्ट बोलले की भाषण संपताच तीन मोठय़ा उद्योगपतींनी त्यांना मिठीच मारली. घरी परतल्यावर त्यांनी जॅकेट काढले तर त्यांच्या दोन्ही खिशांत दीडशे कोटीचे रोखे असलेले लिफाफे मिळाले. केवळ या योजनेमुळेच एका भाषणाची किंमत इतकी वाढू शकली, असे म्हणत त्यांनी सरकारचे आभार मानले.’ योगायोगाची किनार असलेली व साळसूदपणाचा आविष्कार असणारी ही स्पष्टीकरणे ऐकून सारे सल्लागार खूश झाले.
‘चला, निघाला मार्ग न्यायालयीन निकालावर. यावर देशातली भाबडी जनता निश्चितच विश्वास ठेवेल व यात काहीही गैर नाही अशी धारणा निश्चित बाळगेल’ या शब्दांत एकाने समारोप करताच सारे आपापल्या पक्षाध्यक्षांना सल्ला देण्यासाठी तातडीने रवाना झाले.