For I am necessarily a man, and only accidentally am I French. – Montesquieu

‘पर्शियन लेटर्स’ नावाचं छोटेखानी फ्रेंच पुस्तक १७२१ मध्ये अॅम्स्टरडॅम इथून प्रकाशित झालं. त्यावर लेखकाचं नाव नव्हतं. आशय आणि शैलीच्या बाबतीत या पुस्तकाला फ्रेंच साहित्यात पूर्वसुरी नसल्यानं या पुस्तकाचा उल्लेख संदिग्धपणे ‘एकप्रकारची कांदबरी’ असा करण्यात आला. हे पुस्तक म्हणजे युरोपात दीर्घ भ्रमंतीसाठी आलेल्या दोन पर्शियन प्रवाशांचा पत्रव्यवहार ज्यात पात्रांचे बहुविध आणि परस्परविरोधी दृष्टिकोनांना भिडवून संभाषितं, वैचारिक द्वंद्वं यांची बहुधुनता (पॉलिफोनी) निर्माण केली जाते. मनोगतात अनामिक लेखक लिहितो की पुस्तकातील मजकूर माझा नाही. उस्बेक आणि रिका नावाच्या दोन पर्शियन प्रवाशांचा काही काळ सहवास लाभला. पर्शियामधील मित्रपरिवाराशी झालेला त्यांचा पत्रव्यवहार माझ्या हाती लागला. जो मी फ्रेंचमध्ये अनुवाद करून छापला, एवढंच माझं कर्तृत्व. वानगीदाखल काही पत्रं या पुस्तकात प्रकाशित करतोय. मजकूर वाचकांच्या पसंतीस पडला तर उर्वरित पत्रंसुद्धा प्रकाशित केली जातील.

खरं तर १८व्या शतकात निरंकुश राजसत्तेच्या सेन्सॉरशिपपासून आणि धर्मांध शक्तींच्या जाचापासून स्वत:ला वाचवण्यासाठी व्यवस्थेची चिकित्सा करणारं प्रबोधनपर, टीकात्मक आणि शिस्तविघातक साहित्य निनावीपणे, तेही उदारमतवादाची धरती समजल्या जाणाऱ्या अॅम्स्टरडॅम या शहरात जाऊन प्रकाशित करणं सुरक्षित मानलं जाई. ‘पर्शियन लेटर्स’ या पुस्तकात उस्बेक आणि रिका या दोन पर्शियन प्रवाशांनी फ्रेंच समाज, संस्कृती, राजकारण, चालीरीती आणि प्रथापरंपरांविषयी नोंदवलेल्या सूक्ष्म, तटस्थ आणि तिरकस निरीक्षणांसोबतच पर्शियाचं ‘विशिष्ट दर्शन’ घडतं. मोन्तेस्किअनं साकारलेला ‘पर्शिया’ हे फ्रान्सची कठोर चिकित्सा करण्यासाठी तयार केलेलं समाजशास्त्रीय अवजार आहे, की वसाहतवादी ओरिएंटलिस्ट प्रकल्पासाठी रसद पुरवण्याचा प्रकार आहे, याविषयी बरंच लिहिलं गेलं आहे.

घडलं असं की, फार कमी काळातच ‘बेस्टसेलर’ ठरलेल्या या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या जातात. आत्ममुग्ध आणि कूपमंडूक समाजाला बाहेरची दुनिया दाखवणारं, चिमटा काढणारं, अंतर्मुख करणारं, धक्का देणारं, अस्वस्थ करणारं हे पुस्तक पॅरिसच्या उच्चभ्रू अभिजात सॅलोन्स आणि कॅफेंमध्ये चर्चेचा मध्यवर्ती विषय बनतं. वाचकांना बुचकळ्यात पाडणाऱ्या या पुस्तकाचा लेखक कोण, याविषयी तर्क लावले जातात. काही काळानंतर वाचकांना कळतं- हलक्याफुलक्या भाषेत गंभीर मुद्द्यांना हात घालणाऱ्या या तत्त्वज्ञानपर साहित्यकृतीचा लेखक पॅरिसचा कुणी नामवंत नसून पॅरिसबाहेरचा ३२ वर्षीय मोन्तेस्किअ नावाचा मॅजिस्ट्रेट आहे.

फ्रेंच राजा चौदाव्या लुईचा १७१५ मध्ये मृत्यू होऊन त्याच्या ७२ वर्षांच्या निरंकुश राजवटीचा शेवट होतो. त्यानंतर वैचारिक, साहित्यिक आणि कलात्मक क्षेत्रासाठी पूरक वातावरण निर्माण होऊन फ्रेंच प्रबोधनपर्वाची सुरुवात होते. दोन शतकांच्या सांध्यावरील या स्थित्यंतरांचा साक्षीदार मोन्तेस्किअ फ्रेंच प्रबोधनपर्वाचा पहिला महत्त्वाचा तत्त्वज्ञ ठरतो. ‘पर्शियन लेटर्स’ फ्रेंच प्रबोधनपर्वाच्या पहिल्या टप्प्याची धाडसी आणि प्रयोगशील साहित्यकृती समजली जाते. ‘पर्शियन लेटर्स’मध्ये प्रबोधनपर्वाचे कोणते पैलू अधोरेखित होतात, याविषयी प्रस्तुत लेखात चर्चा करू.

उमराव वर्गात जन्मलेला मोन्तेस्किअ (१६८९- १७५५) फ्रेंच प्रबोधनपर्वाचा अग्रदूत समजला जातो. खरं तर १७व्या शतकाच्या अभिजात वातावरणात जडणघडण झालेल्या नेमस्त मोन्तेस्किअवर प्रामुख्याने देकार्त, न्यूटन आणि जॉन लॉकसारख्या विज्ञानवादी आणि उदारमतवादी विचारवंतांचा प्रभाव दिसून येतो, मात्र अभिजात अभिरुचीसह त्याच्या ठायी प्रबोधनपर्वाची नवता, प्रयोगशीलता दिसते. ‘ज्ञान मुक्तीचं साधन असल्याने ज्ञानसाधनेत मनुष्यत्वाचा उत्कर्ष होतो. त्यासाठी शेवटपर्यंत सकारण आणि विनाकारण ज्ञानार्जन केलं पाहिजे,’ ही प्रबोधनपर्वाची ज्ञानविषयक संकल्पना मोन्तेस्किअच्या जगण्यात आणि लिखाणात दिसते. तो म्हणतो की दैनंदिन रहाटगाडग्यातून येणारी शिसारी एक तास जरी चांगलं वाचन केलं तर हमखास दूर होते. मोन्तेस्किअची ज्ञानविषयक संकल्पना स्थितिशील, श्रमरहित आणि परलोकवादी संकल्पनेला छेद देणारी आहे.

कांटच्या भाषेत सांगायचं तर, ‘Ausgange’ अर्थात कष्टपूर्वक बाहेर पडणं ही मोन्तेस्किअच्या विचारांमध्ये ज्ञानाची पूर्वअट ठरते. यात सुखासीन सुरक्षित कोषातून बाहेर पडणं, पूर्वग्रहदूषित धारणांमधून बाहेर पडणं, आयत्या मिळालेल्या अनाकलनीय पण सवयीच्या चौकटीतून बाहेर पडणं अभिप्रेत आहे. उदा.- ‘पर्शियन लेटर्स’च्या पहिल्याच पत्रात उस्बेक त्याच्या मित्राला लिहितो, ‘रिका आणि मी कदाचित पर्शियन लोकांमधील पहिलीच माणसं आहोत जी ज्ञानलालसेपोटी देशाबाहेर पडली; ज्यांनी स्वत:चं सुखासीन जीवन त्यागून ज्ञानाच्या शोधासाठी कष्टदायक भटकंती पत्करली. आमचा जन्म समृद्ध देशात झाला असला तरी आमच्या देशाच्या सीमा म्हणजेच आमच्या ज्ञानाच्या सीमा असाव्यात, या गोष्टीवर आमचा विश्वास नाही.’

उस्बेकचा मित्र रुस्तान उत्तरदाखल दुजोरा देतो, ‘तुझं असं जाणं इस्फहानमध्ये सगळ्यांसाठी चर्चेचा विषय झाला आहे… काहींना वाटतं तुझ्या चंचल स्वभावामुळे तू हे पाऊल टाकलं असावं; तर काहींना वाटतं प्रेमभंग झाला असावा. कुणाचाच विश्वास बसत नाही की तू तुझ्या कुटुंब, मित्र, जन्मभूमी सोडून ज्ञानाच्या शोधात पर्शियन लोकांना अपरिचित अशा परदेशी जगात निघून जाशील.’

मोन्तेस्किअची बौद्धिक जडणघडण बहुआयामी असली तरी त्याच्या लिखाणाच्या केंद्रभागी प्रामुख्याने राजकीय तत्त्वज्ञान आहे. सत्तेचं मूलभूत स्वरूप काय असतं? सत्ता कशी प्रकट होते? सत्ता कशी प्रकट झाली पाहिजे? कायदा म्हणजे नेमकं काय? स्थलकाल सापेक्ष कायद्यांपलीकडे एकमय सामाईक मानवता (common humanity) आणि वैश्विक विवेक (universal reason) प्रतिबिंबित करणारं असं काही नियामक तत्त्व असतं का? या प्रश्नांभोवती त्याचा तौलनिक व्यासंग आकार घेतो. राजकीय क्षेत्राचा विचार सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक क्षेत्रांना वजा करून करता येत नाही, हे त्याच्या समग्रलक्ष्यी पद्धतीशास्त्राचं वैशिष्ट्य आहे.

सार्वजनिक जीवनात मॅजिस्ट्रेट म्हणून गंभीर, रूक्ष अशी प्रतिमा असणाऱ्या मोन्तेस्किअनं ‘पर्शियन लेटर्स’ सारखी मिश्कील, अंतर्मुख करणारी आणि फ्रेंच समाजाच्या मूलभूत धारणांना सुरुंग लावणारी तिरकस साहित्यकृती लिहून फ्रेंच अवकाशात उल्कापातासारखा अचानक प्रवेश केला. अद्भुत संभाषणकौशल्य असलेल्या मोन्तेस्किअला पॅरिसच्या उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित समाजात मानाचं स्थान मिळालं. विद्वज्जडता टाळून विनोदबुद्धी, प्रहसन, तिरकसपणासारख्या शैलींचा वापर केल्यामुळे त्याला मूर्त- अमूर्तामध्ये सहजपणे येरझारा करून सार्वजनिक अवकाशात हस्तक्षेप करता आला.

मोन्तेस्किअसाठी वर्तमान परिस्थितीची कठोर चिकित्सा रचनात्मक तत्त्वज्ञानाची पूर्वअट ठरते. त्यासाठी ‘पर्शियन लेटर्स’मध्ये तो पर्शियन प्रवाशांमार्फत, समाजशास्त्रीय दृष्टिकोनाचा आविष्कार करतो. उदाहरणार्थ, रिका त्याच्या मित्राला लिहितो, ‘‘फ्रेंच राजा युरोपमधील सगळ्यात शक्तिशाली आहे. त्याच्याकडे स्पेनच्या राजासारख्या सोन्याच्या खाणी नसल्या तरी तो त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे. कारण त्याच्या संपत्तीचा स्राोत त्याच्या प्रजेचा मिथ्याभिमान आहे. मिथ्याभिमान ही कधीही न आटणारी खाण असते. हा राजा फार मोठा जादूगार आहे. प्रजेच्या मनावर त्याची कमालीची पकड आहे. तो त्याला हवी ती दिशा प्रजेच्या विचारांना देतो. तो युद्धखोरही आहे. त्यासाठी त्याला फक्त प्रजेच्या मिथ्याभिमानाला चेतवण्याची गरज असते. पैशांना कागद आणि कागदाला पैसा सिद्ध करून, गरीब फ्रेंच जनताच कशी जगात सगळ्यात श्रीमंत आहे, हे पटवून देण्यात त्याला तोड नाही. पण त्याच्यापेक्षा आणखी एक मोठा जादूगार आहे. तो तर मनांवर राज्य करतो. त्याला पोप म्हणतात. तो म्हणतो की तीन म्हणजे वास्तवात एक असतो आणि आपण जो ब्रेड खातो तो ब्रेड नसतो आणि वाइन पितो ती वाइन नसते… अशा अनेक उलटसुलट गोष्टी पटवून देण्यात पटाईत आहे.’

याठिकाणी मोन्तेस्किअ १४वा लुई आणि त्याच्या ७२ वर्षाच्या निरंकुश राजवटीला धार्मिक अधिष्ठान प्रदान करणाऱ्या धर्मसत्तेला लक्ष्य करताना दिसतो. खरं तर L’é tat, c’est moi! अर्थात ‘मी म्हणजेच राज्य आहे!’ म्हणणारा १४वा लुई निरंकुश राजवटीचा समानार्थी शब्द समजला जातो. जणूकाही ईश्वरच राजाच्या माध्यमातून प्रजेवर पित्याप्रमाणे राज्य करतो अशा प्रकारे १४व्या लुईने देवाचा प्रतिनिधी म्हणून दीर्घकाळ राज्य केलं. त्यादरम्यान फ्रान्स दिवाळखोरीत लोटला गेला, पण लुई जिवंत असेपर्यंत कुणाची टीका करायची हिम्मत होत नव्हती. कारण राजावर टीका ही ईश्वरटीकाच ठरणार, असं नेपथ्य त्याच्याभोवती रचण्यात आलं होतं. त्यावर भाबडी आणि देवभिरू प्रजा विश्वास ठेवत असे.

मोन्तेस्किअ हा फ्रान्समधल्या धार्मिक, राजकीय, सामाजिक, पारंपरिक संस्थांचा चिकित्सक पट मांडणारा फ्रेंच प्रबोधनपर्वातील पहिला प्रभावशाली विचारवंत समजला जातो. अभिजात परंपरेची शिस्त The Spirit of Law या त्याच्या संकल्पनात्मक लिखाणात दिसते. नवता, प्रयोगशीलता, समकालीन नागरी समाजाशी संवाद साधण्याची तळमळ ‘पर्शियन लेटर्स’मध्ये दिसते. शैलीत फरक असला तरी आशयद्रव्य समान आहे. त्यामुळे रोजर काइवा लिहितो की, मोन्तेस्किअसाठी गंभीर संकल्पनात्मक ग्रंथ लिहण्याआधी प्रयोगशील साहित्यकृती लिहणं आवश्यक होतं. रुक्ष संकल्पनात्मक लिखाणातल्या मूलभूत मुद्द्यांवर मोन्तेस्किअनं आधीच ‘पर्शियन लेटर्स’मध्ये सोप्या भाषेत लिहून सार्वजनिक चर्चा घडवून आणली.

पुढील लेखात मोन्तेस्किअच्या The Spirit of Law या ग्रंथाची चर्चा करताना राजकीय तत्त्वज्ञानातलं त्याचं रचनात्मक योगदान अर्थात त्याच्या सत्ताविभाजनाच्या सिद्धान्ताची मांडणी केली जाईल. सोबतच, फ्रेंच प्रबोधनपर्वाच्या पहिल्या टप्प्याचं अंतर्विरोधात्मक उदारमतवादी स्वरूप अधोरेखित केलं जाईल. लुई अल्तुसर मोन्तेस्किअचा उल्लेख intellectually revolutionary but politically conservative असा का करतो याविषयीही चर्चा करूच.
शरद बाविस्कर
फ्रेंच साहित्य तत्वज्ञानाचे अभ्यासक
sharadcrosshuma@gmail.com