‘‘आज भारतात सामान्य नागरिकांपुढे किती तरी राजकीय पक्ष आणि तत्त्वप्रणाली सैनिकाचा आदर्श ठेवत आहेत. भाषा, धर्म, राज्य अशा कुठल्या ना कुठल्या ध्येयासाठी नागरिकाने सैनिक बनलं पाहिजे आणि आपलाही पेशा लष्करी असल्याप्रमाणे गणवेश घालून रस्त्यावर कवायत करणारे नागरिक आम्हाला रोज दिसून येतात. या लढाऊ भूमिकेचं आपल्याला का बरं एवढं आकर्षण वाटतं? सामान्यपणे याचं उत्तर असं दिलं जातं की आपल्यामध्ये शिस्त बाणायला हवी. पण फक्त सैनिकालाच शिस्त लागते असं नाही. शास्त्रज्ञ, वास्तुशास्त्रज्ञ, कलावंत या साऱ्यांनादेखील शिस्त हवीच की. मग सैनिकच कोण एवढा लागून गेला? … याचं उत्तर असं की सैनिक विचार करीत नाही.

सैनिकांनी विचार करावा अशी अपेक्षाही नसते. सैनिक सज्ज असतो तो फक्त दुसऱ्यांनी दिलेले हुकूम पाळण्यासाठी. सैनिक एक स्वतंत्र व्यक्ती राहत नाही. तो एका यंत्रणेचा भाग बनतो. तो बोलत नाही, फक्त आज्ञा पाळतो. कवायतीतील हालचालीसुद्धा अगदी इतरांसारख्याच करायच्या असतात. वेगळेपणा उठून दिसणारे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व याला तुकडीत जागाच नसते. भाषासुद्धा यांत्रिक होऊन जाते. एक बटण दाबा पलटण थांबते, दुसरे दाबा ती सलाम ठोकते, तिसरे दाबा ती एका मेळाने कूच करते. आपली स्वत:ची भाषा अर्थपूर्णतेने वापरण्याची जबाबदारी जणू कोणावर नाहीच…’’

एक भारदस्त, सुस्पष्ट मराठी उच्चार असलेल्या आवाजातून हे शब्द बाहेर पडत होते. लोक अक्षरश: जीवाचा कान करून हे सगळं ऐकत होते. १९९७च्या जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला तेव्हाच्या अहमदनगरात भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन गिरीश कर्नाड यांच्या हस्ते झालं होतं. त्यावेळचं ते भाषण. मंडपात विलक्षण स्तब्धता. समोर हजारोंचा समूह श्वास रोखून ऐकत होता. पार्श्वभूमी होती बाळासाहेब ठाकरे यांनी पु. ल. देशपांडे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची. शिवसैनिक संमेलनात गोंधळ घालणार अशीही चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर उद्घाटन समारंभावरही एक सावट होतं.

गिरीश कर्नाड यांनी आरंभी मराठी- कन्नड सांस्कृतिक अनुबंधाला उजाळा दिला. मराठीला असलेली विनोदाची परंपरा कन्नड भाषेत नाही. खेरीज आधुनिक कर्नाटकात निष्ठावंत अशा सामाजिक, राजकीय विचारवंतांच्या परंपरेचा अभाव आहे. ही दोन निरीक्षणं त्यांनी नोंदवली. त्यानंतर सुरू झाला एक ठाम प्रतिपादनाचा प्रवाह. नीरव शांततेत फक्त वाहत्या पाण्याचा आवाज ऐकू यावा तसा एक घनगंभीर नाद. समाजाचंच जणू सैनिकीकरण करण्याचं काम चाललंय असा या प्रतिपादनाचा मुख्य गाभा. माणसांना माणूस असण्यापेक्षा यंत्र असणं अधिक आवडत असेल तर मग नक्कीच कुठेतरी मोठा गोंधळ आहे हे स्पष्ट करताना जणू एका शल्य विशारदाने आजूबाजूच्या पर्यावरणाचं सूक्ष्मपणे विच्छेदन करत आजच्या काळाचा आरसा दाखवावा असं जाणवत होतं. कुणीतरी भयंकराच्या सावल्यांची ओळख करून देत आहे असं वाटत होतं.

अशावेळी समाजात सगळे मनोव्यापारसुद्धा यांत्रिकपणे घडवले जातात. ‘ते’ विरुद्ध ‘आम्ही’ असा तो प्रचार असतो. ‘आपण’ नेहमी बरोबरच असतो, ‘ते’ नेहमीच चुकत असतात. अर्थात ‘त्यांना’ शिक्षा देऊनच आपले विचार मान्य करायला भाग पाडायचं असतं. ही सर्वनामं बहुवचनी असतात. बहुवचनानं हिंसा सोपी होऊन जाते. असं कर्नाड बोलत होते. साहित्य, कला, इतिहास, धर्म, संस्कृती अशा सर्वच गोष्टींना स्पर्श करत त्यांचं हे भाषण त्या संमेलनासाठी अक्षरश: कळसाध्याय ठरलं. मंचाच्या बाजूस या भाषणाची हस्तलिखित झेरॉक्स प्रत होती. गर्दीत घुसून मिळवलेली ती प्रत आजही संग्रही आहे. आवश्यक त्या ठिकाणी केलेल्या दुरुस्त्या, बदल त्या प्रतीवर दिसून येतात. भाषणावर मात्र या खडाखोडीचा कुठेच परिणाम नव्हता.

गिरीश कर्नाड या नावाबद्दल मराठी माणसांच्या मनात एक आस्थेचा कोपरा आहेच. माथेरानचा जन्म, प्राथमिक शिक्षण मराठीतून, मराठी नाटकांचे संस्कार, अगदी ‘उंबरठा’ वगैरेसारख्या सिनेमातलं काम, ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्या आधी हा पुरस्कार विजय तेंडुलकर यांना मिळायला हवा होता असं त्यांचं विधान, आई-वडिलांमुळे मराठी नाट्यपरंपरा हा मला माझा व्यक्तिगत वारसा वाटत आला आहे असं त्यांनी अनेकवार नमूद केलं आहे. त्यांच्या वडिलांनी मूळचं ‘शारदा’, ‘संशयकल्लोळ’ पाहिलं होतं. पोरसवदा वयात आपण बालगंधर्वांसारखं बोटांच्या टोकाभोवती पदर गुंडाळून कशी गाणी गात अनुकरण करत असू हे कर्नाड यांच्या आईनं त्यांना कित्येकदा करून दाखवलेलं. अशा अनेक गोष्टी मराठी माणसांना त्यांच्याशी जोडून घेण्यास कारणीभूत ठरणाऱ्या आहेत. पण त्याचवेळी कोकणी, कन्नड, मराठी हा भाषेचा वारसा जपत इंग्रजीवरचं विलक्षण प्रभुत्व, तर्काच्या आधारे प्रतिपादनातला ठोसपणा, पुराणं, मिथकं, लोककथा यांच्या आधारे वेगवेगळ्या नाटकांतून उभारलेल्या कथावस्तू अशा अनेक बाबी कर्नाड यांच्यातलं असामान्यत्व सिद्ध करतात.

इंग्रजी कविता लिहायच्या आणि लोकप्रिय कवी व्हायचं असं कर्नाड यांचं स्वप्न होतं. प्रत्यक्षात ते नाटकाकडे वळले. वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी लिहिलेलं ‘ययाती’सारखं नाटक. त्यानंतर तुघलक, हयवदन, बली, नागमंडल, तलेदंड, अग्नी आणि वर्षा, वेडिंग अल्बम अशी अनेक नाटकं त्यांनी लिहिली. कन्नडमधून ती भारतीय भाषांसह जगभरातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली, रंगमंचावर आली. मिथकांचा त्यांनी केलेला वापर, पुराणातील कथाबीजांमधून विस्तारलेले कल्पनाबंध आणि त्याला दिलेला आधुनिकतेचा संदर्भ यामुळे त्यांची नाटकं भलेही पुराणकथातल्या एखाद्या सूत्रावर बेतलेली असतील, पण या नाटकांचं समकालीन असणं कुणालाही नाकारता येत नाही. ‘तुघलक’ हे नाटक एका राजाच्या चरित्राचं शब्दांकन करत नाही तर ते सत्तेचंच चरित्र रेखाटतं. त्यामुळेच धर्मवीर भारती यांचं ‘अंधायुग’ आणि कर्नाड यांचं ‘तुघलक’ ही नाटकं अभिजात तर आहेतच, पण आधुनिकही आहेत. ‘हयवदन’मध्ये सुद्धा स्त्री-पुरुष संबंधांतील ताणतणाव, विखुरलेपण या गोष्टी येतात. आधुनिक मानवी जीवनातील संबंधांतले पेच, त्याचबरोबर प्रेमभावनेलाही समजून घेण्याचा प्रयत्न या नाटकातून केला गेला आहे. ‘नागमंडल’ या नाटकात पती-पत्नी यांच्यातल्या संबंधांत प्रतीकं आणि प्रतिमांचा खेळ अद्भुत दाखवला आहे. त्यांच्या नाटकात परंपरा आणि आधुनिकता, शास्त्रीय आणि लोक या संकल्पना बेमालूमपणे मिसळलेल्या दिसतात. त्याचबरोबर परंपरा आणि आधुनिकतेचा संघर्षही दिसून येतो. ही नाटकं इतिहासातल्या काळाचा एक तुकडा घेतात, तेवढाच तुकडा अनेक उपकथानकांच्या माध्यमातून प्रकाशमान करतात. कर्नाड यांची काही नाटकं आधुनिक परिवेशात अवतरतात. काटेसावरी, वेडिंग अल्बम या नाटकांतून बदलती कुटुंबव्यवस्था, मानवी स्वभावाचे पैलू, नात्यातील गुंतागुंत समोर येते. नाटक, चित्रपट या क्षेत्रातलं काम, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या असं अत्यंत गुंतागुंतीचं त्यांचं जीवन समजून घेण्यासाठी ‘आडाडता आयुष्य’ हे आत्मकथन उपलब्ध आहे. कर्नाड वेळोवेळी प्रश्न विचारत राहिले, भूमिका घेत राहिले. त्यासाठीची किंमतही त्यांनी मोजली.

…तर गोष्ट सैनिकीकरणाची. कर्नाड यांनी त्या वेळी आपल्या भाषणाचा शेवट एका बोधकथेने केला होता. चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांना ही कथा चार्ली चॅप्लिनच्या पुस्तकात मिळाली, ती कर्नाडांनी अधोरेखित केली.

‘‘एका राजकीय कैद्याला मृत्यूची सजा झाली होती. त्याच्या फाशीसाठी गोळीबार पथक तयारीत उभं होतं. या पथकात किमान दहा जण असतात. त्यामुळे या कृत्याचं उत्तरदायित्व व्यक्तिश: आपल्यावर आहे अशी अपराधी भावना कोणालाही वाटत नाही. शिक्षेच्या तहकुबीची आशा होती, त्यामुळे पथकाचा मुख्य अधिकारी तहकुबीचा हुकूम घेऊन येणाऱ्या जासुदाची अधीरतेने प्रतीक्षा करत होता. परंतु जासूद आला नाही. नेमलेल्या वेळी अधिकाऱ्याने आज्ञा केली, ‘‘तैय्यार’’ आणि वंगण दिलेल्या यंत्राप्रमाणे पथकाने एकसाथ रायफली सज्ज केल्या. अधिकाऱ्याने पुढे फर्मावले, ‘‘नेम धरा.’’ पुन्हा तितक्याच यांत्रिक सफाईने सर्वांनी नेम धरला.

अकस्मात क्षितिजावर एक स्वार दिसला. जिवाच्या कराराने तो आपल्या हातातला तहकुबीचा हुकूम फडकावून दाखवत होता. त्याला पाहताच आनंदाने हुरळलेला अधिकारी ओरडला, ‘‘थांबा’’ आणि यांत्रिक सफाईने पथकाने एक साथ गोळ्या झाडल्या. ही नुसती कथा नाही. आपण सजग राहिलो नाही तर आपल्या समाजाचे भविष्यात काय होईल याचं हे नेमकं चित्र आहे.’’ कथा संपली. संपूर्ण मंडपात टाळ्यांचा कडकडाट किती तरी वेळ सुरूच होता. पण कथा खरंच संपलीय?

…असं वाटतं की ती कुठल्याही काळात सुरू होऊ शकते.