श्री-सूक्त तसेच मंत्रोच्चारामुळे सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होते असा दावा केल्यामुळे राज्यभर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या कांचनताई १५ दिवसांनी विदर्भातील शेतीच्या पाहणीसाठी निघाल्या तेव्हा माध्यमवीरांचा मोठा ताफा त्यांच्या मागेपुढे होता. शेताची दृश्ये बघून त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पुजारी सोयाबीनच्या पिकावर मंत्रांचा वर्षाव करत आहेत व शेतकरी भक्तिभावाने हात जोडून उभा आहे हे बघून ताईंचा ऊर भरून आला. शेवटी लागले एकदाचे प्रयत्न सार्थकी असे म्हणत त्या एका शेतात गेल्या तर तिथे क्षणात शेकडो शेतकरी गोळा झाले. त्यांना बघून उल्हसित झालेल्या ताईंनी ‘ओम हिरण्यवर्णाम हरीनीम सुवर्णरजतस्त्र जाम’ ही श्री-सूक्ताची पहिली ओळ सुरात म्हणताच सोयाबीनची झाडे शहारल्याचा भास सर्वांना झाला.
माणसांपेक्षा उंच झाडे बघून माध्यमांनी शेतकऱ्यांना मागे ढकलत झाडांचे चित्रीकरण सुरू केले. नंतर ताई पुढे निघाल्या तेव्हा प्रत्येक शेतात फाटका शेतकरी व भरजरी वस्त्रातला पुजारी असेच दृश्य ठिकठिकाणी दिसले. अकोल्याच्या वेशीवर त्या पोहचल्या तर तिथे खुद्द कुलगुरू शरद गडाख व त्यांचे शास्त्रज्ञ उभे. तेही पुजाऱ्यांच्या वेशात. त्यांनीही मंत्र म्हणून ताईंचे स्वागत केले. ‘आम्हाला जमले नाही ते तुमच्या मंत्राने करून दाखवले. यंदा सोयाबीनचे बंपर पीक येणार, शेतकरी आत्महत्या थांबणार’ असे गडाख म्हणताच सर्वांनी ताईंच्या नावाने जयजयकार केला. त्या परतीच्या प्रवासाला निघाल्या तेव्हा एकेक वार्ता त्यांच्या कानावर आदळत होत्याच. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाणाऱ्या पुजाऱ्यांचे मानधन सरकार देणार, श्री-सूक्ताची पुस्तिका छापून ती शेतकऱ्यांना मोफत वाटणार, टंचाई लक्षात घेऊन नवे पुजारी तयार करण्यासाठी विभागवार ‘वेदशाळा’ सुरू करणार. हे सरकारी निर्णय ऐकून त्या सुखावल्या. तेवढ्यात त्यांना कृषीशास्त्रज्ञ सी.डी. मायी रस्त्यात उभे दिसले. त्यांना सन्मानाने वाहनात बसवून घेतल्यावर ते भरभरून बोलू लागले.
‘तुमच्या भाषणाचा सकारात्मक परिणाम इतक्या लवकर दिसेल असे वाटले नव्हते. आता सोयाबीन उत्पादनात आपण अमेरिका व ब्राझीलला मागे टाकणार.’ त्यावर मंद स्मित करत त्या परतल्या तर घरासमोर प्रचंड गर्दी झालेली. चौकशी केल्यावर कळले की शेतकऱ्यांची बेरोजगार मुले पुजारी वेदशाळेत प्रवेश मिळावा म्हणून नितीनजींकडून शिफारसपत्र घेण्यासाठी आली होती. त्यांना अभिवादन करत घरात गेल्या तर परदेशातील कृषिशास्त्रज्ञांच्या एका भल्यामोठ्या शिष्टमंडळाशी नितीनजी गप्पा मारत बसले होते. त्यांच्या हातात तर्रीपोह्यांची प्लेट होती आणि कान मोठ्या आवाजातील श्री-सूक्त ऐकण्याकडे लागले होते. मग पूर्ण खरीप हंगामभर रोज काहीतरी आनंदवार्ता ऐकण्याचा सिलसिलाच सुरू झालेला. एका बियाणे उत्पादक कंपनीने मंत्राने भारलेले बियाणे बाजारात आणताच त्यावर शेतकऱ्यांच्या उड्या पडलेल्या.
साधारण चारेक महिन्यानंतर अमेरिकेतील एक शास्त्रज्ञ गडकरींची शेती असलेल्या धापेवाड्यातीलच एका शेतकऱ्याच्या शेतात विक्रमी सोयाबीन उत्पादनाच्या प्रयोगाबद्दल माहिती सांगणार आहेत अशी बातमी माध्यमात प्रसिद्ध झाली व श्री-सूक्ताच्या आळवणीत आकंठ बुडालेले सत्तावर्तुळ अस्वस्थ झाले. ठरलेल्या दिवशी त्या शास्त्रज्ञाने योग्य मशागत, माफक खतामुळेच सोयाबीनचे उत्पादन वाढले, मंत्रामुळे नाही हे सप्रमाण सिद्ध करून देताच तेथे हजर असलेले सत्तासमर्थक खवळले व त्यांनी तो कार्यक्रमच उधळून लावला. दुसऱ्या दिवशी ‘हिंडेनबर्गच्या या चेल्याने भारतीय शेतकऱ्यांची दिशाभूल न करता त्वरित देश सोडावा’ अशी मागणी असलेला मथळा माध्यमात मोठा झाला. दोनच दिवसानंतर मंत्रोच्चारामुळे सोयाबीन पिकात वाढ असे फलक मग तातडीने राज्यभर लावण्यात आले.